Site icon InMarathi

यशस्वी कलाकारांच्या आत्महत्यांमागील “ही” कारणं आपल्या मनातील अनेक संकल्पना धुळीस मिळवतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येने संपूर्ण समाजमन ढवळून निघालं आहे. चकचकीत दुनियेतील अत्यंत प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व अशाप्रकारे आपल्या आयुष्याचा अंत करेल याची कल्पनाच कुणी केली नव्हती.

समाजाच्या सर्वच स्तरातून त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अगदी पंतप्रधानांपासून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून सामान्य माणसाने देखील आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

तशा रोजच आपण आत्महत्येच्या बातम्या वाचतो, ऐकतो. त्यावेळी रोजचीच एखादी बातमी असे म्हणून सोडूनही देतो. परंतु एखाद्या सेलिब्रिटींनी आत्महत्या केली तर मात्र ती हेडलाईन होते. याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाभोवती असलेलं ग्लॅमर.

फक्त ग्लॅमरच नाही तर त्यांचा जीवनप्रवास, जो इतरांना प्रेरणा देणारा असतो. त्यांनी केलेले कष्ट आणि केलेली वाटचाल हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

कारण त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न समाजातील अनेकजण करत असतात. एका अर्थाने त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते.

आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये आत्महत्या झाल्याची अनेक उदाहरणे मिळतील. अगदी जुन्या काळातील ‘प्यासा’ सारखा एक मास्टरपीस सिनेमा देणाऱ्या गुरुदत्त पासून आताच्या सुशांत सिंहपर्यंत.

 

indianexpress.com

 

सिल्क स्मिता, जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी, कुलजीत रंधावा, नफिसा अली ही काही त्यातील उदाहरणे. यातील प्रत्येकाच्या आत्महत्येची कारणं ही वेगवेगळी आहेत.

प्रश्न हाच पडतो, की या लोकांना आत्महत्या का करावीशी वाटली असेल? कारण बाहेरून बघणार्‍यांना असं वाटतं की यांच्याकडे तर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे तरीदेखील यांना काय दुःख असेल?

सुशांतच्या बाबतीत म्हटलं जातं की त्याला निराशेने घेरलं होतं, नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. वर ज्यांची नावे दिली आहेत त्यांच्या बाबतीतही कोणत्यातरी कारणाने आलेली निराशा हे त्यांच्या आत्महत्येचे कारण आहे.

 

firstpost.com

 

कमकुवत मनाचे लोक आत्महत्या करतात असा आपल्याकडे समज आहे. पण हेही तितकंस खरं नाही. आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले जाण्यापूर्वी त्यांच्या मनात कितीतरी अधिक दिवस एक प्रकारचे द्वंद्व सुरू असतं.

वैयक्तिक कारणांबरोबरच काही आर्थिक कारणंही असतात. अगदी अचानक मिळालेली प्रसिद्धी, पैसा याचं ओझंही सहन करणे कधीकधी कठीण होतं. तिथूनच खरंतर संघर्षाला सुरुवात होते.

छोट्या छोट्या गोष्टीतून, अपयशातून निराशा येत जाते. निराश राहण्याचा काळ हा वाढत जातो तसेतसे आत्महत्येचे विचार मनात येतात.

 

huffingtonpost.in

 

कधीकधी सतत येणारं अपयश, सिनेमा बॉक्स ऑफिसवर न चालणं हीदेखील कारणे असतात. सोशल मीडियावर होणारी टीका, केलं जाणारं ट्रोल हेदेखील काही जणांना सहन होत नाही. त्यामुळे निराशा येते म्हणूनही काही सेलिब्रिटीज सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसतात.

बहुतेक सेलिब्रिटीज, खेळाडू हे या निराशेच्या गर्तेतून कधीतरी जातातच. अगदी आताच्या आघाडीच्या नायिका प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनीदेखील डिप्रेशनचा सामना केला आहे.

 

QUANTICO – ABC’s “Quantico” stars Priyanka Chopra as Alex. (ABC/Craig Sjodin)

 

जेव्हा सेलिब्रिटीज आत्महत्या करतात तेव्हा मात्र ती फक्त बातमीच राहत नाही. तर त्यावर लोक प्रतिक्रियादेखील येत राहतात. बऱ्याचदा सेलिब्रिटीज हे अनेकांचे आदर्श असतात त्यामुळे त्याचा परिणाम समाजावर होतोच.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मन्रोने जेव्हा आत्महत्या केली तेव्हादेखील समाजावर त्याचे विविध पडसाद उमटले. त्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या निराशेमध्ये आत्महत्या केल्या. आजही मर्लिन मन्रोने आत्महत्या का केली याबद्दल लोकांमध्ये कुतूहल आहे.

त्यावेळेस घेतलेल्या एका सर्वे मध्ये लोकांनी सांगितलं की, ती इतकी मोठी अभिनेत्री असूनही तिला इतकं दुःख असेल आणि आत्महत्या करावीशी वाटत असेल तर आम्ही तरी सामान्य लोक.

 होंगकोंग मध्ये तर सेलिब्रिटीच्या मृत्यूनंतर आत्महत्येनंतर त्याचा समाजावर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म काय परिणाम होतो यावर एक अभ्यास करण्यात आला.

त्यामध्ये २० ते ६० वयोगटाच्या २००० लोकांचा समावेश होता. सेलिब्रिटीजच्या आत्महत्येनंतर लोकांना नेमकं काय वाटतं यावर प्रश्नावली तयार करण्यात आली होती.

त्यामध्ये सेलिब्रिटीज आत्महत्येनंतर तुम्ही डिस्टर्ब झालात का? आत्महत्येकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला का? असे काही प्रश्न विचारण्यात आले.

त्यापैकी ३८ टक्के लोक हे सेलिब्रिटीजच्या आत्महत्येनंतर डिस्टर्ब होते. ४३ टक्के लोकांचा आत्महत्येकडे बघायचा दृष्टिकोन बदलला.

६८ लोकांना सेलिब्रिटीजच्या आत्महत्येने कोणताच फरक पडणार नव्हता आणि त्यांना आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नावर उत्तर आहे असं वाटत नव्हतं.

आताच्या सुशांतच्या आत्महत्येनंतर देखील सोशल मीडियावर याबाबत बोलणं सुरू आहे. म्हणजे त्याने आत्महत्या का केली? कारण काय?

 

theconversation.com

 

याचा ऊहापोह करतानाच बऱ्याच ट्विटर, फेसबुक ,इंस्टाग्राम या सगळ्यांवरच्या पोस्ट वाचल्या, की लक्षात येते की लोक आता आपल्या मनाचाही विचार करताहेत.

कालपासून याविषयी बोलणं सुरू आहे. बरेचजण तुमच्या मनात काय आहे हे तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुमचं जो ऐकून घेईल त्या व्यक्तीला सांगा असं म्हणत आहेत.

कसलीही चिंता काळजी असेल तर व्यक्त व्हा, संवाद साधा याविषयीच्या चर्चादेखील सोशल मीडिया वरून होताना दिसत आहेत.

त्याचबरोबर एखादा अडचणीत आहे आणि काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याची टिंगल-टवाळी न करता त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐका.

जेणेकरून जर समोरची व्यक्ती निराशेत असेल तर आपलं कुणीतरी ऐकणार आहे या भावनेने देखील समाधानी होते. अशाही चर्चा सध्या सुरू आहेत आणि ही खरोखरच एक सकारात्मक गोष्ट आहे.

 

addiction center

 

आत्महत्येबाबत जनजागृती होत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. केवळ सेलिब्रेटीज आहेत, काहीही करतात! असं न म्हणता लोक यावेळेस प्रत्येकाच्या मनाचा विचार करत आहेत.

हीच सकारात्मकता आता कायम ठेवण्याची गरज आहे. कारण कोणताही जीव इतका स्वस्त नसतो, जीवन अनमोल आहे.

कितीही वलयांकित व्यक्ती असली प्रसिद्ध असलेली तरीही पहिल्यांदा ती एक माणूस असते. माणूस म्हणून असणाऱ्या सगळ्या भावना, चिंता, काळजी, आनंद त्यांनादेखील असतो.

एखादी अशी दुर्घटना घडली तर त्याचे पडसाद समाजात उमटणारच आहेत. परंतु आता कलाकारांनी देखील त्यांच्या सिनेमातील प्रेरणा देण्याच्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यातही अमलात आणाव्यात. खरोखरंच लोकांचे आदर्श व्हावे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version