Site icon InMarathi

बहुचर्चित मनी हाईस्ट सिरिजच्या “त्या” मास्कच्या मागच्या उत्तम पण “विक्षिप्त” चित्रकाराची कहाणी!

salvador dali featured inmarathi

pulse.ng

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लाल कपड्यात स्पेन ची ‘रॉयल मिंट’ लुटण्यासाठी एक टोळी येते.या टोळीतल्या लोकांची नावे शहरांच्या नावांपासून ठेवण्यात आलेली असतात.

बर्लिन, टोकियो, मॉस्को, डेनवर, हेलसिंकी, रियो, ओस्लो, नैरोबी. ही लूट एका प्राध्यापकच्या कटाचा एक भाग असतो.

लोकांच्या, समाजाच्या दृष्टीने ही सर्व लोकं अपयशी असतात परंतु, या लोकांना ते प्रवाहाच्या विरोधात पोहत असल्याचा विश्वास असतो!

व्यवस्थेच्या विरोधात लढण्यात ह्या टोळीला काही गैर वाटत नाही.स्वतःला जरी ते रॉबिनहूड समजत असले तरी राज्याच्या दृष्टीने ते अपराधी आहेत.

ह्या सर्वांची नावे वेगवेगळी आहेत परंतु ते एकच दिसतात कारण सर्वांनी एकाच प्रकारचं मास्क घातलं आहे!

 

universalnews.org

 

चोरी साठी मधे आल्यावर तिथलं एक पेंटिंग पाहून त्यातला डेनव्हेर विचारतो “या पेंटिंग मध्ये विचित्र मिश्या असलेला माणूस कोण आहे”?

मॉस्को त्याला उत्तर देतो ” दाली, एक स्पेनिष रंगारी!” डेनव्हेर त्यावर प्रतिप्रश्न करतो “रंगारी? रंग देणारा रंगारी??”

मॉस्को ला पण दाली बद्दल फारशी माहिती नसते तो बळच “हो” म्हणून उत्तर देतो.

हा सगळा प्रसंग दाखवला आहे सुप्रसिद्ध मालिका ‘मनी हाईस्ट’ मधे! यात दाली चा उल्लेख आला आहे परंतु तो केवळ चित्रकार नव्हता.

साल्वादोर दाली सणकी, विक्षिप्त, स्वमग्न म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला. परंतु आज जर त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश ,सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.

 

nbcnews.com

 

जाणून घेऊया या ‘वेड्या’ कालाकाराबद्दल.

 

डाडा आंदोलन :

पहिल्या जागतिक महायुद्धा नंतर युरोपात कलेचा नव्याने जागर होऊ लागला.

फ्रेंच मधल्या ‘डाडा’ शब्दाचा अर्थ ‘हॉबी हॉर्स’ जसं आपल्याकडे हिंदीत ‘लकडी की काठी काठी पे घोडा’ म्हटलं जातं तसच काहीसं याचं वर्णन करता येईल.

त्याकाळी युरोपात कलेच्या आंदोलनाला ‘डाडा’ नाव दिल होतं. तेव्हा बहुतांश कलाकारांवर कम्युनिझम चा तगडा प्रभाव होता. यातल्या काही उनाड कलाकारांनी सौंदर्याच्या प्रचलित समजुतींच्या चिंधड्या उडवायला घेतल्या.

त्यांच्या मते पैसा म्हणजेच सर्वस्व मानणाऱ्या या समाजाचे तर्क निराधार आहेत कारण प्रत्येक गोष्टीत ते लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करतात!

या कलाकार मंडळींच्या मते प्रचलित सौंदर्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी अकल्पित आहे.. काय आहे ते माहीत नाही पण ते वास्तव आहे!

ज्याला हा समाज अतार्किक, अगम्य किंवा फालतू समजेल पण ते आहे. त्यांचे विचार प्रखर राष्ट्रवाद, उग्रता, हिंसा यांचा विरोध करणारे होते.

 

widewalls.ch

 

पण तरी प्रश्न येतो की या सर्वाचा ‘लाकडाच्या काठि वरल्या घोड्याशी’ म्हणजे डाडा शी काय सबंध?

त्याकाळी जर्मनीतील एक उनाड कलाकार रिचर्ड ह्यूलसेनबेक ने कागद कापण्याचा सुरा उचलून समोर पडलेल्या एका पुस्तकातील पानावर खुपसला!

या सुऱ्याच्या खाली जो शब्द आला तो होता ‘डाडा’ हो, याचाही काही तर्क लागत नाही परंतु हे सबंध आंदोलनच अतार्किक होतं.

बऱ्याच लोकांना हे आंदोलन लहान मुलासारख निष्पाप वाटायचं.सगळ्या बिघडलेल्या कलाकारांनी या आंदोलनात भाग घेऊन बराच गोंधळ घातला.

पुढे कलाकारांनी या आंदोलनाला पुढच्या स्तरावर नेलं ज्याला ‘सिरियलीजम’ म्हटलं जायचं!

 

सिरियलीजम :

‘सिरियलीजम’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो वास्तवापेक्षा ही अधिक खरं.

१९३६ च्या दरम्यान लंडन मधल्या एका संग्रहालयात ‘सिरियलीजम’ वर एक मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

सल्वोदोर दाली ला यात व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आले. या कार्यक्रमात भाषण करण्यापूर्वीच दाली चा बोलबाला त्याने घातलेल्या कपड्यावरून झाला.

हे व्याख्यान देण्यासाठी दाली समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणाऱ्या जीवरक्षकांचे कपडे घालून आला होता!

डीप सी डायव्हिंग सूट, डोक्यावर हेल्मेट, हेल्मेट वर श्वास घेण्यासाठी एक छिद्र आणि एका हातात बिलियर्ड्स ची काठी तर दुसऱ्या हातात कुत्र्याला बांधण्याचा लगाम!

 

theguardian.com

 

जेव्हा दाली ला विचारण्यात आलं की हा काय पेहराव आहे तेव्हा त्याचं उत्तर होतं ” मी मनुष्यांच्या समुद्रात खोलवर बुडतोय!”

दाली चं हे विक्षिप्त वागणं त्याची ओळख होती. एखाद्या प्रदर्शनात महागड्या कार भर पत्ताकोबी भरून घेऊन येणं,कधी स्वतःच्या घरी संभोग प्रदर्शन आयोजित करणं.

एकंदर हा माणूस अगम्य आणि त्याची कला सुद्धा तशीच अकल्पित, अतार्किक!

११ मे १९०४ ला दाली चा जन्म झाला. त्याच्या जन्मापूर्वी काही महिन्यांपूर्वीच त्याच्या भावाचं निधन झालं होतं त्यामुळे त्याचच ‘साल्वादोर’ नाव त्याला देण्यात आलं.

मोठेपणी दाली स्वतःच्या जन्माबद्दल म्हणतो

“आम्ही दोघे(तो आणि त्याचा मृत मोठा भाऊ) पाण्याच्या दोन थेंबासारखे होतो.अगदी सारखे. फक्त थेंबाच्या आकारात आम्ही विभिन्न दिसत असू . कदाचित तो माझा मागील जन्म होता ज्यात मी अधिक परिपूर्ण होतो!”

दाली ने नंतर आपल्या मृत भावाचं पोट्रेट सुद्धा काढलं. ‘पोट्रेट ऑफ माय डेड ब्रदर ‘ या नावाने ते प्रसिद्ध आहे.

 

popgi.com

 

दाली चे वडील राफायल एक करारी ,नास्तिक प्रवृत्तीचे वकील होते.आपल्या मुलांचं पालन-पोषण कडक पद्धतीने करण्यावर त्यांचा भर होता जेणेकरून दुर्गुणांपासून त्यांचा बचाव व्हावा.

त्याची आई मात्र दयाळू व्यक्ती होती.आपल्या आई विषयी सांगताना दाली म्हणतो

‘आईचं दयाळू असणं म्हणजे माणसाच्या सभोवताली असलेल्या ऑक्सिजन सारखं आहे’

आई चं सान्निध्य दाली ला फार काळ लाभू शकलं नाही. दाली १६ वर्षांचा असताना त्यांच्या आईच निधन झालं नंतर दालीच्या वडिलांनी त्याच्या मावशी सोबत विवाह केला.

दाली ला मावशी आवडायची पण आईच्या आठवणीने तो दुःखी व्हायचा अन वडिलांचा राग यायचा.

पुढे कॉलेज शिक्षणासाठी दाली माद्रिद ला गेला. कला शाखेसाठी त्याने प्रवेश घेतला.अर्थात तो पदवी पूर्ण करू शकला नाही.

कधी विद्यार्थी आंदोलनात सहभाग घे,कधी परीक्षा देण्याचा विरोध कर असे वेगवेगळे प्रयोग केले. याशिवाय डाडाइजम,क्यूबीजम ,सिरिलीयजम प्रकार चालूच होतो.

याचदरम्यान त्याची मैत्री लोर्का सोबत झाली.फेद्रीको गरसिया लोर्का – कवी. पुढे नंतर यांच्या मैत्रीत वितृष्ट आलं.दाली ने कारण सांगितलं की लोर्का चे प्रणया संबंधी विचार मला पटण्यासारखे नव्हते.

 

pride.com

 

पुढे या डाडा आंदोलनातून दाली हळुहळु बाहेर पडला! आंदोलनात राजकारण होणं योग्य नाही हे कारण त्याने सांगितलं. पुढे पुढे तर आंदोलनकर्त्यांची तो खुले आम खिल्ली उडवू लागला.

या संदर्भात त्याचं एक विधान बरंच गाजलं, “The difference between the Surrealists and me is that I am a Surrealist”

या दरम्यान त्यानी काढलेलं एक चित्र बरंच प्रसिद्ध झालं! ‘मेटामॉर्फसिस ऑफ नारसिसस’ या पेंटिंग वरून समीक्षक वर्गाने दाली ला आत्ममोहित व्यक्तीची उपमा दिली.

दाली आता प्रगतिशील राहिला नसून तो भयभीत झाला आहे. त्याला हिटलरवादी, फॅसिस्ट, फ्रँको चा समर्थक इत्यादी वैगेरे ठरवण्यात आले.

फ्रँको हा स्पेन चा होता. विसाव्या शतकातील चौथ्या दशकात स्पेन मधे नागरी युद्ध पेटले होते. फ्रँको त्यात एका गटाचे नेतृत्व करत होता.

परंतु कम्युनिस्ट गट, फ्रँको विरोधात होते. दाली कम्युनिस्ट असूनही गप्प होता. त्याचं हे चूप बसणं फ्रँको ला पाठिंबा असल्याचं मानलं गेलं.

फ्रँको जर्मनीच्या हिटलरच्या मदतीने युद्ध जिंकला आणि आपल्या बऱ्याच विरोधकांना त्याने मारून टाकलं त्यात एक लोर्का सुद्धा होता.

दाली स्पेन बाहेर होता तेव्हा त्याला लोर्का ची बातमी कळाली. त्याची पहिली प्रतिक्रिया होती ‘ओले’ या स्पेनिष शब्दाचा अर्थ होतो ‘ खूप छान’!

लोर्का ने दाली वर प्रेम केलं. हे एकतर्फी प्रेम होतं पण लोकं जोपर्यंत दाली चित्र काढत राहिला त्यात लोर्का चा संदर्भ शोधत राहिले.

 

christies.com

 

लोर्का मात्र दाली च्या प्रेमात आकंठ बुडाला होता इतका की त्याने त्यावर बऱ्याच कविता सुद्धा केल्या होत्या.

 

दालीची प्रेमकहाणी :

लोर्का च दाली वरील प्रेम एकतर्फी होतं. पण दाली ने सुद्धा कोणावर तरी प्रेम केलं होत.

दाली लहान असताना त्याच्या हातात एक पुस्तक आलं. ते पुस्तक लैंगिक विकारसंदर्भात होतं. स्त्री च्या लैंगिक अवयावपासून होणाऱ्या रोगांसंदर्भात त्यात बिभीत्स सचित्र वर्णन केले होत.

ते सर्व पाहून छोट्या दाली च्या मनात भीती बसली. प्रणयाच्या पारंपरिक पद्धत्ती विषयी त्याच्या मनात अढी निर्माण झाली.

त्याच्या मनातली ही भीती पुढे किशोरवस्थेत, तरुणपणी सुद्धा कायम राहिली.

पुढे जेव्हा फ्रॉइड च्या कार्याविषयी दाली ला माहिती मिळाली तेव्हा त्याचे प्रणयासबंधी चे विचार, गैरसमजुती बदलून गेल्या. मनोविश्लेषक जगात सिगमंड फ्रॉइड मोठं नाव होतं.

याच दरम्यान त्याने एक पोट्रेट रेखाटलं ज्याची चर्चा सर्वदूर होऊ लागली. माद्रिद च्या मैफिलीत याची चर्चा होऊ लागली.

एके दिवशी त्याच्या टोळीतला एक सभासद कवी पॉल इलुवर्ड आपली पत्नी गाला सोबत हे पोट्रेट पाहण्यास आला.

चित्र पाहून बऱ्याच भावना समोर येत होत्या सेक्स, रिजेक्शन, सेडिक्शन. दाली च लक्ष मात्र गाला वर खिळून राहील होतं.

पॉल ने पेंटिंग पाहून विचारलं की याचं नाव काय ठेवलंस? दाली ने नाकारार्थने मान हलवली.

कविमनाच्या पॉल ने त्याचं नामकरण केलं ‘द लुगुब्रियस गेम’ म्हणजे एक दुःखद खेळ!

 

slideplayer.com

 

दाली आणि गाला यांच्या भेटी वाढल्या यावेळेस प्रेमाची ओढ दोन्ही बाजूने होती. गाला त्याची प्रेरणा बनू लागली. त्यांच्या जवळकीचे किस्से वर्तमानपत्रात छापून येऊ लागले.

गाला च्या सान्निध्यात आल्यावर दाली ची ख्रिश्चन समजुती वरील रुची वाढू लागली. त्यावरच त्याने एक चित्र काढलं ‘सेक्रेड हार्ट ऑफ जीज़स क्राइस्ट’

चित्राविषयी बोलताना दाली म्हणाला –

“माझ्या साठी या सगळ्या मजेच्या गोष्टी आहेत. तुम्हाला मजा कुठच्याही गोष्टीत मिळू शकते . कधी कधी तर गंमत म्हणून मी माझ्या आईच्या चित्रांवर थुंकतो”

जेव्हा दाली चे वडील रफायल नी ही बातमी वाचली तेव्हा त्यांचं पित्त खवळलं. आधीच आपल्या मुलांचं एका विवाहित स्त्री सोबत चाललेल्या संबंधाच्या बातम्यांनी ते चिडले होते.

या प्रकाराने होणाऱ्या सामाजिक बदनामी ने रफायल वैतागले होते. त्यात परत दाली ने वरील वक्तव्याने त्यांचा राग अजून वाढवला.

शेवटी त्यांनी दाली ला आपल्या घरातून धक्के देऊन हाकलला आणि संपत्ती मधून सुद्धा बेदखल केलं.

नंतर दाली गाला सोबत एका मच्छीमाराच्या खोलीत राहू लागले.

 

thedaliuniverse.com

 

पेंटिंग बनवून त्याच्या विक्रीतून तो एक एक खोली खरेदी करत गेला लवकरच खूप साऱ्या पेंटिंगमधून समुद्र किनारी मोठी इमारत तयार झाली!

पुढे रफायल ने सुद्धा दाली ला स्वीकारलं. गाला च्या साथीने आपल्या सणकि पणाला एक आधार मिळल्यासारखं दाली ला वाटायचं.

दाली ने १९३१मध्ये बनवलेली पेंटिंग त्याचं सर्वात लोकप्रिय चित्र होतं. याचं शीर्षक होतं ‘द परसिस्टेंस ऑफ मेमरी’ काळाच्या संदर्भाने हे चित्र रेखाटलं होत.

यातून दाली सांगू इच्छित होता की काळ हे एक बनावटी प्रकार आहे.

 

बेचैन करणारी चित्रे :

दाली ची ‘हटके’ चित्रे पाहून ‘द न्यूयॉर्कर’ ने त्याच्या चित्रांचं अगदी योग्य वर्णन केलं होतं.

“बर्फात गोठलेल्या, रात्रीच्या वाईट स्वप्नांना हा माणूस जागेपणी आपल्या डोळयांसमोर उभं करतो!”

दाली च्या कला विश्वात कोमलता, सामान्य भाव- भावना यांना स्थान नव्हतं. त्याच्या लैंगिकतेविषयी च्या संकल्पना वर फ्रॉइड च्या विचारांचा प्रभाव होता.

याच विषयावर त्याने ‘डायलॉग ऑन द बीच’ नावाचं एक वादग्रस्त चित्र रेखाटलं.

हे चित्र पाहून बार्सिलोना संग्रहालयातील अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली! इतकं भडक लैंगिक तेचा प्रसार करणाऱ्या चित्राला प्रेक्षकांचा कडवा विरोध होईल या कारणाने त्यांनी ते चित्र प्रदर्शनात लावण्यास मनाई केली.

१९३८ च्या सुमारास दाली ८२ वर्षीय फ्रॉइड ला भेटला. त्यांच्याशी चर्चा करून दाली ने फ्रॉइड च्या सिद्धांतावर चित्र रेखाटण्यास सुरुवात केली.

 

dangerousminds.net

 

जेव्हा लोकांनी फ्रॉइड ला दाली विषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले –

“दाली हा एक विलक्षण सणकी माणूस आहे.त्याची सणक सर्वोच्च स्तरावर आहे!”

जेव्हा दाली ने हे ऐकलं तेव्हा तो खुश झाला. कारण म्हणजे एक तर जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो ने त्याला नाकारलं होतं. कारण तो फ्रँको च्या बाजूला होता.

दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होण्याच्या पूर्वी दाली फ्रान्स मध्ये होता. मोठ्या प्रयत्नाने त्याने पोर्तुगाल च्या वकीलातीतून व्हिसा मिळवला आणि तो गाला सह समुद्री मार्गाने थेट अमेरिकेला पोचला.

इथेच बहुचर्चित पेंटिंग ‘फेस ऑफ वॉर’ चितारली. युद्धाचे दुष्परिणाम दाखवणाऱ्या ह्या चित्राने दाली चा एक नवीन चेहरा जगाला दिसला.

 

thedailystar.net

 

बहिणीच्या पुस्तकावरून विवाद :

दाली ची बहीण एना मारिया लिखित ‘सल्वादोर दाली सीन बाई हिज़ सिस्टर’ पुस्तक १९६० ला प्रकाशित झालं. हे पुस्तक वाचून साल्वादोर दाली भडकला.

वर्षभरापूर्वीच रफायल चं निधन झालं होतं. बापाने अगोदरच संपत्तीतून बेदखल केलं होतं. जे पेंटिंग हाउस होत त्या वरून कोर्टात खटला चालू होता.

एके दिवशी तर भर कोर्टात दाली ने वकिलाला बेदम मारहाण केली.

तर हे पुस्तक वाचून दाली भडकण्याचं कारण म्हणजे या पुस्तकात गाला विषयी बऱ्याच उलट सुलट गोष्टी लिहण्यात आल्या होत्या.

कोणी आपल्या पत्नीची बदनामी करावी हे दाली ला सहन झालं नाही. परिवारातील एकमात्र व्यक्ती सोबतचे नाते-सबंध याने संपृष्ठात आले.

प्रेमाचा शेवट :

गाला ने दाली च्या विक्षिप्त पणा बराच काळ सहन केला. परंतु तिने दाली ची साथ दिली. मात्र ६० च्या दशकानंतर गाला च्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला.

दाली चं विचित्र, अमानवीय रूप जे गाला ला पूर्वी भुलवत असे ते आता भयाण वाटू लागलं होतं. दाली अतिरंजित वागत असे.

कधी कधी कित्येक आठवडे स्वतःला खोलीत कोंडून घेत असे किंवा इतरांना बंदी बनवून त्यांचं निरीक्षण करत बसत. पण आता गाला ला या माणसाची नजर सुद्धा नकोशी वाटू लागली होती.

 

invaluable.com

 

शेवटी दाली ने गाला ला आपला किल्ल्यासारखा दिसणारा बांगला देऊ केला.गाला तिकडे राहण्यास गेली परंतु तिने अट ठेवली की जेव्हा दाली ला या घरी यावेसे वाटेल तेव्हा त्याला गाला ची लिखित परवानगी घ्यावी लागेल.

दाली केवळ एकदाच त्या बंगल्यात गेला ..पूर्ण नशेत धुंद! गाला त्यावेळी गंभीर आजारी होती. ८७ वयाची गाला त्या दरम्यान मरण पावली. ते साल होतं १९८२.

गाला गेल्यानंतर दाली ची अवस्था अर्धमेली झाली होती. त्यानं अन्न-पाणी वर्ज्य केलं त्यातच त्याला पार्किन्सन्स झाला.

ज्या उजव्या हाताने प्रचंड लोकप्रिय चित्रे काढली तो हात प्रचंड कंपाने हलू लागला होता.

त्यातच एके दिवशी त्याच्या घराला आग लागली तो त्यातून बचावला आणि आपल्याच गल्लीत जे संग्रहालय त्यानेच बनवलं होतं तिथे आणला गेला.

जानेवारी १९८९ मधे याच ठिकाणी त्याचे निधन झाले.

मृत्यू नंतर सुद्धा विवाद :

दाली आणि विवाद या कदाचित एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात. मृत्यू नंतर सुद्धा वाद- विवादाने त्याची पाठ सोडली नव्हती. २०१७ मध्ये त्याची कबर खोदण्यात आली!

कारण , एका महिलेने दावा केला होता की दाली तिचा पिता आहे. प्रकरण कोर्टात गेलं ,मीडियात बोल-बाला होऊ लागला. शेवटी डीएनए सॅम्पल घेऊन सोक्ष-मोक्ष लावण्याचा आदेश कोर्टाने दिला.

त्यानुसार दाली ची कबर खोदण्यात आली. त्याचदरम्यान दाली च्या कलेचे प्रेमी बाहेर निदर्शने करत होते. त्यांचा याप्रकारे दाली ची कबर खोदण्यास विरोध होता.

त्या दरम्यान दाली च्या एक जुन्या चित्राची आठवण लोकांना झाली. ह्या चित्रांचं नावं होतं ‘द रेंनी टॅक्सी’

टॅक्सी च्या छतावरील छिद्रातून मध्ये पाणी येत आहे .टॅक्सी मध्ये पहिल्या आसनावर एका पुरुषाचा पुतळा आणि मागल्या आसनावर महिलेचा पुतळा ठेवलेला आहे. ह्या दोन्ही पुतळ्यातून वेल, वनस्पती टॅक्सी बाहेर येत आहे.

 

instruct.uwo.ca

 

शेवटी डीएनए सॅम्पल न जुळल्याने कोर्टाने त्या महिलेचा दावा खोटा ठरवला.

साल्वादोर दाली जरी विक्षिप्त असला तरी त्याच्या पेंटिंग कला विश्वात आजही स्थान राखून आहे. स्वतःविषयी बोलताना तो म्हणायचा

“माझ्यात आणि सणकी व्यक्तित फक्त एकच फरक आहे तो म्हणजे मी सणकी नाही!”

स्वतःच्या व्यसनाधीनतेवर तो म्हणाला होता -“मी ड्रग घेत नाही तर मी स्वतःच ड्रग्स आहे”

 

redditt.com

 

मृत्यू विषयी सुद्धा त्याचे विचार होते की, “जिनियस लोकांना मरण्याचा अधिकार नसतो”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version