“ह्या” खेळाडूचा खेळ वेळीच ‘बहरला’ असता, तर भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनी गवसला नसता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
१८ मार्च २०१८ निदाहस ट्रॉफी ची फायनल मॅच सुरू होती. त्या सामन्यात बांगलादेश ला भारताने नाही तर दिनेश कार्तिक ने हरवलं! कार्तिक खेळायला येई पर्यंत भारताने सामना गमावल्यात जमा होता.
परंतु दिनेश कार्तिक फलंदाजीला आला आणि त्याने चमत्कार केला. शेवटच्या चेंडू वर षटकार लगावून त्याने भारतासाठी विजयश्री खेचून आणली! त्याने ८ चेंडूत २९ धावा कुटल्या.
दिनेश कार्तिक ११ वर्ष भारतीय संघाचा भाग राहिला पण त्याच्या वाट्याला अत्यंत कमी सामने आले.अर्थात आपण चर्चा करत आहोत ते टी-ट्वेंटी सामन्यासंदर्भात.
एकूण १३ वर्षात केवळ ३२ मॅच! आणि त्यातला एक सामना ‘वर्ल्ड इलेव्हन’ चा!
त्याहून मजेदार गोष्ट म्हणजे भारतीय संघाच्या पहिल्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्याचा ‘मैन ऑफ द मैच ‘ होता तो दिनेश कार्तिकच!
दिनेश कार्तिक जर त्याच्या खेळातलं सातत्य टिकवू शकला असता तर कदाचित महिंद्रसिंग धोनी चा भारतीय संघात प्रवेश होणं कठीण गेलं असत.
सध्या दिनेश,कोलकाता नाईट रायडर संघाचं कर्णधारपद भूषावतो आहे.
भारताने आपला पहिला ट्वेंटी-ट्वेंटी सामना १ डिसेंबर २००६ ला जोहान्सबर्ग मध्ये दक्षिण अफ्रिके विरुद्ध खेळला. तेव्हा त्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग कप्तान होता.
आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात १२६ रन बनवले!
सध्याच्या काळात हे जरी किरकोळ वाटत असले तरी त्या वेळी ६ च्या वरचा रन-रेट असलेल्या धावसंख्येचा पाठलाग करणं मोठी गोष्ट होती!
सुरवातीला सेहवाग ने सावध खेळी केली पण तरी आपल्या दोन्ही विकेट लवकर तंबूत परतल्या नंतर आलेला माही सुद्धा शून्यावर बाद झाला.
नंतर बॅटिंगला आलेल्या दिनेश कार्तिक ने टिकून खेळ केला. त्याने २८ चेंडूत ३१ धावा करून भारताला पहिल्याच ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात विजय मिळवून दिला! सामनावीर अर्थातच दिनेश होता.
या नंतर ११ वर्षे ३ महिने १७ दिवसानंतर, १८ मार्च २०१८ .. कार्तिक ने परत त्याचं कसब जगाला दाखवून दिलं.
शेवटच्या बॉल वर षटकार खेचून जिंकलेला सामना क्रिकेट चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहणाऱ्या सामन्यांपैकी एक झाला.
तो पर्यंत कार्तिक क्रिकेट रसिकांच्या विस्मरणात गेल्यात जमा होता.
सामना जिंकल्यावर १८ मार्च ची रात्र आणि १९ मार्च ला भारतात इंटरनेट वर सर्वाधिक शोधण्यात आलेलं नाव होतं दिनेश कार्तिक!
दिनेश कार्तिक च प्रचंड कौतुक झालं. हा त्याच्या कारकिर्दीचा १९ वा सामना होता आणि टीम इंडिया चा ९९ वा सामना.
११ वर्षे ऍक्टिव्ह असून सुद्धा इतके कमी सामने खेळणारा हा एकमेव खेळाडू असावा. पण या मागे केवळ एकच कारण होतं ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी.
दिनेश कार्तिक स्वतःच्या प्रतिभेला कधीच योग्य न्याय देऊ शकला नाही.
त्याचा खेळ जर वेळीच बहरला असता तर कदाचित महिंद्र सिंग धोनी भारतीय संघात आगमन उशिरा झालं असत कारण कार्तिकला, धोनी च्या अगोदर संघात सामील होण्याची संधी मिळाली होती.
दिनेश ने टेस्ट क्रिकेट मध्ये पदार्पण ३ नोव्हेंबर २००४ ला केलं वन-डे मध्ये तर त्या पूर्वीच ५ सप्टेंबर २००४ ला आला होता. परंतु आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो केवळ एक धाव करू शकला.
टेस्ट मध्ये पहिल्या डावात १० तर दुसऱ्या वेळेस केवळ ४ धावा त्याने काढल्या! त्याच्या यानंतर सुद्धा सुरू राहिलेल्या अपयशाने धोनी चा संघात येण्याचा मार्ग प्रशस्त केला.
महेंद्रसिंग धोनी ने पहिला एकदिवसीय सामना २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेश विरुद्ध चितगाव येथे खेळला. अर्थात धोनी पण पहिल्या सामन्यात फार काही करू शकला नाहीच.
पहिल्या सामन्यात तर तो चक्क शून्यावर बाद झाला त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात मिळून त्याला केवळ १९ धावा काढता आल्या.
या खराब कामगिरी नंतर सुद्धा पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी धोनी ची संघात निवड झाली आणि नंतर इतिहास रचला गेला.
या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात जो धोनीचा पाचवा सामना होता त्यात माही ने १४८ धावा काढल्या.
तेव्हापासून ते आजतागायत ही रन मशीन संकटमोचक म्हणून भारतीय संघाच्या मदतीला वेळो वेळी धावून आली आहे.
९० टेस्ट,३५० एकदिवसीय आणि ९८ टी-ट्वेंटी सामने धोनी आजपर्यंत खेळला.टेस्ट क्रिकेट मधून त्याने निवृत्ती घेतली आहे परंतु वन-डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी मधे अजून धोनी चा प्रवास सुरु आहे.
दुसऱ्या बाजूला दिनेश कार्तिक मात्र संघात येता-येता राहून गेला. उत्तम यष्टीरक्षक आणि दमदार फलंदाजी च्या जोरावर महेंद्रसिंग धोनी संघाची गरज बनत गेला.
त्यामुळे साहजिकच बाकी कुठल्या यष्टीरक्षक-फलंदाजाला कुठला वाव शिल्लक राहिला नाही.
दिनेश कार्तिक,पार्थिव पटेल हे गुणवत्ता असून सुद्धा कायम संघाबाहेर राहिले किंवा निवड झाली तरी कायमस्वरूपी राखीव जागेवर!
दिनेश कार्तिक ची क्रिकेट मधली एकूण कारकीर्द सुद्धा खूप चिमुकली दिसते. एकूण १६ वर्षांत केवळ २६ टेस्ट,९४ एकदिवसीय आणि ३४ टी-ट्वेंटी सामने त्याच्या वाट्याला आले.
त्यातही टेस्ट मध्ये तो केवळ एकच शतक झळकवू शकला. वन-डे मध्ये तर एक पण शतक त्याच्या नावावर नाही.
उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची जगाची रीत आहे .त्या मोठ्या प्रकाशासमोर बाकी कुठलाही प्रकाश छोटाच दिसणार.
२०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून धोनी नंतर त्याची निवड झालेली पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं!
ताज्या-दमाचा ऋषभ पंत समोर असताना, दिनेश कार्तिक ला संधी देण्यावरून बरीच टीका ही झाली.
दुर्दैवाने दिनेश कार्तिक सुद्धा या संधीचे सोने करू शकला नाही त्याला वर्ल्ड-कप मधे ३ सामने खेळण्याची संधी मिळाली पण यात तो एकूण १९ धावा करू शकला!
परिणामी पंत च्या चाहत्यांना आयतेच कोलीत मिळाले. वन-डे मधल्या अपयशाने त्याच्या ट्वेंटी-ट्वेंटी मधील कसब झाकोळलं गेलं!
येणारा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा दिनेश ने बोलून दाखवली आहे.आपल्या कामगिरी विषयी बोलताना तो म्हणतो,
” मागच्या वन-डे वर्ल्ड कप मध्ये माझी कामगिरी वाईट होती .पण माझ्या टी-ट्वेंटी कामगिरी कडे दुर्लक्ष करून मला संघातून बाहेर काढण्यात आलं.
पण मला वाटतं की किमान टी-ट्वेंटी मध्ये तरी मी धोनीच्या जागेवर खेळू शकेन.केकेआर आणि तमिळनाडू संघासाठी गेले कित्येक वर्षे मी ही भूमिका निभावत आहेच!
त्यामुळे जर संधी मिळाली तर आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप मधे सहभागी होण्याची माझी मनापासून इच्छा आहे”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.