“हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं” : सध्या रोज कॉलवर ऐकू येणाऱ्या या आवाजामागची कहाणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या कोणालाही फोन केल्यावर पहिल्यांदा एक आवाज आपल्याला ऐकू येतो आणि तो असतो कोरोनाव्हायरसच्या संदर्भात माहिती सांगणारा….
त्यात एका महिलेचा आवाज येतो त्यात ती हिंदीत असं म्हणते, “कोरोना वायरस यानी कोविड-19 से आज पूरा देश लड़ रहा है. मगर, याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं. उनसे भेदभाव न करें. उनकी देखभाल करे. और इस बिमारी से बचने के लिए जो हमारी ढाल है याने की डॉक्टर, पोलीस उनकी सहाय्यता करे. इन कोरोना योद्धाओं का सन्मान करे” हे वाचताना देखील तुम्ही त्या टोनमधेच वाचलं असणार!!
त्याचबरोबर हात वेळोवेळी धुवत रहा. हात धुण्यासाठी हँडवॉश आणि पाणी उपलब्ध नसेल तर अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचा वापर करा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. किमान दोन व्यक्तींमध्ये तीन फुटाचे अंतर राखा. कोरोनाव्हायरसची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. तपासणी करा, घाबरून जाऊ नका. सरकारने सांगितलेल्या सगळ्या नियमांचे पालन करा, इत्यादी सूचना ती बाई देते.
आता कुणाकुणाला या सूचनांचा वैताग देखील आला आहे. त्यावरून आता सोशल मीडियावर जोक्स देखील येत आहेत. काहीकाही जण तर सूचना ऐकेपर्यंत फोन कशासाठी केला, हेच विसरलो असं म्हणत आहेत.
परंतु या आवाजाने आणि या सूचनांमुळे लोकांमध्ये कोरोना विषयीच्या जनजागृतीचं काम नक्कीच केलं आहे. या आवाजामागे नक्की कोण आहे? कोणाचा आवाज आहे याचा शोध घेतल्यानंतर एक नाव समोर आलं ते म्हणजे ‘जसलीन भल्ला’ या व्हाईस ओव्हर आर्टिस्टचे.
गेले तीन महिने भारतात कोरोनाचा कहर सुरू आहे आणि त्यानंतरच हा आवाज आता प्रत्येक फोनची कॉलर ट्यून झाला आहे. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारने ज्या विविध योजना राबविल्या त्यातलीच ही एक.
भारतातल्या सगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी हा मेसेज कॉलर ट्यून म्हणून घेतला आहे, म्हणूनच प्रत्येक फोनच्या आधी हा आवाज ऐकवला जातो.
जसलीन भल्ला ही एक व्हाईस ओव्हर कलाकार आहे. दिल्लीत असणाऱ्या जसलीनने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या खालसा कॉलेजमधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले आहे.
सुरुवातीला पत्रकार म्हणून काम देखील केलं आहे. स्पोर्ट्स पत्रकार म्हणून तिने अनेक चॅनेलवर देखील काम केले आहे. परंतु गेली दहा वर्ष ती व्हाईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे.
याविषयी बोलताना ती म्हणते,
सुरुवातीला मी माझे ऑडिओ सॅम्पल घेऊन अनेक स्टुडिओज मध्ये गेले आहे. ते क्षेत्र मला चॅलेंजिंग वाटत होतं. जसजसं व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचं जग मी बघत गेले तसं मला कळत गेलं की हे क्षेत्र किती मोठं आहे, हे एक प्रकारे एक्टिंग केल्यासारखेचं वेगळं स्कील आहे.
स्वतःचा आवाज आपल्या फोनवर ऐकताना कसं वाटतं? असं तिला विचारल्यावर ती म्हणते की, मला सुरुवातीला हे वेगळच वाटलं होतं आणि वाटलं नव्हतं की प्रत्येक फोन साठी हा मेसेज वापरला जाणार आहे.
सुरुवातीला जाऊन मी फक्त आवाज देऊन आले होते. परंतु मार्च महिन्यात हळूहळू सगळ्याच फोनवरती ही कॉलर ट्यून ऐकू यायला लागली, सुरुवातीला छानही वाटलं.
ती हसून म्हणते की, माझ्या मित्र मैत्रिणींनी माझा आवाज ओळखला होता. त्यावरून ते मला चिडवत देखील होते. पण आता तेही फार बोअर झाले आहेत. ‘अरे बस कर ना यार, किती तेच तेच सांगशील’ असं ते मला म्हणतात.
कुटुंबातील लोक देखील आता या आवाजाला परिचित झाले आहेत. तिच्या नवऱ्याला देखील सुरुवातीला आश्चर्य वाटले होते.
“आता मात्र माझा आवाज त्याला परिचित झाला आहे. मी सतत बडबड करते त्यामुळे त्याला माझ्या आवाजाची सवय आहे” असं ती म्हणते.
तसा तिचा आवाज आता सगळ्यांनाच परिचित झाला आहे अगदी एखादा फोन केल्यानंतर, भाषेच्या सुलभतेसाठी ऐकू येणारा,’ टू कन्टीन्यू इन इंग्लिश प्रेस वन, हिंदी के लिए दो दबाये’ हा आवाज देखील तिचाच आहे.
कोरोना आणि लॉक डाऊन यानंतर देशभरात जी परिस्थिती आली ती तिनेदेखील अनुभवली आहे.
त्याबद्दल बोलताना ती म्हणते, की “या कठीण काळातही मी माझं अर्थार्जन करू शकत होते. घरातूनही काम करता येत होतं. तसंच लोक डाऊन मुळे घरातील सगळी कामे करावी लागत होती.
त्याच वेळेस कळलं की, आपल्याकडे कामासाठी येणारे लोक हे किती महत्त्वाचे आहेत, त्यांची अंगमेहनत किती असते. तसा त्यांच्याविषयी मनात आदर होताच, परंतु लॉकडाउन नंतर आता तो आणखीन वाढला आहे.”
जसलीनच्या आवाजाने आणि त्या कॉलर ट्यूनने तिला एकदमच प्रसिद्ध केलं आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होण्याची तिची इच्छा पूर्ण झाली आहे.
तिला विचारलं की तुला कोणाचा व्हाईस ओव्हर जास्त आवडतो? तर ती म्हणते की मॉर्गन फ्रीमन याचं श्वशांक रिडम्पशन यामधील नरेशन मला आवडतं, ते खूपच वेगळं आहे.
रिचर्ड हमंड यांच्या ‘प्रेझेंटर ऑफ सायन्स ऑफ स्टुपिड’ यामधील आवाजही तिच्या आवडीचा आवाज आहे.
कोरोनाव्हायरस आणि त्याबद्दलची जनजागृती यासाठी मात्र जसलीन भल्ला हिचा आवाज एक ओळख झाली आहे.
पुढे जेव्हा केव्हाही कोरोनाव्हायरस कमी होईल, त्याचे उच्चाटन होईल. त्यावेळेस जेव्हा या व्हायरसची आठवण काढली जाईल, त्यावेळेस जसलीनचा आवाज देखील लोकांच्या आठवणीत येईल, इतका तो आता लोकांच्या मेंदूत फिट बसला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.