क्रिकेटच्या कित्येक चाहत्यांना कायमस्वरूपी विचारात टाकणारे ५ ऐतिहासिक- वादग्रस्त निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाचे एकूण तीन प्रकार. कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी. कसोटी हा सगळ्यात जुना प्रकार, त्या नंतर एकदिवसीय मर्यादित ५० ओवर चे सामने आणि त्यानंतर तिसरा प्रकार टी ट्वेन्टी..!!
कसोटी मध्ये पाच दिवसांचा सामना खेळला जातो त्यात दोन्ही संघ प्रत्येकी दोन वेळा फलंदाजी व क्षेत्ररक्षण करतात.
पाच दिवसात प्रतिस्पर्ध्याला हरवण्याकरता अनेक डावपेच आखले जातात. कसोटी मध्ये सगळे फलंदाज बाद झालेले नसताना ही डाव घोषित करण्याची मुभा कर्णधाराला असते.
अनेक वेळा चांगली धावसंख्या झाल्यावर कर्णधार दिवसाखेरीस डाव घोषित करून ५ किंवा १० ओव्हर साठी प्रतिस्पर्ध्याला फलंदाजी करण्यास भाग पाडले जाते.
उद्देश हा की वेळेचा फायदा घेऊन विकेट मिळाव्यात म्हणजे सामना सहज जिंकता येऊ शकेल. अशा वेळी वैयक्तिक विक्रम, शतक, अर्धशतक, द्विशतक ह्यांचा विचार न करता फक्त संघ जिंकावा ह्या हेतूने अवेळी डाव घोषित केला जातो.
अशा वेळी एखादा खेळाडू शतक, अर्धशतक, द्विशतक साधण्याच्या अगदी जवळ असेल तर मग खेळाडूंमध्ये तात्पुरता गैरसमज होण्याची शक्यता असते. व्यावसायिक आणि समजूतदार व अनुभवी खेळाडू अशा गोष्टीत सरावलेले असतात.
तर आज ह्या लेखात जाणून घेऊया अश्याच काही पाच खळबळजनक व वादग्रस्त घोषित केलेल्या कसोटी सामान्याविषयी :
१. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान टेस्ट सिरीज, ऍडलेड ओव्हल
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान टेस्ट सिरीज च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नर जबरदस्त फॉर्मात होता. पाकिस्तानी भेदक गोलंदाजी त्याने लीलया भेदून काढली.
संयमी सुरुवात करत पुढे चौफेर फटकेबाजी करत त्याने पहिल्या डावात ३०० धावा हा हा म्हणता पूर्ण केल्या. त्रिशतकाचा आनंद व्यक्त करून वॉर्नर ४०० च्या टप्प्याकडे दिमाखात कूच करीत होता.
ब्रायन लारा चा विक्रम मोडण्यासाठी काही धावा शिल्लक होत्या. इतक्यात टीम पेन जो कर्णधार होता, त्याने वॉर्नर ३३५ धावांवर नाबाद असताना खेळ घोषित केला.
दुपारपासून च पावसाचे वातावरण झाले होते. टीम पेन ला भीती होती की पावसामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता होती.
त्या सामन्यावेळी पाऊस तर आला नाही परंतु मोठ्या फरकाने सामना जिंकत पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया ने धूळ चारली. वॉर्नर ने ही संघाचे हित लक्षात घेत आपले पूर्ण योगदान दिले.
२. अशेस सिरीज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००६
भारत पाकिस्तान मॅच जसे प्रतिस्पर्धी आहेत तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशेस मध्ये समोर आल्यावर होते. २००६ मध्ये पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्यावर ब्रिटिशांनी दुसऱ्या कसोटीत भक्कम फलंदाजी करीत ऑस्ट्रेलिया ला सळो की पळो करून सोडले.
पिटर्सन चे शतक, कॉलिंगवूड चे द्विशतक आणि फ्लिंटॉफ च्या फटकेबाजी च्या जोरावर इंग्लंड ने आरामात ५०० धावा पार केल्या. ऑस्ट्रेलिया ३ बाद ८८ धावा अश्या बिकट स्थितीत होती आणि नेमका पोंटिंग चा झेल सुटला.
तिथून ऑस्ट्रेलिया ने मागे वळून पाहिले नाही. क्लार्क आणि पोंटिंग ने शतके झळकवीत ५१३ धावा झोडल्या आणि दुसऱ्या डावात इंग्लंड चा डाव पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा कोसळला.
कुणालाही विश्वास वाटणार नाही अश्या स्थितीतून ऑस्ट्रेलिया ने हा सामना सहज खिशात घातला आणि चाहत्यांनी अवेळी डाव घोषित केल्याबद्दल मजबूत टीका केली.
३. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज त्रिणीनाद १९७६
ऑस्ट्रेलिया कडून पराभूत झालेला वेस्ट इंडिज जखमी वाघाप्रमाणे डरकाळीत होता, आणि त्यांची गाठ पडली भारतीय संघाशी.
भारतीय संघाची चिवट फलंदाजी पाहून कर्णधार क्लाइव्ह लॉइड आणि प्रेक्षक सुद्धा बॉल टू किल, बॉल टू डेथ अश्या घोषणा देत होते. अंशुमन गायकवाड सहित अर्धा डझन भारतीय खेळाडू चेंडू लागून दवाखान्यात ऍडमिट करावे लागले.
होल्डिंग ने त्या दिवशी निगेटिव्ह गोलनदाजी चा कळस केला.
निषेध म्हणून भारतीय संघाने त्या दिवशी १२ रन्स ची लीड असून ही सामना घोषित करून वेस्ट इंडिज ला बाय बाय म्हटलं.
४. क्रोनिए ची मॅच फिक्सिंग
इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका कसोटीत जेव्हा ३ दिवस पावसामुळे वाया गेले तेव्हा चौथ्या दिवशी थोडी व पाचव्या दिवशी थोडी अशी आफ्रिकेने फलंदाजी केली व सामना निकाली काढावा ह्या हेतूने क्रोनिए ने अजब शक्कल लढविली.
त्याने अचानक इंग्लंड ला शेवटच्या दिवशी फलंदाजी करून ७५ ओव्हर मध्ये २७५ धावा करण्याचे लक्ष्य ठेवले. नासिर ने आधी खेळपट्टी पाहून घेतली व हे आव्हान स्वीकारले, किंबहुना एक ओव्हर राखून सामना जिंकला.
त्यावेळी क्रोनिए विषयी कुणालाही शंका आली नाही, पण पुढे जेव्हा त्याचे आरोप सिद्ध झाले तेव्हा क्रोनिए ने १५०००० डॉलर च्या बदल्यात मुद्दाम ऐन वेळी डाव घोषित केल्याचे मान्य केले.
ह्या घटनेमुळे क्रिकेट ला बट्टा लागला तो कायमचाच…!!
५. राहुल द्रविड चा तो निर्णय…!!
प्रत्येक भारतीय जो क्रिकेट चा फॅन आहे त्याला हा दिवस व प्रसंग कायम आठवत असेल.
विरेंदर सेहवाग ने ३०० रन काढून मुलतान का सुलतान हा किताब मिळविला होता. पाकिस्तान ला पळता भुई थोडी झाली होती. क्रिकेट चा देव साक्षात तेंडुलकर फलंदाजी करत होता १९४ वर.
द्रविड ने तिसऱ्या दिवसाची काही शटके पाकिस्तान ला खेळू द्यावी व विकेट काढून सामना जिंकावा ह्या हेतूने डाव घोषित केला.
द्रविड वर प्रचंड टीका झाली, पण सचिन आणि द्रविड हे सत्य जाणून होते. सचिनने अजिबात मनावर न घेता त्या सामन्यात शंभर टक्के योगदान दिले व आपण सामना व मालिका अलगद जिंकली…!!!
खेळ म्हणले की डाव पेच आले, वैयक्तिक विक्रम बाजूला ठेऊन टीम च्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि हेच वर दिलेल्या घटनांवरून अधोरेखित होते. ह्याला अपवाद फक्त क्रोनिएचा…!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.