हा राजा जर हयात असता तर मुक्या प्राण्यांवर अत्याचार करायला कुणीच धजावले नसते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सम्राट अशोक भारतीय इतिहासातील एक सुवर्णपान समजलं जातं. संपूर्ण मानव प्रजातीमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी क्रांती घडवणारा सम्राट अशोक हे केवळ एकच नाव असावं.
सम्राट अशोकाविषयी आपण शालेय इतिहास शिकताना माहिती घेतली असेलच. सम्राट अशोक ख्रिस्तपूर्व २६८ ते २३२ वर्षांपूर्वी होऊन गेला.
सबंध भारतीय उपखंडाला- अगदी बंगालच्या उपसागरापासून ते अफगाणिस्तान पर्यंत भूभागाला (यात अपवाद आहे तो तामिळनाडू,कर्नाटक,केरळ राज्याचा ) एका छत्राखाली आणणारा तो एकमेव सम्राट होता!
सुरवातीला अशोक हा त्याच्या स्त्री लंपट पणाविषयी कुप्रसिद्ध होता. राजकुमार असताना ५०० स्त्रियांचा जनाना त्याने ठेवला होता. आपल्या या ‘शौकाचा’ त्याला प्रचंड अभिमान होता इतका ,की त्याच्या ह्या सवयीबद्दल कोणी बोलल्यास त्या व्यक्तीस कठोर शिक्षा केली जाई.
त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यासाठी त्याने स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली होती ‘पृथ्वी वरील नरक’ हे नाव त्याने स्वतःच त्या खोल्यांना दिलं होतं.
साम्राज्य वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी त्याने ‘कलिंग’- सध्याचे ओडिशा प्रदेशावर हल्ला चढवला. घनघोर युद्ध झाले. शेकडो-हजारो सैनिक मारले गेले, जखमी झाले, कित्येक पकडले गेले. चोहीकडे मृतदेहांचा खच पडला.
सम्राट अशोक युद्ध जिंकला पण त्यानंतर जेव्हा तो युद्धभूमीचा अंदाज घेण्यासाठी आला तेव्हा त्याला हजारो सैनिकांचे मृतदेह, त्यांचा प्रियजनांचे आक्रोश, जखमी सैनिक त्यांचं विव्हळण पाहून सम्राट अशोकाच्या मनात अपार करुणा दाटून आली.
आपल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. सम्राट अशोकाचा हा पाश्चाताप ‘अहिंसेच्या’ विचारला पुनर्जन्म देऊन गेला!
या भयंकर युद्धा नंतर सम्राट अशोकाला विरक्ती आली. मार्गदर्शकाच्या शोधार्थ त्याने अनेक धार्मिक तिर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. यादरम्यान तो एका बौद्ध साधूला भेटला.
त्या विद्वान संताने त्याला भगवान गौतम बुद्धांचा आदर्श ठेवून, महान बोधी वृक्षाखाली ध्यानधारणा करण्याची सूचना केली. बोधी वृक्षाखालीच भगवान गौतम बुद्धांना साक्षात्कार प्राप्त झाला होता.
त्या आदेशानुसार, सम्राट अशोकाने तपस्या केली काही काळानंतर त्याचं एक वेगळंच रूप जगासमोर आलं.बोधी वृक्षाखाली केलेल्या ध्यान- धारणेने त्याला आंतर्बाह्य बदलून टाकलं होतं. तत्कालीन क्षात्र धर्माच्या विपरीत त्याने अहिंसेचा मार्ग अनुसरला.
सम्राट अशोकाचे तेव्हाचे विचार आजच्या युगात सुद्धा प्रगत सिद्ध होतील. संपूर्ण मानव प्रजाती एक कुटुंबच आहे! स्त्री- पुरुष समानता, प्राण्यां प्रती मानवता या विचारांना, कायद्यात बदलून संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्यात आली!
सैनिकांवर सगळ्या जीवांच्या रक्षणाची जबाबदारी टाकण्यात आली (अर्थात अहिंसेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच!)
इतकंच नाही तर अशोकाने शांतता जगात प्रस्थापित होण्यासाठी ग्रीस, सीरिया, बेबीलॉन, मेसिडोनीया या बाहेरील देशांत आपले दूतावास उघडले.
पुढे सम्राट अशोकाने राज्यात विकासाची गंगा वाहावी म्हणून रस्ते बांधले, विहिरी खोदल्या, सामान्य लोकांसाठी विश्रामगृहे, धार्मिक उपदेशातून सहनशीलता आणि बुद्ध विहारांचे निर्माण करवले. त्याच बरोबर संपूर्ण राज्यात कुठल्याही प्राण्याची हत्या निषिद्ध मानली गेली!
बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन अशोकाचा मुलगा व मुलगी श्रीलंकेत बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी निघून गेले. सम्राट अशोकाबद्दल इंग्लिश लेखक आणि इतिहासकार एच जी वेल्स म्हणतात की,
“इतिहासातील दहा हजार सम्राटांची नावं जर काढली तर, त्यात सुद्धा सम्राट अशोक एकटा त्याच्या कार्याने तेजस्वी ताऱ्या सारखा चमकून उठेल!”
सम्राट अशोक अहिंसेच्या तत्वज्ञानाने इतका भारावला की त्याने आपल्या राज्यात गुलामगिरी आणि प्राण्यांच्या हत्येवर बंदी घातली. त्याचे खाली दिलेले विचार आजच्या काळात सुद्धा संपूर्ण मानवजातीला दिशादर्शक सिद्ध होतात.
सत्कर्म करणं अवघड गोष्ट
“चांगली गोष्ट किंवा कृत्य करणं ही अत्यंत अवघड बाब आहे.जो कोणी सत्कृत्य करतो त्याने ते करण्यापूर्वी नक्कीच प्रचंड मेहनत घेतली असते. मी पुष्कळ चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
जर माझ्या मुलांनी, नातवंडांनी आणि त्यांच्या वंशजांनी जर जगाच्या अंतापर्यंत माझ्याप्रमाणेच वागले तर ते सुद्धा उत्तम कार्य ठरेल. परंतु त्या पैकी एक जण जरी माझा उपदेश दुर्लक्षित करेल तर तो नकीच वाईट ठरेल.
जगात वाईट कृत्य करणं सर्वात सोपं आहे. वाईट कृत्य करण्यासाठी फार मेहनत करावी लागत नाही.”
दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला न्याहाळा
सम्राट अशोक म्हणतो, “लोकांना स्वतःचे केवळ चांगले कर्म दिसतात आणि तेच इतरांना सांगतात. परंतु त्याच वेळी त्यांना स्वतःचे दुष्कृत्य मात्र दिसत नाहीत. किंवा हे वाईट आहे आणि मी ही वाईट गोष्ट केली आहे असं कुठलाही मनुष्य म्हणत नाही!
हिंसा, क्रूरता, राग, गर्व, मत्सर या सर्व अवगुणांचा अवलंब केला तर त्या व्यक्तीच्या हातून वाईट कृत्य नक्की घडेल.
संपूर्ण मानवजातीने असा विचार केला पाहिजे की या अवगुणांच्या आहारी जाऊन मला माझे नुकसान करून घायचे नाही. सर्वांनी अशा विचारांचा स्वीकार केला तर विश्वात सुख-शांती नांदू लागेल”
सशक्त प्रजा
कुठलाच समाज केवळ गोष्टी सुलभ, सोप्या बनवण्याच्या उद्देशाने समृद्ध होऊ शकत नाही. त्यापेक्षा राज्यातील जनतेला सशक्त करण्याचं ध्येय ठेवलं तर त्यात सबंध राज्याची प्रगती होऊ शकेल!
जीवांची कदर कर
दुसऱ्यांना कमी लेखणे निषिद्ध आहे. सच्चा मनुष्य किंवा उपासक कुठल्याच जीवाला कमी लेखू शकत नाही. दुसऱ्या जीवात जे काही गौरवास्पद असेल ती गोष्ट हेरून त्याची कदर करणाराच खरा मनुष्य!
अहिंसा परमो धर्म
मी संपूर्ण राज्यात प्राण्यांची हत्या न करण्याचा कायदा लागू केला, परंतु मनुष्यात सदाचरणाचा उगम हा धार्मिक उपदेशातून, जेव्हा तो कुठल्याही जीवाला अपाय करणार नाही आणि कोणाचीही हत्या करणार नाही त्याच वेळी होऊ शकेल.
सर्व धर्मांचा आदर करा
प्रत्येक धर्माचा मूळ उद्देश हा प्रेम,अनुकंपा आणि सदिच्छा हाच आहे. कुठल्याही धर्माच्या मूळ उद्देशाकडे पहा. धर्माच्या अंतर्भागात ह्याच गोष्टी सापडतील. बाह्यभाग कसाही असो. जर तुम्ही मूळ उद्देशाप्रति बांधील राहिलात तर कुठलाच गोंधळ राहणार नाही.
कुठल्याही धर्मावर टीका करू नका त्याचा मूळ उपदेश अभ्यासा.असे केल्याने लोकांमध्ये खऱ्या अर्थाने शांतता नांदेल.
एक क्रूरकर्मा सम्राट ते शांतिदुत असा अशोकाचा प्रवास खरोखर अचंबित करणारा आहे. ध्यान- धारणेने इतके उच्च विचार आत्मसात करता येतात.
अशोकाच्या सर्व जीवांविषयी असलेल्या अहिंसेच्या कल्पना या त्या काळात ‘कवी कल्पना’ म्हणून हेटाळल्या गेल्या मात्र आज अनेक शतकांनंतर सुद्धा त्याचे विचार किती शुद्ध आणि समाजोपयोगी होते याची खात्री पटते.
विसाव्या शतकात भारताने सम्राट अशोकाच्या ‘कायद्याच्या चक्राला’ ब्रिटिशांपासून मुक्तता मिळवण्यासाठीच्या लढ्यात प्रतीक म्हणून वापरलं.
काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वात साक्षर आणि प्रगत अशा केरळ राज्यात एका गर्भवती हत्तींणीची निर्घृण हत्या करण्यात आली. हे केवळ एक उदाहरण नाही,आपल्या देशात कायद्याने प्राण्यांच्या शिकारीला बंदी असून सुद्धा जंगलात वन्य प्राण्यांची सर्रास हत्या ‘शौक’ म्हणून केली जाते.
यात केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती सहभागी नसून मंत्री किंवा समाजातील अत्यंत लोकप्रिय व्यक्तींचा सुद्धा समावेश होतो!
पृथ्वी ही सर्व जीवांची मिळून बनली आहे. अन्नसाखळी चा विचार करता प्राण्यांमध्ये अहिंसेचे तत्व लागू करणे शक्य नाही, परंतु वन्य प्राण्यांपेक्षा वेगळा प्राणी असलेला मनुष्य जर मजा किंवा शौक म्हणून इतर जीवांची हत्या करत असेल तर ते नक्कीच अमानवी आहे.
पृथ्वी वरून अनेक वन्य प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पुढल्या पिढीला बरेचसे प्राणी केवळ चित्रात पाहता येईल इतकी भयानक परिस्थिती आहे! मुक्या प्राण्यांच्या अमानुष हत्येचे कुठल्याच प्रकारे समर्थन होऊच शकत नाही.
भगवान गौतम बुद्ध किंवा सम्राट अशोक यांचे विचार अशा परिस्थितीत तंतोतंत लागू होतात. जर सर्व लोकांनी त्यांचा उपदेश आपल्या मनात बिंबवला तर मुक्या जीवांचं संरक्षण, संवर्धन नक्कीच होईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.