दात घासण्याव्यतिरिक्त “टुथपेस्ट”चे हे फायदे आहेत दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांचं उत्तर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
‘ब्रश केलास का ?’ आपल्या सगळ्यांची सकाळ याच प्रश्नाने सुरू होते. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना हे एक रोजचं काम आहे. दात हा खरं तर शरीरातील सर्वात मजबूत अवयव आहे.
एकदा दुधाचे दात पडले की, नंतर येणारे दात हे एखादा अपवाद किंवा अपघात वगळता आयुष्यभराचे सोबती असतात. स्वच्छ आणि शुभ्र दातांसाठी किती तरी प्रकारचे उपाय मागील काही वर्षात डेंटिस्टनी उपलब्ध करून दिले आहेत.
दातांमध्ये होणारे विकार हे सुद्धा मागील काही वर्षातच बाजारातील जंक फूड मुळे किंवा एकंदरीत सात्विक आहार सेवन होत नसल्याने सुरू झाले आहेत असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
काही वर्षांपूर्वीचं वातावरण आठवलं तर लक्षात येईल की, आपले आजोबा हे लिंबाच्या झाडाच्या काडीने दात स्वच्छ करायचे. त्यांचे दात हे अगदी शेवटपर्यंत मजबूत असायचे आणि त्यांना आता सारखे रूट कॅनॉल वगैरे काहीही करावं लागत नसे.
काही वर्षांनी या गोष्टीची जागा ही मंजन ने घेतली. डाबर लाल दंत मंजन हे तर काही लोक आजही वापरतात. त्यानंतर सुरुवात झाली ती टूथपेस्ट ची. आपण भारतीय लोकांना कोलगेट या ब्रँड ने टूथपेस्ट म्हणजे काय ते सांगितलं हे बऱ्याच अंशी खरं म्हणावं लागेल.
कोलगेट म्हणजे टूथपेस्ट हा समज सुद्धा खूप लोकांच्या मनावर किती तरी वर्ष होता. आपला टार्गेट कस्टमर लक्षात घेऊन कोलगेट ने अगदी स्वस्त पासून सेलेब्रिटी ला सुद्धा आकर्षित करता येईल असे whitening देणारे टूथपेस्ट बाजारात आणले.
प्रामुख्याने दात स्वच्छ करण्यासाठी वापर होणाऱ्या टूथपेस्ट चे इतरही खूप फायदे आहेत हे कालांतराने संशोधनाने लक्षात आणून दिलं.
हे सगळे फायदे दातांच्या संरक्षणा व्यतिरिक्त आहेत. या फायद्यांपैकी काही फायदे आम्ही इथे तुम्हाला सांगत आहोत:
१. बूट स्वच्छ करणे:
तुमच्या लेदर च्या बुटांवर जर कोणते डाग पडले असतील आणि ते जर जातच नसतील सगळे प्रयत्न करून ही तर त्यावर एकदा कोणतंही टूथपेस्ट लावा.
त्याला साधारण ओल्या फडक्याने पुसून काढा. काही वेळातच तुम्हाला तुमचे बूट अगदी नव्यासारखे चकाचक दिसतील.
२. बॉटल स्वच्छ करणे:
तुमच्या घरी जर का लहान मुलांच्या दूध बॉटल्स वगैरे असतील ज्या की स्वच्छ होत नसतील, त्यांचा वास कोणताही साबण वापरून जात नसेल तर त्यावर थोडं टूथपेस्ट वापरा.
त्याला थोडं घसा आणि विसळून घ्या तुमची बॉटल स्वच्छ झालेली असेल. थर्मास साफ करताना सुद्धा तुम्ही टूथपेस्ट चा वापर करू शकता.
३. पिंपल्स कमी करणे:
आजच्या तरुण तरुणींचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न. काही लोकांना कितीही उपाय केले तरीही पिंपल्स पासून कधी सुटका मिळतच नाही. अश्या व्यक्तींनी जेल नसलेली आणि whitening न देणारी टूथपेस्ट त्यांच्या पिंपल्स वर लावावी.
टूथपेस्ट पिंपल्स मधील ऑइल शोषून घेते आणि ती त्वचा कोरडी करते. रात्री जर का तुम्ही टूथपेस्ट चा वापर केला तर सकाळपर्यंत पिंपल्स नाहीसे होऊ शकतात.
जे पिंपल्स अगदी पिकले आहेत त्यांच्यावर ही कृती चांगलं काम करते. संवेदनशील त्वचेला या गोष्टीचा थोडा त्रास होऊ शकतो.
४. गाडीचे हेडलाईट्स:
पावसाळ्यात जर का तुमच्या कार च्या हेडलाईट्स वर धुकं साचलं असेल आणि ते फक्त पाण्याने साफ होत नसेल तर हा एक उपाय उत्तम आहे. एका स्पंज वर थोडं टूथपेस्ट घ्या, तो स्पंज त्या धुकं बसलेल्या हेडलाईट वरून पुसा.
काही वेळाने साधारण ओल्या फडक्याने गाडीचे हेडलाईट्स परत पुसून घ्या. हेडलाईट्स अगदी स्वच्छ होतील.
५. भिंत स्वच्छ करण्यासाठी:
तुमच्या घरातील लहान मुलांनी जर का तुमच्या घरातील भिंतीवर पेन्सिल ने किंवा क्रेयॉन्स ने रंगरंगोटी केली असेल तर काळजी करू नका. जेल नसलेलं एखादं टूथपेस्ट घ्या आणि एक स्क्रब ब्रश घ्या.
भिंतीवरील ‘चित्रकलेवर’ टूथपेस्ट लावा आणि ब्रश ने त्याला पुसून घ्या. साधारण ओल्या फडक्याने भिंत पुसून घ्या. तुमची भिंत पुन्हा पूर्ववत सुंदर दिसायला लागेल.
६. तुमचा कॉफी मग स्वच्छ करण्यासाठी:
तुमच्या आवडत्या कॉफी मग वर एखादा डाग पडला आहे का ? जो की तुमच्या डोळ्यांना सतत त्रास देतोय ? त्या ‘मग’ वर टूथपेस्ट लावा आणि मग आधीसारखं परत धुऊन टाका. तुमच्या आवडत्या मग चा रंग पुन्हा आधीसारखा झालेला असेल.
७. हिरा स्वच्छ करण्यासाठी:
तुमच्याकडे जर काही हिरे असतील आणि त्यांच्यावर काही डाग पडले आहेत असं वाटत असेल तर एका टूथब्रश वर थोडं टूथपेस्ट घ्या आणि तो टूथब्रश तुमच्या हिऱ्यावर हलकेच घासा.
साधारण ओल्या कपड्याने तुमचा हिरा परत पुसून घ्या. तुमचा हिरा पुन्हा चमकायला लागेल आणि त्याची लकाकी परत आलेली असेल.
८. गॉगल स्वच्छ करण्यासाठी:
तुमच्या गॉगल ला स्वच्छ करायचं असेल तर त्यावर टूथपेस्ट लावा. त्यावर धुकं बसणार नाही.
तुम्ही एखादं रंगकाम किंवा नक्षीकाम किंवा स्विमिंग, स्कुबा डायव्हिंग वगैरे करत असताना तुम्हाला धुक्याचा त्रास होणार नाही आणि तुमच्या कामात कोणताही व्यत्यय येणार नाही.
९. फर्निचर वरील पाण्याचे डाग:
तुमच्या फर्निचर चा वापर करत असताना जर कोणी कोस्टर वापरायचं विसरलं असेल तर एका कपड्यावर जेल नसलेलं टूथपेस्ट लावा आणि त्या कपड्याने तेवढी जागा फक्त पुसून घ्या.
साधारण ओल्या कपड्याने फर्निचर परत पुसून घ्या. त्याला थोडं वाळू द्या. फर्निचर पॉलीश लावा. तुमचं फर्निचर तुम्हाला पुन्हा पहिल्या सारखं मिळेल.
१०. बाथरूम सिंक:
तुमच्या सिंक ला जर स्वच्छ करायचं आहे आणि त्यातून येणाऱ्या काही विशिष्ट वासांपासून सुटका पाहिजे असेल तर एक टूथपेस्ट ची ट्यूब घ्या, त्यातील टूथपेस्ट सिंक मध्ये टाका. स्पंज ने सिंक पुसून घ्या.
तुम्हाला पुन्हा एकदा चकाचक सिंक पहायला मिळेल.
११. बाथरूम काचांवरील धुकं:
आंघोळीला जायच्या आधी Gel नसलेलं टूथपेस्ट बाथरूमच्या आरश्यावर लावा. काही वेळाने ते पेस्ट पुसून घ्या. रोज शॉवर घेतल्यानंतर काचेवर जमा होणारं धुकं जमा होणार नाही.
१२. हाताचा वास:
तुमचे हात टूथपेस्ट लावून धुवून घ्या. असं केल्याने तुमच्या हाताला लागलेले माश्यासारखे उग्र वास सुद्धा निघून जातील.
१३. स्वयंपाक घरातील भांडे चमकवा:
तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरातले भांडे चमकवायचे आहेत आणि तुमच्याकडे बाथरूम क्लिनर नसेल तर त्या भांड्यांवर टूथपेस्ट लावा. भांडे पुन्हा पहिल्यासारखे चकाचक दिसायला लागतील.
१४. किडा चावल्यास सुद्धा:
तुम्हाला जर कधी एखादा किडा चावला तर त्या ठिकाणी टूथपेस्ट लावा. त्या जागेची खाज कमी होईल. तुमच्या त्वचेची आग होणं सुद्धा बंद होईल.
१५. आरश्यावरील लिपस्टिक चे डाग:
जर का चुकून लिपस्टिक आरशावर लागलं किंवा एखाद्या टेबल ला लागलं तर त्यावर टूथपेस्ट लावा. तो डाग लगेच निघून जाईल.
आपण रोज वापरणाऱ्या टूथपेस्ट चे इतके फायदे असतील हे आपण यापूर्वी कधी वाचले नसावेत. टूथपेस्ट कडे बघताना आपल्या मनात यापुढे एक वेगळाच आदर असेल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.