Site icon InMarathi

फक्त पोळ्याच नाही, तर गव्हाच्या पीठापासून तुम्ही बनवू शकता “हे” झटपट पौष्टिक पदार्थ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सर्वसाधारणपणे घरात बनवला जाणारा रोजचा पदार्थ…गव्हाच्या पिठाची पोळी. डब्यात भरुन देताना पोळी प्रामुख्याने घेतली जाते कारण ती जोंधळ्याच्या भाकरीसारखी नंतर कोरडी होत नाही. त्यामुळं बहुतेक ठिकाणी गव्हाच्या पोळ्याच प्राधान्याने केल्या जातात.

याचा आणखी एक फायदा असा असतो की गव्हाच्या पिठात असलेला कोंडा हा फायबर युक्त असल्यामुळे पोटाच्या विकारांवर गुणकारी ठरतो. पचायला मैदा वगैरेपेक्षाही हलका असतो.

सतत पोळ्या खाऊन कंटाळलेली मुलं आणि करुन कंटाळलेली आई यांचा प्रेमळ संवाद एकाच वाक्यावर येऊन थांबतो..”आई, वेगळं काहीतरी दे खायला”…”आता मलाच खा!!!”

या वेगळं काहीतरी खायला साठी गव्हाच्या कणकेचे बरेच वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. ते पौष्टिक तर असतातच पण खिशालाही परवडणारे असतात.

 

exportersindia.com

 

गव्हाची कणिक घरात असतेच असते. तिच्यापासून पदार्थ करायचे इतर पदार्थांच्या तुलनेत फारच सोपे. आणि कमी खर्चिक.

बाकी काहीही करायचं ठरवलं तर बाजारातून सामान आणण्यापासून तयारी असते. बरं, ते खिशालाही परवडणारे हवेत.

बाकीचे पदार्थ करायला गेलो‌ तर त्याची तयारीच इतकी जास्त असते की ते तयार करेपर्यंत कंटाळून जायला होतं. आणि ते केले तर भरपूर होतील असंही सांगता येत नाही.

म्हणजे आडजीभ खाल्ली आणि पडजीभ हाका मारली. ना केल्याचं समाधान ना खाल्ल्याचा आनंद. आणि पोषणमूल्यं किती हा पण एक प्रश्नच!!!

पण इथं‌ असे काही सोपे पदार्थ आपण बघणार आहोत ते करायला फार धावपळ करावी लागणार नाही. वेळ पण कमी लागेल पौष्टिक असतीलच आणि मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना पण नक्की आवडतील.

 

१. गव्हाच्या कणकेचे लाडू-

 

tarladalal.com

 

कोणताही ऋतू असो, उन्हाळा,हिवाळा किंवा पावसाळा. हे लाडू करुन खावेतच. एका कढईत अर्धा कप तूप घाला त्यात एक कप कणीक घालून खमंग भाजून घ्या.

त्यात पाऊण कप पिठीसाखर घाला. शक्य असल्यास सुका मेवा , वेलदोड्याची पूड घालून लाडू वळावेत. मुलांना नक्की आवडतील.

ऐन हिवाळ्यात केले तर थोडासा डिंक तुपात तळून घ्या आणि या कणकेत मिसळा अजून पौष्टिक होतील.

 

२. गव्हाच्या पिठाचा शिरा-

 

archanaskitchen.com

 

बारा महिने चालणारी ही स्वीट डिश. दोन वाट्या गव्हाचं पीठ, एक वाटी तूप, दिड वाटी साखर, थोडे बदाम, आणि चमचा भर वेलचीपूड घ्या. तुपात कणीक खमंग भाजून घ्या. त्यात दोन वाट्या पाणी घाला. शिजलं की साखर मिसळा आणि वाफ येऊ द्या.

मग बदामाचे काप आणि वेलचीपूड घालून परत झाकण ठेवून वाफ आणावी. झाला तुमचा शिरा तयार. मुलं आणि मोठी माणसंही आवडीने खातील.

 

३. गव्हाच्या कणकेचा बिन अंड्याचा केक-

 

myrecipes.com

 

सुटलं ना नांव ऐकूनच तोंडाला पाणी? शाकाहारी लोकांसाठी ही खास रेसिपी. दोन कप गव्हाचे पीठ, पाऊण कप लोणी, पाऊण कप साखर, चिमूटभर बेकिंग पावडर, थोडंसं मीठ आणि दालचिनी पावडर, थोडा सुका मेवा आणि अर्धी वाटी दही घ्या.

हे सारं एकजीव करून त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. ओव्हनमध्ये १८० अंश तापमानावर ४० मिनीटे ठेवा. गार झाल्यावर स्लाईस करा आणि बघा मुलं कशी खुश होतात!!!

 

४. गव्हाच्या कणकेची बर्फी-

 

youtube.com

 

हा पण अजून एक पारंपरिक पदार्थ. ज्याची चव, पौष्टिकपणा यांमुळे जिभेवर रेंगाळत राहणारा, पुन्हा पुन्हा खावा वाटणारा आणि करायला अतिशय सोपा पदार्थ.

एक कप गव्हाची कणिक, अर्धा कप तूप, अर्धा कप चिरलेला गूळ किंवा गुळाची पावडर, चिमूटभर वेलचीपूड घ्या. कढईत तूप घालून मंद आचेवर कणिक खमंग भाजून घ्या.

नंतर त्यात गुळाची पावडर आणि वेलचीपूड घालून हलवत रहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मग एका पसरट ताटात हा गोळा पसरुन थापावा त्यावर ड्रायफ्रूटचे काप, थोडंसं किसलेले खोबरे घालून वड्या पाडाव्यात.

 

५. पंजिरी-

 

vegrecipesofindia.com

 

हा पंजाबी लोकांचा अतिशय आवडता पदार्थ. दोन कप गव्हाची कणिक, एक कप तूप, एक कप साखर, भरपूर मनुके बदाम आणि काजूचे तुकडे घ्या. एका पॅनमध्ये बदाम आणि काजूचे तुकडे भाजून घ्या.

ते एका बाजूला ठेवून कणिक खमंग भाजून घ्या. मग त्यात तूप मिसळा आणि एकसारखे करुन घ्या. गॅस बंद करा. त्यात पिठीसाखर घालून भाजलेले ड्रायफ्रूट, मनुके घालून एकजीव करून घ्या.

गार झाल्यावर खायला द्या. इतके ड्रायफ्रूट, मस्त वास पाहून मुलंच काय मोठेही या खाऊच्या प्रेमात पडतील.

 

६. आलू पराठा-

 

 

बटाटा शिजवून त्यात मीठ, मिरची, आलं, लसूण पेस्ट बनवून घाला. त्याचं मिश्रण एकजीव करून घ्या. कणिक मळा आणि बटाट्याचं मिश्रण गोळा बनवून कणकेच्या मध्ये भरुन पराठे लाटा.

तूप सोडून खमंग भाजा आणि दह्यासोबत खायला द्या. बघा, एकदा व्यवस्थित खाऊन पोट भरलं की मुलं पण भूक भूक करणार नाहीत.

 

७. गव्हाच्या पिठाची धिरडी किंवा पॅनकेक – 

 

.fifteenspatulas.com

 

हा अतिशय सोपा प्रकार. गव्हाच्या पिठात पाणी आणि गुळाची पावडर मिसळा. पातळसर मिश्रण गोडीला चांगले हवे. जर फिके झाले तर खायची मज्जा जाते.

तव्यावर तेल सोडून त्यात डावाने हे गव्हाच्या पिठाचे मिश्रण घाला. आंबोळीसारखे पसरुन घ्या. मंद आचेवर भाजून घ्या. नंतर उलथण्याने उलटून दुसरी बाजूही खमंग भाजून घ्या.

गार झाल्यावर खायला द्या. आणि छान लोणकढं तूप न विसरता घाला. मुलं आवडीने खातील.

या धिरड्यातही गोड न आवडणारे‌ लोक असतील तर त्यांच्यासाठी गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, थोडीशी जिऱ्याची पूड घालून तव्यावर तेल सोडून मिश्रण ओता.

थोडं पसरुन घ्या आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. थोडं कोमट झालं की दही किंवा लोण्यासोबत खायला द्या. बघा कशी खुश होतील मुलं!!!

गव्हाचं पीठ हे आहारशास्त्रानुसार पचायला हलके आहे. त्यात एकंदरीत असलेले घटक हे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.

मैद्याच्या तुलनेत गव्हाचे पीठ अतिशय चांगले, पोषणमूल्य असलेले आहे. त्यात असलेले तंतूमय पदार्थ पोटाचेच नव्हे‌ तर संपूर्ण शरीराचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी मदत करते.

 

graina.com.au

 

डायबिटीस कंट्रोल करायला गव्हाचे पीठच जास्तीत जास्त उपयोगी आहे. कारण त्यात असलेल्या अन्न घटकांची मात्रा. हृदयरोग, मधुमेह हे विकार होऊ नयेत म्हणून गव्हात असलेल्या घटकांचा फार मोठा प्रभाव पडतो.

म्हणून तर आजकाल हाॅटेलमध्ये पण मैद्याची रोटी असते, पण गव्हची सुध्दा मिळतेच, अगदी ब्रेडही गव्हापासून बनलेला घेणारे लोक आहेत. थोडक्यात काय तर ‘तुझे आहे तुजपाशी’ हेच आपल्याला हे गव्हाचे पदार्थ सांगतात.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version