आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय राजे आणि त्यांची संस्कृती ही आजही जगजाहीर आहे. भारतीय राजे त्यांच्या रुबाबा साठी आणि लहरी स्वभाव साठी जगभरात प्रसिद्ध आहेत.
जर एखादी गोष्ट त्यांना अपमान वाटली तर मग मात्र त्या अपमानाचा प्रतिशोध कशा प्रकारे घेतला जातो याची अनेक उदाहरणं आपल्याला चर्चेतून नक्कीच मिळतील.
आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी अशीच काही उदाहरण घेऊन आलेले आहोत तर मग जाणून घेऊयात!
१९३० च्या दशकात भारतातील पटियाला येथील महाराज श्री भुपेंद्रसिंग यांनी रोल्स रॉयस जगातील सर्वात महागड्या कंपनीकडे काही गाड्यांची ऑर्डर दिली होती आणि कंपनीने ही ऑर्डर स्वीकारू शकत नसल्याचं कळवलं.
हे ऐकल्यावर महाराजांना राग आला, शेवटी राजेच ते.
भूपेंद्र सिंग यांच्याकडे त्याआधी देखील अनेक रोल्स रॉयस या कंपनीच्या अनेक गाड्या उपलब्ध होत्या परंतु, त्याच कंपनीची अजून एक गाडी आपल्या ताफ्यात हवी म्हणून भूपेंद्र सिंग यांनी काही गाड्यांची ऑर्डर नव्याने दिली होती.
परंतु यावेळी कंपनीने त्यांच्या योग्यतेवरचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. कंपनीने एका अर्थी त्यांच्या श्रीमंतीवरती प्रश्न निर्माण करून मोठी चूक केली आहे अशी त्यांची ठाम धारणा होती.
त्यांच्या या अपमानामुळे ते पहिल्यांदा व्यथित झाले आणि नंतर त्यांना प्रचंड राग आला कंपनीला त्यांच्या चुकीची बद्दल धडा शिकवण्याचा त्यांनी निर्धार केला.
त्यांनी विचारपूर्वक आपल्याकडील जुन्या रोल्स रॉयस कंपनीच्या गाड्या राज्यामध्ये कचऱ्याच्या घंटागाड्या म्हणून वापरायला सुरुवात केली.
कंपनीच्या एका निर्णयामुळे संपूर्ण पटियाला शहरात रोल्स रॉयस कंपनीच्या ज्या गाड्या त्यांनी राजांना द्यायला मनाई केली होती, त्याच गाड्यांमध्ये कचरा भरला जाऊ लागला.
ही बातमी शहरात वार्यासारखी पसरली आणि नागरिक देखील एवढी महागडी गाडी आपल्या दारासमोर कचरा उचलते आहे हे बघून थक्क झाले.
ही बातमी वाऱ्यासारखी देश-विदेशात पसरत गेली. देशातील अनेक नागरिकांनी राज्यांचे याबद्दल कौतुक देखील केलं आणि या सगळ्यातून कंपनीची खूप नाचक्की झाली.
या सगळ्या बातम्या कंपनी पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या कंपनीच्या नावाबद्दल चिंता वाटू लागली, कंपनी देखील या सर्व प्रकारामुळे धक्क्यात होती. आजपर्यंत त्यांच्यासोबत असं कधीच झालेलं नव्हतं.
हे सर्व लक्षात आल्यानंतर कंपनीने देखील वेळ न घालवता भारतात महाराजांशी संपर्क केला.
त्यांनी महाराजांना हे समजून सांगायचा प्रयत्न केला की त्यांच्या या कृत्यामुळे कंपनीची किती बदनामी होऊ शकते आणि कंपनीच्या विक्रीवर देखील त्याचा किती मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
तरीही भुपेंद्रसिंग जी यांनी दया न दाखवल्यामुळे शेवटी कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे अक्षरश: कंपनीच्या मदतीसाठी भिक मागितली.
कंपनीने एवढी क्षमायाचना मागीतल्यानंतर महाराज भूपेंद्र सिंग यांनी कंपनीला माफ केले.
आपल्या शहरात रोल्स रॉयस कंपनीच्या फिरणाऱ्या गाड्या थांबवल्या नागरिकांना आवाहन केलं की त्या गाड्यांमध्ये कोणीही कचरा टाकू नये.
कंपनीने देखील महाराजांची माफी मागून, त्या उद्धट सेल्समनला कंपनीतून काढून टाकले ज्याने महाराजांना गाडी द्यायला नकार दिला होता आणि महाराज भूपेंद्र सिंग यांना नवी कोरी रोल्स रॉयस गाडी भेट म्हणून दिली.
पटियालाचे महाराज भुपेंद्रसिंग यांनी कंपनीला चांगलाच धडा शिकवला होता त्यांनी शिकवलेला धडा इतिहासात आज देखील कोरला गेलेला आहे.
एवढं सगळं होऊन देखील कंपनीकडून काही वर्षांनी अशीच एक गफलत झाली, नुकसान होऊन देखील कंपनी त्या चुकीतुन शिकली नाही हे खरं.
अलवरचे महाराज जयसिंग यांनीदेखील रोल्स-रॉयस या कंपनीला असाच एक धडा शिकवलेला आहे.
महाराज जयसिंग एकदा लंडन मध्ये फेरफटका मारत असताना सहज रोल्स-रॉयस च्या शोरूम मध्ये गेले आणि नवीन गाडी बद्दल विचारपूस करू लागले.
महाराज जयसिंग राजे असले तरी लंडनमध्ये अत्यंत साध्या पोशाखात वावरत असत.
शोरूम मध्ये देखील ते अत्यंत साध्या वेशामध्ये गेले होते आणि त्यांचा हाच साधा पोशाख बघून तेथील सेल्समनने त्यांचा प्रचंड अपमान केला आणि त्यांना शोरूम मधून बाहेर जाण्याची सूचना केली.
सेल्समन च्या याच घोड चुकीमुळे कंपनीवर अजून एकदा मोठं संकट येणार होतं आणि परत इतिहासात रंगवून सांगण्यासाठी एक किस्सा देखील मिळणार होता.
अपमानाचा राग मनात ठेवून राजा जयसिंग शोरूम मधून बाहेर आले त्यांनी काही दिवसांनी परत आपल्या शाही पोशाखात आणि दिमाखात त्या शोरूम ला परत एकदा भेट दिली.
यावेळी सल्समनने त्यांना अगदीच ओळखले नाही, तो राजांना खूपच चांगली वागणूक देत होता.
महाराज जयसिंग यांनीदेखील यावेळी शोरूम मधून १० रोल्स-रॉयस कंपनीच्या गाड्या विकत घेतल्या आणि भारतामध्ये आणल्या!
आतापर्यंत सर्व काही ठीक चालू होतं. महाराजांनी अजून त्यांचा प्रतिशोध घेतलेला नव्हता, महाराज अजून कंपनीला चांगला धडा शिकवणार होते!
जेव्हा महाराज भारतात आले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आणलेल्या नवीन दहा गाड्या कचरा उचलण्याच्या कामाला लावल्या.
यावेळी देखील ही अजब बातमी संपूर्ण देशात आणि विदेशामध्ये वार्यासारखी पसरली आणि कंपनीने अंतर्गत चौकशी समिती गठित केली.
चौकशीदरम्यान कंपनीला लंडनमध्ये घडलेल्या गोष्टींबद्दल माहिती कळाली.
कंपनीने बदनामी वाचवण्यासाठी यावेळी देखील महाराज जयसिंग यांना संपर्क करून त्यांची मनापासून माफी मागितली आणि आमच्याकडून यापुढे अशी चूक होणार नाही अशी देखील कबुली दिली.
त्यानंतर कंपनीने आपल्या ग्राहकांसोबत आपले संबंध सुधारले. कंपनीने त्यानंतर कधीच भारतामध्ये कुठल्याही राजाचा अपमान केला नाही.
या दोन्ही परिस्थितीमध्ये महाराज भुपेंद्रसिंग आणि महाराज जयसिंग यांनी त्या आलिशान गाड्या कचरा उचलण्याच्या कामाला लावल्या कारण तो कंपनीसाठी सर्वात मोठा अपमान होता!
आणि दोन्ही परिस्थितीमध्ये कंपनीला स्वतःची चूक कळाली कंपनीने माफी देखील मागितली.
त्यामुळे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जर सर्वोत्कृष्ट आहात तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांचा अपमान कराल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.