आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतात अनेक धर्म, अनेक जाती गुण्यागोविंदाने नांदतात सगळेजण आपापल्या श्रद्धा, श्रद्धास्थानं जपतात. प्रत्येकाचं वेगवेगळे श्रद्धास्थानही आहे.
परंतु भारतात असा एक पर्वत आहे जो दोन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. तो पर्वत म्हणजे गिरनार पर्वत. गुजरात मधील जुनागढ येथे असलेला हा पर्वत हिंदू आणि जैन धर्मांचं एकत्रित श्रद्धास्थान आहे.
भारतात हिंदू धर्मात नर्मदा परिक्रमा ही एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची गोष्ट मानली जाते. नर्मदा परिक्रमा करताना आलेला मृत्यू देखील स्वर्गात नेतो असे म्हणतात.
अनेक लोक दरवर्षी नर्मदा परिक्रमा करतात. तशीच आणखीन एक परिक्रमा हिंदुधर्मात प्रसिद्ध आहे ते म्हणजे गिरनारची परिक्रमा.
श्री गुरुदेवदत्तांच्या वास्तव्याने पुनीत झालेला तो पर्वत. आज त्याच्याच विषयीची माहिती पाहुयात.
हिंदू धर्मियांच्या दृष्टिकोनातून गिरनार पर्वत :
श्री गुरुदेवदत्तानी गिरनार पर्वतावर वास्तव्य केलं होतं, म्हणून हिंदूंसाठी ते एक तीर्थक्षेत्र आहे. दत्तात्रयांनी तिथे १२००० वर्ष तप केलं अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
म्हणूनच हिंदू धर्मीयांमध्ये गिरनार परिक्रमा आयुष्यात एकदा तरी करावी असे म्हटले आहे. परिक्रमा म्हणजे काय? तर प्रदक्षिणा. गिरनार पर्वताला उजव्या हाताला ठेवून घातलेली प्रदक्षिणा.
पुराणांमध्ये गिरनारला श्वेताचल, श्वेतगिरी अशीही नावे आहेत. अनेक साधू, मुनीजन यांनी तिथे तपश्चर्या केली आहे.
गिरनारच्या पायथ्याशी महादेव मंदिर, हनुमान मंदिर, मृगी कुंड आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी आजही तिथे महादेव मंदिरात अनेक लोक दर्शनासाठी येतात.
तिथला जो मृगी कुंड आहे त्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक नागा साधू हे स्नान करतात.
आणि अशी श्रद्धा आहे की, जितके नागा साधू तिकडे कुंडात पाण्यात डुबकी मारतात त्यांच्यापैकी एक साधू परत वर येत नाही तो अंतर्धान पावतो.
गिरनारच्या आसपासच्या परिसरात अनेक मंदिरे, आखाडे, आश्रम देखील आहेत. या आश्रमांमधून अखंडपणे अन्नदान सुरू असतं. तिथे असणारे काही साधू हे १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत असं म्हटलं जातं.
गिरनार पर्वतावरील महत्त्वाचं आकर्षण आहे ते म्हणजे दत्तगुरूंच्या स्वयंभू पादुका यांचे दर्शन घेणे. दत्तात्रयांनी तेथे १२००० वर्ष तप केले आणि ते अंतर्धान पावले.
ते स्थान पर्वतावर सगळ्यात उंच आहे. त्यामुळे तिथंलं मंदिर हे झुलतं आहे असा भास लांबून पाहणाऱ्याला होतो.
या मंदिराकडे जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या आहेत. पाच हजार पायऱ्या चढल्यानंतर अंबामातेचं एक मंदिर आहे.
देवी पार्वतीने आंबा मातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला, म्हणून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. होळीपौर्णिमा आणि नवरात्रीला तेथे उत्सव असतो.
त्याच्यापुढे पाचशे पायऱ्या चढल्यावर गोरक्षनाथांचे मंदिर येतं.
नवनाथ संप्रदायातील गोरक्षनाथांनी या अवघड ठिकाणी तपश्चर्या केली आणि आजही त्यांचा गुप्त रूपाने तिथे वावर आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे.
त्याठिकाणी गोरक्षनाथांची धुनी देखील आहे तसेच त्याठिकाणी पाप-पुण्याची एक बारी किंवा खिडकी (छोटा बोगदा) आहे. म्हणजे त्यात एका बाजूने आत शिरायचे आणि दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर यायचे.
त्यानंतर पंधराशे पायऱ्या उतरून गेल्यानंतर भैरवनाथाचे एक मंदिर आहे.
तिथे गिरनारीबापूंची गुंफा लागते तिथे जे भक्त नतमस्तक होतात त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार एक रुद्राक्ष प्रसाद म्हणून मिळतो.
पुढे दोन कमानी दिसतात त्यात एका कमानीतून ३०० पायऱ्या उतरून गेल्यावर ‘ श्रीकमंडलू स्थान ‘ आहे. त्याठिकाणी पाच हजार वर्षांपूर्वीची एक धूनी देखील आहे.
ती दर सोमवारी प्रज्वलित केली जाते आणि त्यातील भस्म प्रसाद म्हणून दिले जाते.
याविषयीची एक आख्यायिका देखील सांगितली जाते. दत्तात्रेय ज्यावेळेस तपश्चर्या करत होते त्यावेळेस त्यांना भानावर आणण्यासाठी माता अनुसयाने त्यांना हाक मारली.
–
हे ही वाचा – हिमालय पर्वतातील अज्ञात देवदूत : खास संस्कृती, खास ओळख असणारे…
–
त्यावेळेस त्यांचा कमंडलु खाली पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. एका तुकड्याकडे अग्नि प्रकटला तिथेच आता ती धुनी आहे. तर दुसरीकडे जल तयार झाले. तेच ते स्थान म्हणजे श्रीकमंडलू स्थान.
ज्या दोन कमानी दिसतात त्याच्या एका कमानीतून बाराशे पायऱ्या चढून गेल्यावर दत्तटुंक लागते. त्याच ठिकाणी भगवान दत्तांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली.
तिथेच दत्तांच्या चरणपादुका उमटल्या आहेत. तिथूनच दत्तात्रेय अंतर्धान पावले अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे.
त्याठिकाणी दत्तांच्या पादुका, दत्तांची एक सुबक मूर्ती आणि एक पुजारी बसू शकेल इतकीच जागा आहे.
त्या ठिकाणी एक प्राचीन घंटा देखील आहे. ती घंटा तीन वेळेला आपल्या पितरांची नावे घेऊन वाजवली असता त्या पितरांना मुक्ती मिळते असा विश्वास दत्तभक्तांमध्ये आहे.
गुरुदेव दत्तांची सगुण उपासना करताना त्यांच्या पादुकांची उपासना करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते म्हणूनच अनेक हिंदू लोक त्याठिकाणी जातात.
जैन धर्मीयांच्या दृष्टीने गिरनार पर्वत :
जैन धर्मियांच्या दृष्टीनेदेखील गिरनार पर्वत खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे तिथं असणारं बाविसावे तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांचं मंदिर.
या ठिकाणी भगवान नेमिनाथ यांनी तपश्चर्या करून कैवल्यज्ञान प्राप्त केले म्हणतात. नेमिनाथ हे श्रीकृष्णाच्या समकालीन आहेत.
ते श्रीकृष्णाचे चुलत भाऊ आहेत, असंही समजलं जातं. नेमिनाथ हे अरिष्टनेमी या नावानेही ओळखले जातात. नेमिनाथ हे यादववंशी राजा समुद्रविजय यांचे पुत्र.
नेमिनाथांचा विवाह जुनागडचे राजा उग्रसेन यांची कन्या राजुलमती हिच्याबरोबर ठरला होता. विवाहासाठी नेमिनाथ जुनागडला आले आणि तिकडे त्यांनी अनेक प्राणी पाहिले.
त्यांना त्यावरून कळलं की त्यांच्याच लग्नासाठी या प्राण्यांचा बळी दिला जाणार आहे. आणि जे वर्हाडी मंडळी असतील त्यांच्या भोजनाची ही सोय आहे.
हे पाहून त्यांचं मन द्रवले. मनुष्यांकडून होणारा इतका हिंसाचार त्यांना सहन झाला नाही आणि त्याच वेळेस त्यांच्या मनात विरक्ती आणि वैराग्याची भावना निर्माण झाली.
त्यांनी लग्न ताबडतोब थांबवलं आणि तपश्चर्या करण्यासाठी ते गिरनार पर्वतावर गेले.
गिरनार पर्वतावर त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांना तिथे कैवल्यज्ञान प्राप्त झालं. पुढे त्यांनी अहिंसेचा प्रचार केला. गिरनार पर्वतावर त्यांना मोक्षप्राप्ती झाली.
म्हणूनच तिथे दरवर्षी अनेक जैन धर्मीय देखील दर्शनासाठी जातात. गिरनार पर्वतावर भगवान नेमिनाथ यांची अत्यंत सुंदर मूर्ती आहे.
विशेष करून मूर्तीचे डोळे, त्या डोळ्यांकरिता अनेक मौल्यवान खडे वापरण्यात आले आहेत. अजनेय, माणिक, हिरे यांचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे.
ही जी मूर्ती आहे ती भारतातली सर्वात पुरातन मूर्तीतली एक मूर्ती समजली जाते.
नेमिनाथांच्या मूर्तीच्या चरणात शंख चिन्हांकित केलेलं असतं, याचं कारण म्हणजे शंख हे त्यांचं चिन्ह आहे.
शंख हे नेहमी पांढर्या रंगाचं असतं आणि त्यावर कोणताही रंग चढत नाही या त्याच्या वैशिष्ट्यांमुळेच नेमिनाथांनी शंख हे चिन्ह धारण केलं.
गिरनार पर्वतावर अजून एक भावनाथांचं जैन मंदिर आहे म्हणूनच गिरनार पर्वत जैन धर्मियांसाठी महत्त्वाचा आहे.
दरवर्षी हजारो जैनधर्मीय तिथे जातात आणि तिथली पवित्र माती आपल्या कपाळाला लावतात.
गिरनार पर्वत ट्रेकर्सच्या दृष्टिकोनातून:
गिरनारच धार्मिक महत्त्व तर खूपच आहे याशिवाय आज-काल फिटनेससाठी देखील लोक तिकडे ट्रेकिंगसाठी जातात.
तिथे हल्ली गिरनार मॅरेथॉन आयोजित केली जाते. गिरनारच्या दहा हजार पायऱ्या चढून वर जाणे आणि खाली येणे असा हा ट्रेक असतो.
गिरनार पर्वताला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू चांगला असतो. कारण त्याकाळात उन्हाचा प्रकोप कमी असतो म्हणून ती चढण शक्य होते. दमछाक होत नाही.
साधारणतः पहाटे चारच्या सुमारास ट्रेकला सुरुवात केल्यास ऊन वाढायच्या आत वर जाता येतं. आजकाल ज्या लोकांना चढायचा त्रास असतो त्यांच्यासाठी डोली देखील उपलब्ध आहे.
चढताना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यात अनेक ठिकाणी पाणी आणि खायच्या गोष्टींची व्यवस्था आहे.
गिरनार, अनेक लोकांचे श्रद्धास्थान असलेला हा पर्वत. हिमालयापेक्षाही जुना हा पर्वत. श्री गुरूदत्तांचा वास असलेला हा पर्वत. नेमिनाथांची निर्वाणभूमी असलेला हा पर्वत.
संतकवी नरसिंग मेहता यांनी त्यांच्या अनेक रचना ज्या पर्वतावर बसून लिहिल्या तो हा पर्वत. म्हणूनच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या गिरनार पर्वताला भेट द्यावी.
===
हे ही वाचा – या बाजूला कैलास पर्वत, त्या बाजूला राक्षस तळं जाणून घ्या कैलास मानसरोवरचं रहस्य
====
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.