मेडिटेशन करावंसं वाटतं पण “जमतच” नाही…अशांसाठी एक एक्सायटिंग पर्याय समोर आलाय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आयुष्य म्हणजे एकसारखी बेरीज वजाबाकी. हे गणित इतकं विचित्र आहे. वेळ आणि आवड यांची सांगड जमतच नाही. जेव्हा आवडीचं काही करायचं असतं तेव्हा वेळ तरी नसतो किंवा पैसा तरी.
पुढं पैसा कमवायचा म्हणून बाहेर पडतो तेव्हा आवडीसाठी वेळच रहात नाही. शिक्षण, नोकरी, करिअर, हे सगळं करत असताना तब्येत सांभाळणं कठीण होतं.
वेळी अवेळी खाणं पिणं, ठरवलेली टार्गेट्स पूर्ण करताना होणारी दमछाक या सर्वांचा एकत्रित परिणाम माणसाच्या तब्येतीवर होतो. ही तब्येत नीट असेल तर सगळं उत्तम.
पण जर तीच नीट नसेल तर? मन चंगा तो कठौती में गंगा हे आपले पूर्वज सांगून गेले आहेत. म्हणजे चित्ती असू द्यावे समाधान..
मनःस्वास्थ्य टिकवणं हे इतकं सोपं आहे का? हो...काही गोष्टी सांभाळत राहीलं तर मनःस्वास्थ्य नक्की टिकून राहील आणि आपोआपच तब्येत पण चांगली राहील.
पूर्वी शरीरकष्टाची खूप कामं असल्यामुळे वेगळा व्यायाम करायची गरज भासली नव्हती. सकस आहार आणि भरपूर काम यामुळे माणूस खूपच निरोगी आयुष्य जगत होता. वृत्तीने समाधानी होता. मनाची दुखणी कमीच होती.
आता योग प्राणायाम मेडीटेशन यांच्या मदतीनं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ टिकवायचा प्रयत्न केला जातो. पण यातही अजून एक अजून प्रकार आहे याला मेडिटेशन वाॅकींग म्हणतात.
शरीरस्वास्थ्यासाठी उपयुक्त असलेला हा प्रकार बौद्ध धर्मात प्रामुख्याने केला जातो. याचे अनेक फायदे आहेत. याचा फायदा मुख्यत्वे तुमचं मन आणि शरीर यांच्या विकासासाठी होतो.
यामुळे तुम्हाला अतिशय शांत आणि संतुलित मानसिक आरोग्य लाभते. हा मेडिटेशन वाॅकींग म्हणजे चालण्याचे विविध प्रकार. सरळ रेषेत चालणे, मागे उलटं चालत जाणे, वेडेवाकडे रस्त्यावर चालणे, वर्तुळाकार चालणे इ.
हे सारं सरावाने जमू लागतं. जे यात पारंगत आहेत ते बैठ्या ध्यानधारणेसह हे वाॅकींग मेडिटेशनही सहजी करु शकतात. या वाॅकींग मेडिटेशनमध्ये पुढील प्रकार आढळतात.
१. किन्हीन
२. थेरवाडा
३. विपश्यना.
आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करुन मंत्रासोबत ही ध्यानधारणा केली जाते. याचे फायदे जाणून घेऊया.
१. शरीराची हालचाल वाढते-
मेडिटेशन वाॅकींगमुळे शारीरिक हालचाली वाढतात म्हणजेच शरीर तंदुरुस्त होऊ लागते. रक्ताभिसरण सुधारते.
पायांकडे ते उत्तम रित्या होऊ लागते.त्यामळे तुमची शारीरिक ऊर्जा चांगली राहते. बैठी कामं करणाऱ्या लोकांना याचा जास्त फायदा होतो.
२. पचनशक्ती सुधारते-
जेवणानंतर केलेली शतपावली पचनक्रिया सुरळीत ठेवायला मदत करते. बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो.
३. चिंतानाश-
मेडिटेशन वाॅकींगमुळे मानसिक आरोग्य सुधारते. चिंतेत होणारी मनाची अवस्था ही शारीरिक त्रासाचं मूळ असते.
पण मेडिटेशन वाॅकींगमुळे मन उत्फुल्ल रहातं. चिंता, क्लेश बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत आपण शांत राहू शकतो.
४. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते-
मेडिटेशन वाॅकींगमुळे रक्ताभिसरण सुधारते त्याच बरोबर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.
एका अभ्यासातून स्पष्ट झाले की, सामान्य पद्धतीने चालणाऱ्या लोकांपेक्षा बुद्धिस्ट पद्धतीचा अवलंब करुन चालणारे लोक या चाचणीत जास्त प्रमाणात मधुमेह नियंत्रित करु शकले होते.
५. नैराश्यावर मात शक्य-
मेडिटेशन वाॅकींगमुळे शरीरातील ऊर्जा, कार्यक्षमता वाढते. शिवाय वारंवार भावनांच्या आंदोलनांचा होणारा अतिरिक्त त्रास कमी होतो.
वाढत्या वयात नैराश्य ही एक खूपदा आढळून येणारी समस्या आहे. मेडिटेशन वाॅकींगमुळे ते नियंत्रित करण्यासाठी मदत होते.
६. वर्तन समस्या निराकरण-
निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालवल्याने माणसाचे मन आणि शरीर दोन्ही उत्साही बनते. निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजे काही रोज जंगलात, रानावनात जा असं नाही.
पार्कमध्ये, बागेत किंवा वनराईत फिरायला जा. मेडिटेशन वाॅक करा. त्याचा खूप सकारात्मक परिणाम दिसून येतो.
परदेशी लोक समुद्र किनाऱ्यावर सूर्यस्नान म्हणजे सनबाथ घेताना आपण पाहतो, त्याचप्रमाणे जपानी लोक जंगल बाथ घेतात म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ काढतात. त्याचा परिणाम त्यांचं चिंता करण्याचं प्रमाण, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
७. झोपेचा त्रास कमी होतो-
वाढत्या वयात चिंता- क्लेश या गोष्टी निद्रानाशाचा विकार जडवायला कारणीभूत असतात. पण मेडिटेशन वाॅकींगमुळे शांत झोप लागते.
ज्या बारीकसारीक गोष्टी मनःस्वास्थ्य बिघडवायला कारण ठरतात त्या म्हणजे अतिरिक्त प्रमाणात येणारा मानसिक ताण, चिंता, त्यामुळं होणारी चिडचिड यांचा एकत्रित परिणाम झोपेवर होतो.
मात्र मेडिटेशन वाॅकींगमुळे त्यावर बराचसा सकारात्मक परिणाम होऊन शांत झोप लागते. आणि आपोआपच इतर समस्या कमी होतात.
८. व्यायामाची आवड निर्माण होते-
व्यायामामुळे स्नायूंची लवचिकता वाढते, मनाचे त्रासही कमी होतात, मन आनंदी राहते. पण हे असतानाही व्यायामाची नावड आपण हौसेने जोपासतो.
पण या मेडिटेशन वाॅकींगमुळे वेगळा प्रकार म्हणून हा व्यायाम करुन बघा…व्यायाम आवडू लागेल आणि त्याचे सारे फायदे मिळतीलच.
९. कलात्मकता वाढते-
या मेडिटेशन वाॅकींगमुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि त्याचमुळे मेंदू आणि मन तल्लख होते. बुध्दीला चालना मिळते. आणि कलाकौशल्य असलेली कामं करायला सुरुवात केली जाते.
कारण या व्यायामामुळे मेंदूचा कलाकौशल्य जाणणारा भाग जागृत होतो आणि सुप्त गुणांना चालना मिळते.
१०. शारीरिक तोल सांभाळला जातो-
या मेडिटेशन वाॅकींगमुळे “वाढत्या वयात शरीराचा तोल जाऊन पडझड होते” हे जे सर्रास घडतं त्याला काही अंशी आळा बसतो. चालण्याच्या विविध पद्धतीनी घोट्याची हालचाल आणि काम नीट चालतं.
थोडक्यात काय तर सुदृढ आणि निरोगी शरीर हीच मोठी संपत्ती आहे. पण त्या संपत्तीची जपणूक करायची असेल तर व्यायाम करुनच ती राखता येते. त्यासाठी शरीर आणि मन दोन्ही संतुलित राखण्यासाठी हा मेडिटेशन वाॅकींग म्हणजे उत्तम पर्याय आहे.
हे करताना पुढील बाबी लक्षात घ्या-
१. वर्तमानात जगा
२. मेडिटेशन वाॅकींग बरोबरच बसूनही ध्यानधारणा करत जा.
३. टार्गेट ठरवा आणि त्यानुसार व्यायाम करा.
४. व्यायामाचा कालावधी हळूहळू वाढवत न्या.
५. कोणता व्यायाम प्रकार तुम्हाला जास्तीत जास्त सहजपणे जमतो तोच करत जा.
६. व्यायामाची नोंद करत जा म्हणजे तुम्ही सुरुवातीला कुठे होता आणि कुठंवर पोचला हे समजेल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.