क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला ‘वन-डे’ सामना जो चक्क ‘२’ दिवस खेळला गेला होता!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
क्रिकेट म्हणजे आपल्या भातीयांचा धर्मच. आपल्या लोकांची क्रिकेट वर जितकी श्रद्धा आहे तितकी कोणत्याच खेळावर नाही, आपली लोकं क्रिकेट साठी काहीही करतील!
तसा क्रिकेट हा बेभरवश्याचा खेळ. आणि हे बऱ्याचदा सिद्ध देखील झालं आहे.
सुरवातीला फटाफट विकेट जाऊन सुद्धा मिडल ऑर्डरच्या बॅट्समननी मॅच खेचून आणली आहे तर दुसरीकडे डावाची सुरवात धडाक्यात होऊन सुद्धा नंतर बोलर्सच्या बळावर मॅच फिरल्याचे भरपूर वेळा पहिलं असेल.
२०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल घ्या किंवा २०१६ च्या टी२० वर्ल्डकपची भारत विरुद्ध विंडीज मधली सेमी फायनल घ्या. मॅच चे विरोधी निकाल लागलेले आपण पहिलेच आहेत.
यामध्ये अजून एक फॅक्टर मॅटर करतो,तो पाऊस!
क्रिकेटचे तसे भरपूर किस्से आहेत. तर आज पाहूया तो वनडेचा ऐतिहासिक सामना जो भारताने दोन दिवस खेळलेला.
१९९९ चा वर्ल्डकप म्हटल्यावर काय आठवत? चॉकर्स दक्षिण आफ्रिका, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघाचा उदय.
तर तारीख होती २९ मे १९९९.
भारताला महत्वाचा सामना इंग्लंड सोबत खेळायचा होता. टीम इंडियाला ही स्पर्धा काय तशी खास गेली नव्हती. सुपर ६ मध्ये जागा बनवण्यासाठी इंग्लंड विरुद्धची मॅच जिंकणे महत्त्वाचे होते.
इंग्लिश संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. टॉस नंतर जेव्हा टीमची घोषणा झाली, तेव्हा सगळ्यांना अचंबित करणारा निर्णय घेतला गेलेला.
श्रीलंका विरुद्ध ५ विकेट घेणारा रॉबिन सिंग ला बाहेर बसवलं गेलेलं आणि त्याच्या जागी विकेटकीपर नयन मोंगियाला स्थान मिळालेलं.
आतापर्यंत किपिंग करत आलेल्या द्रविड ला स्पेशालिस्ट बॅट्समन म्हणून वरच स्थान देण्याचं मॅनेजमेंटने ठरवलेलं. यावर भरपूर चर्चा झाली, वाद झाले.
असो, टीम इंडियाची सुरवात तशी स्लो झाली.
एस रमेश आणि सौरव गांगुली यांनी १३ ओव्हर मध्ये ४९ रन्स स्कोअर बोर्ड वर टांगले.आणि रमेश आऊट झाले.
द्रविड ५३, गांगुली ४० आणि अजय जडेजा च्या ३९ धावांच्या जोरावर भारताने २३३ रनंच टार्गेट ब्रिटिशांसमोर ठेवलं.
ब्रिटिशांच्या इनिंग ची सुरवात झाली.
वैयक्तिक २ रन वर असताना इंग्लिश ओपनर अलेक्स स्टीव्हर्ट याला देवाशीष मोहंती याने माघारी धाडलं.
पुढच्याच बॉल वर मोहंती ने ग्रीम हिकचे स्टंप उडवत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. इंग्लिश स्कोअरबोर्ड होता १३ रन्स वर २ विकेट.
ग्रॅहम थोर्प आणि नासिर हुसेन यांनी ब्रिटिश इनिंग सांभाळली. १९ व्या ओव्हर पर्यंत दोघांनी बाजू धरून ठेवलेली. आणि ढगांनी गर्जायला सुरवात केली.
ग्राउंड्समॅन कव्हर घेऊन सज्ज होते.पण पाऊस काय पडला नाही. वातावरण थोडं चलबिचल झालं. आणि खेळ पुन्हा सुरू झाला.
गांगुली आपली दुसरी ओव्हर आणि इनिंगची २० वी ओव्हर घेऊन आला. आणि पहिल्याच बॉल वर नासिर हुसेनच्या दांडक्या गांगुलीने गुल केल्या.
७२ च्या धावसंख्येवर ३री विकेट.या ओव्हर मध्ये गांगुली ने फक्त १ रन दिला आणि नासिर हुसेन ला माघारी धाडलं होत.
अन पावसाला सुरवात झाली. पंचांनी ग्राउंड्समन सोबत चर्चा करुन खेळ थांबवला आणि दुसऱ्या दिवशी खेळ सुरू करण्याचा निर्णय सोडला.
दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. इंग्लंड ला सामना जिंकण्यासाठी अजून १६० रन हवे होते.
थोर्प आणि फेयरब्रदर हे ब्रिटिश फलंदाज पिच वर नांगर टाकून खेळायच्या इराद्यानेच आलेले. पण भारतीय गोलंदाजानी त्यांच्या इराद्याला सुरुंग लावायचं काम चोख पार पाडलं.
२२ व्या ओव्हर मध्ये थोर्प ने श्रीनाथ ला लावलेला चौका अचूक होता. २४ व्या ओव्हर मध्ये श्रीनाथ ने एलबीडब्लू करत थोर्प ला माघारी धाडले.
ब्रिटिश धावसंख्या होती ८१ आणि विकेट पडले होते ४.
आणि हा एलबीडब्लू आउट देण्याचा निर्णय बराच विवादित ठरला होता.
रिप्ले मध्ये क्लीअर दिसत होतं की बॉल लेग स्टंपच्या बाहेर जात होता.आणि हा विवादित निर्णय दिला होता पाकिस्तानी पंच जावेद अख्तर यांनी.
जावेद अख्तर यांनी चुकीचा निर्णय दिलेला हा काही पहिला सामना नाही. पण ब्रिटिशांच्या विरोधात दिलेला हा पाहिला सामना होता.
याआधी १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लड यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पण त्यांनी असेच वादग्रस्त निर्णय दिले होते.
फरक एवढाच होता की त्यांचे निर्णय इंग्लंडच्या पारड्यात आफ्रिकेच्या विरुद्ध पडले होते.
थोर्प च्या जागी नवीन फलंदाज आला अँड्र्यू फ्लिंटॉफ. कुंबळे च्या पहिल्याच बॉल वर छक्का लावत त्याने ब्रिटिश प्रेक्षकांना खुश व्हायची संधी दिली.
पण त्याच ओव्हर मध्ये कुंबळेने त्यांचा आनंद हिरावून घेतला. फ्लिंटॉफ ला पॅव्हेलीयन मध्ये पाठवत कुंबळे ने पाचवा धक्का दिला.
पुढचा फलंदाज ऍडम हॉलीओक. १३० च्या धावसंख्येवर कुंबळेनेच याची शिकार केली.
मार्क इहलाम आणि फेयरब्रदर या दोघांना ठराविक अंतरावर गांगुलीने बाद करत ब्रिटिश फलंदाजीची हवा काढली.
अंततः १६९ वर ब्रिटिशांचा खुर्दा पाडला गेला.आणि भारताने सुपर ६ मध्ये आपली जागा पक्की केली.
फलंदाजीत ४० धावा आणि गोलंदाजी करत ३ विकेट घेऊन ऑल राउंड परफॉर्म करणारा गांगुली सामनावीर म्हणून निवडला गेला.
अशा प्रकारे २९ मे ला सुरू झालेला सामना भारताच्या विजयाने ३० मे ला संपला.
बेभरवश्यावर असणाऱ्या या खेळात पावसामुळे अडथळे आल्याने हा सामना दोन दिवस खेळला गेला.
विवादित डकवर्थ लुईस नियम तेव्हा अस्तित्वात आला होता पण ऑफिशियल आयसीसी ने त्याचा स्वीकार केला नव्हता.
पुढे या वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि पावसामुळे सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.