Ugly- सगळे प्रश्न सोडवूनही अनेक प्रश्न विचारणारा चित्रपट!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
शिरीष कणेकर फिल्लमबाजी मध्ये एक गोष्ट सांगायचे.
नाटकाचा/ चित्रपटाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात किंवा सुरुवातीला भिंतीवर बंदूक दाखवली तर नाटक/ चित्रपट संपेपर्यंत तिचा बार उडालाच पाहिजे…
म्हणजे थोडक्यात काय, तर नाटक, चित्रपटात चर्चिल्या/ दाखवल्या गेलेल्या प्रत्येक दृश्याची, धाग्याची कथेशी संगती अखेर पर्यंत तरी जुळलीच पाहिजे. सगळी कोडी सुटली पाहिजेत. असा हा अलिखित नियम! उत्तम, चांगले मनोरंजन करणारे चित्रपट किंवा नाटकं हा नियम पाळतात. हा नियम न पाळणारे ते ढिसाळ, निष्काळजी दिग्दर्शक किंवा लेखक…!
आता मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात. पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट-गाजलेले, चाललेले सिनेमे म्हणतो किंवा चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी की त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं की तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना, सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. सिनेमा चांगला कॉमेडी असेल, तर नंतर बराच वेळ त्यातल्या गोष्टी मनातल्या मनात आठवून हसू फुटलं पाहिजे किंवा मर्डर मिस्ट्री असेल, तर नंतर आपण गुन्ह्याचे धागे दोरे जुळवत बसलो पाहिजे.
उदाहरणार्थ, गुलझारचा “अंगूर” हा (संजीव कुमार, देवेन वर्मा ने काम केलेला) किंवा “अंदाज अपना अपना”(आमिर खान, सलमान खान चा) हे असे चांगले कॉमेडी सिनेमे होते . तसाच नुकताच येउन गेलेला “दृश्यम “ हा असाच उत्तम मर्डर मिस्टरी होता.
कालच यु-ट्यूब वर सर्फ करताना अचानक “Ugly” हा अनुराग कश्यपचा चित्रपट पाहिला. पहिले ५-१० मिनिट उत्सुकतेने पहिला आणि लगेच बंद करून ठरवले की आज शांतपणे हा बघायचाच.
तो पर्यंत गुगल वर माहिती काढली तेव्हा कळले की हा चित्रपट भारतात नाही फारसा चालला, तरीही सगळीकडे चांगलाच नावाजला गेलेला, कौतुकाला पात्र ठरलेला हा चित्रपट आहे. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये standing ovation मिळालेला हा चित्रपट आहे, म्हणजे बघा! पण ह्या चित्रपटाबाबत आणखी एक स्मृती म्हणजे, मागे जेव्हा कोर्टाने सिनेमात धुम्रपान करताना कोणी दिसत असेल, तर खाली “smoking is injurious to health.” असा वैधानिक इशारा दाखवलाच पाहिजे असा निर्णय / आदेश दिला होता. ह्या आदेशाला अनुराग कश्यपने आव्हान दिले होते ते ह्याच चित्रपटासाठी! अर्थात त्यामुळेच तो भारतात उशिरा प्रदर्शित झाला. भारतातली तर त्याची कमाई यथा तथाच होती( असणारच! बरोबर त्याच सुमारास PK रिलीज झाला होता.) लोकांच्या फारसा काही आज तो लक्षात नाही..असो, तर कथा सांगायची म्हटली तर हा एक रहस्यपट आहे.
एका कली नावाच्या १० वर्षाच्या मुलीच्या संभावित अपहरणाभोवती ही कथा फिरते. कथा वेगवान पद्धतीने दाखवली असली तरी, आपल्याला विचार करायला फारसा वेळ न देता घटनांबरोबर फरफटत नेणारा हा चित्रपट नाही. अनुराग जाणून बुजून पोलीस चौकशांमधून चालणारे रटाळ, कंटाळवाणे पंचनामे दाखवतो. पोलीस नावाच्या (माणूस नसावे अशा वाटणाऱ्या) प्राण्याच्या चित्रात तपशीलवार रंग भरत जातो. गरीब ते निम्न मध्यम वर्गीयांची कळाहीन घरं, घरातल्या मोर्या, स्वयंपाकघरं आणि बेडरुम्स! अगदी उच्चभ्रू वर्गातले लोकही घरात आपणा-सर्वसामान्य माणसांप्रमाणेच राहतात. तसेच कपडे वगैरे घालतात (सिरीयल मधल्यासारखे नाही, कायम मेकपचे रोगण, आणि भरजरी कपडे 24X7!)
गटारं-नाले-ट्रॅफिक-फेरीवाले आणि लोकल ट्रेन्स. हे सगळ घेऊन, एकाच वेळी अनेक चेहरे घेऊन समोर येणारं मुंबई शहर. एखाद्या माणसासारखं गुंतागुंतीच व्यक्तिमत्व घेऊन ते आपल्यासमोर येतं. त्याच्या चेहेऱ्यावर अनेक सुरकुत्या, व्रण, डाग आहेत आणि तरीही काही तरी मोहक आणि हिडीस असं एकाच वेळी ते आहे. मुख्य म्हणजे ते धडधडणारं जिवंत शहर वाटतं…! या शहराच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कलीची आई शालिनी (तेजस्विनी कोल्हापुरे) दिसते. चार भिंतीत बंदिस्त झालेली, टीव्ही-मेकअप-फोनपलीकडे आयुष्य न उरलेली, मुलीतही फारसा रस नसलेली ही बाई. तिचा सध्याचा नवरा (रोनित रॉय) पोलिसात मोठ्या पदावर आहे. कलीचा बाप, त्याचा शालिनी बरोबर घटस्फोट झालाय, (राहुल भट) तिला दर आठवड्याला भेटायला नेणारा अपयशी होतकरू नट. त्याच्यासोबत गेलेली कली गाडीतून दिवसाढवळ्या बेपत्ता होते.
एखाद्या ’सर्वसामान्य’ मूल हरवण्याच्या केसकडे करावं तितपत दुर्लक्ष याही केसकडे करणारे पोलीस जागे होतात, ते तिचा सावत्र बाप कोण आहे ते कळल्यावर. यंत्रणा वेग घेते आणि मग हळूहळू सगळ्या लोकांची डोकी आपापल्या स्वार्थाच्या दिशांनी चालू लागतात. कलीचा सावत्र बाप, कलीचा सख्खा बाप, बापाचा संशयास्पदरित्या वागणारा मित्र (विनीत कुमार सिंग), बापाची मादक प्रेयसी –राखी मल्होत्रा, कलीचा व्यसनी, भणंग, नाकर्ता मामा (सिद्धान्त कपूर), त्यांचे कडवट भूतकाळ, त्यांच्यातलं नासून गेलेलं माणूसपण, अहंकारांचे तिढे आणि न सापडणारी कली! हे इतक गुंतागुंतीच आहे की मला तरी ते इथे उलगडून सांगणं अवघड आहे. त्याकरता तुम्ही चित्रपट बघाच…!
चित्रपट संपायला आला तरी कली सापडायची काही चिन्ह दिसत नाहीत. आपल्याला सवय असते ना, अशा रहस्यापटात हळू हळू गुंता सुटत चालल्याची, ओझं उतरत चालल्याची. तसे आपण ही हळू हळू RELAX होऊ लागतो, पण इथे तसे होत नाही. कली सापडण्याची शक्यता धूसर होऊ लागते. आपल्याच जीवाची तगमग वाढते. ह्यांच्या अहंकार आणि स्वार्थाच्या धुळवडीत कोणाला त्या पोरीची पडलीये की नाही ?, पण अखेरीस कली सापडते. कलीला पळवणारा गुन्हेगार कोण? या प्रश्नाचं उत्तरही मिळतं. पण त्याच बरोबर उत्तराच्या फोलपणानं आपल्याला सटपटायला होतं…!
ह्या चित्रपटात भरपूर मराठी लोक आहेत आणि सगळ्या लोकांची कामं जबरदस्त आहेत. पण सगळ्यात भाव खाऊन जातो गिरीश कुलकर्णीचा इन्स्पेक्टर जाधव! सुरुवातीला या केसकडे नेहमीच्या कोडगेपणाने बघणारा इन्स्पेक्टर ते केसमध्ये गुंतत गेलेला इन्स्पेक्टर जाधव त्यानं छान रंगवला आहे. ह्या एका पात्रालाच अनेक मुखवटे ह्या चित्रपटात नाहीत. बाकी सगळे, अगदी मुलीची आई, तिचे बाप, भाऊ, विद्यमान नवरा, माजी नवरा, त्याचा मित्र आणि प्रेयसी सगळे अनेक मुखवटे घालून वावरतात आणि जसा जसा एका एक मुखवटा उतरत जातो, तसे त्यांचे आतले काळे हिडीस, घाणेरडा वास मारणारे अंतरंग दिसू लागते.
एका साधी मुलीच्या अपहरणाची केस हो! पण मग एकेकाचे एकमेकांबद्दलचे संशय, मत्सर, सूड, असूया त्याबरोबर स्वार्थ, स्वत:ची पोळी शेकून घेण्याचा, दुसऱ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न, असे निरनिराळे भाव लोकांच्या वागणुकीतून डोकावायला लागतात. कुणीही, अगदी मुलीचे आई-बाप, मामा कुणीही ह्यातून सुटत नाहीत आणि शेवटी मग व्हायचे तेच होते. ह्या सगळ्या नकारात्मक भावनांमुळे, वृत्तींमुळे निरागसता, निष्पापपणा कोमेजतो, बळी जातो. त्यानंतर त्यांना जाणवत राहते की ह्या सगळ्याची खरच काहीही गरज नव्हती. आपण योग्य आणि सरळ पर्याय निवडले असते, तर काहीतरी चांगले झाले असते. पण ती असते पश्चात बुद्धी, विफल पश्चात बुद्धी…!
विजय तेंडूलकरांनी लिहिलेल्या गिधाडे ह्या नाटकाची संहिता वाचून असाच माझा थरकाप उडाला होता. मी फार लहान असेन, जेव्हा त्याचे प्रयोग होत असत त्यामुळे मी ते नाटक पाहिलेले नाही, पण नुसते वाचूनच प्रश्न पडला होता खरेच माणसे अशी वागत असतील? इतकी आपमतलबी, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी, अप्पलपोटी माणसे असू शकतील? काय उपयोग अशा वागण्याचा?
हा चित्रपट पाहूनही असे अनेक प्रश्न उभे राहतात. शिरीष कणेकर म्हटले त्याप्रमाणे, लाक्षणिक अर्थाने प्रत्येक बंदुकीचा बार उडतो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते खरे पण…. उत्तराचे अर्थहीनत्व जाणवून उदास व्हायला होतं. आवर्जून हा चित्रपट बघा. पण हे प्रश्न डोक्याला भुंगा लावतील, मुंग्या आणतील…तरीही बघा, कारण कधी कधी मेंदूला अशा मुंग्या आलेल्या बऱ्या ! नाही का?!
जाता जाता आणखी एक, ह्या चित्रपटात जवळपास प्रत्येक जण सिगारेट ओढतो. दर पाच मिनिटाला कुणीतरी सिगारेट ओढतोच, त्याबरोबर वैधानिक इशाराही येतो. हा खरेतर खास पुणेरी जोडा! कोर्टाच्या सुलतानी निर्णयावर अनुरागने मारलेला. आपण रोज हजारो लोकांना सिगारेट विडी ओढताना बघतो तेव्हा कुठे असतो हा वैधानिक इशारा. पण कोर्टाच्या बुद्धीपुढे (आणि निर्णयापुढे) काय तर्क चालणार! अनुराग कश्यप इतका पुणेरी असेल असे वाटले नव्हते.
असो, चित्रपटची इतर माहिती खाली दिलेली आहे आणि लिंक ही दिली आहे आवर्जून, वेळ काढून बघाच…! त्रास होईल कदाचित पण पश्चात्ताप नाही होणार…खात्रीने सांगतो!
- दिग्दर्शक:अनुराग कश्यप
- कलाकार:राहुल भट, रोनित रॉय, गिरीश कुलकर्णी, सिद्धान्त कपूर, तेजस्विनी कोल्हापुरे
- चित्रपटाचा वेळ:१२८ मिनिटे / २ तास ८ मिनिटे
- भाषा:हिंदी
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi