आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
अमेरिकेत आणि पाश्चात्य देशांत वर्णभेद आणि द्वेष किती तीव्र आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु अनेकदा आता तसं काही राहिलेलं नाही असा आभास निर्माण केला जातो.
मात्र अजूनही श्वेत-अश्वेत हा तिथला मुद्दा आपल्या इथल्या ब्राम्हण-दलित किंवा उच्चवर्णीय-दलित मुद्द्याइतकाच गंभीर आहे.
अशावेळी २०१७ मध्ये आलेला ‘गेट आऊट’ हा याच विषयावरचा एक गंभीर सिनेमा नक्कीच बघण्यासारखा आहे.
जॉर्डन पील यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा अमेरिकेतील वंशवादावर प्रहार करणारा आहे.
यात पील यांनी एक काल्पनिक रुपक वापरून एक आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीने आपल्या कॉकेशियन मैत्रिणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ज्या घटना घडत जातात त्या संबंधाने अमेरिकेतील वर्णभेद आणि त्यांबंधाने आंतरजातीय संबंधांवर प्रकाश टाकलेला आहे.
या चित्रपटात ख्रिस वॉशिंग्टन (डॅनियल कालुया) हा फोटोग्राफीत करीअर करणारा तरुण आपल्या गर्लफ्रेन्डच्या, रोज आर्मिटेजच्या ( ऍलिसन विल्यम्स) घरी तिच्या कुटुंबियांना भेटायला जातो.
जाण्यापूर्वीच तो शंकीत असतो, आणि आपल्या मैत्रिणीला विचारतो, ‘मी ब्लॅक आहे हे तुझ्या घरच्यांना माहीत आहे ना?’
यावर रोज त्याला म्हणते की माझे पालक उदारमतवादी आहेत. लिबरल विचारांचे आहेत. तरी देखील ख्रिस मनातल्या मनात शंकीतच असतो.
परंतु जेव्हा रोजच्या घरचे लोक त्याचं हसून मनापासून स्वागत करतात तेव्हा तो निशंक होतो.
मात्र चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकत जाते, तशा अनेक विचित्र गोष्टी आणि त्या घरातील लोकांचे धक्कादायक संवाद, विधाने यामुळे हळू हळू त्याच्या लक्षात येते की,
आपण इथं येऊन चूक केलीय आणि आपण एका जाळ्यात अडकलोय. इथून आपल्याला काहीही करून सटकण्याचा मार्ग शोधावा लागेल.
चित्रपटाच्या सुरुवातीला ही एक आंतर्वर्णिय प्रेमकहाणी एक सुखी अंताकडे जाते असं वाटत राहतं. सगळं काही साधारणरित्या चालू असतं.
मात्र नंतर ही कहाणी वळण घेते आणि त्या कुटुंबातील श्वेत लोकांची खरी मानसिकता, खरा स्वभाव उघड करत जाते. सुरुवातीला त्या घरातील लोकांचे प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण असलेलं वागणं आणि बोलणं नंतर हळू हळू बदलत जातं.
बोलण्यातला भाव देखील बदलत जातो. सुरुवातीला सहज, घरगुती वाटणारे संवाद आणि त्यातील सहज भाव नंतर नंतर हिंसक आणि भीतीदायक होत जातात.
त्यामुळे सुरुवातीला सिनेमाचे प्रेक्षक देखील ख्रिस वॉशिंग्टनप्रमाणेच साधारण मूडमध्ये असतात आणि नंतर नंतर त्या घरातल्या लोकांच्या वागण्याने ते देखील ख्रिसप्रमाणेच अचंबित आणि भयभीत होत जातात.
ही कहाणी काहीशी आपल्या इथल्याच उच्च ब्राम्हण किंवा क्षत्रिय वर्ग आणि दलित वर्गातील संघर्षाच्या कहाणी सारखीच आहे.
ज्याप्रमाणे आपल्या इथे उच्चवर्णीय घरातील मुलीने कथित दलित वर्गातील मुलाशी केलेली मैत्री, प्रेम, लग्न हे सगळं नामंजूर असतं आणि त्याला कडाडून विरोध केला जातो,
प्रसंगी खुनाखुनीवर वेळ येते, त्याचप्रमाणे पाश्चात्य देशात वर्णभेद तीव्र स्वरुपात आहे. श्वेतवर्णीय आणि अश्वेत यांच्यात तशीच तेढ आहे. दुस्वास आहे.
या सिनेमाची कहाणी लेखक – दिग्दर्शक जॉर्डन पील यांनी अमेरिकेत ओबामा यांच्या अध्यक्षतेच्या कार्यकालात लिहिलेली आहे.
कारण तेव्हा असं वातावरण निर्माण झालं होतं, की आता अमेरिकेत श्वेत-अश्वेत असा काही भेद उरलेला नाही. परंतु प्रत्यक्षात तसं नव्हतं आणि हेच जॉर्डनला सांगायचं होतं या सिनेमाच्या माध्यमातून.
हा सिनेमा हॉरर-कॉमेडी प्रकारात आहे. परंतु तो तितकाच सामाजिक-राजकीय वास्तव अधोरेखित करणारा देखील आहे.
आणि जोपर्यंत तुम्ही या सिनेमाकडे हॉरर कॉमेडी दृष्टीकोनातून न बघता सामाजिक-राजकीय दृष्टीकोनातून बघत नाही, तोपर्यंत त्यातील भयावहता तुमच्या लक्षात येणार नाही.
दिग्दर्शकाने या सिनेमाचे दोन शेवट केले होते. त्यातील एक फक्त डिव्हीडी साठी ठेवला होता आणि त्यात शेवटी पोलिस ख्रिसला पकडते आणि जेलमध्ये टाकते.
तिथे त्याच्याबरोबर तेच होतं, जे सहसा नेहमी अश्वेत लोकांबरोबर होत आलंय. व्यवस्था त्याला न्याय देत नाही.
आणि सिनेमात जो शेवट दाखवला गेलाय त्यात मात्र शेकडो वर्षांपासून श्वेतवर्णियांनी केलेल्या अत्याचारांना एक अश्वेत पात्र विद्रोही उत्तर देतंय असं दाखवलं गेलंय.
‘गेट आउट’ हा सिनेमा २०१७ चा सर्वात अधिक चर्चिला गेलेला सिनेमा आहे. या सिनेमाने कमाईचा देखील विक्रम केलेला आहे.
भारतीय रुपयाच्या हिशोबात बोलायचं तर ३० कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने १६०० कोटींचा व्यवसाय केला.
या सिनेमाची कहाणी लिहायला जॉर्डन पील यांना ८ वर्ष लागली होती. आणि सिनेमा बनवण्यात जवळपास दहा वर्षे लागली.
विशेष म्हणजे या सिनेमात त्याने गोरे लोक चांगले पण असतात अशी तोंडदेखली दांभिक भूमिकाही घेतली नाही. हा सरळ सरळ गोरे विरुद्ध काळे असा द्वेषाचा माहोल आहे.
आणि जो वास्तवाशी बराच मिळता जुळता आहे.
जॉर्डन पील हा मुळात एक कॉमेडी अभिनेता आहे. कॉमेडी सेन्ट्रल नावाच्या एका टिव्ही चॅनलवर त्याची ‘की एंड पील’ नावाची मालिका यायची जी खूप गाजली होती.
त्यात त्यानी बराक ओबामा यांची देखील नक्कल केली होती.
या सिनेमाने २०१८ चे बरेच ऍवॉर्ड्स जिंकले. स्वतः जॉर्डन पील तीन पुरस्कारांसाठी नामांकित झाला होता. बेस्ट डायरेक्टर, बेस्ट कहाणी आणि बेस्ट पिक्चर यासाठी.
दिग्दर्शन क्षेत्रात जॉर्डन पील हे इतके अनुभवी नसले, तरी त्यांनी ज्या तंत्राने हा सिनेमा बनवलाय त्यामुळे सजग प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा विचार करण्यास भाग पाडतो.
त्यासाठी त्यांनी या सिनेमात धक्कातंत्राचा वापर केला आहे. उपहासात्मक विनोद, भाषा, संवाद यांच्यातून पुढील भयंकर प्रसंगाची कल्पना येईल असे तंत्र वापरले आहे.
या सर्वांतून वर्णभेद, वंशभेद आणि त्यातील द्वेष हे सर्व परिणामकारकपणे आणि नाट्यमयतेने उभे केले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या श्वेत स्त्रीला शहरातल्या ब्लॅक वस्तीत गेल्यावर किंवा जाताना जितकी भीती वाटेल तितकीच एखाद्या अश्वेत व्यक्तीला श्वेत व्यक्तींच्या विभागात जाताना वाटू शकते हे यशस्वीपणे उभे केले आहे.
तिच्याइतकाच इथे हा ब्लॅक तरुण धोकादायक स्थितीत येऊन फसलेला आहे.
या सर्वांवर कळस म्हणजे या सिनेमातील सर्व कलाकारांचा अभिनय देखील उत्तम जमून आलेला आहे.
ख्रिसचे पात्र निभावणारा अभिनेता कलुया, विल्यम्स आणि लॅकीथ स्टॅनफिल्ड यांनी अभिनय देखील चांगला केलेला आहे.
या चित्रपटासाठी बेस्ट ऍक्टर म्हणून कलुयाची ऍकेडेमिक पुरस्कारासाठी तर विल्यम्स एमटीव्ही पुरस्कारासाठी बेस्ट व्हिलन भूमिकेसाठी नामांकन मिळालं होतं.
परंतु यातील छोट्या छोट्या भूमिका निभावणाऱ्या पात्रांचा अभिनय देखील तितक्याच तोडीचा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.