Site icon InMarathi

“हेलिकॉप्टर मनी?”….. नकोच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : स्वप्निल श्रोत्री

===

कोरोना विषाणूंच्या महामारीने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. जगातील श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्थासुद्धा संकटात असल्यामुळे गरीब देशांची परिस्थिती तर अडूनच बिकट होण्याची चिन्हे आहेत.

अशातच जागतिक बँक, अंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक आणि इतर नामवंत संस्थांनी पुढील दहा वर्षासाठी विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसंदर्भात केलेली भविष्यवाणी जगाच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी विविध अर्थतज्ञ, राजकीय नेते आपापल्या परीने प्रयत्न करीत असून त्यावर विविध उपाय सूचवीत आहेत.

 

 

भारतातही असेच काही प्रयोग सुरू असून त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आघाडीवर आहेत.

काही दिवसांपूर्वी राव यांनी रिझर्व बँकेकडे हेलिकॉप्टर मनीची मागणी केली असून महाराष्ट्रात एका स्थानिक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही असाच सूर आवळला.

जगातही विविध देशातील अनेक तज्ञांनी व राजकीय नेत्यांनी आपापल्या देशातील मध्यवर्ती बँकांकडे हेलिकॉप्टर मनीची मागणी केली आहे.

सध्या चर्चित असलेले हे हेलिकॉप्टर मनी म्हणजे नेमके काय? त्याचे फायदे कोणते व त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान कोणते याचा विचार करणे गरजेचे.

हेलिकॉप्टर मनी म्हणजे नेमके काय?

 

thehansindia.com

 

हेलिकॉप्टर मनी ही अर्थशास्त्रातील अशी संकल्पना आहे, जेथे बुडत्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशातील मध्यवर्ती बँक गरजेपेक्षा जास्त चलनी नोटांची छपाई करते आणि केंद्र किंवा मध्यवर्ती सरकारद्वारा त्या चलनी नोटा नागरिकांमध्ये वाटल्या जातात.

मग त्या थेट नागरिकांच्या बँक खात्यात जमा केल्या जावू शकतात किंवा घरोघरी जावून वाटल्या जावू शकतात किंवा हेलिकाॅप्टर द्वारे नोटांची वृष्टी करून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जावू शकतात. इतर कोणत्याही प्रकारे थेट नागरिकांपर्यंत पोचविल्या जातात.

हेलिकॉप्टर मनी ही कोणत्याही देशातील मध्यवर्ती बँकेच्या भात्यात असलेले अंतिम अस्त्र असून ते बऱ्याच वेळेस बुमरॅंग होण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे शक्यतो कोणत्या देशाची मध्यवर्ती बँक ही हेलिकॉप्टर मनी नावाच्या अस्त्राचा वापर करण्याचे टाळते. शिवाय कोणताही अर्थतज्ञ हेलिकॉप्टर मनी चा वापर करण्याची सूचना केंद्राला कधीही देत नाही.

 

मृत अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी फायदेशीर

 

economictimes.com

 

हेलिकॉप्टर मनी ह्या संकल्पनेचा जन्मच मूळी देशाच्या मूर्त झालेला अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी झाला आहे. ज्या वेळी एखाद्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था रसातळाला जाते तेव्हा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी हेलिकॉप्टर मनी चा वापर केला जातो.

अर्थशास्त्राचे मूळ सूत्र हे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. जेव्हा वस्तूंची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असतो त्या वस्तूंची किंमत वाढते अर्थात महागाई ( अर्थशास्त्राच्या भाषेत इन्फ्लेशन वाढते ).

जेव्हा वस्तूंची मागणी कमी आणि पुरवठा अधिक असतो तेव्हा वस्तूंची किंमत कमी होते. परिणामी अर्थव्यवस्थेत मंदी येते, बाजारात चलनाची कमतरता होते व हळू – हळू अर्थव्यवस्था ठप्प होते.

नोवल कोरोना विषाणूंच्या महामारीमुळे संपूर्ण जगात जगात गेल्या ४ महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे देशांतर्गत आणि अंतरराष्ट्रीय आर्थिक क्रिया संपल्यात जमा आहेत.

त्यामुळे वस्तूंची मागणी नसल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. ( विशेषतः सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग).

 

telegraph.com

 

कारखाने बंद झाल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले, रोजगार गेल्यामुळे आर्थिक स्थैर्य लयास गेले आणि आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे लोकांची पैसे खर्च करण्याची क्षमता कमी झाली. परिणामी, आर्थिक मंदी आली.

हेलिकॉप्टर मनीच्या समर्थकांच्या मते केंद्रीय किंवा मध्यवर्ती सरकारने हेलिकॉप्टर मनी च्या माध्यमातून नागरिकांमध्ये पैशाचे वाटप केले तर नागरिक ते पैसे खर्च करतील. ह्यामुळे बाजारात पुन्हा तेजी येवून वस्तूंची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती येईल असा त्यांचा विचार आहेत

 

आत्मघातकी संकल्पना

 

punjabkesari.in

 

हेलिकॉप्टर मनी ह्या संकल्पनेचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लोकांकडे अचानक पैसा आल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात तो एकदम खर्च करतात. परिणामी बाजारात वस्तूंची मागणी प्रचंड वाढते, किमती वाढतात, काळाबाजार आणि साठेबाजीस ऊत येतो.

परिणामी, महागाई इतकी वाढते की चलनाची किंमत स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय बाजारातून कमी होते, देशावर कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि लोकांकडील पैसे संपले की पुन्हा मंदी येते.

व्हेनेझूएलाचे उदाहरण डोळ्यासमोर

दक्षिण अमेरिकेत असलेल्या व्हेनेझूएलाचे मध्ये गेल्या काही वर्षापासून प्रचंड महागाई आहे. तेथील स्थानिक चलन असलेल्या ‘व्हेनेझूएलन बोलीव्हर’ ची अंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास संपल्यातच जमा आहे.

 

bloomberg.com

 

उद्योगधंदे पूर्ण ठप्प आहेत. परिणामी, तेथील नागरिकांना एखादी किरकोळ वस्तू जरी बाजारातून घ्यायची असेल तरी किलो मध्ये नोटा द्याव्या लागतात.

म्हणजेच व्हेनेझूएलामध्ये चलनी नोटांची किंमत ही नोटेवर छापलेल्या किमतीपेक्षा ही कैक पटींनी कमी झाली आहे.

येथे लक्ष देणे गरजेचे

अर्थशास्त्र ही अशी संकल्पना आहे,जी जास्त ताणूनही चालत नाही आणि जास्त सैल सोडून सुद्धा चालत नाही. येथे दोन्ही गोष्टींचा योग्य ताळमेळ बसवावा लागतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे की नाही हे आपण कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही. आज लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प आहे परंतु ह्याचा अर्थ ती मंदीत आहे असा होत नाही.

ज्या वेळेस भारतातील सर्व उद्योग धंदे आपल्या पूर्ण क्षमतेने उघडले जातील त्यानंतर काही काळाने हे समजू शकेल की भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीत आहे की नाही.

जागतिक बॅंक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या नामवंत संस्थांच्या अहवालाबाबत सांगायचे झाले तर त्या नेहमीच ‘डम्प डेटा’ उचलत असतात.

तो सुद्धा देशाच्या काही ठराविक भागातून किंवा अनेक वेळा केंद्र किंवा मध्यवर्ती सरकारकडून हा डेटा घेतला जातो त्यामुळे अशा संस्थांच्या अहवालास जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती ही स्थानिक प्रशासनास ( उदा: राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका ) ह्यांना अधिक चांगल्या पद्धतीने माहित असते.

थोडक्यात, हेलिकॉप्टर मनीची भारताला अजिबात गरज नसून लाॅकडाऊनमुळे बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करणे, सुरू असलेले उद्योग पूर्ण क्षमतेने चालू ठेवणे आणि नवीन उद्योग विकसित करणे एवढेच आव्हान भारताने डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version