Site icon InMarathi

“पुस्तकांची फाळणी” : १९४७ च्या दुःखद आठवणींचा असाही एक कोलाज

books partition featured inmarathi

liyhub.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१९४७ ची फाळणी ही एक वेदनादायक घटना आहे. त्यामुळे फक्त दोन देशांचे विभाजन झालं नाही तर अनेक मनामनांचे क्लेशकारकरित्या विभाजन झालं. एक रक्तरंजित इतिहास यावेळेस घडला.

अनेक मन दुभंगली, संसार उध्वस्त झाले, अनेकांची आयुष्य संपली, प्रेतांनी भरलेल्या गाड्या एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ लागल्या. नद्यांची विभागणी झाली.

 

lithub.com

 

जवळ-जवळ १४ दशलक्ष लोकांनी त्यावेळेस स्थलांतर केले. दोन लाख ते २० लाख लोकांच्या कत्तली त्यावेळेस झाल्या.

पाकिस्तानातले हिंदू आणि शीख भारतात येत होते तर भारतातील काही मुसलमान पाकिस्तानात जात होते.

भारत-पाकिस्तान हे तसे संस्कृतीने, भाषेने एक सारखेच असलेले देश पण ज्या दिवशी फाळणी झाली त्यावेळेस दोन्ही देशात रक्तपात सुरु झाला.

घराघरातून लूट सुरू होती, जाळपोळ सुरू होती, बायका मुलींवर अत्याचार होत होते. भावंडांच्या समोरच त्यांना ठार मारलं जात होतं. अगदी १ वर्षाची लहान बाळं देखील त्यातून सुटली नाहीत.

 

blogs.tribune.com.pk

 

त्यावेळेस इतका रक्तपात झाला होता की झाडाला येणारे फळ देखील लाल असायचे, असं म्हटलं जातं. नद्या ओढे यांचे पाणीदेखील लाल झाले होते.

लोक आपली घरदार संपत्ती सोडून आपला देश शोधण्यासाठी धावत होती. केवळ कसाबसा जीव वाचवणे एवढा एकच पर्याय त्यावेळेस लोकांसमोर होता.

फाळणीमुळे काय काय घडलं नाही. अगदी आपल्या शेजार्‍याचीही भीती वाटावी अशी परिस्थिती तेव्हा होती. माणसाचा माणसावर विश्वास नव्हता. तो रक्तपात, क्रूरता बघून अनेकांचे मानसिक संतुलन देखील ढळलं.

फाळणीमुळे भारत पाकिस्तान या देशांमध्ये कायमचीच एक तेढ निर्माण केली. ब्रिटिशांनी जाता जाता भारताची फाळणी करण्याचं कृत्य करून आशिया खंडात अस्थिरता निर्माण केली.

भारताला कायमचा एक शत्रु देऊन ते गेले.

भारत पाकिस्तान फाळणीची आणि त्यावेळेस उफाळलेल्या हिंसाचाराची जगभरातील अनेक वर्तमानपत्रांनी, मासिकांनी याची दखल घेतली होती.

याचे वेगवेगळे फोटो तिथल्या वर्तमानपत्रात मासिकांमध्ये प्रसिद्ध होत होते आणि फाळणीची दाहकता संपूर्ण जगाला समजत होती.

 

twitter.com

 

त्याच काळात १८ ऑगस्ट १९४७ ला एक फोटो टाईम्स मॅक्झिन मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो एका कारणामुळे गाजला देखील.

कारण तो फोटो होता भारतातील ‘ इम्पेरियल सेक्रेटरिएट लायब्ररी, नवी दिल्ली’ येथील लायब्ररीचा. त्या फोटोत असं म्हटलं गेलं होतं की १५०००० मोठमोठी पुस्तकं दोन्ही देशांसाठी वेगळी करायची होती.

त्या पुस्तकांची वाटणी भारत आणि पाकिस्तान यांच्या नावाने करण्यात येत होती. आणि त्या पुस्तकांच्या ढिगार्‍यात एक माणूस कपाळाला हात लावून बसलाय असा तो फोटो होता.

हे तिथले ग्रंथपाल बी. एस. केसवन होते. जे आता स्वतंत्र भारतातील लायब्ररीचे ग्रंथपाल होणार होते.

हा फोटो डेव्हिड डगलस डंकन या अमेरिकन पत्रकाराने टाईम मॅगझीन साठी काढला होता.

 

lithub.com

 

आणि हाच फोटो १५ ऑगस्ट १९९७ ला भारताच्या स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीबद्दल फाळणीच्या वेळेचे वेगळे फोटो या सदरात परत एकदा प्रसिद्ध करण्यात आला आणि मग तो चर्चेत आला.

कारण ती लायब्ररी कोणती यावरून वाद सुरू झाला. काहींच्या मते तो फोटो ‘ नॅशनल लायब्ररी, कलकत्ता ‘ येथील होता आणि काहींच्या मते ‘इम्पेरियल सेक्रेटरिएट लायब्ररी, दिल्ली’ येथील होता.

म्हणूनच मग हा फोटो नक्की कुठे काढला गेला आहे याचा शोध सुरू झाला. आता दिल्ली येथील जी लायब्ररी आहे तिचं नाव ‘सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररी’ असं स्वातंत्र्यानंतर करण्यात आलं आहे.

या फोटो संदर्भात या लायब्ररीचे माहिती अधिकारी वाय.रवींद्रनाथ राव म्हणतात की हा फोटो १९४७ मधील ‘सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररी, दिल्ली चाच आहे.

तसेच बी.एस. केसवन यांच्या मुलाने मुकुंद केसवानने देखील त्याचे वडील सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररीमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करायचे असे सांगितले.

 

justdial.com

 

या फोटोची चर्चा तेव्हा झाली, जेव्हा हिंदुस्थान टाइम्सने हा फोटो एका स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ट्विटर वर दिला.

आणि फाळणीच्या वेळेस ‘ नॅशनल लायब्ररी कलकत्ता’ येथील पुस्तकांची देखील फाळणी झाली असं त्याखाली कॅप्शन दिलं.

गार्डियन ने देखील ही लायब्ररी कलकत्ता येथील आहे असंच सांगून हा फोटो शेअर केला होता. परंतु हा मूळ फोटो दिल्ली येथील लायब्ररीचा आहे.

विशेष म्हणजे ती लायब्ररी कोणतीही असू दे, परंतु त्यातील कोणत्याही पुस्तकांची फाळणी कुठल्याही देशासाठी कुठल्याही लायब्ररीतून झालेली नाही.

अन्वेशा सेनगुप्ता या लेखिकेने, स्वातंत्र्यानंतरचे प्रशासकीय बदल जे झाले त्या संदर्भात एक पुस्तक लिहिले आहे.

त्या पुस्तकात असं म्हटलं आहे की फक्त त्या त्या देशातल्या प्रांतात असणाऱ्या लायब्ररीज वेगवेगळ्या झाल्या.

इम्पेरियल लायब्ररी आणि इम्पेरियल सेक्रेटरिएट लायब्ररी या इम्पेरियल लायब्ररीच्या अंतर्गतच आहेत त्यामुळे तिथल्या कुठल्याही पुस्तकांचं विभाजन झालं नाही. कारण ते फक्त भारतातच होते.

फक्त ‘ कलकत्ता मदरसा लायब्ररी ‘ मधील जगातील सगळ्यात पुरातन पर्शियन हस्तलिखित यांचंच विभाजन करण्यात आलं.

पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ढाक्याला ही हस्तलिखितं उघड्या ट्रकमधून नेण्यात येत होती, आणि त्याच वेळेस जोराचा पाऊस आला आणि त्या सगळ्याच पुस्तकांना हानी पोहोचली.

सगळीच पुस्तके खराब झाली. आता कलकत्त्यात मदरसा लायब्ररीमध्ये केवळ कोणती पुस्तक होती याचा फक्त कॅटलॉग आहे.

मुकुल केसावन यांच्या म्हणण्यानुसार देखील कुठल्याही लायब्ररी मधील पुस्तकांचं विभाजन झालं नाही.

 

openthemagazine.com

 

अर्थात या लायब्ररीज मधील पुस्तकांचं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विभाजन व्हावं असा एक प्रस्ताव होता, परंतु तो अमलात आणणं शक्य नव्हतं.

आणि कुठल्या पुस्तकाला कुठल्या देशात ठेवायचं याच्यासाठी कोणता नियम लावणार होते?

पण तरीही हा प्रश्न उरतोच की हा फोटो का काढला गेला असेल? या फोटोत मुकुलचे वडील कसे आले? शेवटी मुकुल केसावन ने आपल्या वडिलांनाच याबद्दल विचारलं.

तेंव्हा त्यांनी फक्त हसुन मुकुलला इतकंच सांगितले ‘ तुला माहितीये, पुस्तकांचे विभाजन हे कधीच झालं नाही.’

तरीही मुकुलला असं वाटतं की फक्त वडिलांचा फोटो काढला गेला असेल, नंतर तो एडिट केला असेल. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान असे बोर्ड लावलेले दिसत आहेत.

टाईम्स सारख्या मॅक्झिन नी फोटो का दिले असतील?

 

amazon.com

 

मुकुलला असंही वाटतं की, टाइम्स मॅगझिनने केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा फोटो काढला असावा.

फाळणीच्या वेळेस जे काही सुरु होतं त्यात एखादा असा एक फोटो जो फाळणीच्या घटनेला नाट्यमयता देईल. तो फोटो टाकून अशी एखादी स्टोरी मॅक्झिन साठी केली तर ती वेगळी ठरेल.

म्हणूनही कदाचित फोटोग्राफरने असा फोटो काढला असेल. फोटो कशासाठी काढला हे कळलं नाही पण तो फोटो प्रसिद्ध मात्र आहे.

१९४७ ला देशाची फाळणी झाली, माणसांची फाळणी झाली परंतु सुदैवाने पुस्तकांची मात्र फाळणी झाली नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version