Site icon InMarathi

कोरोना : सॅनिटायझरचा अतिरिक्त आधार घेत असाल तर या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गेले २ ते ३ महिने सतत कानावर पडणारे शब्द म्हणजे कोरोना व्हायरस किंवा कोविद-१९! कोणाला काही कळायच्या आत भारताला ह्या विषाणूने विळखा घातला आणि लोकांचे नाहक बळी जायला सुरुवात झाली.

कोरोना बाधित पेशंटस् लाखोंच्या घरात आहेत आणि हजारोंच्या घरात बळींची संख्या! लोकांचे अज्ञान, सरकारी सूचनांचे पालन न करणे (ह्यात सोशल डिस्टंसिंग न पाळणे, स्वच्छता न राखणे, पोलिस, डॉक्टर्स् ह्यांच्यावर अरेरावी करणे ह्यासारख्या अनेक गोष्टी येतात).

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावर कोणतेच औषध, कोणतीच लस उपलब्ध नाही, ह्यामुळे हा विषाणू पसरतच गेला. ज्याला ह्याची बाधा झाली त्याचे तर हाल विचारूच नका! कोणीही त्याच्या जवळ जायचं नाही, अगदी त्याच्या जीवा भावाच्या लोकांनी सुद्धा!

एका बंद खोलीत रहायचं, कधी तरी डॉक्टर किंवा नर्स येऊन तपासून जाणार… बस! बरं ह्याच्यामुळे मृत्यु झाला तर त्यानंतरही रूग्णाची (मृतदेहाची) विटंबना थांबत नाही, अंत्यसंस्काराला नातेवाइक येऊ शकत नाहीत. परस्पर बेवारशासारखे अंत्यविधी होतात त्याचे!

 

aljazeera.com

 

त्यामुळेच आता हा रोग होऊ नये ह्याची खबरदारी घेणे खूपच गरजेचे आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आता ह्यावर औषध किंवा लस उपलब्ध नाही त्यामुळे, ह्या रोगाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेणे एवढेच आपल्या हातात आहे. (Prevantion is better than cure) ह्या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय येत आहे, या आत्ताच्या काळात!

ह्या बाबतीत जनजागृती व्हावी ह्यासाठी टि.व्ही., रेडिओ ह्यावरील विविध वाहिन्यांवर, न्युज चॅनेल्स् वर, वृत्तपत्रांमधून जसं जमेल तसं सरकार जनजागृती करत आहे.

गरम पाणी पिणे, बाजारातून आणलेल्या वस्तूं मधील शक्य तितक्या वस्तू स्वच्छ करून घेणे, चेहेरा, नाक, डोळे ह्यांना वारंवार हात लावू नये आणि आपले हात वारंवार साबण, हॅंड वॉशने धुवावेत, हॅंड सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा अशी सूचना वारंवार दिली जाते.

हॅंड सॅनिटायझरचा अती वापर हानीकारक असतो, त्याचा अतिरिक्त वापर केला तर, ‘साइड ईफेक्टस्’ होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो (अती तेथे माती).

ह्या हॅंड सॅनिटायझरचे काय गंभीर दुष्परिणाम, ‘साइड ईफेक्टस्’ होतात हे आज आपण ह्या लेखातून पाहूया.

 एक्झिमा

 

 

आपण जाहिरातीमधे बघतो की, कमीत कमी २० सेकंद हॅंड सॅनिटायझरने हात धुवावेत, ज्यामध्ये कमीत कमी ६०% अल्कोहोल असेल.

हॅंड सॅनिटायझरच्या अतिरिक्त वापरामुळे हाताला खाज येणे, हातांची जळजळ होणे तसेच हाताला भेगा पडणे ह्यासारख्या समस्यांना सामोरं जावे लागते. ह्यालाच एक्झिमा असे नाव आहे. ह्यामुळे हात कोरडे पडतात.

त्यामुळे समजा आपण जरी हॅंड सॅनिटायझरने हात धुतले तरी त्यानंतर लगेचच हाताला चांगल्या कंपनीचे मॉश्चरायझर लावावे. त्यामुळे एक्झिमा होण्याची शक्यता काही अंशी कमी होते.

 

हातांची आग होणे (irritation)

 

 

आधी सांगितल्याप्रमाणे सॅनिटायझरमधे कमीत कमी ६०% अल्कोहोल असते, त्या अल्कोहोलचा वास येऊ नये सुगंधी द्रव्ये वापरतात.

त्याचप्रमाणे सॅनिटायझर जरासे घट्ट व्हावे म्हणून काही द्रावण वापरले जाते ज्यामुळे हातांची जळजळ होणे, इरिटेशन होणे ह्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

जर आपली त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर हातांना भेगा पडू शकतात ह्यासारख्या किंवा ह्याहून अधिक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.

सॅनिटायझर वापरण्या ऐवजी हॅंड वॉश आणि गरम पाणी ह्यांनी हात धुणे जास्त श्रेयस्कर असते. म्हणजेच हॅंड सॅनिटायझरचा वापर कमीत कमी करावा.

 

लहान मुलांना विषाप्रमाणेच हानीकारक

 

kipsinendeinstitute.ac.ke

 

६०% अल्कोहोलचे प्रमाण असलेले हॅण्ड सॅनिटायझर लहान मुलांसाठी विषाइतकेच हानीकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.

अल्कोकोल शिवाय बाकीची जी द्रावणे असतात जसे, सुगंधी द्रव्य आणि घट्टपणा येण्यासाठी जे द्रव्य वापरतात ते सगळे एकत्रित मिळून हे तयार होते ज्याचा अतिरेकी वापर हानीकारक असतो. विशेषकरून लहान मुलांसाठी ते जास्त हानीकारक सिद्ध झाले आहे.

त्यामुळे लहान मुलांपासून ते दूरच ठेवावे, त्यांच्या हाताला ते लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.

 

 त्वचारोग

 

pinterest.com

 

आपल्या हातावरील विषाणू दूर व्हावेत म्हणून आपणा हॅंड सॅनिटायझरचा वारंवार वापर करतो, पण आपल्या हातावरची पातळ त्वचा तसेच उपयोगी जीवाणू सुद्धा ह्या सॅनिटायझरचा अती वापर केल्यामुळे नष्ट होतात आणि त्वचारोग उद्भवण्याचा संभव असतो.

हातावर छोटे छोटे पुरळ उठणे, कोड उठणे, खरूज होणे ह्यासारख्या त्वचारोग होण्याचा संभव असतो. त्यामुळे ह्याचा वापर कमीत कमी करावा.

 

 हानीकारक सुगंधी द्रव्ये

 

 

हॅंड सॅनिटायझर मधे फॅलेट्स् आणि फॅरेबेन्स् ही सुगंधी द्रव्ये मोठ्या प्रमाणात वापरलेली असतात ज्यामुळे अल्कोहोलचा वास कमी होतो. पण हे सुगंधी द्रव्ये खूपच हानीकारक असतात.

फॅलेट्स् आणि फॅरेबेन्स् ह्या द्रव्यांचा शारीरिक विकास आणि पुनरुत्पादन ह्यावर हानीकारक परिणाम होतो. त्यामुळे ह्यांचा अतिरिक्त वापर संप्रेरक, प्रजनन किंवा पुनरुत्पादन ह्यांच्यावर नकारात्मक परिणाम करणारे ठरतात.

म्हणून ही फॅलेट्स् आणि फॅरेबेन्स् द्रव्ये नसणारे हॅंड सॅनिटायझर वापरायला हरकत नाही. तरीही ह्याचाही वापर कमीच करावा.

 

 रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

 

ह्याशिवाय ह्या सॅनिटायझरच्या अतिरिक्त वापरामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर परत कोणी हात धुवत नाही त्यामुळे तसेच अन्न सेवन केले जाते.

हे सॅनिटायझर पोटात गेले तर इम्युनिटी कमजोर होते. त्यामुळे साबण आणि गरम पाण्याचा वापर करणे जास्त सोयीस्कर असते.

 

 हार्मोन्स वर विपरित परिणाम होतो

 

newsbugz.com

 

सॅनिटायझर मधे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी ट्रायक्लोजन नावाचे संप्रेरक असते. ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स वर विपरित परिणाम होतो. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर कमी करणेच योग्य आहे.

एकूणच ह्या सॅनिटायझरचा अती वापर हानीकारक आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल त्यामुळे, आपण हात गरम पाणी आणि साबणानेच हात धुण्याला जास्त प्राध्यान्य देणे गरजेचे आहे. स्वच्छता बाळगा पण सजग राहून!

याचा अर्थ अजिबात सॅनिटायझर वापरू नका असे नाही. योग्य प्रमाणात ती वस्तु वापरणे श्रेयस्कर!!  

=== 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version