Site icon InMarathi

भारतातील एक गाव “या” सर्वार्थाने काळ्याकुट्ट अशा कारणासाठी कुप्रसिद्ध असेल हे खरं वाटणार नाही!

black magic 2 featured inmarathi

101india.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘काळी जादू’ नाव वाचूनच धसकन होतं. ज्या गोष्टी नैसर्गिक पद्धतीने घडू शकत नाहीत त्या गोष्टींना घडवून आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘काळी जादू’ करणे असं आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो.

विज्ञानाने इतकी प्रगती केल्यावर सुद्धा अश्या गोष्टी घडत असतात हे एक फार मोठं आश्चर्य आहे. आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मुलन समिती सुद्धा कार्यरत आहे.

पण, तरीही अंधश्रद्धेचा किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीचा नाश अजूनही झालेला नाहिये असंच म्हणावं लागेल.

या सर्व गोष्टींचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आसाम मधील ‘मयोंग’ हे गाव. गुवाहाटी पासून ४० किलोमीटर लांब असलेलं हे गाव हे ‘काळ्या जादू’ साठी जगभरात प्रसिद्ध आहे.

 

teletech.com.np

 

‘मयोंग’ हे नाव माया या शब्दापासून मिळालं आहे असं काहींचं म्हणणं आहे. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की, दिमासा या भाषेत मयोंग या शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो.

स्थानिकांच्या मते, हे गाव पुरातन काळात मणिपूर च्या मोईरंग या कुळाच्या अधिपत्याखाली होतं आणि त्यावरूनच या गावाला मयोंग असं नाव पडलं.

या गावात घडणारी प्रत्येक घटना ही रहस्यमय आहे हेच वारंवार निदर्शनास आलं आहे. पूर्वापार चालत आलेल्या या ‘ब्लॅक मॅजिक’ ला मानणारे आणि त्याला पुढे चालू ठेवणारी पिढी आजसुद्धा मयोंग गावात आहे.

काही जुन्या ग्रामस्थ लोकांनी शेती चालू ठेवली आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा शेतीचं आणि त्यांच्या अंगात असलेल्या मूर्तिकला आणि तत्सम कलागुणांचा वारसा पुढे चालवण्यासाठी तयार केलं.

तर काही लोकांनी त्यांचा विश्वास असलेली ‘काळी जादू’ ही गोष्ट पुढे चालू ठेवण्यास खत पाणी घातलं. ते या शक्तीचा उपयोग आजही सामाजिक प्रगती साठी करतात असं त्यांचं म्हणणं आहे.

 

livemint.com

 

तुम्ही जर का या गावात एक फेरफटका मारला किंवा तिथलं एखादं लोकसाहित्य वाचलं तर लक्षात येईल की, तिथे चालता बोलता माणूस अचानक हवेत उडून गायब झाला ही अगदी सामान्य गोष्ट आहे.

कथा तर अश्या पण प्रसिद्ध आहेत की, ‘काळ्या जादूच्या’ च्या सहाय्याने या गावातील काही माणसांना चक्क जनावर सुद्धा करण्यात आलं आहे.

पहिल्यांदा वाचत असताना या सर्व गोष्टींवर शंका येणं सहाजिकच आहे. हे गूढ समजण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया.

आलमगीर नमा नावाचे एक थोर इतिहासकार होऊन गेले आहेत.त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की,

औरंगजेब च्या काळात मुघल साम्राज्याला आसाम च्या आर्मी पेक्षा मयोंग या गावातील ‘ब्लॅक मॅजिक’ च्या शक्तीची जास्त भीती वाटली होती.

त्याला तशी कारणंही होती. या गावातील कोणतीही वस्तू जरी हरवली तरी हे लोक तांत्रिकाला बोलवायचे,

तो त्याच्याकडे असलेल्या तांब्याच्या भांड्यात एक फुल ठेवायचा आणि ते फुल आपोआप फिरत जायचं आणि ती हरवलेली वस्तू जिथे त्या जागी जाऊन पडायचं.

हे कसं शक्य आहे ? याचं उत्तर काही केल्या त्यांना सापडत नव्हतं किंवा असंही म्हणता येईल की या गोष्टीचं समाधानकारक उत्तर आज सुद्धा मिळालेलं नाहीये.

आजही जर का या गावातील एखाद्या व्यक्तीची पाठ दुखत असेल तर त्याच्या पाठीवर एक तांब्याचं ताट ठेवलं जातं, काही मंत्र म्हंटले जातात आणि त्या माणसाचं ते दुखणं थांबवलं जातं.

 

thehindu.com

 

हे तर काहीच नाही. तुम्हाला जर का एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे ‘उरण मंत्राचा’ उच्चार केला जातो आणि तो म्हणताच ती व्यक्ती काही मिनिटातच उडून त्या जागेवर पोहोचलेली असते.

या सगळ्या गोष्टी वाचताना सुद्धा एक तर भीतीदायक वाटतात किंवा अविश्वासार्ह वाटतात किंवा काहींना हे विनोदी सुद्धा वाटू शकतं.

या घटनांपैकी काही घटना खूप क्रूर देखील आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया च्या एका लेखानुसार, मयोंग गावामध्ये ‘चुरा बेझ’ नावाचा एक माणूस आहे जो की ‘लुकी मंत्र’ म्हणतो आणि काही सेकंदातच हवेत गायब होतो. तुम्ही या बद्दल गुगल सुद्धा करू शकता.

तिथेसुद्धा चुरा बेझ या व्यक्तीचं नाव हे ‘मॅजिकल मॅन ऑफ मयोंग’ असंच लिहून येतं.

त्याची अजून करामत ही आहे की, त्याच्यासमोर कितीही चिडलेला, खवळलेला वाघ जरी आला तरीही तो ‘वाघ बंध मंत्र’ म्हणतो आणि त्या वाघाला शांत करतो.

चुरा बेझ च्या नातीने टाईम्स ऑफ इंडिया ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की,

“मी तेव्हा खूप लहान होते जेव्हा माझे आजोबा खूप विलक्षण गोष्टी करायचे. क्षणात तुम्ही त्यांना बघू शकत होतात आणि क्षणात ते गायब व्हायचे.”

मयोंग गाव हे मीडिया च्या नजरेत त्यावेळी आलं जेव्हा उत्पल बोरपुजारी नावाच्या एका दिग्दर्शकाने ‘Mayong : Myth / Reality’ या नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली.

या फिल्म मध्ये मयोंग गाव, तिथले लोक आणि त्यांच्या मानसिकता आणि तिथे प्रचलित असलेलं ‘ब्लॅक मॅजिक’ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

 

sevendiary.com

 

हेमेन्द्र नाथ हे मयोंग मध्ये राहणारे एक जादुगार आहेत. त्यांचं वय ७० वर्ष आहे. ह्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,

“आजकाल लोकांचा ब्लॅक मॅजिक वर विश्वास नाहीये. असं ही म्हणता येईल की, लोक या जादू ला सरसकट अंधश्रद्धेचं नाव देऊन टाकतात. लोकांना बरं वाटत नसलं की, लोक आमच्याकडे येण्यापेक्षा डॉक्टर कडे जातात.

पण, आजही काही लोक आहेत जे की त्यांच्या समस्या घेऊन आमच्याकडेच येतात. या समस्या कधी घरगुती असतात, तर कधी व्यवसायिक असतात किंवा एखाद्या आजाराच्या संदर्भात असतात.”

मयोंग च्या लोकांना त्यांना अवगत असलेल्या काळ्या जादूचा खूप अभिमान आहे आणि त्यांनी या जादु ला उपयोगी पडत आलेलं काही साहित्य हे गुवाहाटी मध्ये असलेल्या ‘मयोंग ब्लॅक मॅजिक म्युजियम’ मध्ये संग्रहित करून ठेवल्या आहेत.

आसाम ला भेट देणाऱ्या पर्यटकांचं हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. या संग्रहालयाची दखल National Geographic या चॅनल सुद्धा घेतली आहे.

 

unusualcollections.wordpress.com

 

एक युनिक संग्रहालय म्हणून त्यांनी या संग्रहालयाची नोंद केली आहे.

काळानुसार मयोंग या गावातील लोक बदलत सुद्धा आहेत. खूप लोक हे पारंपरिक काम सोडून नोकरी करणे, बिजनेस करणे सुद्धा पसंत करत आहेत.

सहाजिक आहे की, हातावर मोजण्या इतकेच जादूगार शिल्लक असताना ही जादु अजून किती वर्ष चालेल हा एक प्रश्नच आहे. ही जादू काही वर्षात कालबाह्य झालेली असेल यात शंका नाही.

जुनी जी मंडळी आहे ती आजही कथा रंगवून सांगत असतात की, ब्लॅक मॅजिक करणारे काही तांत्रिक, चेटकिण हे जंगलाच्या दुसऱ्या टोकाला आजही राहतात.

हा लेख लिहिताना कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन करण्याचा आमचा अजिबात उद्देश नाहीये.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version