Site icon InMarathi

स्वतःला गिनीपिग करून भारतातल्या प्लेगवर लस शोधणारा, पण ब्रिटिशांनी धर्मामुळे त्रास दिलेला शास्त्रज्ञ

haffkine featured inmarathi

haaretz.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोना महामारीचं सगळीकडेच तांडव सुरू आहे! जगातील अर्ध्याहून अधिक देश हे लॉकडाऊन मध्ये आहेत, भारतात सुद्धा कोरोना दिवसेंदिवस फैलावत चालला आहे.

ह्याला पॅनडेमीक सुद्धा म्हणतात म्हणजेच एक प्रकारची महामारी! भारतात ह्या अगोदर सुद्धा ब्रिटिश काळात अशाच २ महामाऱ्यांनी थैमान घातले होते त्या म्हणजे कॉलरा आणि प्लेगची महामारी.

प्लेगच्या साथीमुळे ब्रिटिशांनी भरतीयांवर केलेले अत्याचार आजही आठवले तरी आपले रक्त उसळून येते! 

 

welcomecollection.org

 

परंतु जंतुशास्त्रज्ञ वाल्डेमार हाफकीन याने कॉलरा आणि प्लेग या भारतातल्या संसर्गजन्य रोगाच्या साथीवर लसी शोधायचं मोठं कार्य केलं होतं!

मात्र ज्यू असल्यामुळे या शास्त्रज्ञाला आपल्या आयुष्यात बरंच काही सहन करावं लागलं.

भारतातील प्लेगच्या भयंकर साथीवर औषधं शोधण्यासाठी त्याने आपले अमोल योगदान दिलेले आहे. मुंबई येथे पसरलेल्या प्लेगच्या साथीवर त्याने विक्रमी वेळेत लस तयार केली होती.

मात्र या लसीचा प्रयोग कोणावर करायचा हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्याने स्वतःवरच त्या लसीचा प्रयोग करून घेतला. हा त्याचा मोठेपणा होता.

 

rbth.com

 

ती लस घेतल्यानंतरही तो जिवंत राहिला आणि प्लेगच्या लसीचा अशारीतीने शोध पूर्ण झाला.

मात्र औषधे शोधताना गिनी पिग म्हणून स्वतःवरच प्रयोग करून घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ नव्हती.

वाल्देमार हाफकीन –

वाल्देमार हाफकीन या ज्यू शास्त्रज्ञाचा जन्म १५ मार्च १८६० रोजी रशियातील ओडेसा या बंदर असलेल्या शहरात एका शाळा शिक्षकाच्या घरी झाला.

मात्र त्याचे शिक्षण युक्रेन येथील बर्डीयान्स्क येथे झाले. लुई पाश्चर या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या हाताखाली त्याने ट्रेनिंग घेतेले होते.

तरुणपणी हाफकीन एका क्रांतिकारी गटात सामील झाला होता. मात्र नंतर हा गट हिंसक होतो आहे हे पाहून त्याने सोडून दिला होता.

पुढे जाऊन १८८१ मध्ये याच गटातील लोकांनी दुसरा झार अलेक्झांडर याची हत्या केली. हाफकीन एका ज्यू गटाचा देखील नंतर सदस्य झाला.

 

thoughtco.com

 

हा गट ज्यू म्हणून स्व-बचावासाठी स्थापन झालेला गट होता. १८८० मध्ये या गटातर्फे ज्यू नागरिकांना मदत करताना तो जखमीही झाला होता. आणि त्याला अटकही झाली होती.

त्याचे ओडेसा येथील इम्पीरिअल नोव्हरोसिया विद्यापीठाचे शिक्षक एली मेथनीकोफ यांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याची सुटका झाली.

हे मेथ्नीकोफ मोठे शास्त्रज्ञ होते आणि त्यांना नंतर फिजिओलॉजी आणि मेडीसीनमधले नोबेल पारितोषिकही मिळाले होते.

१८८४ मध्ये डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याला त्याच विद्यापीठात शिकवण्यासाठी ऑफर मिळाली होती.

मात्र त्यासाठी त्याला अट घालण्यात आली होती, ती म्हणजे त्याने रशियाचा पारंपरिक धर्म स्वीकारावा. परंतु अर्थात त्याने ते कबूल केले नाही आणि तो १८८८ मध्ये जिनिव्हा युनिव्हर्सिटीत जॉईन झाला.

तिथे काही वर्ष काम करून नंतर त्याने लुई पाश्चर युनिव्हर्सिटी पॅरीस येथे संशोधनाचे काम केले. तिथे त्याचे शिक्षक मेथनीकोफ हे आधीच रुजू झालेले होते.

त्यांच्यामुळे तिथे त्याला लायब्ररीअन ते असिस्टंट टू द इन्स्टीट्यूट्स डायरेक्टर हे प्रमोशन मिळाले.

१८९२ ची कॉलराची साथ –

१८९२ मध्ये आशिया आणि युरोप येथे कॉलराची साथ वेगाने पसरली आणि हाफकीनने कॉलरावरची लस शोधण्यास प्रारंभ केला.

ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या परवानगीने १८९३ मध्ये तो भारतात आला. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडीकल कॉलेज येथे त्याने प्रयोगशाळा स्थापन केली आणि संशोधनास प्रारंभ केला.

 

blog.nli.org

 

कॉलराच्याच जंतूपासून तयार केलेली ही लस नंतर चाचणी कुणावर घ्यायची हा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याने स्वतःलाच टोचून घेतली.

तेव्हाही तो ज्यू असल्याने त्याच्या या संशोधनाकडे संशयाच्याच नजरेने बघितले जात होते. असे असूनही आपल्या लशीची कार्यक्षमता सिद्ध करण्यात तो यशस्वी झाला.

इंग्रज अधिकारी त्याला ज्यू असल्याने चांगली वागणूक देत नव्हते, तरी भारतातील आगाखान यांनी मात्र त्याला प्रयोगशाळेसाठी आपली ईमारत देऊ केली.

तिथेच हाफकीन इन्स्टीट्यूटची स्थापना झाली. मुंबई येथील इतर प्रतिष्ठीत भारतीय देखील त्याला पाठिंबा देत होते.

नंतरची मधली पाच वर्षे सोडल्यास आपल्या नोकरीतून निवृत्त होईपर्यंत तो भारतातच राहिला. भारतातील प्लेग, कॉलरा इत्यादी सातत्याने येणाऱ्या संसर्गजन्य साथींवर त्याचे औषध हे संजीवनी ठरली.

आणि त्यातून मुक्तता मिळाली. आजही भारतातील प्रमुख संशोधन संस्था ही त्याच्या नावाने म्हणजेच हाफकीन इन्स्टीट्यूट या नावाने ओळखली जाते.

१८९६ ची प्लेगची साथ –

कॉलरावर औषध निघते न निघते तोच १८९६ मध्ये प्लेगची भयंकर साथ सुरू झाली. हाफकीनसाठी हे देखील आव्हानात्मक संशोधन ठरले.

त्याच्याबरोबर काम करणाऱ्या दोन सहाय्यकांनी ताण न झेपल्यामुळे हे काम मध्येच सोडून दिले तर तिसऱ्याला वेड लागण्याची पाळी आली.

मात्र हाफकीनने १० जानेवारी १८९७ साली प्लेगची लस शोधली आणि ही लस देखील त्याने प्रयोगाच्या सिद्धतेसाठी स्वतःवरच टोचून घेतली.

 

haaretz.com

 

हाफकीनवर दोषारोप –

त्यानंतर पाच वर्षांनी पंजाबमधील एका गावातल्या १९ लोकांना टिटॅनस (धनुर्वात) झाला. या सगळ्यांना हाफकिनच्या प्लेगची लस टोचण्यात आली होती.

ह्या सर्व एकोणीस लोकांचा मृत्यू झाल्याने त्याचे खापर हाफकीनवर फोडण्यात आले आणि त्याची बॉम्बे प्लेग प्रयोगशाळेच्या प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि त्याने भारत सोडला.

दोषमुक्त –

त्यानंतर त्याच्यावरचा हा दोष दूर होण्यासाठी जवळपास पाच वर्षे गेली आणि सत्य बाहेर आले.

त्या १९ लोकांना जी लस देण्यात आली होती ती एकाच बाटलीतल्या औषधातून दिली गेली होती.

आणि ती बाटली उघडल्यानंतर त्याची लस माणसाला टोचेपर्यंत जशी काळजी घेतली जायला हवी होती तशी न घेतली गेल्याने त्यातील औषध दुषित झाले होते.

हे सिद्ध झाल्यानंतर हाफकीनला न्याय मिळाला आणि तो पुन्हा भारतात परतला.

मात्र आता बॉम्बे प्लेग प्रयोगशाळेच्या मुख्यपदी दुसरी नियुक्ती झालेली असल्याने तो कलकत्ता येथील बायोलॉजिकल इन्स्टीट्यूटचा डायरेक्टर या पदी नियुक्त झाला.

 

thehindu.com

 

तिथेही इंग्रज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचे फारसे स्वागत केले नाही. मात्र भारतीय स्टाफने त्याचे फार प्रेमाने स्वागत केले.

ज्यू म्हणून त्रास –

दरम्यानच्या काळात त्याला ज्यू म्हणून तो जिथे जिथे गेला तिथे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. याच दरम्यान पॅलेस्टाईन इथली जमीन ज्यू लोकांना त्यांचा देश म्हणून मिळावी या चळवळीतही तो सामील झाला होता.

तिथली जमीन खरेदी करण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालू होता. त्यासाठी त्याने ऑटोमन सुलतानशीही संपर्क साधला होता. मात्र सुलतानला त्याच्या योजनेत रस नव्हता.

भारतातील त्याचे वास्तव्य –

हाफकीन १९१४ मध्ये निवृत्त होईपर्यंत भारतात राहिला. त्यानंतर तो फ्रान्सला परत गेला. उर्वरीत आयुष्यात तो फार धार्मिक झाला होता आणि धर्म प्रसाराकडे लागला होता.

‘ए प्ली फॉर ऑर्थोडॉक्सी’ या नावाने त्याने एक पुस्तकही लिहिले होते. पूर्व युरोपातील ज्यू लोकांच्या शिक्षणासाठी त्याने एक ट्रस्टही स्थापन केला होता.

हाफकीन आपल्या आयुष्यात अविवाहीतच राहीला. शेवटच्या काळात तो स्विट्झर्लंड येथील लसाने या ठिकाणी राहिला. २६ ऑक्टोबर १९३० रोजी तो मरण पावला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version