आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
असं म्हणतात की बॉलीवुडमध्ये यश मिळवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या “गॉडफादर”ची गरज असते. काळात नकळत तुमच्या प्रवासात तुम्हाला एखादी व्यक्ति देवदूतासारखी भेटते आणि तुमच्या जीवनाला कलाटणी मिळते.
आपल्याला कलाकारांची प्रसिद्धी दिसते, मात्र त्यामागे मेहनत घेणारी माणसं किंवा त्यांना पुढे आणणारी माणसं मात्र अज्ञातच राहतात.
दीपिका पदुकोण. आजची आघाडीची अभिनेत्री. नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या ‘छपाक’ या अत्यंत संवेदनशील सिनेमाने तिने समीक्षकांचं लक्ष तिच्यातील प्रतिभावान कलाकाराकडे परत वेधून घेतलं आहे.
‘ओम शांती ओम ‘ हा दीपिका पदुकोण चा पहिला चित्रपट. त्या चित्रपटापासून ते ‘छपाक’ पर्यंत प्रेक्षकांनी कायम तिच्यावर भरभरून प्रेम केलं.
आपल्या मेहनती ने एखादी अभिनेत्री जिच्यासाठी बॉलीवूड हे क्षेत्र पूर्णपणे नवीन होतं ती किती प्रगती करू शकते याचं दीपिका पदुकोण हे एक उदाहरण म्हणता येईल.
मॉडेलिंग करणाऱ्या दीपिका पदुकोण ला बॉलीवूड मध्ये पहिली संधी ज्या व्यक्तीमुळे मिळाली ती म्हणजे फॅशन डिझायनर वेन्डेल रॉड्रीकस.
त्यांच्या सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला फक्त फॅशन डिझायनर म्हणणं खरं तर चुकीचं आहे. कारण, ते एक पर्यावरणवादी सुद्धा होते, लेखक सुद्धा होते, नट सुद्धा होते आणि सोबतच कम्युनिटी साठी योगदान करणारे सुद्धा होते.
१२ फेब्रुवारी २०२० ला त्यांच्या राहत्या घरी गोवा येथे त्यांचा मृत्यू झाला.
वेन्डेल रॉड्रीकस हे एक यशस्वी फॅशन डिझायनर होते. त्यांचा जन्म २८ मे १९६० या दिवशी गोव्याच्या एका कॅथलिक परिवारात झाला होता. त्यांचं शिक्षण हे मुंबईत झालं.
त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट चा डिप्लोमा केला होता. हॉटेल मॅनेजमेंट मधूनच त्यांच्या करिअर ची सुरुवात झाली होती. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना मस्कत येथे नोकरीची संधी मिळाली.
तिथे ते रॉयल ओमान पोलीस ऑफिसर्स क्लब च्या केटरिंग डिपार्टमेंट मध्ये होते. आता त्यांना फॅशन डिझायनिंग चा अभ्यास करायचा होता. त्यासाठी त्यांच्या पार्टनर ने त्यांना पैशाची बचत करण्याचा सल्ला दिला.
पगारातून वाचवलेल्या पैशात त्यांनी १९८६ ते १९८८ या दोन वर्षात त्यांनी पॅरिस आणि लॉस इंजिलीस यासारख्या ठिकाणी फॅशन डिझायनिंग चा अभ्यास केला.
फॅशन डिझायनिंग चं शिक्षण घेतल्यानंतर वेन्डेल रॉड्रीकस हे भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी फॅशन इंडस्ट्री मध्ये काम करायला सुरुवात केली आणि पदार्पणातच चांगली कामगिरी केली.
काही काळातच भारताच्या नामवंत फॅशन डिझायनर मध्ये त्यांची गणना केली जाऊ लागली. इको फ्रेंडली कपड्यांचा ट्रेंड यांनीच भारतात आणला.
त्याच काळात Lakme fashion week हा एक इव्हेंट सुरू झाला होता. भारतात होणाऱ्या या इव्हेंट ला फॅशन इंडस्ट्री साठी एक शुभ संकेत मानून वेन्डेल रॉड्रीक्स हे त्या इव्हेंट सोबत अगदी प्लॅनिंग पासून संपन्न होईपर्यंत त्यामध्ये सहभागी झाले.
त्यानंतर त्यांना त्यांच्या इको फ्रेंडली कपड्यांसाठी जर्मनी, मलेशिया, दुबई आणि न्यूरेमबर्ग सारख्या ठिकाणी सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं.
वेन्डेल रॉड्रीक्स त्यानंतर मुंबई मध्ये फॅशन डिझायनिंग चे क्लासेस सुद्धा घेत होते. एका मॉल मध्ये एकदा ते क्लास घेत होते आणि त्याच ठिकाणी दीपिका पदुकोण ही ज्वेलरी वर्कशॉप अटेंड करत होती.
तिथे वेन्डेल रॉड्रीक्स ने दीपिका पदुकोण ला पहिल्यांदा बघितलं. बघताच क्षणी त्यांच्या लक्षात आलं की, दीपिका पदुकोण ने मॉडेलिंग क्षेत्रात तिचं करिअर करावं.
हे ऐकून दीपिका पदुकोण च्या आईला राग आला होता. पण, दीपिका पदुकोण ने मॉडेलिंग हेच क्षेत्र निवडलं आणि वेन्डेल रॉड्रीक्स यांच्यासोबत बऱ्याच प्रोजेक्ट्स वर काम केलं.
वेन्डेल रॉड्रीक्स ने दीपिका पदुकोण ला योग्य मॉडेलिंग एजन्सी कोणती हे सांगितलं. त्याच दरम्यान फराह खान ओम शांती ओम या सिनेमासाठी एका मॉडेलच्या शोधात होत्या जिला की शाहरुख खान सोबत कास्ट करता येईल.
त्यांनी ही गोष्ट मलायका अरोरा हिला सांगितली आणि मलायका अरोरा ने वेन्डेल रॉड्रीक्सला. त्यावेळी वेन्डेल रॉड्रीक्स हे एक फॅशन शो करत होते.
तिथे त्यांनी मलायका अरोरा हिला बोलावलं आणि सांगितलं की, “जी पहिली मुलगी स्टेज वर दिसेल तीच शाहरुख खान सोबत काम करण्यासाठी अगदी योग्य आहे.”
तो शो दीपिका पदुकोण च्या एन्ट्री ने ओपन झाला होता. आणि मग दीपिका पदुकोण ला तिचा पहिला सिनेमा मिळाला आणि बॉलीवूड ला एक सुंदर अभिनेत्री.
वेन्डेल रॉड्रीक्स यांनी आपल्या करिअर मध्ये तीन पुस्तकं लिहिली. पहिलं होतं ते फॅशन या विषयावर ‘मोडा गोवा’ (२०१२).
दुसरं पुस्तक होतं ते म्हणजे त्यांचं आत्मचरित्र ‘द ग्रीन रूम (२०१२) या नावाने तर तिसरं पुस्तक त्यांनी गोवा च्या विषयावर लिहिलं ज्याचं की नाव ‘पॉस्केम’ (२०१७) असं होतं.
लिखाणासोबतच त्यांनी अभिनय क्षेत्रात सुद्धा काम केलं. २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘बूम’ या सिनेमात त्यांनी अमिताभ आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम केलं होतं.
त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या ‘True West’ मध्ये सुद्धा काम केलं. २००८ मध्ये रिलीज झालेल्या मधुर भांडारकर यांच्या ‘फॅशन’ या सिनेमात सुद्धा त्यांनी वेन्डेल रॉड्रीक्स या नावानेच एक छोटा रोल केला होता.
२०१४ मध्ये वेन्डेल रॉड्रीक्स यांना भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. ह्या पुरकाराची घोषणा झाली तेव्हा वेन्डेल रॉड्रीक्स हे न्यूझीलंड मध्ये नवीन वर्षाचं स्वागत करायला गेले होते.
त्यांचा फोन बंद होता. त्यांनी फोन सुरू केला आणि त्यांना पाहिला मेसेज दिसला तो म्हणजे गोवाच्या राज्यपालांनी केलेला. तो मेसेज बघून किती तरी वेळ वेन्डेल रॉड्रीक्स यांना त्यांचे आनंदाश्रू थांबवता आले नाही.
करिअर च्या शेवटच्या काही वर्षात वेन्डेल रॉड्रीक्स हे आपल्या पार्टनर जेरोम सोबत गोवा मध्ये राहत होते. जेरोम आणि वेन्डेल यांची भेट ओमान मध्ये १९८३ मध्ये झाली होती.
गोवा येथे ते ज्या विला मध्ये राहत होते तिथे त्यांना ‘मोडा गोवा म्युझियम अँड रिसर्च सेंटर’ ची सुरुवात करायची होती. त्यासाठी ते मागच्या १७ वर्षांपासून गोवा मध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध पोशाखांवर अभ्यास करत होते.
या कामाची माहिती त्यांनी त्यांच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये सुद्धा दिली होती.
हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने त्यांनी २०१६ साली आपल्या स्टुडिओ आणि फॅशन डिझायनिंग मधून निवृत्ती जाहीर केली होती आणि कामाची जवाबदारी त्यांच्यासोबत १९९९ पासून काम करणाऱ्या शुलेन फर्नांडिस ला सोपवली होती.
नियतीला हे मान्य नव्हतं असं म्हणावं लागेल कारण, १२ फेब्रुवारी २०२० रोजी वेन्डेल रॉड्रीक्स यांचं रात्रीच्या झोपेतच हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बतमीबद्दल अनुष्का शर्मा ने ट्विट करून नाराजी व्यक्त केली.
वयाच्या १८ व्या वर्षी वेन्डेल रॉड्रीक्स यांच्या सांगण्यावरूनच अनुष्का शर्मा ही बँगलोर वरून मुंबई मध्ये मॉडेलिंग मध्ये करिअर करण्यासाठी आली होती.
बॉलीवुडच्या अभिनेत्रींना “तारकापण” बहाल करणारे असे अनेक चेहरे पडद्यामागेच राहतात, त्या सगळ्यांचेही आभार मानायलाच हवेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.