या कलाकारांनी “हे” चित्रपट नाकारल्याचे परिणाम, आपल्याला यश-अपयशाबद्दल मोठा धडा शिकवतात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय लोकांच्या आयुष्यात सिनेमा फार महत्त्वाचे स्थान ठेवतो. कितीतरी लोकांना सिनेमा हा श्वास वाटतो. त्यातील कथानकं, गाणी, कर्णमधूर संगीत, हाणामारी, प्रेम हे सगळं आपल्याला फार जवळचं वाटतं.
कितीतरी वेळा ते खोटं आहे हे समजत असतं पण तरीही आवर्जून बघतात लोक. आवडलेले सिनेमे डोक्यावर घेतात.
एखादा कमी खर्चात तयार झालेला साधासा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. तर कधीकधी प्रचंड पैसा खर्च करून बनवलेला सिनेमा पडला. या मायानगरीनं अशा अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत.
माणूस आणि नियती यांचं खातं आजवर चुकामुकीचं राहीलं आहे. एखादं काम करायला घ्यावं नी ते पूर्ण होत असतानाच बंद करावं लागतं किंवा आपल्याकडं काहीही नाही असं वाटत असतानाच एकदम काही असं मिळून जावं की आयुष्य उजळून जावं.
कधी हाता तोंडाशी आलेला घास दुसऱ्या कुणाला तरी मिळावा. कधी लोकाचा घास अलगद आपल्याला मिळावा आणि आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जाऊन थांबावं…असे अगणित चमत्कार माणसाच्या आयुष्यात घडतात.
कितीतरी सिनेमे कथा ऐकून प्रथितयश नटांनी डावलले, नकार दिले आणि तेच सिनेमे ब्लाॅकबस्टर हिट ठरले. आपण निर्णय घ्यायला चुकलो अशी हळहळ अभिनेत्यांना, अभिनेत्रींना चित्रपटासाठी दिलेल्या नकारावर वाटत राहीली असेल.
असे काही ब्लाॅकबस्टर ठरलेले चित्रपट… जे नाकारुन कलाकारांना मनोमन पश्चाताप वाटला असेल, आज आपण अशा काही चित्रपटांची माहिती घेऊया.
१. स्वदेस –
स्वदेसमधील मोहन भार्गव या रोलसाठी पहिली आॅफर दिली होती हृतिक रोशनला. स्वदेसचं स्क्रिप्ट वाचून हृतिकनं नकार दिला. आणि मग हे स्क्रिप्ट शाहरुख खानच्या हातात गेलं.
त्यानं जो मोहन भार्गव साकारला तो किती जणांच्या प्रशंसेचा धनी झाला!! या सिनेमासाठी शाहरुख खानला उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
आजही हृतिक रोशन किती हळहळत असेल तर या निर्णयासाठी!!!
२. थ्री इडीयट्स-
२००४ साली आमिर खानचा आलेला थ्री इडीयट्स हा सिनेमा आधी शाहरुख खानला आॅफर केला होता.
आमीर खानचा रणछोडदास छांछड ऊर्फ फुन्सुख वांगडू शाहरुखने करावा अशी आॅफर दिली होती, पण शाहरुखने नकार दिला आणि ती भूमिका आली आमीर खानच्या हाती. पुढे थ्री इडीयट्स हिट ठरला.
शाहरुखने काॅफी विथ करण या शोमध्ये ही स्पष्ट कबुली दिली आहे.
३. गोलियों की रासलीला रामलीला-
रणवीर सिंग आणि दिपीका पदुकोण या जोडीचा हा गाजलेला चित्रपट. पण तुम्हाला ठाऊक आहे? आधी हा चित्रपट करीना कपूर खान करणार होती.
ऐनवेळी तिनं नकार दिल्याने ही भूमिका दिपीकाला मिळाली.आणि सिनेमा सुपरहिट झाला.
इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत करीनाने हा आपला वेडेपणा होता हे मान्य केलं आहे.
४. दिवाना-
१९९२ मध्ये ऋषी कपूर, दिव्या भारती आणि शाहरुख खान यांचा दिवाना हा चित्रपट आला होता. पण तुम्हाला ठाऊक आहे, शाहरुख खानच्या भूमिकेसाठी अरमान कोहली हे नाव विचाराधीन होता.
पण अरमान कोहली या भूमिकेसाठी तयार झाला नाही. मग ही भूमिका शाहरुख खानच्या खात्यात गेली आणि इतिहास झाला. याच सिनेमानं भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवा बुलंद तारा दिला.
५. लगान-
शाहरुख खानच्या नकारामुळे आमीर खानला मिळालेला आणि हिट झालेला हा आणखी एक सिनेमा. या नकाराचा शाहरुख खानला फार पश्चाताप झाला.
६. द डर्टी पिक्चर-
सिल्क स्मिताच्या जीवनावरील द डर्टी पिक्चर साठी कंगना राणावतला विचारलं होतं.
तिनं नकार दिल्याने हा सिनेमा विद्या बालन हिने केला आणि सिनेमा तुफान लोकप्रिय झाला. कंगनाला “का नकार दिला” असं नक्कीच वाटत राहीलं!!!
७. बाजीराव मस्तानी-
संजय लीला भन्साळी यांनी हा सिनेमा सलमान आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन करायचं ठरवलं होतं. तेव्हा त्यांची प्रेमकहाणी फार जोरात चालू होती. पण तारखांचा मेळ बसवून हा सिनेमा सेटवर आणेपर्यंत सलमान आणि ऐश्वर्या वेगळे झाले होते.
मग भन्साळीनी रणवीर सिंग आणि दिपीका यांना घेऊन हा चित्रपट केला.
८. दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे-
तुम्हाला माहिती आहे? दिलवाले दुल्हनियाँ… साठी सैफचं नाव राज या कॅरॅक्टर साठी पक्कं केलं होतं. पण सैफला ती स्टोरी पटली नाही. त्यानं नकार दिला.
मग शाहरुखच्या गळी अक्षरशः उतरवून या सिनेमा बनवला. मिळालेले लोकप्रियतेचे उच्चांक पाहून सैफच्या दिल पे क्या गुजरी होगी… कल्पनाच केलेली बरी!!!
९. बाजीगर-
अँटी हिरो म्हणून बाजीगरनं शाहरुख खानला फार मोठं यश दिलेला हा प्रचंड यशस्वी चित्रपट. पण हा सुद्धा शाहरुखच्या पदरात कधी पडला? जेव्हा सलमानने या सिनेमात काम करायला नकार दिला होता.
अब्बास मस्तान यांनी ही कथा सलीम खान यांना ऐकवली. त्यातील निगेटिव्ह शेड दाखवताना आईच्या दृष्टीकोनातून पण लिहा असं त्यांनी सुचवलं होतं. ते तयार झाले नाहीत. सलमानही असं निगेटिव्ह पात्र करायच्या तयारीत नव्हता.
आपल्या लोकप्रियतेला ती इमेज झाकोळून टाकेल असाही एक ग्रह असावा. पण नंतर अब्बास मस्ताननी सिनेमात आईचं पात्र टाकलं. आणि बाजीगरनं लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. पण सलमान म्हणतो मला त्या निर्णयाचा अजिबात पश्चाताप नाही.
१०. क्विन-
कंगना राणावतचा खूपच गाजलेला सिनेमा क्विन. २०१४ साली आलेल्या या चित्रपटाची नायिका कंगनाला त्यावर्षीचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं.
एवढेच नव्हे तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार कंगनाला मिळाला होता. समिक्षकांनी खूप नावाजला होता कंगनाचा अभिनय.
एका साध्याशा मुलीच्या नवऱ्यानं भर मांडवात लग्नाला नकार दिल्याने तिच्यात झालेल्या रुपांतराची ही पाॅझिटीव्ह कथा लोकांना खूप आवडली होती.
पण या भूमिकेसाठी करिना कपूर ही पहिली पसंती होती. तिने नकार दिल्याने ही भूमिका कंगनाला मिळाली.
करिनाला नक्की काय वाटलं कोण जाणे… पण तिची प्रतिक्रिया फार गंमतशीर होती- मी सोडलेले सिनेमे ज्या हिरोईन करतात त्या स्टार होतात. मला लोकांना काम देण्यात आनंद होतो!!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.