हात पाय गमावूनही यशोशिखर गाठणाऱ्या शिवम कडे बघून वाटतं हेच तर “खरं” जीवन आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या आजूबाजूला अनेक नकारात्मक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे समाजातील अनेक जणांना नैराश्याने घेरलेलं आहे. कोरोनाचा विषय सोडला तरी निराश झालेली अनेक मंडळी आपण आपल्या अवतीभोवती पाहतो.
एकंदरच लॉकडाऊन मध्ये घरात बसून आपण सगळेच वैतागलो आहोत आणि हीच चिंता सतत डोक्यात आहे की हे सगळं कधी थांबणार आणि जनजीवन कधी सुरळीत होणार?
हल्ली तर अगदी लहान मुलांना देखील छोट्या छोट्या गोष्टींमुळे निराशा येते. जराकाही स्वतःच्या मनाच्या विरुद्ध घडलं तर ती लगेच निराश होऊन बसतात!
अगदी टीव्ही बघण्यासाठी रिमोट दिला नाही या कारणावरून देखील लहान मुलं स्वतःचं बरं-वाईट करत आहेत. अशा अनेक बातम्या आपण वाचतो, पाहतो.
परंतु आपल्या समाजात अशाही अनेक व्यक्ती आहेत त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी निराशा त्यांच्या मनाला शिवू शकत नाही.
अनेक कठीण प्रसंगातून देखील ते मार्गक्रमण करतात आणि लोकांना प्रेरणा देत राहतात. समाजासमोर आदर्श निर्माण करतात. अशीच ही गोष्ट आहे वडोदराच्या शिवम सोलंकीची.
बारा वर्षाचा असताना दोन्ही हात आणि एक पाय त्याने एका अपघातात गमावले.
आता आयुष्यभर अपंग बनून रहावं लागणार आहे, याची जाणीव झाली तरी हा मुलगा जिद्दीने परत उभा राहिला. आणि बारावीच्या परीक्षेत त्याने ९२ टक्के मार्क्स मिळवले आहेत.
तेही कोणत्या लेखनिकाची मदत न घेता. आपल्या हाताच्या कोपऱ्याच्या साह्याने पेपर लिहून त्याने बारावीची परीक्षा दिली.
शिवम सोलंकी हा बारा वर्षाचा असताना घराच्या छतावर पतंग उडवण्यासाठी गेला होता.
आपल्याला माहीतच असेल की, मकर संक्रातीला गुजरात मध्ये पतंग उडवण्याचा उत्साह किती असतो!
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पतंग उडवण्यात सहभागी होतात. त्यातला लहान मुलांचा सहभाग तर अवर्णनीय असतो. लोक मैदानावरून, घराच्या छतावरून पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात.
छोटा शिवम तरी त्याला कसा अपवाद असेल!
त्या दिवशी शिवम देखील तसाच पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर गेला. पण तिथे असणाऱ्या विजेच्या एका हाय व्होल्टेज लाईनला त्याचा स्पर्श झाला.
त्याच्यासोबत अपघात घडायला एवढंच कारण पुरेस होतं. त्या अपघातात त्याचे कोपरापर्यंतचे दोन्ही हात व एक पाय निकामी झाले.
तशी घरची परिस्थिती खूप काही सधन म्हणावी अशी नाही. कारण त्याचे आई-वडील हे सफाई कामगार आहेत. परंतु त्यांनी शिवम वर वैद्यकीय उपचार केले.
त्यातून तो बरा झाला पण इतकंच काही पुरेसं नव्हतं. शिवमच्या मनात जगण्याबद्दल जिद्द निर्माण करणही महत्त्वाचं होतं आणि ते काम शिवमच्या आईने केलं.
“आता याच अवस्थेमध्ये तुला जगात कायम वावरावे लागणार असून असंच जगण्याचा प्रयत्न कर.”
असं वास्तवतेचे भान देऊन त्या माउलीने आपल्या मुलाला देऊन जीवन जगण्याचा मंत्र दिला.
वयाच्या बाराव्या वर्षी त्याचे दोन्ही हात निकामी झाले. हाताने लिहणेही त्याला शक्य नव्हते. म्हणून मग त्याने कोपऱ्याच्या साह्याने लिहिण्यास सुरुवात केली, ही कल्पनादेखील त्याच्या आईचीच!
आणि दहावीपर्यंत तसं लिहिण्यात तो पारंगत झाला. दहावीला ही त्याने ८९ टक्के गुण मिळवले. शाळेतल्या त्याच्या मित्रांचा सपोर्ट आणि शिक्षकांचा पाठिंबा त्याला मिळाला.
शिक्षक त्याला प्रोत्साहन देत होते. त्याच्याकडून पेपर सोडवुन घेत होते. बारावीच्या परीक्षेतही असाच अभ्यास करून दहावी पेक्षा जास्त गुण मिळवायचा त्याने निश्चय केला होता.
दहावीच्या गुणांच्या जोरावर त्याने सायन्स साईडला प्रवेश घेतला आणि त्याप्रमाणे तो दररोज अभ्यास करायचा.
त्याच्या सगळ्या शंकांचे निरसन त्याचे शिक्षक करायचे. घरातही त्याला अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळत होतंच.
मित्रही त्याला मदत करायचे म्हणूनच जेव्हा बारावीची परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा त्याने लेखनिकाची ही मदत न घेता परीक्षा दिली आणि परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले.
त्याच्या या यशाबद्दल बोलताना त्याचे वडील म्हणतात की,
“लहानपणीच इतका मोठा आघात शिवम वर होऊनही त्याने आपली जिद्द खचू दिली नाही. त्याच्या शाळेतून आणि घरातून त्याला खूप सपोर्ट मिळाला. शिक्षकांनी त्याची विशेष काळजी घेतली.
त्याला हवी ती मदत त्यांनी केली म्हणूनच आज त्याने हे यश संपादन केले आहे.”
शिवमला आता पुढे डॉक्टर व्हायचे आहे. जर ते शक्य होणार नसेल तर तशाच प्रकारच्या सेवेमध्ये त्याला रुजू व्हायचे आहे. आणि समाजाची सेवा करायची आहे.
त्याच्या या यशाबद्दल बोलताना तो म्हणतो की,
“सर्व शिक्षकांचे आणि माझ्या मित्रांचे सहकार्य मिळाले. घरातूनही आईवडिलांनी खूपच सपोर्ट दिला. म्हणूनच मी हे यश मिळवू शकलो.
पुढे परीक्षेसाठी बसणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. तसेच लक्षात ठेवा ,ही केवळ एक परीक्षा आहे. त्याचं कोणतंही टेन्शन कुणीही घेऊ नये.
केवळ या परीक्षेवरच तुमचं आयुष्य अवलंबून आहे असे नाही. कारण आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. उद्या काय होणार आहे याची शाश्वती नसते. त्यामुळे आयुष्य जसं येतं तसं त्याला सामोरे जा.
अशा परीक्षा पुढच्या आयुष्यातील येणाऱ्या कठीण प्रसंगाला कशाप्रकारे सामोरे जायचं हेच शिकवतात. त्यामुळे आयुष्याला सामोरे जा आणि आनंदाने राहा.”
शिवमच्या या उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.
इतकंच नाही तर अशीच माणसं समाजासाठी देशासाठी आदर्श असतात. मरगळलेल्या निराश मनांना यांचं जीवन प्रेरणा देणारे असते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.