आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
हॉलिवूड अॅक्टर्ससह पाश्चात्य देशातल्या विविध क्षेत्रातील सेलेब्रिटींच्या लग्नाच्या वेळी होणाऱ्या प्रिनप्शल अॅग्रीमेंट्सची चर्चा सध्या जोरात आहे. लग्नाच्या आधी दोघांमध्ये होणारा हा एक प्रकारचा करार असतो.
काय आहे प्रिनप्शल करार ?
हा एक विवाहपूर्व समझौता, करार असतो. प्रत्येक देशाप्रमाणे ह्या करारासंदर्भातला कायदा बदलतो. देशातील कायदे डोळ्यांसमोर ठेवूनच हा करार केला जातो.
विवाहादरम्यान होणारे नवरा-बायको कुठल्या देशात आणि कुठल्या राज्यांत राहतात, आणि लग्न कुठं होणार तेथील कायद्यांवरही हा करार बराचसा अवलंबून असतो.
हा करार त्या जोडप्यांमधील एक खासगी करार असतो. त्यात प्रामुख्याने जर पुढे जाऊन त्या विवाहात एकाचा आधी मृत्यू झाला, किंवा दोघांचा काही कारणाने घटस्फोट झाला, तर दोघांच्या संपत्तीचे वाटप कसे होईल याचा उल्लेख केलेला असतो.
या करारात निष्पक्षपणा महत्त्वाचा असतो. दोघेही आपल्या वकीलाच्या मदतीने हा करार तयार करतात. त्यात दोघांनाही आपल्या पूर्ण संपत्तीचा उल्लेख करावा लागतो. संपत्ती जाहीर करावी लागते.
हा करार विशेषतः स्त्रियांना सुरक्षितता प्रदान करतो. उदा. जर एखाद्या स्त्रीने एखाद्या व्यक्तिशी लग्न केले. ती व्यक्ती प्रचंड धनवान असेल आणि ती स्त्री त्याच्याबरोबर लग्नात पंधरा-वीस वर्षे राहिली आणि नंतर दोघांचं पटेनासं झालं, तर घटस्फोटानंतर त्या स्त्रीचे हाल काय होतील?
तिला आतापर्यंत एक विशिष्ट प्रकारची लाईफस्टाईल जगण्याची सवय झाली असेल, तिने असं एकदम रस्त्यावर आलेलं कुणालाही बरोबर वाटेल का?
त्यात पुन्हा जर तिच्या पदरात त्या व्यक्तिपासून झालेली मुलं असतील तर त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीसाठीही तिला पैशाची गरज लागणार. आणि म्हणूनच घटस्फोट किंवा मृत्युनंतरही आपली आर्थिक सुरक्षितता कायम राहावी यासाठी हा करार केला जाते.
या सेलिब्रिटींची उत्पन्ने प्रचंड असतात. लाखो डॉलर्समध्ये. साहजिकच लग्न विच्छेदानंतर आपल्यावर ती लाईफस्टाईल गमवायची पाळी येऊ नये, या सावधतेपोटी अशा श्रीमंत व्यक्तींशी लग्न करताना असे करार केले जातात.
हे ही वाचा –
===
सेलेब्रिटीजचे प्रिनप्शल करार –
आपल्या इथे अजून आपण सर्वसामान्य लोक तरी अशा प्रकारच्या करारांचा विचार करत नाही. आपण लग्न म्हणजे स्वर्गातल्या गाठी वगैरे समजत असतो.
परंतु हल्लीच्या काळात असे राहिलेले नाही. लग्नं टिकणं, टिकवणं ही फार कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. लग्नाआधी असलेले प्रेमही लग्नाच्या काही काळानंतर ओसरायला सुरूवात होते.
त्यातही तुम्ही जर अतीश्रीमंत व्यक्ती असाल, तर तुमच्याशी लग्न करणारी व्यक्ती आपल्या भविष्याचा विचारही आधीच करणार यात नवल ते काय?
उद्या जर तुमच्याशी तिचं पटलं नाही आणि घटस्फोटाची वेळ आली, तर तिच्या भवितव्याचं काय? म्हणून ती असा करार करून मागणारच.
पाश्चात्त्य देशातील सेलेब्रिटीजची सध्या हीच परिस्थिती आहे. लाखो डॉलर्समध्ये कमावणाऱ्या तिथल्या सेलेब्रिटीजना लग्नाआधीच असे करार करावे लागतात.
आपली संपत्ती जाहीर करून भविष्यात त्याचे वाटप दोघांमध्ये कसे केले जाईल याच्या अटी आणि शर्ती टाकल्या जातात. अर्थात समंजसपणातून आणि मान्यतेतूनच हे केलं जातं.
आपण बघू या, काही सेलेब्रिटीजच्या प्रिनप्शल करारातील अटी –
मार्क झुकरबर्ग आणि प्रिस्किला चॅन –
फेसबुकचा संस्थापक असलेला मार्क झुकरबर्ग आणि बालरोगतज्ज्ञ असलेली त्याची बायको प्रिस्किला चॅन हे जगातील सध्याच्या काळातील सर्वाधित श्रीमंत जोडपं.
त्यांची संपत्ती आहे ७४.६ बिलिअन डॉलर्स. त्यामुळे साहजिकच या जोडप्यांत लग्नाआधी प्रिनप्शल करार झालेला आहेच.
संपत्तीच्या जोडीला त्या करारात अजून एक अट आहे, ती म्हणजे प्रिस्किलाने आठवड्यातून १०० मिनिटे तरी मार्कने आपल्याला द्यावेत, आपल्यासाठी राखून ठेवावेत अशी अट घातलेली आहे.
साहजिकच आहे. झुकरबर्गसारखा जगातील सर्वात श्रीमंत आणि उद्योगी माणूस हा सदासर्वकाळ बिझी राहणार मग तो आपल्या पत्नीला आणि कुटुंबाला वेळ नाही देऊ शकला तर अशा लग्नाचा काय फायदा?
जेसिका बेल आणि टिंबरलेक –
हॉलिवुडमधील या स्टार दाम्पत्याची कमाई २४८ मिलिअन डॉलर्स एवढी आहे.
या स्टार कपलने आपल्या प्रिनप्शल करारात एक अट ठेवली आहे, की घटस्फोट तर दूरची गोष्ट पण टिंबरलेकने जर जेसिकाला फसवून इतर कोणाशी संबंध ठेवल्याचे कळले, तर ताबडतोब त्याने तिला पाच लाख डॉलर्स काढून द्यायचे.
हे ही वाचा –
===
निकोल किडमन आणि किथ अर्बन –
निकोल किडमनने आधी टॉम क्रूजशी लग्न केलं होतं. त्याच्या डिव्होर्स झाल्यानंतर २००६ मध्ये तिने किथ अर्बनशी लग्न केले. या ऑस्ट्रेलिअन कपलची कमाई २०५ मिलिअन डॉलर्स इतकी आहे.
या दोघांनी एकमेकांची काळजी घेत आपला प्रिनप्शल करार केलेला आहे. किथ अर्बनला दारू आणि कोकेनचे व्यसन असल्यामुळे तिने जर तो या दोन गोष्टींपासून लांब राहिला तर दरवर्षाला त्याला सहा लाख डॉलर्स देण्याचे कबूल केले आहे.
जे झी आणि बियॉन्सी –
या जोडप्यांची कमाई ही १.६ बिलिअन डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या करारात जे झीने त्यांना होणाऱ्या प्रत्येक मुलाच्या नावाने पाच मिलिअन डॉलर्स ठेवायचे असे कबूल केले आहे.
जर हे लग्न दोन वर्षाच्या आत मोडलं तर बियॉन्सीला १० मिलिअन डॉलर्स द्यायचे आणि शिवाय पंधरा वर्षांपर्यंत दरवर्षी १ मिलिअन डॉलर द्यायचे असे कबूल केले आहे.
किम कार्डाशिअन आणि कानिए वेस्ट –
ह्या जोडप्याचा प्रिनप्शल करार काही वेगळाच आहे. यात मुलांसाठी काहीही मागितलेले नाही.
फक्त आपल्या सासूने म्हणजे कार्दाशिअनच्या आईने, क्रिस जेनरने आपल्या करिअरबद्दल काही निर्णय घेऊ नये, दोघांच्या मध्ये ढवळाढवळ करू नये कारण त्याचा परिणाम या दोघांच्या आयुष्यावर होतो. अशी अट घातलेली आहे. आहे ना मजेशीर!
ब्रॅड पिट आणि ऍन्जेलिना जॉली –
या दोघांचाही घटस्फोट आता झालेला आहे.
पण या दोघांच्या प्रिनप्शल करारात फक्त एवढेच लिहिलेले होते, की या जोडीचा जर घटस्फोट झाला, तर मुलांचा ताबा पूर्णपणे ऍन्जेलिना जॉलीकडे राहील. आणि तसंच झालं.
मायकेल डग्लस आणि कॅथरीन झेटा-जॉन्स –
या दोघांच्या प्रिनप्शल करारात उल्लेख आहे की जर कधी या दोघांचा डिव्होर्स झाला, तर झेटाला मायकेल कडून वर्षाला २.८ दशलक्ष डॉलर्स मिळतील.
जर त्याच्या फसवणुकीमुळे डिव्होर्स घ्यायची पाळी आली, तर तिला त्याने तिला जास्तीचे ५ मिलिअन डॉलर्स द्यायचे!
टायगर वुड्स आणि एलिन नॉर्डिग्रेन –
टायगर वुड्सने नॉर्डिग्रेनची फसवणुक केली नसती, तर त्या डिव्होर्सचे तिला फक्त २० मिलिअन डॉलर्स मिळाले असते.
पण कराराप्रमाणे टायगरने तिची फसवणुक केल्याने त्याला तिला ११० मिलिअन डॉलर्स द्यावे लागले. खरंतर वुड्सला तिला घटस्फोट द्यायचा नव्हता. तिने परत यावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केले, मात्र ती आली नाही.
टॉम क्रूज आणि केटी होम्स –
यांचा विवाहविच्छेद झाल्यावर टॉमला केटीला त्यांच्या लग्नाला जितकी वर्षे झाली तितक्या प्रत्येक वर्षासी ३ मिलिअन डॉलर्स एवढी रक्कम द्यावी लागली.
त्या शिवाय त्या दोघांना जी मुलगी झाली, सुरी, तिच्या देखभालीसाठी केटीला ४०,००० डॉलर्सचा भत्ताही मिळतो.
ब्रिटनी स्पिअर्स आणि केव्हीन फेडरलिन-
या जोडप्याचा प्रिनप्शल करार वेगळाच होता. या दोघांनी कायदेशीररित्या कधीच ‘तांत्रिकदृष्टया’ लग्न केले नव्हते असे त्यांच्या करारात म्हटले आहे.
त्यामुळे दोघांचा विवाह संपुष्टात आल्यावर फेडरलिनला केवळ १ मिलिअन डॉलर एवढीच रक्कम मिळाली.
अशा रीतीने पाश्चात्त्य देशातील अनेक सेलेब्रिटीजच्या लग्नापूर्वीचे करार बघितले आणि त्याची अमलबजावणी पाहिली तर आपल्याला त्यात विविध नमूने मिळतात.
भारतातील कपल्समध्ये अजून तरी असे काही विशेष स्वरुपाचे करार ऐकीवात नाहीत. मात्र आपल्याकडेही हे लोण लवकरच येईल असे वाटते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.