लॉकडाउन : ‘मुली काय करू शकतात?’ असं विचारणाऱ्या पुरुषांना चपराक देणारी कौतुकस्पद घटना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भावना आणि नातं ही भारतीय लोकांची दोन बलस्थानं आहेत. या दोन गोष्टींसाठी पाश्चिमात्य देश सुद्धा भारताची सध्या तारीफ करताना थकत नाहीयेत.
आपल्याकडे असलेली कुटुंब व्यवस्था, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला एकमेकांबद्दल असलेली ओढ ही खरंच फार मोलाची गोष्ट आहे.
आपल्या सिनेमांमध्ये सुद्धा जेव्हा एखादी चुकीची गोष्ट त्या सिनेमाच्या नायक किंवा नायिकेच्या फॅमिली मेंबर सोबत घडते तेव्हा आपण बघतो की, त्यांची सर्व ताकत एकवटली जाते आणि ते त्या प्रसंगाचा सामना करतात.
पुढे आपल्या परिवारातील सदस्यांना त्या समस्येतून सुखरूप बाहेर काढतात. ह्याची काही उदाहरणं सांगायची झाली तर दृश्यम, गदर किंवा श्रीदेवी यांचा शेवटचा सिनेमा ‘मॉम’.
आपल्याला असं वाटेल की पडद्यावर काहीही दाखवणं शक्य असतं. पण, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी आपल्या भारतात प्रत्यक्ष घडली.
ज्योती कुमारी या १५ वर्षाच्या मुलीचं या कामासाठी जगभरात कौतुक होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि राजकीय सल्लागार एवांका ट्रम्प हिने सुद्धा ज्योती कुमारीचं आणि पर्यायाने भारतीय लोकांच्या सहनशील वृत्तीचं आणि ‘आपल्या’ माणसांसाठी असलेल्या त्यांची ‘काहीही’ करण्याच्या वृत्तीचं कौतुक केलं आहे.
त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये असं म्हटलं आहे :
15 yr old Jyoti Kumari, carried her wonder father to their home village on the back of her bicycle covering +1200 km over 7 days.
The beautiful feat of endurance & live has captured the imagination of the Indian people and the cycling federation!
ज्योती कुमारी ही बिहार मधील दरभंगा या जिल्ह्यातील सिरहुल्ली या गावात राहते. तिचे वडील मोहन पासवान हे दिल्ली NCR मधील गुडगाव येथे रिक्षा चालवतात. यावर्षी मार्च महिन्यात ज्योती ही तिच्या वडिलांकडे रहायला आली होती.
जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की, मार्च महिन्यापासून भारतभर कोरोना पासून लोकांचा बचाव करण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.
या काळात सर्वात जर का कोणाचे हाल झाले असतील तर मोहन पासवान सारख्या लोकांचे ज्यांचं की हातावर पोट आहे. रोज काम करतील तर काही कमावतील आणि तरच काही खायला मिळेल अशी या लोकांची परिस्थिती असते.
यात अजून भर म्हणजे मोहन पासवान यांचा अपघात झाला होता. त्यांचं रिक्षा चालवणं बंद झालं होतं. पैसे नव्हते. घरमालक “हे भाडं द्या नाही तर घर सोडून द्या” अशी धमकी देऊ लागला.
पैश्यांची इतकी अडचण होती की बापलेक हे दोन वेळच्या जेवणासाठी त्रस्त झाले होते.
जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा कोणीही आपल्या घरी जायचा विचार करतो. मोहन पासवान आणि ज्योती यांनीही तोच विचार केला. पण, तोपर्यंत सगळेच पब्लिक ट्रान्सपोर्ट हे बंद करण्यात आले होते.
ज्योती ने काही लोकांकडून पैसे उधार घेतले आणि २००० रुपयांत सेकंड हँड सायकल विकत घेतली आणि त्या सायकल वर आपल्या घरी जायचं ठरवलं.
मोहन पासवान हे जखमी असल्याने १२०० किलोमीटर सायकल चालवणं त्यांना तर काही शक्य नव्हतं. त्यांच्या मुलीला सुद्धा त्यांनी सांगितलं की, तुला सायकल चालवणं आणि मला डबल सीट घेऊन जाणं हे काही शक्य होणार नाही.
पण, ज्योती कुमारी ने मनाशी ही गोष्ट ठरवलं होतं की मी ‘काहीही’ करेन आणि माझ्या वडिलांना घरी सुखरूप नेईन. निश्चय इतका दृढ असल्यावर गोष्टी व्हायच्या थोडीच राहत असतात.
इथे ही तेच झालं. ७ दिवस सतत सायकल चालवून ज्योती आणि तिचे वडील हे दरभंगा या त्यांच्या गावी गुडगाव पासून १२०० किलोमीटर अंतर पार करुन सुखरूप पोहोचले.
हे कसं शक्य आहे ? उत्तर एकच – इच्छाशक्ती.
जेव्हा इच्छाशक्ती इतकी दांडगी असते तेव्हा गोष्टी घडून येतात. या घटनेची दखल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने ज्योती कुमारी हिला ट्रायल साठी बोलावलं आहे.
ही ट्रायल यशस्वी झाली तर ज्योती ला सायकलिंग फेडरेशन च्या खर्चावर ट्रेनिंग दिली जाईल आणि भविष्यात सायकलिंग मध्ये विविध स्पर्धांमध्ये भारताला represent करायचा तिला चान्स मिळू शकतो.
ज्योती ने सांगितलंय की, ती या ऑफर मुळे खूप आनंदी आहे आणि पुढच्या महिन्यात ती ही ट्रायल द्यायला नक्की जाईल.
मीडिया सोबत बोलताना ज्योती हिने सांगितलं की, “माझी इच्छा आधी शिक्षण पूर्ण करण्याची आहे. मला कमीत कमी दहावी पर्यंत तरी शिक्षण आधी पूर्ण करायचं आहे आणि तसंही सध्या तर मी खूप थकले आहे.”
या घटनेचे पडसाद राजकीय पटलावर सुद्धा पडले. लोक जनशक्ती पार्टी चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ज्योती हिच्या पूर्ण शिक्षणाची जवाबदारी घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
ज्योती चे वडील मोहन यांनी सुद्धा यो गोष्टीला दुजोरा दिला की,
“आम्ही ज्योती ला सायकलिंग फेडरेशन च्या ट्रेनिंग ला लॉकडाऊन संपल्यानंतर नक्की पाठवू. आम्ही कालच तिचं नववी चं ऍडमिशन घेतलं आहे. तिने दहावी पर्यंत आधी शिक्षण पूर्ण करावं अशीच माझीसुद्धा इच्छा आहे.”
‘मुली काय करू शकतात?’ असं विचारणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीचं समर्थन करणाऱ्या लोकांसाठी ही घटना म्हणजे एक चपराक आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.