' ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ आणि ‘सौरऊर्जा निर्माण’ यासाठी या दाम्पत्याचा “आविष्कार” पाहून थक्क व्हाल!   – InMarathi

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ आणि ‘सौरऊर्जा निर्माण’ यासाठी या दाम्पत्याचा “आविष्कार” पाहून थक्क व्हाल!  

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनामुळे देशात आणि खासकरून महाराष्ट्र मुंबई अशा भागात पावसाची कामं बरीच रखडली आहेत, आणि पावसाळ्यात सुद्धा हे कोरोनाचं थैमान असंच चालू राहिलं तर मात्र खूपच त्रास वाढण्याची शक्यता आहे!

आपल्या देशात पाऊस भरपूर पडतो, तरीही लोकसंख्येनुसार अनेक शहरांत आणि गावांमध्ये देखील उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते.

शिवाय बदलत्या ऋतुमानानुसार आणि हवामानानुसार पावसाच्या पाण्याचे प्रमाण देखील कमी-अधिक होत असल्याचे दिसून येते.

अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरपूर कोसळते मात्र त्यातील बहुतांश पाणी हे वाहून जाते. आणि पावसाळा संपल्यावर लोक पाण्यासाठी वणवण करताना दिसतात.

 

water tanks inmarathi
wbur.org

 

रेन वॉटर हार्वेस्टिंगने जर आपण हे पावसाचे पाणी धरून योग्य प्रकारे साठवू शकलो, तर ही विवंचना दूर होईल. आणि देशात पाण्याची टंचाई दूर होऊ शकेल.

त्या प्रकारे अनेक ठिकाणी हळू हळू का होईना थोड्या प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टींगची सुरूवात झालेली आहे. अर्थात त्याचे प्रमाण अजूनी नगण्य आहे.

मात्र समीत चोक्सी आणि प्रिया वकील चोक्सी या दाम्पत्याने एक अनोखा प्रयोग करून भारतात त्याची सुरूवात देखील केली आहे.

हे दाम्पत्य सिंगापूर, लंडन, अटलांटा आणि सॅन फ्रान्सिस्को येथे आपले काम करते.

या दाम्पत्याने आपल्या अनुभवाचा आणि कामाचा फायदा आपल्या देशाला देखील व्हावा या हेतून आपले हे प्रोजेक्ट भारतात राबवायला सुरूवात केली आहे. आणि त्यांना इथं चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.

 

amit choksi inmarathi
techinasia.com

 

प्रिया ही आर्किटेक्टमधील पदवीधर असून समीत हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

आज ते १२ लोकांच्या टिमसह या रेन वॉटर हार्वेस्टींग आणि सोलार एनर्जी प्राप्त करून देणाऱ्या उलट्या छत्र्या बसवून देण्याचे काम करत आहेत.

काय आहे हा प्रोजेक्ट?

उलटा छाता, किंवा उलटी छत्री या नावाने ओळखला गेलेला हा उपक्रम म्हणजे एकाच वेळी एकाच प्रोजेक्टमधून रेन वॉटर हार्वेस्टींग आणि सोलार एनर्जी मिळवणे असे दोन्ही हेतू साध्य करणारा हा प्रोजेक्ट आहे.

उन्हाळ्यात सोलार एनर्जी आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवणे हे दोन्ही फायदे या उपक्रमातून मिळतात.

उलटा छाता किंवा उलटी छत्री –

चोक्सी दाम्पत्याने ThinkPhi Sustainable Lab Pvt Ltd या कंपनीद्वारे हा प्रोजेक्ट उभा करून दिलेला आहे.

सध्या आंध्र प्रदेश येथील गुंटकल या रेल्वे स्टेशनने या कंपनीकडून हा प्रोजेक्ट तयार करून घेतलेला आहे.

 

ulta chaata inmarathi
myindiandream.in

 

या रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या रिकाम्या जागेत अशा सहा उलट्या छत्र्या बसवून घेतल्या आहेत.

या उलट्या छत्र्या म्हणजे छताच्या आकाराच्या आणि काहीशा खोलगट आणि म्हणून उलट्या झालेल्या छत्रीसारख्या आकाराच्या कॅनोपीज आहेत. थोडक्यात ते सोलार सिस्टमचे छतच आहे.

यात पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवले जाऊन ते खालच्या पाईपमधून जमिनीत साठवले आणि मुरवले जाते.

त्याचवेळी हे पाणी फिल्टर होऊन आणि जंतुविरहीत होऊन जावे यासाठ त्यात फिल्ट्रेशन व्यवस्था देखील फिट केलेली आहे. अंडरग्राऊन्ड बांधलेल्या मोठ्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवले जाते.

आणि ते शुद्ध होऊन आलेले असल्याने ते थेट पिण्यासाठी वापरले जाते.

या छत्र्यांमधून खालच्या टाक्यांमध्ये ८५ हजार ते एक लाख लिटर इतके शुद्ध पिण्याचे पाणी साठवले जाऊ शकते!

हे छत म्हणजे सोलार एनर्जी मिळवण्यासाठी स्पेशल तयार केलेले असल्याने जेव्हा पाऊस नसेल तेव्हा ते सोलार एनर्जी क्रिएट करण्यास मदत करते.

अशा रीतीने एकाच छतातून सोलार एनर्जी आणि पावसाचे पाणी असं दोन्ही मिळवून देणारा हा उपक्रम किंवा ही व्यवस्था पर्यावरणाशीही सांगड घालणारी ग्रीन व्यवस्था आहे.

 

ulta chaata 2 inmarathi
thebetterindia.com

 

पर्यावरणावर कोणतेही दुष्परीणाम न करता उलट नैसर्गिक साधनांचा योग्य प्रकारे साठा करून त्याचा मानवजातीला फायदा करून देणारा हा उपक्रम अतिशय उपयुक्त असा उपक्रम आहे.

स्वरूप आणि खर्च –

गुंटकल रेल्वे स्टेशनने अशा सहा छत्र्या लावल्या आहेत. यातील एकेक छत्री ही ५ x ५ मी. ची असून त्याचे वजन १२० किलो इतके आहे आणि प्रत्येक छत्रीखाली स्टेनलेस स्टीलचा पाईप आहे.

तसेच ४० वॅट्सच्या एलईडी ट्यूब लावलेल्या आहेत. ह्या छत्रीचे पॅनेल हे लवचिक आणि वजनाने हलक्या असलेल्या मोनोक्रिस्टलाईनपासून बनवले गेले आहे.

यात लिथियम बॅटरीवर चालणारे चार्ज कंट्रोलर आणि स्वयंचलित सेन्सर नियंत्रक बसवलेले आहे.

जेव्हा जेव्हा या छताची साफसफाई करणे गरजेचे होईल, तेव्हा हे सेन्सर्स थेट कंपनी आणि युजर्सना त्याची सूचना देतील. त्यामुळे या छतात धूळ, कचरा, घाण इत्यादी साठले की त्यांची वेळच्यावेळी साफसफाई होऊ शकेल.

ह्या छत्र्या मजबूत असून १४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात देखील त्या पडणार नाहीत अशा आहेत.

 

ulta chaata works inmarathi
yourstory.com

 

अशा प्रकारे प्रत्येक लहानसहान बाजू लक्षात घेऊन तयार केल्या गेलेल्या या प्रत्येक छत्रीला साधारणपणे १०-१२ लाख इतका खर्च होतो.

म्हणजेच या प्रोजेक्टचा खर्च देखील अवाढव्य नसून आवाक्यात आहे. मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स, कार्यालये इत्यादीसारख्या मोठ्या ईमारतींमध्ये असे उपक्रम सहजपणे बसवले जाऊ शकतात.

जर या १ चौरस फुटाहून अधिक जागा न घेणाऱ्या अशा १० छत्र्या लावल्या तर त्या उत्तम रिझल्ट देतात. या दहा छत्र्यांमधून ३६० चौ. फुटांचे पाणलोट क्षेत्र मिळू शकते. आणि सोलार एनर्जीही.

इतर फायदे –

या छत्र्यांमुळे ती जागा सावली मिळवून देते आणि त्याखाली येणारे जाणारे लोक थोडा वेळ विसावण्याकरता बसू शकतात. आपले मोबाईल वगैरे चाळत आपला वेटींग पिरिअड घालवू शकतात.

 

thinkphi inmarathi
mgsarchitecture.in

 

गप्पा मारू शकतात. त्यामुळे या छत्र्या तिहेरी उपयोगाच्या ठरतात. त्यांची रचना देखणी असल्यामुळे त्या भवतालात एक देखणे चित्र निर्माण करतात.

थिंक फी कंपनीच्या या उलट्या छत्र्या आता मुंबई, पुणे आणि बंगलोरसारख्या मोठ्या शहरांत देखील बसवल्या जाऊ लागल्या आहेत.

थिंक-फि स्टार्टअपला निम्मगडा प्रसाद यांनी अनुदान दिले आहे. त्यांनी यापूर्वी मेट्रिक्स प्रयोगशाळा, केअर हॉस्पिटल्स इ. मध्ये गुंतवणूक केली होती.

या उपक्रमाने आधीच भारतीय रेल्वे, गोदरेज इंटिरियर आणि रुस्तॉमजी या प्रमुख ग्राहकांना या उपक्रमाची विक्री केली आहे.

हे उत्पादन बर्‍याच बाबी लक्षात घेऊन तयार केले गेले आहे, असे थिंक फिचे संस्थापक समित चोकसी म्हणतात, जे जागतिक स्तरावर हे विस्तृत करण्याचे उद्दीष्ट ठेवतात.

जगभरात ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचे दुष्परिणाम उद्भवत आहेत. अशा काळात आपण पर्यावरणाबद्द्ल जागरुक राहिलो नाही, तर पुढच्या पिढ्यांना त्याचे अधिक दुष्परिणाम भोगावे लागतील.

 

thikphi inmarathi
twitter.com

 

उलट्या छत्रीचा हा उपयोग नक्कीच इको-फ्रेंडली आहे. अशावेळी नैसर्गिक संसाधनांचा अशा रितीने पर्यावरणस्नेही उपक्रम राबवून उपयोग करून घेणे हे नेहमीच मानवी हिताचे राहणार आहे.

म्हणून अशा प्रोजेक्ट्सचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे.

अधिकाधिक लोक याचा स्वीकार करू लागल्यावर याची आज किंमत जी मोठी वाटू शकते ती देखील येणाऱ्या काळात कमी होऊ शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?