ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
रॉबर्ट डाऊनी ज्युनियर.! मार्व्हलच्या सिने जगतातला आयर्न मॅन. आज तो ज्या यशाच्या उत्तुंग शिखरावर आहे,त्या मागची मेहनत सर्वांना माहीत आहे.
सिनेमात काम करायचा आधी अट्टल नशेडीचा स्टॅम्प बसलेला आरजेडी कित्येकदा जेलवारी पण करून आला आहे.
या सगळ्या वाईट आठवणी, वाईट कृत्य मागे सोडून त्याने नव्याने सुरवात करून आज कुठेच्या कुठे पोहोचला आहे. त्याची ही स्टोरी आज सर्वश्रुत आहे.
पण, क्रिकेटच्या चमकदार दुनियेत पण असेच स्ट्रगल करून अमाप प्रसिद्धी आणि यश संपादन करणारे खेळाडू आहे. त्यातलं एक मोठं आणि महत्वाच नाव म्हणजे ‘कायरन पोलार्ड.’
मोठं या साठी की त्याच्याशिवाय कोणतीच टी२० लीग खेळली गेली नाही. आणि महत्वाच यासाठी की आयपीएल मधला सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या यशामध्ये त्याचा असलेला वाटा.
२००९ ची चॅम्पियन्स लीग टी२० स्पर्धा आठवते? तीच ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इतर प्रसिद्ध लोकल टी-२० लीग खेळवणाऱ्या देशांच्या विजेत्या संघाची जत्रा.
स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स ने जिंकली.
पण,स्पर्धा गाजवली ती २२ वर्षीय उंच धिप्पाड कॅरेबियन खेळाडू पोलार्ड याने.!
जागेवरून बॉल मैदाना बाहेर टोलवायची त्याची क्षमता आणि आपल्या स्लोवर फास्ट बॉलिंग ने विकेट काढायच्या कौशल्यामुळे स्पर्धेत पोलार्ड भरपूर चमकला गेला.
परिणामी आयपीएल मधल्या सगळ्यात मोठ्या संघाने ‘मुंबई इंडियन्स’ ने त्याला सर्वोच्च बोली लावत आपल्या पारड्यात खेचून घेतले.
पोलार्ड, विंडीज च्या एकदिवसीय आणि टी२० संघाचा कर्णधार.जगातील सर्वोत्तम टी२० खेळाडू पैकी एक.५०० टी२० सामने खेळणारा जगातला एकमेव खेळाडू.!
पण,एक वेळ अशी होती की याच पोलार्ड कडे खायला सुद्धा पैसे नव्हते.
१२ मे १९८७, कॅरेबियन बेटावरच्या त्रिनिदाद मध्ये पोलार्ड चा जन्म झाला.वडील नव्हते. आईनेच पोलार्ड आणि त्याच्या दोन बहिणींचा सांभाळ केला.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आई आपल्या कुटुंबासह पीआरको येथे स्थायिक झाली. ही जागा ड्रग्ज,गॅंग वॉर आणि मुख्य म्हणजे खेळासाठी असलेल्या वेडेपण यासाठी प्रसिद्ध होते.
त्या परिस्थितीत वाढणाऱ्या पोलार्ड समोर दोन पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने अमाप पैसा कमावण्याचा आणि मेहनत करून खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!
त्याने दुसरा पर्याय निवडत खेळामध्ये करियर करायचं ठरवलं.आणि यासाठी त्याला बरंच काही गमवाव सुद्धा लागलं.
जस भारतात इव्हेंट नुसार खेळ बदलले जातात,तसंच पोलार्ड च्या शहरात सुद्धा होत.
फुटबॉल वर्ल्डकप आला की फुटबॉल खेळायला सगळ्यांना आवडायचं.ऑलम्पिक आलं की त्यातले खेळ आणि काहीच नसेल तर मग नसानसात भिनलेला क्रिकेट
लहानपणापासून पोलार्ड लांबच्या लांब छक्के मारण्यात पटाईत होता.
भारतात आधी जस भारतासाठी खेळायचं म्हणजे मुंबई कडून खेळणं महत्वाच असल्याचं तसच काहीसं इथे देखील होत.
विंडीज कडून खेळायचं म्हणजे आधी त्रिनिदाद आणि टोबॅगो कडून खेळल पाहिजे. शाळेपासूनचं क्रिकेट मध्ये नाव कमावणाऱ्या पोलार्ड ला टी अँड टी मध्ये जागा मिळवणं सोप्प झालं.
२००६ साली विंडीजच्या अंडर १९ मध्ये सिलेक्शन मग लोकल लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास मॅचेस तो खेळू लागला.
२००७ ला टी-२० वर्ल्डकप अस्तित्वात आला आणि क्रिकेट विश्वाने आपली दिशा बदलली. वेगवान झालेल्या या फॉरमॅट मध्ये हाणामारीची खेळी चाहत्यांना पण आकर्षित करू लागली.
पहिल्या वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकून विंडीजच्याच ख्रिस गेल ने हा फॉरमॅट आपल्यासाठी आहे हे ठणकावून सांगितलं.
अन २००९ साली प्रोफेशनल लीग खेळणाऱ्या संघाचं मिळून चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा भारतात आयोजित केली गेली.
कॅरेबियन लीग विजेता टी अँड टी संघ पण या स्पर्धेत सहभागी झाला. पोलार्ड ला ग्लोबली प्रसिद्धी मिळवून देणारी हीच ती स्पर्धा!
हैद्राबाद मध्ये झालेल्या न्यू साऊथ वेल्स आणि ती अँड टी मधल्या सामन्यात न्यू साऊथ वेल्स ने निर्धारित २० ओव्हर मध्ये १७० धावा ठोकल्या.
चेस करायला उतरलेल्या टी अँड टी चा संघ १५ व्या ओव्हर मध्ये ११८ वर ६ विकेट गमावून बसलेला. टी अँड टी सामना गमावणार अशीच काहीशी लक्षण होती.
अन मैदानात आलं पोलार्ड नावाचं वादळ. १८ बॉल मध्ये ५४ रन्स ठोकून पोलार्ड ने १९ व्या ओव्हर मध्येच मॅच संपवली.
परिणामी सामनावीर म्हणून त्याचा गौरव झाला.
या मध्ये मोठी गोष्ट अशी की त्यावेळेसचे ऑस्ट्रेलिया कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे प्रसिद्ध बोलर्स न्यू साऊथ वेल्स कडून खेळत होते.
ब्रेट ली, स्टुअर्ट क्लार्क, मोयनेज हेन्रीकेज, डग बॉलिंजर या सगळ्यांना पोलार्ड ने झोडल होत.
याच स्पर्धेनंतर झालेल्या आयपीएल ऑक्शन मध्ये साडे पाच करोडची सर्वाधिक बोली लावून मुंबई ने पोलार्ड ला आपल्याकडे घेतलं. तेव्हापासून आजतागायत पोलार्ड मुंबई कडून आयपीएल खेळतो.
कधी कधी विंडीजच्या खेळाडूंवर आरोप लावला जातो की ते देशासाठी न खेळता पैशांसाठी खेळतात. त्याची सुरवात झाली ती पण पोलार्ड पासूनच!
जस एखद्या देशाच्या क्रिकेट बोर्डासोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्ट नुसार बोर्ड बोलवेल तेव्हा खेळाडू उपस्थित असला पाहिजे.
उदारणार्थ २०१९ च्या वर्ल्डकप आणि अशेस या दोन स्पर्धा लक्षात घेता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांच्या काही खेळाडूंना आयपीएल खेळण्यास मनाई केली होती.
तर, २०१० मध्ये पोलार्डला विंडीज बोर्डाने इंग्लंड टूरसाठी उपलब्ध होण्यास सांगितले होते.पण त्याला प्रोफेशनल टी-२० आणि विंडीज दोघांच्या कडून खेळायचं होत.
बोर्डाने सांगितलं म्हणजे प्रोफेशनल लीग सोडावी लागणार हे पोलार्ड मान्य करण्यास तयार नव्हता. त्यामुळे विंडीज बोर्ड आणि पोलार्ड यमांध्ये खटके उडायला सुरवात झाली.
आणि पोलार्ड ने विंडीज बोर्डासोबत असलेलं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडून दिलं.
पोलार्ड च्या या वागणुकीमुळे नाराज झालेल्या मायकेल होल्डिंग यांनी कमेंट दिली की पोलार्ड त्यांना काही प्रोफेशनल खेळाडू वाटत नाही.
बाकी होल्डिंग सुरवाती पासून टी२० क्रिकेट च्या विरोधात आहेत.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसताना सुद्धा पोलार्ड विंडीज कडून वनडे आणि टी२० खेळतो. सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मान्य न करण्याच त्याच मुख्य कारण म्हणजे त्याला जगभरातील प्रोफेशनल टी-२० सामने खेळता यावे.
बऱ्याचदा आपण पाहिलं ही असेल की विंडीजची एखादी आंतरराष्ट्रीय टूर चालू असेल आणि पोलार्ड आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये टी-२० सामने खेळत आहे.
त्याच्या या निर्णयावर स्पष्टीकरण देताना पोलार्ड म्हणतो,
“माझ्या या निर्णयामुळे जगभरातील माध्यमातून माझ्यावर टीका झाली.अनेकांच्या निशाण्यावर मी सतत राहिलो आहे.
पण मी तो दिवस बघण्यासाठी आतुर आहे जेव्हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून जगातल्या विविध देशाच्या विविध संघांकडून खेळातील.
या अशा गोष्टींसाठी कोणी तरी सुरवात करायला हवीच ना.”
पोलार्ड आतापर्यंत जगभरातील ३० संघांकडून खेळला आहे. आणि विक्रमी ५०० टी-२० सामने खेळला आहे. ज्यात त्याने १०००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत तर २५० पेक्षा जास्त विकेट घेतले आहेत.
पोलार्ड कधी आंतरराष्ट्रीय कसोटी सामने नाही खेळला. २०१६ ते २०१९ या काळात तो विंडीज संघाबाहेर होता.
२०१९ ला सिलेक्शन पॅनल बदलल्या नंतर पोलार्ड परत संघात परतला शिवाय कर्णधार सुद्धा झाला.
एक दशक पेक्षा जास्त क्रिकेट खेळलेल्या पोलार्डच करियर भरपूर विवादित राहील आहे.
पण त्याला जे हवं होतं ते त्याने मिळवलं सुद्धा. तो आपल्या कुटुंबाला चांगलं जीवन द्यायच्या मागे होता.आपल्या आईला सुखी जीवन व्यतीत करायला मिळावं याच्या मागेच तो सतत राहिला.
लहानपणीच्या कटू आठवणींना आपली प्रेरणा समजून पोलार्ड सांगतो,
“माझ्या लहानपणी मी जे काही सहन केल ते माझ्या कुटुंबाला सहन कराव असं मला अजिबात नाही वाटत. म्हणून मी जेव्हा पण मैदानात उतरतो माझी हीच प्रेरणा मला चांगलं प्रदर्शन करायला उद्युक्त करते!”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.