भारताच्या स्वातंत्र्यासाठी ह्या “कॅप्टनने” दिलेली “ही” चिवट झुंज आजही अज्ञात आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपण स्वतंत्र भारतात जन्मल्याने स्वातंत्र्यलढा किंवा स्वातंत्र्याची आपल्याला फारशी जाणीव नसते. सध्या लॉकडाऊन च्या काळात मात्र आपल्या सर्वांनाच ‘स्वातंत्र्य’ या मूलभूत अधिकारचं महत्त्व कळून चुकलं असेल.
१९४७ पूर्वी ब्रिटीश राज्य असतांना आता असलेले नागरिकांचे मूलभूत अधिकार सुद्धा उपलब्ध नव्हते. पारतंत्र्यातुन मुक्तता मिळवण्यासाठी कित्येक ज्ञात-अज्ञात लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढा आपल्यापैकी बहुतेकांनी अभ्यासला असेल.
लोकमान्य टिळक, महात्मा गांधीं, सुभाष चंद्र बोस पासून ते चंद्रशेखर,भगतसिंग,सुखदेव असे कित्येक स्वातंत्रसेनानी नी लढ्यात मौल्यवान योगदान दिलं.
यामध्ये बऱ्याच अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा समावेश होतो. असे बरेच क्रांतिकारी किंवा सैनिक होते जे ब्रिटिशांविरुद्ध आपापल्या परीने लढत होते.
सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारलं होतं. त्यांच्या बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांसोबत चकमकी सुद्धा घडल्या.
याच आझाद हिंद सेनेतील एका शूर शिपाई मनसुखलाल यांच्या एका लढाईची गोष्ट आपण जाणून घेऊयात.
कॅप्टन मनसुखलाल आझाद हिंद सेनेच्या पराक्रमी योध्यांपैकी एक होते.
ब्रिटिशांविरुद्ध लढाईत गाजवलेल्या पराक्रमाबद्दल सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना वीरतेचा सर्वोच्च पुरस्कार ‘शेर-ए-हिंद’ आणि ‘सरदार-ए-जंग’ देऊन गौरव केला होता.
सेनेतील गांधी ब्रिगेड च नेतृत्व त्यांनी केलं. इंफाळ च्या लढाईत ब्रिटिशांच्या स्कॉटिश सैन्या विरुद्ध त्यांची बटालियन सहभागी होती.
ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या स्कॉटिश सैनिकांची संख्या २००० च्या जवळपास होती आणि आझाद हिंद सेने कडे ६०० सैनिकी बळ होतं!
गांधी ब्रिगेड ची दुसरी बटालियन या युद्धात सहभाग घेण्यासाठी पाठवण्यात आली. तेव्हा इंफाळ ला जोडणारे केवळ दोन रस्ते उपलब्ध होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र.३७, जो सिलीचर पासून इंफाळ ला जायचा आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.२ ,जो इंफाळ वरून कोहिमा ला जोडायचा.
आझाद हिंद सेने ने जपान च्या ३० आणि ३३ क्रमांकाच्या तुकडी सोबत मिळून इंफाळ- कोहिमा भागात दोन्ही महामार्ग आणि मोक्याच्या ठिकाणी मजबूत तटबंदी लावली होती.
या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी उंचावरच्या जागांवर ताबा असणं महत्वाचं होतं जेणेकरून उंचीवरून आजू बाजूच्या मार्गांवर पाहणी करता येईल.
या भागातील एक उंच प्रदेश ‘लाल टेकडी’ आपल्या ताब्यात घेण्याची आझाद हिंद सेनेची योजना होती.
जेव्हा कर्नल इनयात कियानी यांनी सैनिकांसमोर बोलताना ‘लाल टेकडी’ कामगिरी चे नेतृत्व कोण करणार ?अशी विचारणा केली तेव्हा कॅप्टन मनसुखलाल पुढे आले.
त्यांच्या नेतृत्वात ही लाल टेकडीची लढाई लढली गेली. तसं पाहिलं तर ही लढाई करणं हा एक आत्मघातकी प्रयोग होता कारण आझाद हिंद सेनेकडे मनुष्यबळ अत्यंत कमी होतं.
पण तरी सेनेचा जोश प्रचंड होता त्यांनी कर्नल इनयात कियानी आणि विभागीय कमांडर मेजर जन. मोहम्मद जमान कियानी यांना वचन दिलं की कुठल्याही परिस्थितीत आझाद हिंद सेना मागे हटणार नाही!
लढाई सुरू झाली आझाद हिंद फौज समोरच्या स्कॉटिश सैनिकांचा फडशा पाडत होती. स्कॉटिश सैनिकांकडे अत्याधुनिक हत्यारं होती, पुष्कळ मनुष्यबळ सुद्धा होतं.
लढाईदरम्यान मनसुखलाल यांना १३ गोळ्या लागल्या त्यांच्या जखमेतून पाण्या सारखं रक्त वाहू लागलं होतं. याही अवस्थेत ते युद्धभूमीत उभे होते आणि सैनिकांना प्रोत्साहन देत होते.
एवढ्या गोळ्या लागल्याने त्यांचे पाय लटपटत होते!
आपल्या नेत्याची ती अवस्था पाहून आझाद हिंद सेनेचे फौजि क्षणभर गोंधळले पण मनसुखलाल यांनी त्यांना आक्रमण करून, कुठल्याही परिस्थितीत टेकडी काबीज करण्याचे आदेश दिले.
त्या अवस्थेतल्या आपल्या कॅप्टन चा जोश पाहून,ध्येयाप्रति असलेली निष्ठा पाहून सैनिकांच्या अंगात सुद्धा वीरश्री संचारली! ते अधिक त्वेषाने दुश्मनांवर तुटून पडले.
महत्वाची गोष्ट म्हणजे सेने कडे तोफखाना नव्हता. त्यामुळे वर बसलेल्या दुश्मनाला बंदुकीने उत्तर देत आझाद हिंद सेना हळू हळू टेकडी वर चढत होती.
शेवटी त्यांचा जोश पाहून स्कॉटिश सैनिक टेकडी सोडून मागच्या बाजूने पळून गेले.
या लढाईची तुलना ‘टोलोलिंग हिल’, कारगिल युध्दादरम्यान चे ‘टायगर हिल’ किंवा १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळेस ‘हाजीपुर पास’ च्या युद्धा सोबत केली जाते!
कारगिल युद्धा वेळी सुसज्ज तोफखाना दिमतीला होता पण लाल टेकडी वेळी एकही तोफ आझाद हिंद सेनेकडे नव्हती! दुसऱ्या बाजूला दुश्मन लाईट मशीन गन घेऊन टेकडीवर बसला होता.
मनसुखलाल यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा ब्रिटिश कॅप्टन ब्राऊन ने टेकडीवरून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
परंतु आझाद हिंद सेनेतीळ गांधी ब्रिगेड च्या मेजर खजान सिंग यांनी त्याला जिवंत ताब्यात घेतलं. या युद्धाचा इतका धसका ब्रिटिशांनी घेतला की पुढे बराच काळ त्यांच्या या भागातील मोहिमांना खीळ बसली.
पुढे कॅप्टन मनसुखलाल उपचार घेऊन बरे झाले . १९८० मध्ये गाझियाबाद मधल्या एका कार्यक्रमात आझाद हिंद सेनेचे गुरुबक्ष सिंग ढिल्लो या लढाई बद्दल बोलतांना म्हणाले होते,
” कॅप्टन मनसुखलाल यांच्यापेक्षा जरी माझी पोस्ट ही वरची असली तरी,आझाद हिंद सेने मध्ये ते वीरश्री गाजवण्यात आम्हा सगळ्यांमधे श्रेष्ठ होते!
नेताजी सुभाषचंद्र नी त्यांना ‘शेर-ए-हिंद’ हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला होता. लाल टेकडी चे युद्ध हे आझाद हिंद सेनेने लढलेल्या अति रक्तरंजित युद्धांपैकी एक होतं”
दुसऱ्या जागतिक युद्धाला ७० वर्ष झाल्याच्या निमित्ताने २०१३ ला आंतरराष्ट्रीय संघटना Reuters ने एक लेख प्रकाशित केला होता.
त्यात ब्रिटिशांना जड गेलेल्या लढायांचा उल्लेख होता ज्यात इंफाळ- कोहिमा भागातील युद्धांचा सुद्धा उल्लेख आहे.
इंफाळ- कोहिमा युद्ध १९४४ च्या दरम्यान नागालँड मधे लढले गेले.त्या वेळी जपानी फौजा बर्मा वरून भारताकडे कूच करत होत्या. अर्थात आझाद हिंद सेनेचा त्यांना पाठिंबा होताच.
सीमेवरून भारतात येण्यासाठी फौजेला जंगल आणि टेकड्यांवर युद्ध करावं लागलं. बहुतांश युद्ध हे समोरासमोर लढलं गेलं.
बऱ्याच युद्ध अभ्यासकांच्या मते हे ब्रिटिश साम्राज्याचे शेवटचे मोठे युद्ध आणि नवीन भारताचं पहिलं!
भारतीय सैनिक ब्रिटिशांसोबत जिंकण्यासाठी किंवा राज्यासाठी लढत नव्हते तर त्यांना स्वतंत्र भारताच्या निर्मितीची आस लागली होती!
या युद्धाचे सेनानी कॅप्टन मनसुखलाल यांनी १९९० मध्ये आपली जीवनयात्रा संपवली.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.