Site icon InMarathi

कोरोना योद्ध्यांसाठी या लहानग्या मुलीने जे केलंय ते पाहून थेट व्हाईट हाऊसने दिलीये शाबासकी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना व्हायरसचा फटका कोणत्या देशाला जर सगळ्यात जास्त बसला असेल तर तो म्हणजे अमेरिका. आत्तापर्यंत तेथे एक लाख लोकांचे बळी कोरोनाने घेतले आहेत.

तिथल्या आरोग्य यंत्रणेला देखील या कोरोना व्हायरसने जेरीस आणले आहे. तिथे कोरोना वॉरियर्स युद्धपातळीवर काम करत आहेत.

डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ भरपूर काम करीत आहेत. तरीदेखील कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाहीये. रोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच मृत्यूदेखील वाढत आहेत.

 

aljazeera.com

 

अशा वेळेस फ्रन्टलाइन वर काम करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचं मनोबल कमी होत राहत. त्या सगळ्यांना मनोबल देण्याचं काम अनेक संस्था, व्यक्ती करत आहेत.

अमेरिकेतल्या त्या वॉरियर्सच्या कामांना सलाम करून त्यांना त्यांच्या कामाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी छोटीशी भेट देण्याचं काम एका भारतीय वंशाच्या दहा वर्षाच्या मुलीने केलेले आहे.

त्या मुलीचे नाव श्राव्या अन्नापरेड्डी. या कोरोना वॉरियर्ससाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फक्त आभार व्यक्त करण्याकरिता काहीतरी करावं या हेतूने श्राव्याने त्यांच्यासाठी बिस्किट, कुकीज आणि काही ग्रीटिंग कार्ड पाठवले.

इतक्या छोट्या मदतीची बातमी होईल आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्याचं कौतुक होईल याची तिला अजिबात कल्पना नव्हती.

कोरोना वॉरियर्सचे आभार व्यक्त करण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला आहे आणि कोरोना वॉरियर्सच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवलं आहे; त्या लोकांचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या लोकांना व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केले होते.

आपली छोट्या श्राव्या देखील त्या निमंत्रितांपैकी एक होती.

 

greatandhra.com

 

श्राव्याचा जन्म अमेरिकेत झाला आहे. लैला खान आणि लोरेने या दोघी बरोबर तिने हा उपक्रम केला.

मेरीलँड मध्ये राहणाऱ्या या तिघींनी तिथल्या स्थानिक अग्निशामन दलाचे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी या सगळ्यांसाठी १०० बॉक्सेस कुकीज आणि बिस्किट्स केले.

त्याचप्रमाणे देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ग्रीटिंग कार्ड पाठवले. विशेष म्हणजे या तिघींनी या सगळ्या गोष्टी घरीच बनवल्या आहेत.

व्हाइट हाउस कडून, स्काऊट गर्ल्स म्हणून या तिघींचा सन्मान करण्यात आला.

याबाबत बोलताना श्राव्या म्हणते की, ‘प्रत्येक जणच छोटीशी मदत करू शकतो हे आमच्या टीमने दाखवून दिले आहे. अमेरिकेतल्या शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलांचे प्रतिनिधित्व आम्ही केलं आहे.’

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुलींचं कौतुक करताना म्हटलं की, “कोरोना व्हायरस बरोबर लढणाऱ्या या सर्व कोरोना वॉरियर्सच मी कौतुक करतो. त्यांचे धैर्य पाहून खरोखरच अचंबा वाटतो.

 

amarujala.com

 

अमेरिकन लोकांकडे असणारी शौर्य, चिकाटी, वचनबद्धता आणि प्रेम याचं कौतुक तर आहेच. पण त्यांना साथ देणाऱ्या, त्यांच्या कामाची जाण ठेवणाऱ्या अशा मुलांचे देखील कौतुक करायला हवं.

या अशा कठीण काळात सगळ्यांच्या साथीने जर मार्गक्रमण केलं तर या कोरोनाच्या संकटावर मात करून आपण पण पुढे जाऊ शकतो हा विश्वास आहे.” या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प देखील हजर होत्या.

श्राव्याचे आई-वडील हे मूळतः आंध्र प्रदेशातील आहेत. विजयरेड्डी अन्नप्पारेड्डी हे गुंटूर येथील असून सध्या अमेरिकेत ते फार्मसिस्ट आहेत, तर आई सीता कलम, विशाखापट्टणमची असून तिने तेथील कॉलेज मधून मेडिकल डिग्री घेतली आहे.

या दोघांनीही आपल्या मुलांवरती भारतीय संस्कार केले आहेत. भारताचं ‘वसुधैव कुटुम्बकम’चं तत्व त्यांनी मुलांना शिकवलं आहे.

 

marathinews.com

 

श्राव्या जेव्हा जन्माला आली तेव्हा तिच्या नावे पालकांनी आंध्र प्रदेशातील रामनयन पालम येथील पाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पासाठी २५ लाख रुपये देणगी म्हणून दिले होते.

श्राव्याकडे आलेली ही समाजसेवेची दृष्टी तिला मिळालेल्या संस्कारा मधूनच आली असावी. श्राव्या आणि तिचा भाऊ आविव अन्नपरेड्डी हे दोघेही, अशा अनेक समाजकार्यात स्वयंसेवक म्हणून काम करतात. श्राव्या मनापासून अशा कामात भाग घेते.

श्राव्याचा हा जो सन्मान व्हाईट हाऊस कडून झाला आहे त्यामुळे ते कुटुंब देखील भारावून गेलं आहे.

याविषयी बोलताना तिचे वडील विजय रेड्डी म्हणतात की, श्राव्याने इतक्या लहान वयात केलेल्या एका छोट्या कामाचं इतकं कौतुक झालं आहे की आता तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येत आहे.

एक मात्र नक्की की आता अशाप्रकारची काम करण्यासाठी तिला प्रोत्साहन मिळाले असून पुढेदेखील समाजासाठी ती नक्कीच काहीतरी करेल. या कौतुक सोहळ्याचा तिच्या जीवनावर नक्कीच चांगला परिणाम होईल.

भारताने अमेरिकेला औषध पुरवठा करून तशी मदत केलीच आहे. परंतु श्राव्या सारख्या छोट्या मुलीने देखील तिथे आपली मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.

म्हणतात ना कठीण प्रसंगात एखादं काम करताना आपला खारीचा वाटा उचलणंही खूप महत्त्वाचं असतं. रामायणात समुद्रात सेतू बांधण्यासाठी एका खारीने रामाला मदत केली. तसाच प्रयत्न आता छोट्या श्राव्याने केला आहे जो कौतुकास्पद आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version