देवांचा देव भगवान शंकराच्या ‘तिसऱ्या डोळ्याविषयी’ या काही आख्यायिका जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“देवों के देव महादेव”, असं ज्यांना म्हटलं जातं ते भगवान शंकर! शंकर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर जी मूर्ती येते ती म्हणजे एका ध्यानस्थ योग्याची.
एकदम शांत चेहरा, मिटलेले डोळे, डोक्यावर जटा, जटांमध्ये अवतरलेली गंगा, गळ्याभोवती नागाचं वेटोळं, केसांमध्ये चंद्राची अर्धकोर, रुद्राक्षाच्या माळा,
वाघाच्या कातडीची वस्त्रं, शरीरावर लावलेलं स्मशानातील भस्म आणि कपाळाच्या मध्यभागी बंद असलेला तिसरा डोळा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शंकराचा हा तिसरा डोळाच माणसाच्या औत्सुक्याचा विषय आहे. कारण आपल्याला माहीत आहे की सर्व प्राणिमात्रांना दोन डोळे आहेत.
अगदी देवांच्या गोष्टी काढल्या तरीही देवांनाही दोनच डोळे असतात. परंतु शंकर हा एकमात्र देव आहे की ज्याला तिसरा डोळा आहे.
शंकराला जेव्हा राग येतो तेव्हा शंकर तिसरा डोळा उघडतो आणि त्यानंतर घडतो तो विनाश असं शिवपुराणात सांगितले आहे.
शंकर त्या तिसऱ्या डोळ्याने, जे दोन डोळ्यांना दिसत नाही त्याच्या पलीकडचं पाहू शकतो. आणि त्यामुळेच शंकर चांगल्या गोष्टीचं रक्षण करतो आणि वाईट गोष्टींचा नाश करतो असं समजलं जातं.
शंकर तिसरा डोळा क्वचितच उघडतो. तो उघडल्यानंतर विनाश हा ठरलेला आहे. यामागे एक मोठी कथा आहे.
शंकराचे लग्न सती बरोबर झालं. सतीने स्वतःच्या वडिलांच्या विरोधात जाऊन शंकराबरोबर लग्न केले. दक्ष प्रजापती हे सतीचे वडील. त्यांना सतीने, शंकरासारख्या एका कफल्लक देवाशी लग्न करणे मान्य नव्हतं.
तरीदेखील सतीने शंकराशी लग्न केलं. एकदा दक्ष प्रजापतीने एक यज्ञ ठेवला होता.
त्यात त्याच्या सगळ्या मुलींना आणि जावयांना दक्षाने आमंत्रण दिले होते. (प्रजापती दक्षाना ८४ मुली) फक्त सतीला आणि शंकराला मात्र आमंत्रण नव्हते.
सतीला ही गोष्ट समजली, तिने विचार केला वडिलांच्या घरी जायला आमंत्रण कशाला हवं! म्हणून ती स्वतः त्या यज्ञाच्या ठिकाणी गेली. तिकडे तिच्या बहिणींचा आणि त्यांच्या नवर्यांचा यथोचित सन्मान केला जात होता.
सती तिथे गेल्यावर तिला मात्र वेगळी वागणूक मिळत होती. शंकराचा विषय निघाल्यावर दक्ष प्रजापतीने शंकराचे राहणं आणि दिसणं यावरती चेष्टा करायला सुरुवात केली.
शंकराचा अपमान होईल असं बोललं जाऊ लागलं, सतीला मात्र हे सहन झालं नाही. आपल्या नवऱ्याचा सगळ्यांसमोर होणारा अपमान सहन न होऊन तिने तिथे असलेल्या यज्ञात उडी घेतली.
शंकराला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा शंकर तिकडे धावत गेले तोपर्यंत तिचा प्राण गेला होता. शंकरांना भयंकर राग आला. तेथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांवरती शंकरांचा राग व्यक्त होत होता.
शेवटी दक्षाचं शीर कलम करून शंकर थांबले. पण त्यांचं दुःख कमी झालं नाही. शंकरांनी सतीचं प्रेत उचललं, आणि ते घेऊन शंकर विलाप करत फिरू लागले.
हा विलाप इतका होता की देवांनाही समजेना की शंकरांना कसे शांत करावे.
सगळं भूमंडळ त्यामुळे हादरू लागलं. शेवटी विष्णूनी सतीच्या जळालेल्या देहाचे अवशेष पृथ्वीवर ठीकठिकाणी टाकले. तिचा देह दिसेनासा झाला तसे भगवान शंकर थोडे भानावर आले.
पण अत्यंत निराश,दुःखी होऊन ते हिमालयात एका गुहेत ध्यानस्थ होऊन बसले. आणि आत्तापर्यंत आलेला राग, संताप याचं परिमार्जन करायला त्यांनी सुरुवात केली.
शंकर आणि सती हे कधीही वेगळे होऊ शकत नव्हते. कारण सती म्हणजेच शक्ती, शंकराचा अंश. म्हणून ते असे खूप दिवस एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते.
शेवटी सतीचा पुनर्जन्म झाला तो पार्वती म्हणून, हिमालयाची कन्या म्हणून. ती जशी उपवर होऊ लागली, तशी ती शंकरांकडे आकृष्ट होऊ लागली.
शंकरांना मनवण्याचा हर एक प्रयत्न पार्वतीने केला परंतु शंकर काही बधले नाहीत.
पण शंकर आणि पार्वती यांनी एकत्र येणं गरजेचं होतं. त्यावरच सृष्टीचं भवितव्य अवलंबून होतं. सगळे देव यासाठी प्रयत्न करत होते, परंतु शंकर कुठल्याही मोहाला बळी पडत नव्हते.
ते आपल्याच ध्यानात मग्न होते. ते वैरागी बनले होते, कुठलीही मोहमाया त्यांना अडकवू शकत नव्हती. शेवटी देवांनी प्रेमाची देवता असणाऱ्या कामदेवांना शंकरांच्या मनात प्रेमभावना उत्पन्न करायला सांगितलं.
देवांच्या सांगण्यावरून कामदेव आपला मदनबाण घेऊन त्या गुहेत आले. पार्वती देखील त्यावेळेस तिथे उपस्थित होती.
देवांचा मनसुबा असा होता की, कामदेवाने मदनबाण सोडल्यानंतर भगवान शंकर डोळे उघडतील आणि त्यांची नजर पार्वतीवर पडेल,आणि त्यांच्या मनात प्रेमभावना जागृत होईल.
मग त्या दोघांचे लग्न लावून देता येईल.
ठरल्याप्रमाणे कामदेव आले आणि एका दगडाच्या मागे लपून त्यांनी शंकरांवर मदनबाण सोडायला सुरुवात केली. तो बाण जाऊन भगवान शंकर यांच्या छातीवर लागला.
ज्यामुळे शंकरांच्या साधनेत व्यत्यय आला म्हणून शंकरांनी रागाने आपला तिसरा डोळाच उघडला. त्यांची नजर कामदेवावर पडली.
त्या डोळ्यातून आगीचा लोळ बाहेर आला आणि कामदेवाचे अक्षरशः भस्म झाले.
यामुळे अजून एक नवीनच समस्या उत्पन्न झाली. म्हणजे शंकर – पार्वतीच लग्न तर दूरच, आता पृथ्वीवरील जीवसृष्टीचेही काय होईल? याची भ्रांत देवांना पडली.
कारण कामदेव असल्यामुळे प्राणिमात्रांच्या मनात प्रेमभावना उत्पन्न होऊन दोन जीवांचे मीलन व्हायचं आणि त्यातूनच नवीन जीव जन्माला यायचा, आणि सृष्टीचक्र चालू राहायचं.
पण आता कामदेव नसल्यामुळे सृष्टिचक्र बंद पडायची वेळ आली. म्हणूनच शंकरांना विनाशकारी म्हटलं जातं. हिंदू धर्मानुसार ब्रम्हा हा निर्माता आहे तर विष्णू पालनकर्ता आणि शंकर म्हणजे विनाश करणारा.
शेवटी सगळे देव परत पार्वतीकडे आले कारण कितीही झालं तरी पार्वती ही शक्ती होती. केवळ तीच शंकरांना समजावू शकत होती. शेवटी पार्वतीने घोर तपश्चर्या आरंभली.
अन्नपाणी वर्ज्य करून तिने तिच्यातल्या शंकरांना मनापासून हाक मारायला सुरुवात केली.
शेवटी शंकरांना तिच्याकडे यावे लागले आणि पार्वतीला जे हवे आहे ते देणे त्यांना भाग पडले. सर्व देवांच्या उपस्थितीत शंकर पार्वतीचा विवाह संपन्न झाला.
पुन्हा सृजनला सुरुवात झाली, पुन्हा सृष्टीचा समतोल राखला गेला.
या तिसऱ्या डोळ्याची आणखीन एक कथा सांगितली जाते. भगवान शंकर तसे फकिरी वृत्तीचे. पण लग्न झाल्यानंतर काही कर्तव्य केली पाहिजेत याची जाणीवही त्यांना नव्हती.
म्हणून पार्वतीने त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे दोन्ही डोळे झाकले.
असं समजलं जातं की शंकरांचे दोन डोळे म्हणजे सूर्य आणि चंद्र. आता पार्वतीने डोळे झाकले आणि संपूर्ण पृथ्वीवर अंधकार झाला.
याची जाणीव शंकरांना झाली आणि त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि सूर्याला प्रकाशमान केलं परंतु पार्वतीच्या हातांना त्या उष्णतेची झळ बसायला लागली.
शंकराची उष्णता आणि पार्वतीचा थंडावा यातून एक बाळ जन्माला त्याचं नाव अंधक. या अंधकाला एका राक्षसाने दत्तक घेतलं, जो शंकराचा भक्त होता आणि त्याला एकही मुल नव्हतं.
पुढे हा अंधक जसजसा मोठा व्हायला लागला तसा तसा तो शक्तिमान व्हायला लागला.
त्याला असं वरदान मिळालं होतं की जर त्याच्या मनात आईविषयी प्रेमभावना उत्पन्न झाली तर त्याचा त्याच्या वडिलांकडून मृत्यू होईल. त्याला नक्की तो कुणाचा मुलगा आहे हे माहीत नव्हतं.
अंधक अधिकाधिक शक्तीशाली होत गेला तसा तसा तो क्रूर होत गेला. आकाश, पाताळ, पृथ्वी या तीनही लोकांवर त्याचं राज्य आलं.
हे करताना त्याने एकदा पार्वतीला पाहिलं तिचं सौंदर्य पाहून तो भाळला. तिच्याशीच लग्न करायचं आणि तिला राणी बनवायचं,असं त्याने ठरवलं.
तो पार्वतीचा पाठलाग करू लागला. पार्वतीने शंकराला बोलवलं. भगवान शंकरांना राग आला आणि त्याने त्रिशूळाने अंधकासुराला मारले.
त्याचं रक्त जेव्हा त्रिशुळाला लागलं तेव्हा अंधकासुराला कळालं की तो कोणाचा मुलगा आहे. मग त्याने शंकर आणि पार्वती दोघांचीही माफी मागितली.
या गोष्टीवरून हे कळतं की स्वतःच्या लालचेपाई माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो. त्याला चांगलं वाईट, खरं-खोटं, चूक बरोबर यातला काहीच फरक कळत नाही.
आणि मग तो अंधकासारखा वागतो. तो अगदी आई आणि बायको यातला ही फरक करू शकत नाही. ही वृत्ती संपवण्यासाठीच शंकर येतात.
शंकरांच्या डोक्यावर असलेल्या चंद्रकोरी बद्दल ही एक कथा आहे. चंद्र हा प्रजापती दक्षाचा जावई. प्रजापती दक्षाच्या २७ मुली या चंद्राच्या बायका. या २७ मुली म्हणजेच २७ नक्षत्र.
परंतु चंद्राला मात्र एकटी रोहिणीच आवडायची. तो कायम आपला सगळा वेळ रोहिणी सोबत घालवायचा.
त्यामुळे बाकीच्या २६ जणींनी प्रजापती दक्षाकडे तक्रार केली की, चंद्र आमच्याकडे लक्ष देत नाही.
दक्षाने चंद्राला सांगून पाहिलं की तुझं कर्तव्य आहे की तू सगळ्या बायकांकडे व्यवस्थित वेळ दिला पाहिजे. तरीदेखील चंद्राने ऐकलं नाही तो जास्त वेळ रोहिणी सोबतच असायचा.
त्यामुळे दक्षाने त्याला शाप दिला की तुला तुझ्या तेजावर, प्रकाशावर, सौंदर्यावर जेवढा गर्व आहे ते तुझं प्रकाश, सौंदर्य, तेज कमी होईल.
त्यानंतर चंद्राचा प्रकाश कमी व्हायला लागला. तो दुर्बल अशक्त व्हायला लागला आणि त्याने शंकराची प्रार्थना केली आणि शंकराला सर्व घटना सांगितली.
शंकर म्हणाले की मी तुला पूर्वीचे रूप नाही देऊ शकणार परंतु थोडीफार मदत करू शकेन. पण तू इतर बायकांनाही वेळ द्यायला हवा.
तुझा प्रकाश कमी होत पूर्ण जाईल त्यादिवशी माझ्या डोक्यावर बस. त्याप्रमाणे चंद्राचा पूर्ण प्रकाश ज्यादिवशी गेला त्या दिवशी चंद्र शंकरांच्या डोक्यावर जाऊन बसला.
मग शंकरांनी त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातली ऊर्जा चंद्राला देऊ केली आणि मग चंद्र परत हळूहळू प्रकाशमान झाला.
अमावस्येच्या दिवशी चंद्र शंकरांच्या डोक्यावर बसतो आणि तिथून ऊर्जा घेतो,असं म्हटलं जातं. त्याचं तेज वाढत असताना तो रोहिणी कडे असतो आणि कमी होताना इतर बायकांकडे जातो.
ही गोष्ट हेच दर्शवते की लहरीपणाने, मिजासखोरपणे इतरांचा विचार न करता वागू नये.
आधुनिक विज्ञानानुसार आता आपल्याला माहीत आहे की चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही. पौर्णिमेच्या दिवशी तो पूर्ण तेजस्वी, चमकदार असतो तर अमावस्येला तो दिसत नाही.
इतर दिवशी त्याच्या कला आपल्याला दिसतात. म्हणजे पुराणातली एक कथा प्रत्यक्ष घडताना आपण पाहतो.
शंकरांच्या तिसरा डोळ्याचा एक आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो तो म्हणजे आपणच आपल्यावर विजय मिळवणे. संयम ठेवणे.
कामदेवाने त्यांना बाण मारला म्हणजेच शंकरांच्या मनातच ती प्रेमभावना जागृत झाली. पण त्यांना ध्यानात लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे त्यांनी ती भावना मारून टाकली.
म्हणजेच ध्येय गाठताना इतर कोणत्याही अडचणी आल्या, मोहाचे प्रसंग आले तरी त्यांचा त्याग केला पाहिजे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.