राजकारणाचा क्रॅश कोर्स आणि बाराखडी… सगळं काही आहे या १२ चित्रपटांमध्ये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
राजकारण. भारतीय लोकांचा आवडता विषय. असं म्हणतात की भारतात या तीन गोष्टींना कधीच अंत नाहीये: पहिलं म्हणजे राजकारण, दुसरं म्हणजे क्रिकेट आणि तिसरं म्हणजे बॉलीवूड.
२०१४ पासून जर का आपण ट्रेंड पाहिला तर एक लक्षात येईल की सोशल मीडिया वर सर्वात जास्त चवीने चर्चा केला जाणारा कोणता विषय असेल तर राजकारण.
सोशल मीडियाचा जन्मच राजकारणासाठी झाला आहे असं सुद्धा बोललं जातं निवडणुकीच्या दिवसात. कमालीची गोष्ट आहे की हे तिन्ही क्षेत्र एकमेकांना कनेक्ट होत असतात.
असं अजिबात नाहीये की, राजकारणावर सिनेमा तयार करायचा हा ट्रेंड अगदी नवीन आहे. कारण की, भारतात भ्रष्टाचार, राजकीय उलथापथ ही इतकी सातत्याने घडणारी गोष्ट आहे.
एक ठराविक प्रेक्षक वर्ग या विषयाला नक्की मिळू शकतो हे निर्मात्यांना अगदी बरोबर माहिती आहे.
आम्ही तुम्हाला आज १२ अशा सिनेमांची माहिती देणार आहोत, जे की तुम्ही जर का या दोन्ही क्षेत्रांचे फॅन असाल तर नक्की बघितले असतील किंवा काही कारणास्तव बघणं झालं नसेल तर हे सिनेमे आवर्जून पहा. तुम्हाला नक्की आवडतील :
१. न्यूटन (2017):
छत्तीसगढ राज्यातील एका गावाची कथा आहे ही. राजकुमार राव हा एक प्रामाणिक निवडणूक अधिकारी असतो. त्याला एका अशा जागी इलेक्शन ड्युटी म्हणून पाठवलं जातं जो की अगदीच आदिवासी दुर्गम भाग आहे.
तिथे कधीच निवडणूक शांततेत संपन्न झालेली नाहीये. त्या दुर्गम भागात माओवादी लोकांच्या असलेल्या दहशतीमुळे लोकं सुद्धा मतदान करण्यासाठी अजिबात पुढे सरसावत नाहीत.
तरी सुद्धा राजकुमार राव ही जवाबदारी घेतो. मतदारांचं प्रबोधन करतो आणि निवडणूक शांततेत घडवून आणतो. त्यासाठी अगदी जीवाची पर्वा न करता तो काम करतो.
सिनेमा मध्ये एक छान डायलॉग आहे : “जब तक कुछ नही बदलोगे ना दोस्त… कुछ नही बदलेगा”.
अमित व्ही. मासुरकर यांची ही कलाकृती प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडते. भारताकडून हा ऑस्कर साठी पाठवलेला सिनेमा होता.
२. शांघाई (2012):
दीबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकाने हा सिनेमा एका हॉलीवूड सिनेमा ची संकल्पना भारतीय सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला होता. या आधी दीबाकर बॅनर्जी ने खोसला का घोसला, ओये लकी ओये, लव सेक्स और लोचा, धोका हे सिनेमे तयार केले होते.
शांघाई मध्ये अभय देओल, इमरान हाश्मी, प्रसेनजीत चटर्जी, फारूक शेख आणि कल्की कोचर सारखी भली मोठी स्टारकास्ट होती. राजकारणात वापरली जाणारी कुटनीती, गुंतागुंत अगदी योग्य पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
दोन गटात हा सिनेमा घडताना आपण बघत असतो. पहिला म्हणजे स्वघोषित नेत्यांचा गट जे , एक राज्य चालवण्यासाठी कायम चढाओढ करत असतात. दुसरा गट म्हणजे त्या लोकांचा जे ह्यांना विरोध करत असतात.
एखाद्या राज्यातील निवडणूकपूर्व आणि निवडणुकी नंतर ची परिस्थती हा सिनेमा अगदी योग्य पध्दतीने पडद्यावर दाखवण्यास यशस्वी होतो.
३. राजनीती (2010):
सध्या परत एकदा गाजत असलेल्या महाभारतावर हा सिनेमा बेतलेला होता. त्यासाठी दिगदर्शक प्रकाश झा यांनी स्टारकास्ट सुद्धा तशीच तगडी घेतली होती.
ज्यामध्ये त्यांचा आवडता स्टार अजय देवगण, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, नाना पाटेकर, मनोज वाजपेयी आणि कतरिना कैफ सारखे मोठे नावं होते.
सत्तेसाठी महाभारतात दिसलेला संघर्ष या सिनेमामध्ये हुबेहूब उभे करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहे. नावाप्रमाणेच राजनीती हा राजकीय डावपेच कसे खेळले जातात हे शिकायची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी एक आकर्षक उजळणी आहे.
४. गुलाल (2009) :
अनुराग कश्यप यांनी तयार केलेला एक मास्टरपीस म्हणून हा सिनेमा ओळ्खला जातो. गुलालच कथानक हे राजस्थान मधील राजपूत लोकांच्या राजकीय सत्तेसाठी सतत होणाऱ्या संघर्षावर प्रकाश टाकणारं आहे.
बॉक्स ऑफिस वर जरी हा सिनेमा फार यशस्वी झाला नाही तरीही सिनेमाचं किचकट कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांनी केलेलं काम यामुळे हा सिनेमा कायम प्रेक्षाकांच्या स्मरणात राहील.
५. फिराक (2008):
नंदिता दास या गुणी अभिनेत्रीचा हा दिगदर्शनातील पहिलाच प्रयत्न होता. या सिनेमाचा विषय हा 2002 मध्ये गुजरात मध्ये घडलेल्या जातीय दंगली भोवती फिरणारा आहे.
या दंगली नंतर समाजात जी जातीय तेढ निर्माण झाली होती त्याबद्दल अगदीच स्पष्टपणे हा सिनेमा भाष्य करतो. हे सादरीकरण प्रभावी केलंय ते नसिरुद्दीन शाह, परेश रावल आणि दीप्ती नवल यांच्या दमदार अभिनयाने.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एका जातीय दंगली मुळे कसा फरक पडतो आणि त्या व्यक्तीला त्या काळात किती संयमाने वागावं लागतं हे सांगणारा हा एक उत्कृष्ट सिनेमा आहे.
६. सरकार (2005):
राम गोपाल वर्मा यांचा हा चित्रपट. त्यांनी हा 2005 मध्ये सर्वात जास्त कमाई केलेला राजकीय पट लोकांसमोर ठेवला होता. ह्या सिनेमातील ‘गोविंदा, गोविंदा, गोविंदा…’ ही थीम तर सिनेरसिकांच्या मनात आज सुद्धा तितकीच ताजी आहे.
गॉडफादर या इंग्रजी सिनेमा पासून संकल्पना घेऊन ‘सरकार’ ची कथा मांडण्यात आली होती.
प्रमुख कलाकार अमिताभ यांचं पात्र हे थोड्या फार प्रमाणात बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखं दाखवून दिगदर्शकाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेऊन ठेवली होती.
अभिषेक बच्चन ने त्याला सतत वाटणारी असुरक्षितता पडद्यावर खूप योग्य रीतीने दाखवली आहे तर के के मेनन ने त्यांच्यातील भावनिक कलाकाराचं सार्थ रूप दाखवलं होतं.
राजकारण हे कसं कपटी पद्धतीने केलं जातं आणि वरकरणी दिसणारी लोकशाही ही एखाद्या पक्षात कशी एकाधिकार शाही असते यांचं हा सिनेमा उत्कृष्ट उदाहरण आहे.
७. हजारो ख्वाईशे ऐसी (2005):
सुधीर मिश्रा यांचा हा सिनेमा तीन तरुणांची कथा आहे. ज्यांचं आयुष्य नक्षलवाद आणि आणीबाणी यामध्ये कसं भरडलं जातं हे आपण थक्क होऊन पडद्यावर बघत राहतो.
आजूबाजूच्या परिस्थिती मुळे के के मेनन आणि त्यांचे दोन मित्र हे कसे बदलत जातात आणि आपली राजकीय व्यवस्था त्यांना त्यांच्या ध्येयधोरणांना बदलायला कशी भाग पाडते याचं खूप परखड चित्रण या सिनेमा मध्ये आपल्याला पहायला मिळतं.
या सिनेमात स्वानंद किरकिरे यांनी गायलेली गाणी सुद्धा लोकांना फार आवडली होती.
८. हासिल (2003):
आपण नुकतंच ज्यांना गमावलं त्या इरफान खान यांचा हा एक माईलस्टोन सिनेमा म्हणायला काही हरकत नाहीये. त्याच्या सोबत ह्या सिनेमा मध्ये आशुतोष राणा आणि जिमी शेरगिल यांनी सुद्धा त्यांच्या करिअर चा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स या सिनेमा मध्ये दिला आहे.
तिगमांशू धुलिया या दिग्दर्शकाने या तीन तरुणांची राजकारणात करिअर करण्याची उदात्त इच्छाशक्ती आणि त्यासाठी त्यांना मोजावी लागलेली किंमत याचं अगदी समर्पक चित्रण या सिनेमातून प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे.
९. हू तू तू (1999):
गुलजार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा सिनेमा हा आजचा तरुण राजकारणाविषयी काय विचार करतो या विषयावर भाष्य करतो. प्रत्येक मुलांना असं वाटत नाही की त्यांचे पालक जे राजकारणात आहेत ते कायम राजकारणातच रहावेत.
त्यांना सुद्धा असं वाटतं की, आपल्या पालकानी सुद्धा इतर पालकांप्रमाणे सामान्य आयुष्य जगावं असं वाटत असतं. कबड्डी चा खेळ आणि राजकारण याच्यात असलेलं एक साम्य दिगदर्शकाने खूप छान पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणलं आहे.
सुनील शेट्टी आणि तब्बू प्रमुख भूमिकेत असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर जास्त चालला नाही; पण, जे प्रेक्षक एका चांगल्या मेसेज असलेल्या सिनेमाचे चाहते आहेत त्यांनी हा सिनेमा आवर्जून बघावाच असा आहे.
१०. मै आझाद हूं (1989):
टीनू आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा फ्रँक कॅपरा यांच्या मीट जॉन डॉ या हॉलीवूड पटाचा रिमेक आहे.
अमिताभ बच्चन यांनी या सिनेमा मध्ये एका काल्पनिक क्रांतिकारी तरुणाची भूमिका केली आहे जो की भ्रष्ट व्यवस्था आणि राजकारणी यांच्या बद्दल सत्य भाष्य करायला कायम अग्रेसर असतो.
काही घटना अशा घडतात की त्यानंतर अमिताभ यांच्या लक्षात येतं की त्यांचा वापर हा फक्त एक राजकीय मोहरा म्हणून केला जात आहे.
या रोल मधून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक जबर किंमत मोजावी लागते ज्या नंतर ते फक्त लोकोपयोगी गोष्टीच करायचं ठवतात आणि खऱ्या अर्थाने लोकांना भ्रष्ट लोकांपासून आझाद (स्वातंत्र्य) करतात.
११. न्यू दिल्ली टाईम्स (1986):
राकेश शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा हा न्यू दिल्ली टाईम्स नावाच्या एका वृत्तपत्र संपादकाच्या व्यथेबद्दल भाष्य करतो. शशी कपूर यांनी या संपादकाची भूमिका खूप सार्थ निभावली आहे.
आदर्शवाद आणि कोणतीही राजकीय बातमी देतांना कोणत्याही संपादकांच्या मनाची होणारी अवस्था दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
यासोबतच शशी कपूर यांनी मीडिया जगातील स्पर्धा, आपला पेपर कायम चर्चेत राहण्यासाठी मनाला न पटणाऱ्या पण तरीही कराव्या लागणाऱ्या गोष्टी या खूप परिणामकारक पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.
या सिनेमातील कामासाठी शशी कपूर यांना त्या वर्षीचं बेस्ट हिरो चा नॅशनल अवॉर्ड देण्यात आला होता.
१२. किस्सा कुर्सी का (1975):
नावाला साजेसा हा चित्रपटावर आणीबाणी च्या काळात बंदी घालण्यात होती. अमृत नहाटा यांचा हा सिनेमा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचा मुलगा संजय गांधी यांच्या काही जनतेला गृहीत धरून केलेल्या कृत्याबद्दल भाष्य करतो.
भारतीय राजकारण आणि निवडणूक पद्धती या विषयावर हा सिनेमा म्हणजे सर्वात चांगलं विडंबन म्हणता येईल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सापडल्यास अवश्य बघावा असा हा सिनेमा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.