पुरुषी अत्याचार पीडित महिला हे “असं” काही करतील असा विचार एका पुरुषाने स्वप्नातही केला नसेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
स्त्री म्हणजे एक उपभोगाची वस्तू ही समजूत संपूर्ण पृथ्वीवर प्रत्येक देशात आहे. अगदी आपण आपल्याही देशात पाहतो की स्त्रीला समाजामध्ये काय स्थान असतं!
लोकांची गंमत असते की, एकतर स्त्रीला देवत्व बहाल करायचं नाहीतर दास्यत्व द्यायचं. स्त्रीला माणूस म्हणून वागणूक मिळत नाही.
यातूनच स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार वाढत जातात. या घटना जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात घडतात. त्याला केनिया तरी कसा अपवाद असेल!
केनिया, आफ्रिका खंडातील छोटासा देश. वाइल्ड लाइफ सफारीबद्दल प्रसिद्ध असणारा हा देश, केवळ यावरच या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
केनिया, वाइल्ड लाइफ सफारी बद्दल प्रसिद्ध असला तरी अत्यंत मागासलेला देश. इथे असणारे आदिवासी, त्यांच्या स्त्रियांबाबत अनेक कल्पना विचित्रच.
आपण शाळेत असताना ‘मसाई लोक’ हा शब्द भूगोलाच्या पुस्तकात वाचला असेल, तेच हे आदिवासी. त्यांची भाषा स्वाहिली.
उत्तर केनियातील,’उमोजा’ या गावाची ही गोष्ट. फक्त बायकांसाठी असलेलं हे गाव. सांबुरु या गवताळ प्रदेशातील ऊमोजा हे एक वेगळेच गाव आहे.
उमोजा म्हणजे स्वहिलीमध्ये ‘एकी'( UNITY ). ही कुणाची एकी ? तर हे गाव ज्या १५ स्त्रियांनी, स्त्रियांसाठी वसवलं आहे, त्या स्त्रियांची एकी.
हे वेगळं गाव तयार व्हायला कारणही तसंच घडलं. हे गाव तयार झालं ते १९९० मध्ये. तिथल्या १५ स्त्रियांनी हे गाव तयार केलं. या स्त्रिया कोण होत्या, तर ज्या ब्रिटिश सैनिकांकडून होणाऱ्या बलात्कारापासून, लैंगिक छळापासून वाचल्या होत्या.
परंतु त्यांनी पुरुषांनी केलेले अत्याचार पाहिले होते. त्यासाठीच त्यांना पुरुषांपासून दूर राहायचे होते.
सध्या या गावात अशा अनेक महिलांना आश्रय मिळतो ज्यांच्यावर बलात्कार झाला आहे, ज्यांच्यासोबत घरगुती हिंसाचार झाला आहे, ज्या मुलींचा बालविवाह झाला आहे.अशा स्त्रियांचे आयुष्य म्हणजे एक नरकच आहे. त्या स्त्रियांना या गावामध्ये राहता येतं.
असं गाव निर्माण केलं ते ‘रिबेका लोलोसोली’ या एका महिलेने. फक्त स्त्रियांसाठी गाव निर्माण करणं तशी गोष्ट सोपी नव्हती. कारण तिकडे पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे स्त्रीला तसेच दुय्यमच स्थान.
जेव्हा रीबेकाने असं गाव तयार करायचा प्रयत्न केला, तेव्हा तिला अनेक धमक्या मिळाल्या. तिच्यावर हल्ला झाला पण तरीही ती डगमगली नाही. कोण विरोध करायला येईल अशा पुरुषाशी चार हात करायला देखील ती तयार असायची.
पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे तिथल्या स्त्रियांना घरातली पुरुष मंडळी जे काही ठरवतील किंवा कसे वागवतील ते सहन करायला लागायचं.
पितृसत्ताक पद्धतीमुळे तिथे बहुपत्नीत्व देखील आहे. आणि एकाही पत्नीला कोणतंही सुख मिळत नाही. महिलांवर होणारे बलात्कार देखील आहेतच.
बाल जरठ विवाह ही आणखीन एक दुसरी समस्या. लहान वयाच्या मुलींची म्हाताऱ्या माणसांशी लग्न लावून दिली जातात. आणि मग अशा मुली प्रेग्नेंट झाल्या, काही शारीरिक समस्या निर्माण झाल्या तरीदेखील त्यांना तिकडे औषधोपचार मिळत नाही.
काही गायींच्या बदल्यात लहान मुलींचा सौदा केला जातो. तिथल्या स्त्रियांचं हेच दुःख रिबेकाने जाणलं.
एक स्त्री म्हणून आपले काय अधिकार आणि हक्क आहेत याची जाणीव देखील तिथल्या स्त्रियांना नाही, ती करून दिली पाहिजे हे देखील तिने ओळखलं. आणि या स्त्रियांना स्वावलंबी बनवायचं तिने ठरवलं.
आता त्या गावात आसपासच्या गावातील ज्या महिला आहेत त्या आपल्या मुलांसहित येऊ शकतात. राहू शकतात.
परंतु कोणत्याही पुरुषाला मात्र रिबेकाने आपल्या गावात प्रवेश दिलेला नाही. त्या स्त्रीच्या मुलांमधील जे मुलगे असतात ते वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत ऊमोजा या गावात राहू शकतात. त्यानंतर त्यांनाही ते गाव सोडावे लागते.
या महिलांना स्वावलंबी बनवण्याचे देखील रिबेकाने ठरवले आहे. त्यासाठी तिथे बनणारी खास ज्वेलरी, क्राफ्ट्स या महिला बनवतात आणि तिकडे येणाऱ्या पर्यटकांना कमी किमतीत विकतात.
आपला एखादा जरी दागिना विकला गेला तरी त्या स्त्रियांना होणारा आनंद अवर्णनीय असतो.
आता त्या गावातील मुलांना शिक्षण मिळावे याकरिता रिबेकाने एक शाळाही चालू केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्रत्येक मुलाला मिळायलाच हवी.
रिबेका, हिलरी क्लिंटन यांची फॅन आहे. ती त्यांना भेटली देखील आहे. त्या खूप स्ट्रॉंग आणि फ्रेंडली वूमन आहे असं रिबेकाचं म्हणणं आहे.
बराक ओबामा यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी जी काही पावले उचलली ती खूपच चांगली आहेत असं ती म्हणते.
उमोजा या गावात आता ४७ महिला आणि त्यांची २०० मुलं राहतात. त्या महिला आता स्वावलंबी आणि सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
आता त्यांना लग्न करणे आणि त्या जोखडात अडकणे नको आहे. कारण अजूनही गावाच्या आसपासच्या खेड्यातील लोकांची मानसिकता बदललेली नाही.
त्या आदिवासी लोकांच्या मते, स्त्री अशी एकटी राहू शकत नाही. रिबेका हे जे करत आहे ते चुकीचे आहे.
ज्या माणसाची पत्नी नवऱ्याच्या छळाला कंटाळून ऊमोजा या गावामध्ये आली आहे, तो माणूस आता तिसरं लग्न करायला तयार झाला आहे. दुसरी बायको गेली हे तिने अत्यंत चुकीचं केलं असं तो म्हणतो.
पुरुषांशिवाय स्त्री राहू शकत नाही, तिने मुलांना जन्म घातला पाहिजे असं ते समजतात. समाजाच्या, संस्कृतीच्या विरोधात रिबेका काम करते, असंही त्याचं म्हणणं आहे.
पण रिबेकाने जे काम १९९० पासून चालू केलं आहे त्याचा थोडाफार परिणाम आता दिसून येत आहे. आता जी नवीन मुलं लग्न करत आहेत ते आता म्हणत आहेत की आम्ही एकच लग्न करू आणि पत्नीला सुखी ठेवू.
आम्हाला मुलगी झाली तर तिला शिक्षण देऊ. हा विचार, हा बदल रिबेकाने घडवला आहे.
केनिया सारख्या मागासलेल्या देशात तिथे प्रचलित असलेल्या पद्धतींच्या विरोधात जाऊन प्रसंगी मारामारी करून देखील रिबेकाने महिलांच्या साथीने एक गाव वसवणं ही साधी गोष्ट नव्हती.
कोणतीही सरकारी मदत नाही, कुठूनही येणारा पैसा नाही, अशा परिस्थितीत महिलांना घेऊन राहणे मुश्किलंच.
अशा वेळेस महिलांसाठी घरं बांधली. ती घरं म्हणजे काटक्यांनी उभी केलेली झोपडी आणि त्यावर गाईच्या शेणाने केलेली शाकारणी. फक्त निवाऱ्याची व्यवस्था करून थांबणे ही शक्य नव्हतं.
महिलांच्या हाताला काही काम देणे, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणे जरुरीचे होतं. रिबेकाने तो ही निर्माण केला, अगदी आजूबाजूला विरोध असतानादेखील.
उमोजा गावात येणाऱ्या पर्यटकांकडून एन्ट्री फी घेतली जाते. तिथे स्त्रिया अनेक दागिने बनवतात जसे की नेकलेस,बांगड्या, अँकलेट्स. आणि ते पर्यटकांना विकण्यात येतात.
उमोजामध्ये एक शाळादेखील बांधलेली आहे. ज्या शाळेत उमोजा गावातील मुलांबरोबरच आसपासच्या खेड्यातील मुलांनाही प्रवेश दिला जातो.
रिबेकाने त्या महिलांना जे दिले आहे त्यातून त्या महिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद, आत्मविश्वास दिसून येतो.
कुठल्याही पुरुषाच्या मदतीशिवाय आम्ही काम करू शकतो आणि स्वाभिमानाने आणि आनंदाने जगू शकतो हा विश्वास आता या महिलांच्या चेहऱ्यावर दिसतो.
पण हे गाव कसा आहे, तिकडे कशाप्रकारे व्यवहार चालतात हे मात्र पाहायला तिथल्या पुरुषांना बंदी आहे.
उमोजा गावातील स्त्रिया मात्र आसपासच्या गावांमध्ये,खेड्यांमध्ये, मार्केटमध्ये जाऊ शकतात; परंतु शेवटी स्वतःच्या घरामध्ये अभिमानाने येतात. कारण रिबेकासारखी खमकी बाई तिकडे त्यांच्या संरक्षणार्थ आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.