नारा स्वदेशीचा, लढा आत्मनिर्भरतेचा…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : प्रसाद पवार
===
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात आत्मनिर्भरता या शब्दाचा उल्लेख केला आणि स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर काय दिला, संपूर्ण सोशल मीडियावर आत्मनिर्भर या एका शब्दावर मीम सुरु झाले.
स्वदेशी म्हणजे गोबर इथपासून लोकांनी विदेशी मालावर बंदी घालण्याची ऑनलाईन प्रतिज्ञासुद्धा घेतली.
पण सध्याच्या जगात स्वदेशी म्हणजे नेमकी कोणती पावले उचलावीत? आत्मनिर्भर होणे म्हणजे नेमके काय करणे? सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वातंत्र्य चळवळीतली स्वदेशीची व्याख्या लागू होईल का? आणि आता चीनला प्रतिकार म्हणून चिनी मालाची होळी करायची नसून कोणत्या उपाययोजना आखल्या जाव्यात यावर सविस्तर उहापोह होणे गरजेचे आहे.
संपूर्ण मानवी उत्क्रांती आणि जीवनाचा अर्थच आत्मनिर्भरतेच्या तत्वावर राहिलेला आहे. आपण शिकून सावरून कमवायला लागतो. आपल्या आईवडिलांनी कमावलेल्या पैशावर आयुष्य काढणाऱ्याला समाजात कोणत्या नजरेने संबोधतात हे सर्वाना माहित आहे.
त्यानंतर आपली पुढील पिढीसुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत असते.
ह्याच आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेचा व्यापक आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने संबंध लावायचे ठरवल्यास जागतिक बाजारपेठेतील एक प्रमुख प्रतिस्पर्धी, आघाडीचा उत्पादक, निर्यातदार आणि सारख्या विदेशी कुबड्यांची गरज न बाळगता सक्षम राष्ट्र म्हणून ओळख असाही लावता येऊ शकतो.
पण थिल्लरपणा करून मीमच्या दुनियेत अडकून आत्मनिर्भरतेचा थेट लैंगिक गरजांशी संबंध जोडून एखाद्या गोष्टीचा आणि उद्दिष्टाचा कचरा कसा करावा हेसुद्धा भारतीयांकडून शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मनोरंजनाचा भाग वगळता विधायक चर्चा सुद्धा होण्याची गरज आहे.
आज स्वदेशी म्हटले तर लोक विविध मालाची तुलनात्मक यादी बनवून ह्यातले भारतीय उत्पादन मी वापरेन आणि विदेशी वापरणार नाही असे फॉरवर्ड करत असतात. पण प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्यात हा उत्साह किती काळ टिकतो?
साधा सरळ अर्थ. मी जे स्वतः निर्माण करू शकतो त्यासाठी मी दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही, त्याच न्यायाने जे माझ्या देशात निर्माण होते त्याला मी प्राधान्य देईन इतरांना धुडकवावे असे नाही.
जे आपल्या देशात मिळत नाही आणि आपण अद्याप निर्माणही करू शकत नाही, अशा वस्तू मी विकत घेईन पण ते माझ्या अटीनुसार घेईन आणि त्या गोष्टी माझ्यावर लादल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेईन.
माझी जागतिक कुवत इतकी असावी की माझी भूमिका ही निर्णय घेणाऱ्यांमध्ये असावी निर्णय लादला जाणाऱ्यांमध्ये नाही.
चिनी मालावर बहिष्कार टाकणाऱ्यांबद्दल अनेकवेळा टीका होताना दिसते. अर्थात नुसते तेवढे करून भागणार नाही पण भारताने नेहमीच ग्राहक का असावे? उत्पादक किंवा विक्रेता का असू नये? होणारा व्यापार आपल्या फायद्याचा आहे की नाही हे का पाहू नये?
उदा. सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन हे उत्तम दर्जाचे मानले जातात. पण सध्या भारतात त्यांना म्हणावी तशी टक्कर देईल अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही. पण म्हणून सॅमसंग च्या उत्पादनांपासून भारताने दूर राहावे का? तर असे अजिबात नाही.
भारताने आज जगातली सगळ्यात मोठी मोबाईल फॅक्टरी नोइडामध्ये उभारली आणि तीसुद्धा सॅमसंग. आज त्यामुळे अनेक रोजगार उपलब्ध झाले आणि किमतीसुद्धा घटल्या. हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले पाऊल नव्हे का?
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत विविध मॉडेल्सची चर्चा होते पण आपण आपले स्वतःचे मॉडेल विकसित करून पुढे जाण्यात आत्मनिर्भरता नव्हे का?
आज विविध विदेशी कंपन्या भारतात येऊन गुंतवणूक करू पाहत आहेत. अनेक स्थानिक कंपन्यासुद्धा आपला कारभार वाढवण्याच्या प्रयत्नात असतात.
यामुळे एखाद्या विदेशी कंपनीत काम करतो म्हणून कोणी आत्मनिर्भर नाही आणि भारतीय कंपन्या म्हणजेच काय तो स्वदेशीचा मापदंड असल्या चर्चा म्हणजे आर्थिक नीती नव्हे.
अर्थात भारतात कोणत्या उद्दिष्टाने कोण गुंतवणूक करत आहे आणि त्यासाठीची धोरणनिश्चिती आवश्यक आहेच. आणि मेक इन इंडिया, एफडीआय सुधारणा हे त्याचाच एक भाग आहे.
नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना लढाईत व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केली आणि सोशल मीडियावर आत्मनिर्भरतेवर चर्चा झडायला लागल्या.
याच अमेरिकेला भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनसुद्धा देऊ केले होते हे सोयीस्करपणे विसरून खिल्ली उडवली जाते.
त्यामुळे सर्व काही फुकट मिळवण्यासाठीची धडपड आणि विधायक कामांचीसुद्धा खिल्ली उडवण्याची प्रवृत्ती यामुळे आपल्या देशाचे आज नुकसान झाले आहे.
त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना, विदेशातून भारतात येऊन उत्पादन करणाऱ्यांना प्रोत्साहन, विकेंद्रित आर्थिक नीती आणि स्थानिक ऊर्जा निर्मितीवर भर या सर्वांची आज गरज आहे. तरंच कोरोनानंतरच्या काळात भारत आर्थिक भरारी घेऊ शकेल.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.