' गिरीश कुबेरांचं चौर्य-कर्म आणि प्रस्थापित माध्यमांनी पाळलेला गुन्हेगारी विश्वातील “ओमर्टा” – InMarathi

गिरीश कुबेरांचं चौर्य-कर्म आणि प्रस्थापित माध्यमांनी पाळलेला गुन्हेगारी विश्वातील “ओमर्टा”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पत्रकार, स्तंभलेखक गिरीश कुबेरांनी कालचा दिवस (पुन्हा एकदा) गाजवला. खरं तर कुबेरांनी दिवस गाजवला म्हणण्याऐवजी, ट्विटर-फेसबुकवर सामान्य मराठी माणसाने गिरीश कुबेरांना (इथेसुद्धा, पुन्हा एकदा) गाजवलं – असं म्हणायला हवं. निमित्त, अर्थातच, कुबेरांच्या लेखाचं.

गिरीश कुबेरांची पुस्तकं, लेख इंग्रजी भाषेतील साहित्य, लेखांवर आधारित – कधीकधी तर थेट भाषांतरित असतात – असे आरोप समाज माध्यमांत नेहेमी होत असतात. (कदाचित म्हणूनच कुबेरांच्या लेखांमध्ये समाजमाध्यमं, समाजमाध्यमांवर लेखन करणारे सामान्य जन नीच भासवले जातात.)

परंतु यावेळी मात्र गिरीश कुबेरांकडून घडलेला प्रमाद अगदी ‘हा सूर्य – हा जयद्रथ’ प्रमाणे उघडा पडला आहे.

कोविडोस्कोप : मिठीत तुझिया.. या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या एका सदरात, गिरीश कुबेरांनी पुढील लेखन केलं आहे :

 

girish kuber codoscope inmarathi

 

इच्छुकांसाठी ही लिंक : कोविडोस्कोप : मिठीत तुझिया..

कॉपी-पेस्ट बहाद्दरांच्या बाबतीत माहितीची गंगोत्री जिथून उगम पावली, तिथलंच पाणी पुढे वहात जाणार असा प्रकार नित्ययाचाच. तोच प्रकार कुबेरांच्या बाबतीत घडला आहे.

वरील मसुदा वाचा आणि पुढील ३ इंग्रजी परिच्छेद पहा –

 

andrew lilico blog inmarathi

 

हा आहे, अँड्र्यू लिलिको या पत्रकारांचा ब्लॉग.

कुबेरांनी या लेखातील वरील भाग जशास तसा, किरकोळ शाब्दिक बदल करून आपल्या शैलीत मांडला आहे. (इच्छुकांसाठी लिंक: A sense of proportion )

अर्थात, अशी मांडणी करण्यास हरकत काहीच नसते. परंतु मूळ लेखकाची परवानगी घेणे, आपण अशी मांडणी करताना मूळ लेखकाचा उल्लेख करणे – या बाबी जगाला नैतिकतेचे धडे देणाऱ्या गिरीश कुबेरांच्या लक्षात आल्या नाहीत.

ही बाब फेसबुक आणि ट्विटरवर समोर आणली गेली.

मूळ लेखकाने एकामागे एक अनेक ट्विट्स आणि प्रितिक्रियांद्वारे त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पुढील प्रितिक्रियेत लेखक म्हणत आहेत, स्पष्टपणे – की कुबेरांनी परवानगी मागितली नाही. त्यांना हे सगळं ट्विटरवरच कळालं.

 

andrew lilico admits girish kuber didn't seek permission to quote inmarathi

 

इतकंच नव्हे…हे प्रकरण जस जसं अधिकाधिक मोठं होत गेलं तसतशी अँड्र्यू यांनी अधिकाधिक दिलखुलासपणे ट्विट्स करणं सुरु केलं.

 

andrew lilico tweet 1 inmarathi

 

अँड्र्यू साहेबांनी मराठी ट्विट करून आणि मराठी म्हणीचा आस्वाद देखील घेऊन झाला…!

 

 

 

आणि हो – हे अँड्र्यू लिलिको कुणी सामान्य ब्लॉगर नव्हेत. त्यांचा ट्विटर बायो त्यांची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.

 

andrew lilico twitter bio inmarathi

 

म्हणजे, मराठी पत्रकारितेची, जगभरात अशी छी थू होण्यास साक्षात गिरीश कुबेर कारणीभूत ठरले आहेत.

दिवसभर ट्विटरवर हे सर्व सुरु होतं. पण जरा कुठे खुट्ट वाजलं की मोदींनी स्पष्टीकरण द्यावं असं वाटणारे आमचे संपादक महाशय कुठंतरी अदृश्य होते.

त्यांच्याकडून अजूनही दिलगिरी आलेली नाही.

मूळ लेखात बदल, सुधारणा…काहीही नाही.

हे आहे जाणत्या जनांच्या वृत्तपत्राच्या प्रमुख संपादकांचं वास्तव.

 

girish kuber inmarathi
loksatta.com

राजकारण्यांनी कसं वागावं, जतनेने कसं वागावं, मोदी, गांधी, ठाकरे, फडणवीस…अगदी डोनाल्ड ट्रम्प पर्यंत अनेक लोक कसे चुकतात, त्यांना ते कसं कळत नाही जे यांना कळतं – अश्या थाटात लेख लिहीणाऱ्या संपादक महाशयांना आपल्या क्षेत्रातील साधे नैतिक नियम पाळता येऊ नयेत?

इतकं होऊनही यांनी इतरांना योग्य अयोग्य वर प्रवचनं द्यावीत? आणि जनतेने ती निमूट ऐकून माना डोलावत यांची कौतुकं करावीत? कुठून येतो हा उर्मटपणा? कुठून येते ही दांभिकता?

संपादकीयातून अर्धवट, खोटारडी विधानं केली जातात. त्यावर लोकांनी आवाज उठवला तर कोपऱ्यात कुठेतरी दिलगीरी व्यक्त होते. पण पुन्हा काहीच दिवसांनी येरे माझ्या मागल्या. लोकांकडून, राजकारण्यांकडून सत्य, प्रामाणिकपणा, सदाचार वगैरे तत्वांवर आधारित वर्तनाची अपेक्षा करणारे स्वतः असे वागतात. झालेल्या चुकीची शरम नसते, त्यातून सुधारणा होणं नसतं – उलट काही दिवसांनी त्याच बेमुर्वतखोरपणे त्याहून “सरस” वर्तन केलं जातं.

इतकं सगळं करूनही हे उजळ माथ्याने वावरत असतात.

आणि तरीसुद्धा, माध्यम स्वातंत्र्य संकटात असतं. फ्री स्पीच ची मुस्कटदाबी होत असते.

आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं की गिरीश कुबेर फक्त निमित्तमात्र आहेत.

या प्रसंगातून आपलं माध्यमविश्व कोणत्या वाळवीने पोखरून काढलं आहे हे समोर आलं आहे.

एका राजकीय पक्षाने दुसऱ्या पक्षावर काही आरोप केले तर लगेच “तुमचं यावर काय म्हणणंय?” असं विचारत चर्चा रंगतात. देशाच्या कुठल्याश्या कोपऱ्यात कुठलीशी अप्रिय घटना घडली तर पंतप्रधानांपासून प्रत्येकाने उत्तर देणं, स्पष्टीकरण देणं अपेक्षित असतं. रेल्वेचा अपघात झाला तर “रेल्वेमंत्री राजीनामा देणार काय?” असा सवाल उगारला जातो.

हे २०१४ पूर्वीही व्हायचं, आजही होतं. सत्तेत कोण आहे ही गोष्ट दुय्यम. माध्यमांनी शेंडा ना बूड असलेले प्रश्न विचारत रहायचे असतात. वाट्टेल त्याला जाब विचारायचा असतो.

पण यांची स्वतःची मात्र आपल्या क्षेत्रातील घाणीकडे एक दृष्टिक्षेप टाकण्याची हिम्मत नसते.

राजकारण्यांच्या भ्रष्टाचारावर चर्चासत्र घेणाऱ्या माध्यमांनी – पत्रकारितेतील ब्लॅकमेलिंग आणि भ्रष्टाचारावर किती शब्द खरडले आहेत काय? सोशल मीडियामुळे खोट्या बातम्या पसरतात ही तक्रार करणाऱ्यांनी, आपल्या अग्रलेखांतून, अर्धवट मथळ्यांतून, खोट्या बातम्यांमधून केलेल्या सामाजिक ध्वंसाची जबाबदारी कधी स्वीकारली आहे काय?

गेल्या कित्येक महिन्यांपासून “२०१४ नंतर भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले” अश्या अर्थाची विधानं जागोजागी पेरली गेली आहेत. एका तरी माध्यमाने या विधानाचा आधार कधी सांगितला आहे काय? अत्याचार “वाढले” हे कश्याच्या आधारावर म्हणताय – या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे काय?

हे प्रश्न तर फार मोठे झाले. कुबेरांच्या कालच्या कृत्याच्या पार्श्वभूमीवर एक साधा प्रश्न घेऊया.

भाजप ने केलेल्या चुकांवर काँग्रेसने कठोर भूमिका घ्यावी आणि काँग्रेस च्या अपयशावर भाजपने टीका करावी – अशी अपेक्षा करणाऱ्या विविध माध्यमांतील – गिरीश कुबेरांनी समस्त मराठी माध्यम क्षेत्राची प्रतिमा अख्ख्या जगात मलीन करण्याचं इंटरनॅशनल कर्तृत्व गाजवल्यावर – किती संपादकांनी, पत्रकारांनी कुबेराचा निषेध केला आहे?

शून्य.

NIL.

आणि यांची अपेक्षा असते की जनतेने यांना सोज्वळ समजून, देवघरात बसवून यांच्या बुद्धिमत्तेची पूजा करावी.

ही एकमेकांच्या चुकांकडे कानाडोळा करण्याची वृत्ती सहज आलेली नाही. यामागे “तेरी भी चूप मेरी भी चूप” हा अघोषित समझोता आहे.

संघटित गुन्हेगारी क्षेत्रात क्राईम सिंडिकेट्स असतात. वेगवेगळ्या गँग्ज असतात. एकमेकांच्या कार्यक्षेत्रावर यांचा डोळा असतो. एकमेकांच्या फूट सोल्जर्सचे मुडदे पाडले जातात.

पण यांच्यात आपापसात एक अलिखित करार असतो.

पोलिसात जायचं नाही.

पोलिसांना प्रतिपक्षाचे धंदे सांगायचे नाहीत.

आपल्या शत्रूशी आपण लढायचं – पण पोलिसांना त्याची माहिती द्यायची नाही.

या माफिया जगातल्या अलिखित कायद्याला – ओमर्टा – म्हणजेच कोड ऑफ सायलेन्स म्हणतात.

 

omerta meaning inmarathi

 

हाच कायदा प्रस्थापित माध्यमांनी प्राणपणाने जपला आहे.

म्हणूनच गिरीश कुबेरांना “असंतांचे संत” हा अग्रलेख मागे घ्यायला लावला गेला, तेव्हा कुणीही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही.

म्हणूनच कुमार केतकरांनी आपल्या संपादकीय जागेचा अनैतिक वापर पक्षीय प्रचारासाठी केला तेव्हा कुणीही उफ्फ केलं नाही.

आणि म्हणूनच आजसुद्धा – गिरीश कुबेरांनी आपल्याच कार्यक्षेत्राचं – ज्याला आम्ही स्वतःच्याच पाठीवर थाप देत लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे म्हणत मिरवत असतो – जगभरात प्रतिमाहनन केलं असूनही – प्रथापित माध्यमांतील एकही वीर पुढे येऊन स्पष्ट निषेध, टीका करत नाहीये.

याच करणामुळे या लोकांना समाज माध्यमं आवडत नाहीत.

कारण आपापसात अळीमिळीगुपचिळी करत वर्षानुवर्षे लपवलेली घाण, आता समाजमाध्यमांचं शस्त्र वापरून सामान्य माणसं उघडी पाडत, यांच्याच तोंडावर फासत आहेत.

म्हणूनच यांना स्वतः प्रस्थापित माध्यमांतून चालवलेला प्रोपागंडा प्रिय असतो – पण समाजमाध्यमांवरील फेक न्यूज फार मोठ्या संकट वाटत असतात.

कारण “खोटा प्रचार करण्यावर फक्त आमचाच कॉपीराईट आहे! त्यावर सामान्य माणसाने आक्रमण केलं तर आमचं काय होईल?” – हा प्रश्न त्यांना सतावत असतो.

आणि इथेच समाजमाध्यमं या प्रचारपंडितांना हरवत असतात.

कारण सोशलमिडीयावर फेक न्यूज बस्ट पण होतात. फॅक्ट चेक करून जाब विचारले जातात. कुणी खोटं बोललं तर त्याला लगेच उघडं देखील पाडलं जातं.

हे काम माध्यमांना कधीच करता आलं नाही – त्यांच्यात ही आपसातील गलिच्छ घाण समोर आणण्याचं नैतिक बळ कधीच नव्हतं.

म्हणूनच समाजमाध्यमांमधून गिरीश कुबेर आणि तत्सम मंडळी उघडे पडतात. पडत रहातील.

अर्थात, गुन्हेगारी जगातील ओमर्टा जपत, आपापसात डोळे मिचकावत पुन्हा अग्रलेख लिहिले जातीलच.

वर्षानुवर्षे आपली शरम विकत जगत आलेल्यांना, आज अचानक उपरती होईल याची शक्यता नाहीच.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?