आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
फेसबुक माहीत नाही असा माणूस सध्या तरी विरळाच असावा. कारण या फेसबुकमुळे कितीतरी चांगल्या गोष्टी माणसाच्या आयुष्यात आल्या.
दूरदेशी गेलेले मित्र मैत्रिणी असोत, आपल्याला आवडणारे लेखक कवी असोत, आपल्या आवडत्या विषयांवरची वेगवेगळी माहिती असो.. विज्ञान, तंत्रज्ञान, कितीतरी लोकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी फेसबुकची मदत घेतली आहे.
कितीतरी हौशी कलाकार लेखक यांनी आपला चाहता वर्ग निर्माण केला. कित्येक लोकांना आपली कला सादर करायला प्लॅटफॉर्म मिळाला. लोक व्यक्त होऊ लागले. प्रतिभावंतांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. हे सारं कुणामुळे शक्य झालं?
हे सगळं फक्त या सोशल नेटवर्किंग साइट मुळे शक्य झालं. हे सगळं माहीत असेल तर मार्क झुकरबर्ग हे नांव ऐकलंच असेल तुम्ही!!! तोच तो फेसबुकचा निर्माता…
या माणसानं फेसबुक चालू केलं आणि जग खरंच किती जवळ आलं. एका क्लिकमध्ये, एका अंगठ्यावर जग सामावलं ते फेसबुकमुळे!!!
कधीतरी आपल्या आई बाबांना विचारा, त्यांचं काॅलेज संपल्यावर किती मित्र मैत्रिणी संपर्कात राहीले? ते कसे दिसतात? त्यांचे कुटुंबीय, यापैकी किती गोष्टी त्यांनी पाहील्या होत्या?
आपण हे सगळं पाहू शकतो, त्यांच्या संपर्कात राहू शकतो. याचं खूपसं श्रेय मार्क झुकरबर्गलाच जातं. ही सारी झुकरबर्गची कृपा.
मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठात शिकत होता. शिकत असतानाच त्यानं प्रायोगिक तत्त्वावर नेटवर्किंग साइट बनवली. त्यावेळी ही साईट केवळ काॅलेजमध्येच वापरता येत होती.
पुढं मार्कनं शिक्षण पूर्ण होण्याआधीच काॅलेज सोडलं आणि ही नेटवर्किंग साइट बनवून ती जास्त व्यापक कशी करता येईल याचा अभ्यास करु लागला. त्यावेळी त्या साईटला कोणतंही नाव नव्हतं.
हळूहळू त्या साईटची व्याप्ती त्यानं युरोप भर केली आणि या साईटला नांव दिलं फेसबुक!!! अल्पावधीतच हे फेसबुक जगात पोचलं आणि जगाचा चेहरा बनून गेलं. अब्जावधी युजर्स फेसबुक वापरतात.
खुद्द झुकरबर्ग सुध्दा या फेसबुकच्या जीवावर अब्जाधीश झाला आहे. २००७ साली फोर्ब्ज मासिकानं जी यशस्वी लोकांची यादी प्रसिद्ध केली होती त्यात मार्क झुकरबर्ग चौथ्या स्थानावर होता.
आता या व्यावसायिक यशस्वीतेची ही दुसरी बाजू बघा…मार्क झुकरबर्ग, ज्याला फेसबुकचा प्रणेता म्हटलं जातं तो ग्रॅज्यूएट सुद्धा नाही. हार्वर्ड विद्यापीठात तो शिकत असतानाच त्यानं आपल्या या जगावेगळ्या स्वप्नासाठी शिक्षण अर्धवट सोडून दिलं.
त्याच्या पालकांनाही इतर पालकांप्रमाणंच वाईट वाटलं होतं. मुलगा साधा ग्रॅज्यूएट सुद्धा नाही आणि हे काय जगावेगळं खूळ डोक्यात घेऊन बसला आहे.
पण डिग्री, शिक्षण हे सारं काही असतं का? खूपदा जी मुलं अभ्यासात हुशार असतात, उत्तम मार्क मिळवून पास होतात ती जगाच्या परीक्षेत यथातथा असतात.
जी बॅकबेंचर्स म्हणून हिणवली गेलेली मुलं असतात ती असंच काहीतरी अभिनव करुन चमकदार कर्तृत्व दाखवतात.
बिल गेट्स यांनीही शिक्षण अर्धवट सोडून मायक्रोसॉफ्ट सुरु केली. त्यांच्या विंडोजनी जग पादाक्रांत केलं. कित्येक काँप्युटर इंजिनिअर त्यांच्या कंपनीत काम करतात.
आज हे सारं सांगायचं कारण म्हणजे हार्वर्ड विद्यापीठानं मार्क झुकरबर्ग ला बोलावून मानद डिग्री दिली. काॅलेज सोडलं तर याला १३ वर्षं झाली आणि आज ३३ व्या वर्षी मार्क झुकरबर्ग मानद पदवीधर झाला.
स्वतः मार्क झुकरबर्ग सुध्दा ही डिग्री मिळणं हे फार मोठे यश समजतो. कारण त्याच्या आई वडिलांना ही गोष्ट फार अभिमानास्पद आहे.
बिल गेट्स यांनी १९७५ साली हार्वर्ड विद्यापीठाला राम राम केला होता. त्यांना ही मानद डिग्री मिळण्यासाठी खूप वर्षं लागली. त्यामानाने झुकरबर्ग फारच नशिबवान.
१३ वर्षांनी विद्यापिठानं बोलावून समारंभ आयोजित करुन डिग्री दिली.
मार्क झुकरबर्ग हा एक ब्रँड बनला आहे. पण २००५ साली त्यानं फेसबुक लाँच केलं आणि हार्वर्ड विद्यापीठातील त्याच्या सिनीअर्सनी त्याच्यावर आरोपांची राळ उडवून दिली.
मार्कनं आमची फसवणूक केली आहे. प्रथम ही नेटवर्किंग साइट फक्त काॅलेजपुरती वापरणार असं सांगून त्यानं आमच्याकडून ही कल्पना घेतली. मग पुढं त्यासाठी मार्कला १.२ मिलीयन शेअर्स देऊन याची किंमत मोजावी लागली होती.
जेव्हा फेसबुक लाँच करण्यात आले तेंव्हा मार्कचं वय अवघं १९ वर्षं होतं आणि त्याची जिवलग मैत्रीण असणारी प्रेशिता १८ वर्षांची होती. पुढं सात वर्षांनी दोघेही विवाहबद्ध झाले.
आजच्या घडीला फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय नेटवर्किंग साइट आहे. या साईटचे २ अब्ज मंथली युजर्स आहेत.
२०१७ साली फेसबुकची ब्रँड व्हॅल्यू ७३.५ बिलीयन डाॅलर होती. तर फोर्ब्जच्या यादीत सर्वात लोकप्रिय ब्रँडच्या यादीत फेसबुक चौथ्या स्थानावर होतं. वयाच्या २३ व्या वर्षीच मार्क झुकरबर्ग अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झाला.
जगातील सर्वाधिक श्रीमंत माणसांच्या यादीत मार्क झुकरबर्ग पाचव्या क्रमांकावर आहे.
हे सगळं वाचताना काही आठवलं? “बेटा, काबिल बनो’ म्हणणारा रँचो आठवला? जगात शिक्षणच सारं काही नसतं.. शिक्षणाचा वापर कसा केला जातो हे पण महत्त्वाचं आहे.
पुस्तकं वाचून आपल्याला जगात काय चालले आहे हे समजतं, पण जेव्हा जगात उतरतो, तेव्हा प्रॅक्टिकल वेगळंच असतं. पुस्तकात शिकवलेलं त्यावेळी कामाला येईल पण जो धडा जगात वावरताना मिळतो तो जास्त शिकवून जातो.
मुलांना शिक्षणावर, डिग्रीवर जोखणारे पालक पाहून हे सांगावं वाटतं.. शिक्षणच सारं काही नसतं. जी मुलं शिक्षणापेक्षा अशा जगावेगळ्या स्वप्नासाठी वेगळी वाट निवडतात तिथं सारी जबाबदारी त्यांचीच असते.
चांगला वाईट जो लागेल तो निकालही त्यांचाच असतो. आणि हीच मुलं आपलं साम्राज्य उभं करु शकतात.
लौकीक अर्थानं भले ती ग्रॅज्यूएट सुद्धा नसतात पण त्यांना बोलावून पायघड्या घालून विद्यापीठात पदवी प्रदान करतात.
फेसबुकवर कितीजण काम करतात. त्यांची फीचर्स सतत बदलती आणि जास्तीत जास्त आकर्षक अशी राहतील याची काळजी फेसबुकची टीम घेत असते.
त्यामुळं अजूनतरी फेसबुकला टक्कर देणारं, त्याच्याइतकं लोकप्रिय समाज माध्यम तयार करता आलं नाही कुणालाही. हेच मार्क झुकरबर्ग याचं घवघवीत यश आहे..ज्यानं त्याच्याकडं नसलेली डिग्री सुध्दा झाकून टाकली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.