Site icon InMarathi

महाराजांचे असेही शूर-वीर – येसाजी कंक नामक एक रांगडी हिंमत!

Yesaji Kank InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वराज्य का निर्माण करावे ही समज आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची सेवा करणाऱ्या मावळ्यांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागते ते म्हणजे – शूर शिलेदार येसाजी कंक यांचे!

 

 

स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाला तोड नाही. जी लढाई समोर आली त्या प्रत्येक लढाईला त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि विजय संपादूनच ते माघारी परतले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात देखील त्यांनी आपले शौर्य स्वराज्यास अर्पण केले होते. इतिहास जाणून घेताना या रांगड्या मावळ्याचा वारंवार उल्लेख होतो आणि त्यांचे शौर्य आपल्या नजरेस पडते.

येसाजी कंक यांच्याबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ते अतिशय बलदंड शरीराचे होते. शंभर हत्तीचे बळ असलेला माणूस अशी उपाधी येसाजी कंक यांना दिल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांना येसाजींच्या सामर्थ्यावर किती विश्वास होता हे दर्शवणारा एक प्रसंग इतिहासाच्या पानावर आपल्याला सापडतो. तोच आज तुमच्यासमोर उलगडतो आहोत.

 

स्रोत

१६७६ साली राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाले. आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कुतुबशहाला सोबत घेतले होते. त्यामुळेच महाराज कुतुबशहाच्या भेटीस निघाले.

भागानगरीत महाराजांच्या सर्व लवाजम्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. महाराजांसोबत त्यांची काही विश्वासू आणी जवळची माणसे देखील होती. त्यात येसाजी कंक यांचा देखील समावेश होता.

महाराजांनी दादमहालात प्रवेश केल्यावर कुतुबशहाने स्वत:हून पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. महाराज स्थानापन्न होताच कुतुबशहाने त्याला मघापासून सतावत असलेला प्रश्न विचारला,

राजाजी आपकी फौज तो बहुत बडी है लेकीन इसमें हाथी क्यूँ नही है?

महाराज म्हणाले,

तानाशहाजी ऐसा कूछ नही है, आमच्याकडे पन्नास हजार हत्ती आहेत. मतलब एक एक सिपाही हाथिके बराबर है. जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही आमच्या शिलेदारांपैकी कोणाचीही निवड करा. वह आदमी आपके फौज के किसी भी हाथी के साथ जंग करेगा.

महाराजांचं हे प्रत्युत्तर ऐकून कुतुबशहा भलताच बावचळला. पण त्याचा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस हत्तीला टक्कर देऊ शकतो. त्यामुळे त्याने महाराजांच्या शिलेदारांना आजमवायचे ठरवले.

त्याने महाराजांच्या भोवती उभ्या असणाऱ्या माणसांकडे नजर टाकली. येसाजींच्या बलदंड शरीरयष्टीने कुतुबशहाची नजर रोखली. कुतुबशहाने हत्तीशी मुकाबला करण्यासाठी येसाजींची निवड केली. येसाजींनी देखील न डगमगता आव्हान स्वीकारले.

महाराजांनी एकवार येसाजींकडे पाहिले आणि नजरेतूनच त्यांच्या निडरपणाचे कौतुक केले.

येसाजींनी देखील मान हलवून जणू महाराजांना वचन दिले की, “महाराज निश्चिंत असावे, विजय आपलाच आहे.”

हत्ती आणि येसाजींच्या झुंजीचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात शानदार गोलाकार जागा तयार केली गेली. सभोवताली माळे रचून प्रेक्षकांसाठी आणी मान्यवरांसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली आणि अखेर तो क्षण आला.

 

 

येसाजींनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि नंगी तलवार हाती घेऊन आत्मविश्वासाने ते मैदानात उतरले. कुतुबशहाने सैनिकांना इशारा दिला आणि मागील दरवाज्याने साखळदंडात बांधलेला हत्ती जोरजोरात आरोळ्या ठोकत आत शिरला. त्या हत्तीला सांभाळायला जवळपास २५ हबशे होते.

म्हणजे विचार करा त्या हत्तीची ताकद काय असेल..!

हबशांनी त्याला साखळदंडातून मुक्त केले आणि तो मदांध हत्ती समोर उभ्या असलेल्या येसाजींन पाहून अधिकच मस्तीत आला. त्याने चवताळत सरळ येसाजींवर चाल केली.

हत्तीच्या चालीची येसाजींना जणू अपेक्षा होती. त्यांनी डाव्या बाजूला उडी घेत हत्तीला चकवले. जमलेले प्रत्येक डोळे जीव मुठीत धरून तो थरार पाहत होते. हत्ती आणि माणूस या दोघांमधील लढाई हत्तीच जिंकणार याची जणू सर्वाना खात्री होती. पण केवळ येसाजींचा संघर्ष पाहायचा म्हणून ती प्रत्येक नजर तेथे हजर होती.

 

स्रोत

 

येसाजींनी काही वेळ हत्तीला खेळवले. समोरचा इवलासा माणूस आपल्याने बधत नाही हे पाहून हत्ती अधिकच आक्रमक होत होता. तो सर्वशक्तीनिशी येसाजींना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत होता. पण येसाजी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळवत होते. अजून काही वेळ असाच गेला. येसाजी खेळवत होते आणी हत्ती खेळत होता.

सततच्या धावण्याने अखेर हत्तीला धाप लागली आणि त्याची आक्रमकता कमी झाली. येसाजी जणू याच संधीची वाट बघत होते. यावेळेस त्यांनी स्वत:हून पुढे जाऊन हत्तीला जोरदार धडक दिली.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, मातीत कमावलेल्या त्या बलदंड शरीराचा धक्का बसताच क्षणभर हत्तीही जागेवरून हलला. पण अचानक त्याने स्वत:ला सावरत येसाजींना सोंडीत पकडले. पण येसाजी हार मानतील ते कसले? त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून हत्तीच्या सोंडेतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडेवर केला…!

बघणाऱ्यांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता…!

कुतुबशहा तर केवळ तोंडात बोट घालायची बाकी होता.  येसाजींनी घातलेला घाव हा त्या लढाईतला निर्णायक घाव ठरला. त्या जबरदस्त घावामुळे हत्तीचा सगळा जोश उतरला आणि त्याने सरळ बाहेर धूम ठोकली.

हत्ती आणि माणसाच्या झुंजीत झालेला हा विजय माणसाचा नव्हता. कारण अशी अचाट कामगिरी करणे प्रत्येकाला शक्य नाही. तो विजय होता येसाजी कंक नामक सामर्थ्याचा, त्यांच्या रांगड्या हिंमतीचा!

 

 

सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. सर्वत्र येसाजींच्या नावाचा गजर होऊ लागला. येसाजी देखील सर्वाना अभिवादन करत होते.

इतक्यात त्यांची नजर महाराजांच्या नजरेला मिळाली आणि त्यांची छाती गर्वाने अधिकच फुलली.

कारण त्या टाळ्यांच्या कडकडाटापेक्षा त्यांच्या दृष्टीने मौल्यवान होता आपल्या राजाच्या डोळ्यात आपल्याविषयी दिसणारा अभिमान!

धन्य ते येसाजी ! धन्य ती त्यांची निष्ठा !!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version