Site icon InMarathi

मातीशी नाळ जपण्यासाठी, हातातली नोकरी सोडून ही महिला उद्योजक बनलीये अनेकांची माऊली…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

माणूस एक गोष्ट ठरवतो. त्यानुसारच शिक्षण पूर्ण करतो.‌ नोकरीला सुरुवात करतो आणि एका दिवशी असं लक्षात येतं की अरे, हा आपला प्रांत नाही, हे आपलं ध्येय नाही.

अचानक चालू झालेली वाट सोडून, एखाद्या अनामिक ओढीने गर्दी नसलेली वाट निवडावी आणि साक्षात्कार व्हावा… हेच ते, आपल्याला हवं होतं ते…आपलं इच्छित!!!

आपली आवड आपलं काम होणं हे खूप कमी लोकांच्या बाबतीत होतं. पण रुळलेल्या वाटेवरून बाजूला जाऊन आपली वाट निर्माण करणारे लोकच स्वतःचं नाव कमवू शकतात.

आज आपण अशाच एका “ब्रँड” झालेल्या महिलेची कहाणी बघूया.

आजची ही कहाणी अशाच ध्येयवेड्या स्त्रीची आहे. जिनं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी केली, मग एक काॅफी शाॅप चालू केलं. ते बंद करुन थेट काॅफी उत्पादन चालू केलं आणि काही टनात विक्री केली.. झालात ना थक्क?

आपण भारतीय चहाचे शौकीन. पण काॅफीची लज्जत पण औरच असते. सकाळी स्ट्राँग काॅफीचा वास आळसाला पार हाकलून देतो. आणि सुरु होतो तजेलदार दिवस!!!

 

msn.com

 

अशा काॅफीच्या प्रेमातून मेघालयमधील दासूमार्लिन माजाव यांनी आपलं काॅफी फार्म चालू केलं आणि त्या स्मोकी फाॅल्स ट्राईब काॅफी या ब्रँडला सर्वत्र पोहोचवलं. ही आहे त्यांची प्रेरणादायी कहाणी-

दासूमार्लिन त्यांच्या लहानपणी आजीसोबत काॅफी प्यायच्या. तिथं आजोळी अंगणात काॅफीची झाडं लावलेली होती. लोक ताजी काॅफी बनवायचे. पण नंतर नंतर या लोकांनी काॅफीऐवजी चहाकडं मोर्चा वळवला.

हे आठवलं आणि त्यांना वाटलं की याच काॅफीचं उत्पादन करुया आणि काहीतरी वेगळं करुया. आणि सात टन काॅफीचं उत्पादन घेत ३०० हून अधिक शेतकऱ्यांना उत्पन्नाचं नवं साधन दिलं.

पूर्वेकडील १४ पेक्षा जास्त काॅफी शाॅपना दासूमार्लिन काॅफी पुरवतात. तसंच बंगळुरू, गुवाहाटी, मुंबई सारख्या शहरात विविध रिटेल दुकानात त्या काॅफी पुरवतात.

इतकंच नव्हे तर फ्रान्स, न्यूझीलंड, बांगलादेश इथंही त्यांची काॅफी पोहोचली आहे.

 

http://dreamwallpage.blogspot.com/

 

२००४ साली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोडे दिवस शिक्षिकेची नोकरी दासूंनी केली. प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी केली आणि एका सामाजिक संस्थेसाठी पण काही दिवस काम केलं.

पण ते त्यांचं ध्येय नव्हतं. आपली आवड असलेल्या काॅफीसाठी काहीतरी वेगळं करायचंय हे ठरवलं आणि काॅफी शाॅप चालू केलं. पण दुर्दैवाने काही दिवसांतच ते बंद करावं लागलं.

पण त्यांची जिद्द त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यांनी एक किलो काॅफी रोस्टर आणला. काॅफीच्या बिया आणल्या. त्या भाजून बनवलेली काॅफी नमुन्यासाठी आपल्या मित्र मैत्रिणी आणि जवळच्या लोकांना दिली. त्याचा स्वाद सर्वांना आवडला.

लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे हे पाहून त्यांनी ५ किलोचा रोस्टर कर्ज काढून आणला. आणि इथंच सुरुवात झाली स्मोकी फाॅल्स ट्राईब काॅफी या ब्रँडची!!!

त्यानंतर दासूनी जर्मन मेक रोस्टर आणला ,जो काॅफीच्या बिया भाजताना तापमानावर नियंत्रण ठेवू शकत होता. आलेख आणि माॅनिटरची सोय असल्यामुळे हे काय थोडं सोपं झालं.

आता व्याप वाढणार हे लक्षात घेऊन तिथे असलेल्या शेतकऱ्यांना दासूनी आपल्याकडे वळवून घेतले. यात त्यांच्या वडिलांनी फार मदत केली. दासूंचे वडील या शेतकऱ्यांना भेटत.

 

https://lighttravelaction.com/

 

त्यांनी शेतकऱ्यांना काॅफीच्या लागवडीसाठी उद्युक्त केले. त्यासाठी आवश्यक ती माहिती देण्यासाठी बरीच शिबिरे आयोजित केली. त्यामुळे शेतकरी निव्वळ दासूंनाच नव्हे तर इतरांनाही काॅफीची बियाणं पुरवतात.

इतकंच नव्हे तर जे दुर्गम भागात असलेले काॅफी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडून दासू स्वतः जाऊन खरेदी करून आणतात. सिरा हे वयोवृद्ध शेतकरी दिड टन काॅफी दासूंना विकतात.

आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करुन दासूंनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

इतका मोठा व्याप सांभाळत असताना दासूंनी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष केले नाही . संध्याकाळी आॅफीसधून घरी आल्यावर संध्याकाळी मुलांचा अभ्यास, खाणं हे बघून रात्री साडेनऊ वाजता परत घराजवळ असलेल्या युनिटला भेट देतात.

गेल्या वर्षी त्यांचा आधारस्तंभ असलेल्या त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. म्हणजे मशिनरीची देखभाल दुरुस्ती करणं कठीण होणार होतं. पण दासूंनी धीर सोडला नाही. वडीलही लवकर बरे झाले.

रोबस्टा जातीचं काॅफीचं वाण भारतात फारसं लोकप्रिय नाही, मग अरेबिका वाणाला काॅफी बोर्डाकडून मान्यता मिळवून घेतली.

 

https://www.thebetterindia.com/

 

व्यवसाय करताना चढ उतार येतात आणि ते आपल्याला जास्त स्ट्राँग बनवतात. फक्त आव्हान स्वीकारून काम करायची तयारी हवी. दासूंनी हे सारं अवघ्या ३८ व्या वर्षी मिळवलं आहे.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून त्यांना फार मदत झाली. हे सारं करताना एखादा नवा माणूस आपला व्यवसाय सुरु करत असेल तर दासू त्याला सहाय्य करतात.

गेल्यावर्षी मेघालय सरकारचा उद्योजकता पुरस्कार देऊन दासूंचा गौरव करण्यात आला.

 

https://shillongtoday.com/

 

त्यानंतर दासूंनी पुढचा प्रकल्प हाती घेतला. तोही असाच जगावेगळा आहे. फणसापासून चाॅकलेट्स बनवायचा!!!पण सध्याच्या काॅफी व्यवसायासाठी त्यांना अजूनही खेडी दत्तक घेऊन शेतकरी स्वावलंबी बनवायचे आहेत.

अजून बरीच शिबिरं घेऊन शेतकऱ्यांना काॅफीची लागवड आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी शिकवून त्यांचं राहणीमान उंचावायचं आहे.

त्या सांगतात, जेव्हा त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करायचं ठरवलं तेव्हा लोकांनी त्यांना खूप नांवं ठेवली होती. स्टेट बँकेतील नोकरी सोडून हा कसला वेडेपणा करु पाहते आहे ही म्हणून.

इतकंच नव्हे तर, जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा लोकांनी त्यांना असेही सल्ले दिले की, “दक्षिणेतून काॅफीच्या बिया मागवून त्यावर प्रक्रिया करून दे आम्ही आमच्या नावावर ‌विकू.”

हे केलं तरीही चाललं असतं पण त्यामुळे त्या जो हेतू घेऊन या व्यवसायात उतरणार होत्या तो कधीच साध्य झाला नसता. त्यांना शेतकऱ्यांना मदत करुन पुढं आणायचं होतं.

त्यांची इच्छा होती की मेघालयाचं नांव भारताच्या नकाशात काॅफीच्या उद्योगासाठी ओळखलं गेलं पाहिजे.आणि त्यांची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे.

चांगला हेतू मनाशी धरुन जेव्हा एखादं काम करायला आपण सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला लोकं चेष्टा करतात, नावंही ठेवतात.

पण आपण जेव्हा आत्मविश्वासाने पाऊले टाकत जातो तो आत्मविश्वास, प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट, सचोटी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातात. हीच प्रेरणा देते दासूंची कहाणी!!!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version