आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी आपण सगळ्यांनीच आपल्या शालेय जीवनापासून वेगवेगळी माहिती वाचली असेल.
लहानपणी, त्यांच्या वाढदिवशी म्हणजे १४ नोव्हेंबर ला बालदिनाच्या निमित्ताने स्वतःच कौतुक सुद्धा करवून घेतलं असेल.
आधुनिक भारताला पुढील वाटचालीची दिशा दाखवण्याचं महत्त्वाच कामं नेहरूंनी केलं!
सार्वजनिक क्षेत्रातील विविध उद्योग,पायाभूत सुविधा,परराष्ट्र धोरण यांविषयी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा राष्ट्र विकासात अमूल्य वाटा आहे.
१९४७ ते १९६४ अश्या त्यांच्या प्रदीर्घ पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत देशाला नवीन घटना मिळाली.
अनेक छोटी राज्ये ,जी सुरवातीला भारतात विलीन झाली नव्हती त्यांना भारतात आणण्याचं काम सरदार पटेलांच्या मदतीने त्यांनी पूर्ण केलं. थोडक्यात सांगायचं तर स्वतंत्र भारताचे ते एक शिल्पकार होते!
प्रत्येक राजकीय नेत्याला विरोधाचा सामना करावा लागतोच पण ,भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना विनाकारण बदनाम करण्याची एक टूम अलीकडच्या काळात आलीये.
जुने फोटो फेरफार करून त्यांच्या विषयी गैरसमज पसरवून नवीन पिढीचा बुद्धिभेद करण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे.
खालील अफवा पंडितजीं बद्दल जाणून- बुजून पिकवण्यात आल्या. चला तर जाणून घेऊया या ‘व्हायरल ‘ कथांमागचं सत्य.
१. पंडित नेहरूंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत उपस्थिती लावली होती :
वरील फोटो बऱ्याच सोशल मीडिया वर पसरवला जात आहे . या फोटो सोबत एक मचकूर पण आहे
“मोठ्या प्रयत्नांनी हा फोटो मिळाला आहे. पंडित नेहरू जी संघाच्या शाखेत उभे असल्याचं स्पष्ट दिसतंय!आता तुम्ही त्यांना सुद्धा भगवे दहशतवादी म्हणणार का?”
या फोटोत पंडितजी नक्कीच आहेत. परंतु ते संघाच्या शाखेत नाहीत! १९३९ मधला हा फोटो नैनी, उत्तर प्रदेश मध्ये काढण्यात आला होता.
यात नेहरूंनी पांढरी टोपी घातली आहे. संघाच्या गणवेशात १९२५ पासून काळी टोपी समाविष्ट आहे पांढरी नाही! त्यामुळे हा फोटो संघ शाखेचा निश्चितच नाही.
२. बहिणी आणि भाची सोबतच्या प्रेमळ फोटोंच विद्रुपीकरण :
पंडित नेहरूंच चित्रण हे ‘बाईलवेडे’ या प्रकारे मुद्दामहून केलं जातं आहे.
त्यांचे बहिणीसोबतचे ,भाची सोबतचे फोटो दाखवून एक गैरसमज पसरवण्याचा डाव अमित मालवीय नावाच्या एका पक्षाच्या प्रवक्त्यांनी चालवला आहे.
ह्या फोटोत पहिल्या आणि तिसऱ्या फोटोत दिसणाऱ्या महिला आहेत श्रीमती विजयालक्ष्मी पंडित. नेहरूंच्या भगिनी.
शेवटच्या चित्रात(खालून उजवीकडे) दिसणाऱ्या महिला आहेत नयनतारा सहगल – नेहरूंची भाची- विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी!
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटो ने केली जाणारी बदनामी नक्कीच खेदाची बाब आहे.
३. “मी केवळ जन्माच्या अपघाताने हिंदू” चुकीचे विधान :
काही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्ही वरील एका चर्चे दरम्यान भाजप चे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी एक विधान केलं होतं. ते नेहरूंच्या बाबतीत म्हणतात,
“नेहरू एकदा म्हणाले होते की मी शिक्षणाने इंग्रज आहे, संस्कृती ने मुघल आणि केवळ जन्माच्या अपघाताने हिंदू!”
जेव्हा या विधानाची सत्यता पडताळून पाहण्यात आली तेव्हा असं सापडलं की ,या प्रकारचे विधान हे १९५९ मधे हिंदू महासभेचे नेते एन. बी.खरे यांनी सर्वप्रथम केलं होतं.
त्यांचा दावा होता की पं.नेहरू नी त्यांच्याआत्मवृत्तात असं विधान केले आहे. परंतु सत्य हे आहे की या प्रकारचं कुठलही विधान नेहरूंच्या आत्मकथेत नाही.
४. नेहरूंनी सुभाष चंद्र बोस यांचा ‘युद्ध कैदी’ असा उल्लेख केला होता! अजून एक अफवा :
सोशल मीडिया वर एक जुनं टंकलिखित पत्र दाखवलं जात आहे.
या पत्रानुसार पं. नेहरूंनी तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अटली यांना हे पत्र पाठवून त्यात सुभाषबाबूचा उल्लेख ‘युद्ध कैदी’ असा केला आहे!
हे पत्र २६ डिसेंबर १९४५ ला पाठवण्यात आल्याचं दिसतं.परंतु सुभाषचंद्र बोस हे ऑगस्ट १९४५ मध्ये तैवान येथे एका विमान अपघातात मृत्युमुखी पडले!
जेव्हा या पत्राची सत्यता पडताळणीसाठी शोध घेतला असता असं दिसून आलं की हे पत्र पंडितजींनी लिहिलेलं नसून त्यांच्या श्यामलाल जैन नावाच्या स्टेनो ने टाइप केलेलं आहे!
१९७० मध्ये जेव्हा सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्यासाठी खोसला आयोग नेमण्यात आला.
तेव्हा या आयोगासमोर साक्ष देताना श्यामलाल जैन यांनी दावा केला की हे पत्र स्वतः जवाहरलाल नेहरूंनी टाईप करण्यास सांगितलं!
प्रत्यक्षात शोध घेता आढळून आलं की ,पत्रात उल्लेखलेल्या तारखेला म्हणजे २७ डिसेंबर १९४५ ला पं. नेहरू दिल्लीतच हजर नव्हते!
५. सुभाषचंद्र बोस यांचा फोटो असलेल्या नोटा बंद केल्या! – अजून एक खोडसाळ प्रचार :
जुन्या नोटेचा फोटो दाखवून त्या खाली संदेश दिला जात आहे की,
” नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो असलेली ५ रु.ची नोट जी नेहरूंनी जाणीवपूर्वक बंद केली. जेणेकरून सुभाषबाबू च योगदान लोकांच्या विस्मृतीत जावं!
या नोटेला अधिकाधिक शेअर करा म्हणजे सरकार याचा परत चलनात वापर करेल!”
इंटरनेट वर व्हायरल होणाऱ्या या नोटे च्या चित्राची जेव्हा माहिती शोधण्यात आली तेव्हा असं दिसून आलं की ,ही चलनी नोट स्वतंत्र-पूर्व भारतातल्या आझाद हिंद बँकेची आहे.
ही बँक यांगून ,म्यानमार मधे स्थापण्यात आली होती! या बँकेचा मुख्य उद्देश आझाद हिंद सैन्याचा ब्रिटिशां विरोधातला युद्ध खर्च भागवण्याचा होता.
ही नोट कायदेशीर दस्त नव्हती त्यामुळे नेहरू सरकारनी या नोटेवर बंदी आणण्याचा प्रश्नच येत नाही!
६. ब्रिटन च्या मंत्र्याने नेहरूंच्या शैक्षणिक धोरणावर ताशेरे ओढले :
हा व्हिडीओ इंटरनेट वर पसरवून असं सांगितलं जातं आहे की
ब्रिटिश मंत्रिमंडळातील पाहिले मुस्लिम मंत्री यांचा नेहरूंवर खळबळजनक आरोप! नेहरूंनी भारतात हिंदू धर्म पद्धतशीररित्या संपवला! कृपया दोन मिनिटे काढून हा व्हिडीओ पहाच!
या व्हिडीओ मधे दाखवलेले वयोवृद्ध हे ब्रिटन च्या मंत्रिमंडळातील पहिले मुस्लिम मंत्री असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे! व्हिडीओ व्हाट्स अँप वर पसरवला जात आहे.
जेव्हा या व्हिडियो क्लिप विषयी सत्यता जाणून घेतली तेव्हा असं आढळून आलं की,’हिंदू अकॅडमी’ नावाच्या यू ट्यूब चॅनेल वर हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे!
‘हिंदू अकॅडमी’ ही इंग्लंड मधील एक संस्था असून ब्रिटन मध्ये हिंदू धर्माच्या शिक्षणाचा प्रसार करणं हेच त्यांच मुख्य उद्दिष्ट आहे!
या व्हिडिओ मधे असणारे गृहस्थ हे कोणी मुस्लिम मंत्री वैगेरे नसून त्यांचं नाव ‘जय लखाणी’ आहे. त्यांच्या ट्विटर प्रोफाइल वर ते हिंदू धर्माचे शिक्षक असल्याचं लिहिलंय.
लखाणींचा हा व्हिडीओ हिंदुत्त्ववादी गटांकडून मोठ्या प्रमाणात पसरवला जात आहे.
७. नेहरूंना जमावाने केली मारहाण! अजून एक खोटा दावा :
हा फोटो इंटरनेट वर दाखवून सांगितलं जातं आहे की, “१९६२ च्या भारत- चीन युद्धात भारताच्या अपयशा नंतर जमावाने नेहरूंना मारहाण केली!” साधारण २०१३ पासून हा फोटो जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहे.
वास्तव मात्र वेगळं आहे. हे खरं आहे की हा फोटो १९६२ सालचा आहे परंतु तो भारत- चीन युद्धा पूर्वी घेण्यात आला होता.
जानेवारी १९६२ मधे पाटना येथील काँग्रेस च्या अधिवेशनात गर्दी मुळे स्टेज खाली लोकांची धावपळ उडाली तेव्हा ती पळापळ थांबवण्यासाठी नेहरू स्वतः खाली उतरले!
मात्र प्रोटोकॉल नुसार अंगरक्षकांनी त्यांच्या भोवती कडे करून त्यांना अलगद बाजूला घेतले.
८. १९४८ ऑलम्पिक मधे भारतीय फुटबॉल टीम ला पुरेसे अर्थसहाय्य केलं नाही :
सोशल मीडिया वर हे चित्र दाखवण्यात येत आहे.
त्याच्या एका बाजूला खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत आहेत तर दुसऱ्या बाजूला पं. नेहरू आपल्या पाळीव कुत्र्या सोबत विमानातून बाहेर येताना दिसत आहेत.
या चित्रासोबत दावा केला जात आहे की १९४८ ऑलम्पिक मधे जेव्हा खेळाडूंना पायात घालण्यासाठी बूट नव्हते तेव्हा नेहरूंचा कुत्रा सुद्धा हवाई यात्रा करत होता!
मात्र १९४८ ला ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय फूटबॉल टीम ने बूट न घालता खेळण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला होता!
आंतरराष्ट्रीय कायद्याने बूट घालून खेळणं आवश्यक करेपर्यंत भारतीय खेळाडू याच प्रकारे स्पर्धेत खेळ खेळत!
९. १९६५ च्या भारत- पाक युद्धाला नेहरू जबाबदार! अजून एक शोध
“जेव्हा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं तेव्हा माझे एक मित्र कमांडर-इन-चीफ जनरल चौधरी यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची परवानगी मागितली.
लष्कराच्या नियमानुसार हल्ल्या ला प्रतिहल्ल्याने उत्तर देणं जास्त योग्य आहे. तुम्ही बचावात्मक धोरण अवलंबल म्हणजेच तुम्ही हार कबूल केल्यासारखं असतं”
चित्रपट निर्माता विवेक अहनिहोत्री याने मार्च २०१९ मधे या आशयाचं ट्विट केलं होतं.
विवेक, १९६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धाचा उल्लेख करत होते आणि ज्या कमांडर विषयी त्यांनी लिहलं होतं ते होते जनरल जयंतो नाथ चौधरी! ते १९६२-१९६६ दरम्यान लष्कर प्रमुख होते.
अग्निहोत्री त्यांच्या ट्विट मध्ये १९६५ च्या भारत- पाक युद्धासाठी नेहरूंनी परवानगी नाकारल्याच सांगतात परंतु तिथेच ते एक मोठी चूक करून बसले. कारण, पं. नेहरूंचा मृत्यू १९६४ मधे झाला होता.
भारत- पाक युद्ध जे १९६५ ला झालं तेव्हा लालबहादूर शास्त्री जी पंतप्रधान होते!
हा प्रकार फक्त पं. नेहरूं च्या बाबतीत होतो असं नाही तर महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महापुरुषांवर मजबूत चिखलफेक इंटरनेटवर चालते.
या प्रकारच्या कित्येक खोट्या बातम्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला तडा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेला असतो. भारताच्या जडणघडणीत अनेक नेत्यांच योगदान आहे.
परंतु एका मोठ्या नेत्याचं या प्रकारे खच्चीकरण करणं आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार लज्जास्पद आहे. वाचकांनी सुद्धा या खोट्या बातम्या शेयर करण्यापूर्वी खरी माहिती घेतलीच पाहिजे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.