स्वकर्तृत्वाने नारीशक्तीचा अर्थ सिद्ध करणाऱ्या या ११ भारतीय महिलांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतात अशी ओरड आहे की इथे स्त्रीला सक्षम करण्यासाठी यंत्रणाच मुळात सक्षम नाही. अर्थात ते काही प्रमाणात खरेही आहे.
स्त्रियांना संधी मिळत नाही किंवा घरगुती अडचणीमुळे फारसं काही करता येत नाही.
अशी परिस्थिती असून देखील भारतातल्या काही स्त्रिया अशा आहेत की, अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आणि आणि नारीशक्ती म्हणजे काय याचा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
अशाच काही कर्तुत्ववान महिलांनी आपल्या कामाने स्वतःचा ठसा उमटविला आहे.
इथल्या कुठल्याही सिस्टीमला नावं न ठेवता किंवा कसलीही तक्रार न करता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आज या महिला समाजात एक आदराचे स्थान मिळवून आहेत.
१. इंद्रा नुयी :
पेप्सिको या कंपनीच्या सीईओ इंद्रा कृष्णमूर्ती नुयी. जेव्हा त्या पेप्सिको या प्रसिद्ध कंपनीच्या सीईओ झाल्या त्यावेळेस त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं.
१९९८ मध्ये त्यांनी पेप्सिको जॉईन केली होती. परंतु स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि कार्यकुशलतेच्या बळावर त्या पेप्सिकोच्या सीईओ बनल्या.
२०१७ मध्ये फोर्ब्ज मासिकात जगभरातल्या १०० शक्तिशाली महीलांमध्ये त्यांचं स्थान ११ वं होतं. तर फॉर्च्यून मासिकाने त्यांना दुसरं स्थान दिलं.
अत्यंत शिस्तबद्ध आणि परिणामकारक काम करून त्यांनी पेप्सिको कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं आहे.
२. अरुंधती रॉय:
‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ‘या पहिल्याच पुस्तकाला बुकर प्राइज मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय. जीवनातल्या अनेक क्षेत्रात त्यांनी मुक्त संचार केला.
आर्किटेक्चर मध्ये शिक्षण पूर्ण केलं. तरीही करिअरच्या सुरुवातीला काही शॉर्टफिल्म साठी लेखन केलं. एक्टिंग करूनही पाहिली. परंतु शेवटी आता त्या एक सामाजिक कार्यकर्त्या बनल्या आहेत.
पर्यावरण आणि मानवाधिकार यासाठी त्या कामही करतात. लेखिका म्हणून तर त्या प्रसिद्ध आहेतच, त्यांच्या लेखनाचे अनेक चहातेही आहेत.
त्यांच्या अनेक भूमिका ह्या विवादास्पद असतात. त्यासाठी त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीकाही होते.
तरीदेखील अरुंधती रॉय म्हणजे स्वतःच्या मनाला पटेल तेच करणारी व्यक्ती.
३. मेरी कोम :
भारताला बॉक्सिंग मध्ये मानाचं स्थान देणारी खेळाडू म्हणजे मेरी कोम. ईशान्येकडील एका छोट्या गावातून अत्यंत गरीब घरातून बॉक्सिंग मध्ये जिने नाव कमावलं ती मेरी कोम.
बॉक्सिंगसारख्या वेगळ्या क्षेत्राचं दालन भारतातल्या महिलांना खुलं करणारी मेरी कोम आता सगळ्यांनाच माहीत आहे.
ऑलिंपिक मध्ये भारताच्या महिला बॉक्सिंग टीमचं प्रतिनिधित्व तिने केले. ती पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चंपियन झाली.
सलग सहा सामन्यांमध्ये गोल्ड मेडल मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. इथपर्यंत येण्यासाठीचा तिचा प्रवास सोपा नव्हता.
प्रचंड मेहनत, भरपूर सराव आणि अनेक अडचणींवर मात करत ती स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर ती इथवर आली.
लग्न झाल्यानंतर आणि मूल झाल्यानंतर काही काळ तिने स्वतःला बॉक्सिंग पासून वेगळे केले. परंतु नंतर तिने बॉक्सिंग मध्ये कमबॅक केलं आणि परत एकदा भारताला बॉक्सिंगमध्ये मेडल्स मिळवून दिले.
तिचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे.
४. सीमा राव :
भारताची वंडर वुमन अशी सीमा राव हिची ओळख. याचं कारण म्हणजे ती भारतातली पहिली कमांडो ट्रेनर आहे.
पेशाने ती डॉक्टर आहे तरीही आपत्कालीन स्थितीत कशाप्रकारे काम केलं पाहिजे यात तिने एम बी ए केलं आहे.
मेजर दिपक राव या आपल्या पतीबरोबर तिने आत्तापर्यंत १५००० कमांडोजना ट्रेनिंग दिलं आहे.
ब्रुसली क्या ‘जीत कुने दो ‘ या मार्शल आर्टची पद्धत जगातल्या ज्या दहा महिलांनी शिकली आहे त्यातली एक सीमा राव. अत्यंत वेगळं असं क्षेत्र तिनं आपलं करिअर म्हणून निवडलं आहे.
५. इरोम शर्मिला :
भारताची ‘आयर्न लेडी’ असं तिला म्हटलं जातं. नागरी हक्कांसाठी लढणारी आणि ते मिळवण्याची प्रचंड इच्छाशक्ती बाळगणारी व्यक्ती म्हणून इरोम शर्मिला ओळखली जाते.
ईशान्येकडील राज्यांमध्ये भारत सरकारने भारतीय सशस्त्र दलाला तैनात करून त्यांना अनिर्बंध अधिकार दिले याच्याविरोधात इरोम शर्मिलाने उपोषण सुरू केले.
आणि ते उपोषण जवळजवळ सोळा वर्ष सतत चालू होते. तिने अन्नपाणी सोडले भारत सरकारने तिचा जीव जाऊ नये म्हणून तिला दवाखान्यात ठेवले आणि तिचे प्राण वाचवले.
तिचे उपोषण जगातले सगळ्यात दीर्घकाळ चाललेले उपोषण आहे.
६. किरण बेदी :
भारतीय पोलिस सेवेत पहिली महिला पोलीस अधिकारी बनणारी व्यक्ती म्हणजे किरण बेदी. जवळजवळ ३५ वर्ष त्या भारतीय पोलिस सेवेत होत्या.
अनेक धडाडीचे निर्णय घेणे, महिलांविरुद्ध जे अत्याचार करतील त्यांना शिक्षा करणे, अनेक खतरनाक गुन्हेगारांना पकडणे यासाठी त्या प्रसिद्ध होत्या.
अगदी तिहार जेल मधल्या त्या जेलर झाल्या तिथेही त्याने अनेक सुधारणा करून दाखवल्या. त्यांच्या या कामाची दखल युनायटेड नेशन्सनेही घेतली.
२००३ मध्ये युनायटेड नेशन्सच्या सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात, तसेच लेखनही करतात.
परंतु किरण बेदींमुळे देशातल्या कितीतरी मुलींना पोलीस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली.
७. बरखा दत्त :
एनडीटीवी न्यूज चॅनेलच नाव घेतलं की बरखा दत्त आठवते.
अत्यंत आक्रमकपणे, कशाचीही भीडभाड न ठेवता एखाद्या विषयावर चर्चा घेणे,मत मांडणे बातम्या सांगणे अशा सगळ्या भूमिका बरखा दत्तने हिरीरीने वठवल्या.
१९९९ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळेस त्या जास्त चर्चेत आल्या. कारण त्यांनी कारगिलच्या युद्धभूमीवर जाऊन पहिल्यांदाच तिथून रिपोर्टिंग करणं चालू केलं.
त्यावेळेस त्यांचा हाच गुण त्यावेळेस खूप वाखाणला गेला. त्यानंतर टेलिव्हिजन क्षेत्रात जी क्रांती झाली त्यातून अनेक मुली त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
पुढे बरखा दत्त एकसारखीच मते मांडतात म्हणूनही त्यांच्यावर खूप टीका झाली किंवा अजूनही होते.
तरीही टेलिव्हिजन न्यूज क्षेत्रात बरखा दत्त यांचे नाव मोठं आहे.
८. सुषमा स्वराज :
भारतीय राजकारणाच्या पटलावरील एक सक्षम स्त्री नेतृत्व म्हणजे सुषमा स्वराज.
ओघवती हिंदी, स्पष्ट बोलणे, दमदार आवाज आणि विचारातील सुस्पष्टता आणि सलगता सुषमा स्वराज यांच्याकडे होती. कॅबिनेट मिनिस्टर बनणाऱ्या त्या सगळ्यात तरुण मंत्री होत्या.
त्यावेळेस त्यांचं वय फक्त पंचवीस वर्ष होतं. इंदिरा गांधी नंतर देशाच्या परराष्ट्र मंत्री बनणाऱ्या त्या दुसऱ्याच महिला होत.
त्या व्यवसायाने वकील होत्या परंतु त्यांचा ओढा मात्र राजकारणाकडे होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे त्यांचे आदर्श.
पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळात देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी वेळोवेळी अत्यंत खंबीर आणि योग्य भूमिका घेतलेली दिसून येते. राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या.
९. शोभना चंद्रकुमार पिल्लाई :
भरतनाट्यम मधील सर्वोत्कृष्ट कलाकार. तेराव्या वर्षापासून साउथ इंडियन सिनेमांमध्ये भूमिकाही केल्या. दोन वेळेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी पटकावला.
आपलं करियर आणि इतर छंद यांनाच शोभना यांनी प्राथमिकता दिली. परिणामी त्या अविवाहित राहिल्या.
मात्र एका मुलीला त्यांनी दत्तक घेतले आहे आणि तिचं नाव अनंता नारायणी ठेवले आहे.
१०. सालुमारदा थिंमक्का :
कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला वयाचं बंधन नसतं हे सालुमारदा थिंमक्का यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं.
त्या मजूर म्हणून काम करायच्या. परंतु त्यांना आणि त्यांच्या नवऱ्याला जेव्हा समजलं की ते आई-वडील होऊ शकणार नाहीत, तेव्हा त्याने झाडे लावायला सुरुवात केली.
आत्तापर्यंत त्यांनी आठ हजाराहून जास्त वडाची झाडे लावलेली आहेत. झाडांवर मुलांप्रमाणे प्रेम केलं आहे. त्यांच्या या कृत्याची दखल बीबीसीनेही घेतली आहे.
२०१६ सालच्या, समाजावर प्रभाव टाकणाऱ्या १०० व्यक्तींमध्ये, या १०५ वर्षांच्या आजींचा समावेश बीबीसी ने केला आहे.
११. लक्ष्मी अग्रवाल :
भारतात महिलांवर होणाऱ्या हल्ल्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे लक्ष्मी अग्रवाल. वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्यावर ॲसिड हल्ला झाला. ज्यामुळे तिचं आयुष्य उध्वस्त व्हायची वेळ आली.
पण त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुढे मग अशा हल्ल्यात जखमी होणाऱ्या मुलींसाठी काम करायला तिने सुरुवात केली.
अशाप्रकारचं ॲसिड सहजासहजी उपलब्ध होऊ नये यासाठी याचिका दाखल केली.
आणि सुप्रीम कोर्टानेही तिच्या या याचिकेची दखल घेतली आणि केंद्राला आणि राज्यांना ॲसिड विक्रीबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
भारतीय लग्नांमध्ये बाह्य सौंदर्याला महत्व असल्यामुळे ती आणि तिचा जोडीदार आलोक दिक्षित हे आता लग्न न करता लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत आहेत.
ही आहेत काही सक्षम महिलांची उदाहरणे. अशाच अनेक महिला भारतात आजही खंबीरपणे उभ्या आहेत आणि स्वतःचा वेगळा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.