आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोनाव्हायरस लॉकडाऊनच्या या काळात जुन्या “रामायण’, ‘महाभारत’ इत्यादी मालिका टिव्हीवरून पुनःप्रसारीत झाल्या आणि दर्शक देखील या मालिकांचा आनंद घेऊ लागले.
त्यावर सोशल माध्यमांतून चर्चा करू लागले. त्यात काम केलेल्या सगळ्या अभिनेत्यांना पुन्हा लोकप्रियता मिळू लागली.
नव्वदच्या दशकांत जेव्हा ह्या मालिका प्रथम दूरदर्शनवरून प्रसारीत झाल्या तेव्हा घराघरातील लोक टिव्हीसमोर एकत्र बसत. रस्ते सामसूम होत. प्रत्येकजण या मालिकेची वेळ चुकवत नसे.
इतकी अमाप लोकप्रियता या मालिकांनी मिळवली होती. आणि अर्थात त्यातील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय झाले होते.
तेव्हाच्या कलाकारांना पुन्हा मिळतेय लोकप्रियता –
‘रामायण’, महाभारत’ इत्यादी जुन्या मालिका आज जवळपास ३२-३३ वर्षांनी पुन्हा टिव्हीवर आल्यामुळे त्या मालिकेत काम करणारे ऍक्टर्स आज खुश आहेत.
त्यांच्याही जुन्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या आहेत. ते देखील त्या आठवणीत रमत आहेत. विविध माध्यमांवर त्यांच्या नव्याने मुलाखती रंगत आहेत.
नव्वदच्या दशकांत दूरदर्शनवर गाजलेल्या महाभारत या मालिकेत अर्जूनाचं काम करणारा अभिनेता हा मुस्लिम धर्मीय असून त्याचं खरं नाव फिरोजखान होतं.
अशीच एक मुलाखत नुकतीच झाली ती बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत काम करणाऱ्या फिरोज खानची.
या अभिनेत्याने या मालिकेत अर्जूनाचा रोल केल्यानंतर आपले नावच बदलून अर्जून केले होते.
अर्जून हे महाभारतातील मुख्य पात्र –
आपल्या सर्वांना ठाऊक आहे, की अर्जून हे महाभारतातील एक मुख्य आणि महत्त्वाचे पात्र आहे. साहजिकच या भूमिकेसाठी तेव्हा अनेक दिग्गज कलाकारांनी प्रयत्न केला होता.
त्यातच जॅकी श्रॉफ हे देखील एक नाव होते. सुरुवातीला अर्जूनाची भूमिका जॅकी श्रॉफ करणार अशी बातमी होती.
मात्र नंतर काही कारणांनी त्यांच्याऐवजी फिरोजखान या मुस्लिम कलाकाराला या भूमिकेसाठी निवडले गेले.
असं म्हणतात, की अर्जूनाच्या या भूमिकेसाठी तेव्हा जवळपास वीस हजारांहून अधिक कलाकारांची ऑडिशन घेतली गेली होती! कारण ती भूमिकाच तशी महत्त्वाची होती.
महाभारतातील शूर धनुर्धर अर्जून हे महाभारतातील एक महत्त्वाचे प्रमुख पात्र. त्यासाठी तशाच ताकदवर आणि त्या भूमिकेत सूट होईल अशा कलाकाराची गरज होती.
अर्जून उर्फ फिरोजखान या भूमिकेत फिट बसला. या मालिकेचे वैशिष्ट्यच असे होते, की यात काम केलेला प्रत्येक कलाकार या भूमिकेसाठी अगदी फिट होता.
असं वाटायचं की यातील प्रत्येक भूमिका निभावणारा कलाकार हा कलाकार नसून प्रत्यक्ष ते ते पात्रच आहे. लोक या सर्व कलाकारांच्या प्रेमांत होते.
ते जिथे जात तिथे त्यांना खरोखरचे पांडव, द्रौपदी, राम, सीता इत्यादी समजून त्यांच्याशी तशाच प्रकारे वागले जात असे.
अर्जून उर्फ फिरोजखानला ही भूमिका कशी मिळाली?
नुकत्याच ‘हिंदूस्तान टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्याला ही भूमिका कशी मिळाली आणि त्यानंतर आपण आपले खरे नाव बदलून अर्जून हे नाव का स्वीकारले याबद्दल सांगितले आहे.
या मुलाखतीत आपल्या आठवणी सांगताना अर्जून म्हणाला,
की या मालिकेच्या ऑडीशनसाठी जेव्हा तो बी. आर. चोप्रांच्या ऑफिसमध्ये पोचला तेव्हा तिथे दिपक पराशर, गोविंदा आणि राज बब्बर बसलेले होते.
गोविंदाच्या सांगण्यावरूनच त्याने महाभारत या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. ऑडीशनसाठी त्याला दोन पानी स्क्रिप्ट वाचायला दिले होते. ते स्क्रिप्ट हिंदीत होते.
पण फिरोजखानला हिंदी तितकीशी चांगली जमत नव्हती. त्याने गोविंदाला रिक्वेस्ट करून त्याच्याकडून ती स्क्रिप्ट वाचून घेतली आणि रोमन लिपीत लिहून काढली.
अर्जून म्हणतो, की हा रोल त्याला केवळ सुदैवानेच मिळाला. कारण अर्जूनाची भूमिका त्या आधी जॅकी श्रॉफला देण्यात आली होती.
अर्जून म्हणतो, ऑडीशननंतर एक आठवडा उलटला तरी मला बी. आर. चोप्रा यांच्या ऑफिसमधून काही फोन आला नाही, म्हणून मी पुन्हा त्यांच्या ऑफिसमध्ये पोचलो.
तिथे मला त्या भूमिकेतील पोशाख घालून मिशा लावायला सांगितले गेले. मी त्याप्रमाणे तयार होऊन पहिल्या मजल्यावरच्या बी.आर. चोप्रा यांच्या केबिनमध्ये पोचलो.
तिथे त्यांच्याबरोबर मालिकेचे लेखक श्री. राही मासूम रझा आणि पंडित नरेंद्र शर्मा बसलेले होते. त्यांनी मला सांगितलं की अर्जूनच्या भूमिकेसाठी तुझी निवड झालेली आहे.’
फिरोजखानने आपले नाव बदलून ‘अर्जून’ हे नाव का स्वीकारले?
अर्जून म्हणतो, की या मालिकेने मला अमाप लोकप्रियता दिली आणि माझ्यासाठी अभिनयाचे दरवाजेही खुले केले.
परंतु मी जेव्हा कुणा प्रोड्यूसरला किंवा दिग्दर्शकाला फोन करायचो तेव्हा फिरोजखान हे नाव ऐकून त्यांना मी ‘कुर्बानी’ सिनेमातला प्रसिद्ध फिरोजखान वाटायचो.
जेव्हा तो हा फिरोजखान नाही असं कळलं की ते नंतर फोन कर म्हणून सांगायचे. अशाने त्याला खूप अपमानित झाल्यासारखे वाटायचे.
त्याने ही गोष्ट राही मासूम रजा आणि बी. आर. चोप्रा यांना सांगितली तेव्हा त्यांनी त्याला नाव बदलून ‘अर्जून’ हेच नाव स्वीकारण्याचा सल्ला दिला.
अर्जून म्हणतो, या नावाने मला अमाप लोकप्रियता दिली. मी कधी कल्पनाही केली नव्हती इतकी प्रसिद्धी आणि पैसा मला या भूमिकेने मिळवून दिले.
लोक मला अर्जून या नावानेच ओळखू लागले होते. एवढंच नव्हे, तर माझी आई देखील मला अर्जून म्हणूनच हाक मारू लागली होती.
आणि म्हणून मी माझे फिरोजखान हे मूळ नाव बदलून सिनेक्षेत्रासाठी अर्जून हेच नाव स्वीकारले.
या मालिकेनंतर अर्जूनने जवळपास पन्नासहून अधिक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.
त्यात ‘कयामत से कयामत तक’, ‘करण-अर्जून’, ‘साजन चले ससुराल’ ‘आ गले लग जा’, ‘मोहोब्बत’ इत्यादी गाजलेले सिनेमेही आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.