Site icon InMarathi

मोगरा मुळात सौंदर्य प्रसाधन नव्हेच! जाणून घ्या, मोगऱ्याची “खरी” जादू…!

jasmine featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पांढरा शुभ्र मोगरा कुणाला माहिती नाही? आणि त्याचा धुंद करणारा सुगंधही? उन्हाळ्यात मोगऱ्याची फुलं अधिक बहरतात. मोगऱ्याचे अनेक प्रकार आहेत.

त्यात ‘मदनबाण’ म्हणून ओळखला जाणारा एकेरी पाकळ्यांचा मोगरा हा अधिक लोकप्रिय तसेच अधिक गुणकारी आहे. आयुर्वेदातही या मोगऱ्याचे महत्त्व खूप वर्णिलेले आहे.

काही ठिकाणी हा अरेबियन जास्मिन म्हणून देखील ओळखला जातो. मोगऱ्याचे फूल खूपच गुणकारी आहे. त्याचे अनेक फायदे आहेत.

भारतातील अनेक ठिकाणच्या स्त्रिया मोगऱ्याचा वापर आपल्या केसांत माळण्यासाठी आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी करतात.

 

weddingsonline.in

 

परंतु मोगऱ्याचा फक्त तेवढाच उपयोग नाही. सजावटीसाठी मोगऱ्याचा वापर केला जातो. इजिप्त आणि ग्रीक देशात अरोमाथेरपीमध्ये मोगऱ्याचा वापर महत्त्वाचा मानला जातो.

चायनामध्ये ग्रीन टीचा स्वाद वाढवण्यासाठी मोगऱ्याच्या फुलाचा वापर केला जातो. तो जास्मिन टी म्हणून ओळखला जातो.

चला तर बघू या मोगऱ्याचे काय काय आणि कसे फायदे आहेत ते –

१. मोगऱ्याचा सुगंध –

मोगऱ्याचा सुगंध इतका परिणामकारक आहे की त्याच्या वासाने आल्हादक वाटतं. मन लगेच प्रसन्न होतं.

त्यामुळे मोगऱ्याचा वापर चित्तवृत्ती प्रसन्न करण्यासाठी आणि मनावरील औदासिन्य झटकण्यासाठी याचा उपयोग होतो. मोगऱ्याच्या फुलांचा वापर करून त्यापासून मोगऱ्याचे अत्तर बनवले जाते.

 

freepik.com

 

फुलांचा सिझन नसेल, तेव्हा मोगऱ्याचे हे अत्तर देखील तुमच्या चित्तवृत्ती खुलवण्याचे काम करते.

२. त्वचेसाठी –

• मोगरा हा नैसर्गिक डिओडरन्ट आहे. मोगऱ्याचे एक फुल जर तुम्ही केसांत माळले अथवा शर्टच्या खिशात ठेवले तर ते तुमच्या शरीरातून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीला दूर ठेवते.

फूल नसेल तर तुम्ही मोगऱ्याचे अत्तर किंवा परफ्यूम देखील वापरू शकता.

• जस्मिन ऑईलचे काही थेंब तुम्ही तुमच्या बाथ टबमध्ये टाका आणि दहा मिनिटे त्या पाण्यात डुंबून राहा आणि फरक अनुभवा.

किंवा मोगऱ्याच्या तेलाचे दोन थेंब ऍलोव्हेरा लोशनमध्ये टाकून त्वचेवर लावा. तुमची त्वचा नक्की मऊ होईल. आणि तुम्हाला प्रसन्नही वाटेल.

• जास्मिन ऑईलचे काही थेंब पेट्रोलियम जेलीमध्ये किंवा नारळाच्या तेलात टाकून त्वचेवरील डाग आणि चट्टे यावर लावल्यास ते दूर होण्यास मदत होते.

त्वचा जर काळवंडली असेल तर किंवा रुक्ष पडली असेल, तरी या मिश्रणाने ती मुलायम आणि उजळ होण्यास मदत होते.

 

naturallycurly.com

 

• जास्मिन टी प्यायल्याने शरीरावरच्या जखमा, व्रण लवकर भरून येण्यास मदत होते. सनबर्नमुळे त्वचेवर उठलेले पुरळ आणि लालसरपणा जास्मिन टी प्यायल्याने कमी होता.

त्वचेवर होणारे कॉर्न्स देखील या मोगऱ्याच्या चहाने कमी होतात.

• जास्मिन ऑईलच्या ऍलोव्हेरा बरोबरील मिश्रणाने चेहऱ्यावरील पिंपल्स (मुरुम) तर बरे होतातच पण मुरुमांचे डाग राहिले असतील तर तेही दूर होतात.

जस्मिन ऑईल हे त्वचेला मॉयश्चराझर पुरवते. व अशाप्रकारे वातावरणाच्या परिणामांपासून त्वचेचे रक्षण करते.

• मोगऱ्याच्या फुलांत आणि त्यापासून काढलेल्या त्याच्या तेलात ऍन्टी बॅक्टेरिअल, ऍन्टीसेप्टीक आणि ऍन्टीव्हायरल गुण असतात.

त्यामुळे हे शक्य होतं आणि त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांवर ते गुणकारी ठरतं.

 

३. केसांसाठी फायदे –

• केसांच्या सजावटीसाठी पुरातन काळापासून फुलांचा वापर केला जातो. त्यात मोगऱा गुलाब आदींना प्रथम पसंती असते.

आपल्या इथे देखील स्त्रियांना मोगऱ्याची फुलं आणि गजरे अती प्रिय असतात. त्याने केसांचे सौंदर्य तर खुलतेच आणि केसांना सुगंधही प्राप्त होतो. 

• मोगरा हे नॅचरल कंडीशनर आहे. यासाठी साध्या पाण्यात मोगऱ्याची १० ते १५ फुलं भिजत ठेवा. केस धुवून झाले की शेवटी या पाण्याने केस धुवा.

बेकींग सोडा मध्ये मिक्स करून शाम्पूसारखा उपयोगही करू शकतो. मोगऱ्याचे हे पाणी केस धुताना शेवटी सिरम म्हणून पण वापरू शकतो.

 

prekashi.com

 

मोगऱ्याचे तेल कुरळ्या आणि भुरभुरणाऱ्या केसांवर वापरल्यास केसांना चांगले वळण देता येते आणि केसांना पोषणही.

• मोगऱ्याच्या पानांचा अर्क केसांच्या मुळांना मजबूत बनवतो आणि त्यांना दाट बनवतो. नारळाच्या तेलात जास्मिनचा अर्क टाकून ते केसांच्या मुळांना लावल्यास मुळं मजबूत होतात.

• मोगऱ्याची ओंजळभरून फुलं कोणत्याही तेलात टाका (उदा. नारळाचे, बदामाचे किंवा केसांना लावता येईल असे इतर कोणतेही) आणि ते तेल केसांच्या मुळांना त्वचेवर नियमित लावल्यास केसांमधील उवा, लिखा दूर होतात.

• जस्मिन ऑईल हे इतर कोणत्याही, उदा. नारळ, बदाम इत्यादी तेलांत मिक्स करून केसांना नियमित लावल्यास डोक्याची त्वचाही मऊ राहते. त्यामुळे केसांत कोंडा होण्याचे प्रमाण कमी होते.

 

nykaa.com

 

त्यामुळे तुमच्या केसांत वारंवार कोंडा होत असेल, आणि डोक्याची त्वचा रुक्ष होऊन खाज येत असेल, तर मोगऱ्याच्या तेलाचे दोन थेंब साध्या तेलात टाकून ते नियमित केसांना लावा.

• पावसाळा आला की डोक्यात फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात.

मोगऱ्याच्या फुलांमध्ये ऍन्टीबॅक्टेरिअल तत्व असल्याने ओंजळभर फुलं नारळाच्या तेलात टाकून ते केसांखालच्या त्वचेला लावल्यास असे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.

४. आरोग्यासाठी मोगऱ्याचे फायदे –

• मोगरा हा नैसर्गिक कामोत्तेजक आहे. प्राचीन काळापासून मोगऱ्याचा वापर कामवासना वाढवण्यासाठी केला जातो. म्हणूनच नवदांपत्यांच्या बिछान्यावर मोगऱ्याच्या फुलांची सजावट केली जाते.

 

dreamstime.com

 

• वर पाहिल्याप्रमाणे जास्मिन हे ऍन्टीसेप्टीक म्हणूनही काम करत असल्याने जास्मिन टी शरीरावरच्या जखमा आणि व्रण कमी करण्यास मदत करतो.

• या फुलावर केलेल्या अभ्यासातून ही मोगऱ्याची फुलं कर्करोगाविरोधात चांगले काम करत असल्याचे दिसून आलेले आहे.

मोगऱ्याच्या पानांचा आणि फुलांचा उपयोग स्तनांच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी केला गेला आहे.

• डोकं किंवा पाठ दुखत असेल तर जास्मिन ऑईलचे दोन थेंब लावून थोडं चोळा. लगेच आराम पडेल.

• सर्दी पडसे झाल्यास ओंजळभर फुलं घेऊन त्याचा सुगंध घ्या. त्याच्यातील नैसर्गिक तत्व तुमचे चोंदलेले नाक मोकळे करतात आणि तुम्हाला शांत झोप लागते.

• डिप्रेशन आलं असेल, मूड नसेल, तर मोगऱ्याच्या फुलांचा किंवा अत्तराचा सुगंध तुम्हाला लगेच फ्रेश करतो.

• घोरण्याची सवय असेल, तर मोगऱ्याचा सुगंध झोपण्याआधी नियमित घेण्याची सवय ठेवल्यास घोरण्याची सवय कमी होते.

 

mgsfl.com

 

• ग्रीन, ब्लॅक किंवा व्हाईट टीसोबत जास्मिनची फुलं टाकून तो प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यालाच जास्मिन टी देखील म्हणतात. या चहाने शरीरातील मेटाबोलिझम वाढतो.

• ताप आला असेल, तर मोगऱ्याची फुलं थंड असल्याने ती ताप कमी करण्यास मदत करतात.

• मासिक पाळीत पोटात खूप दुखत असेल तर जास्मिन ऑईलचे दोन थेंब तीळाच्या तेलात टाकून त्याने ओटीपोटावर मसाज केल्यास दुखणे कमी होते.

• याचप्रमाणे जास्मिन ऑईलचे चार थेंब जोजोबा ऑईलमध्ये टाकून ते पोटावर चोळल्यास बाळंतपण सहजपणे होण्यास मदत होते.

• जास्मिन टी शरीरातले इन्शुलिनचे प्रमाण योग्य ठेवून डायबेटीस कमी होण्यास मदत करते.

• जास्मिन टी ने शरीरातील कॉलेस्ट्रोलचे प्रमाण देखील नियमित राहते.

हा इतका उपयोगी जास्मिन टी कसा बनवायचा ते आता पाहू –

 

blogs.piquetea.com

 

साहित्य –

• मोगऱ्याच्या फुलाच्या पाकळ्या १० ते १२

• ग्रीन टीची पाने आवश्यकतेप्रमाणे

• गरम पाणी

• साखर किंवा मध

कृती – मोगऱ्याच्या पाकळ्या आणि ग्रीन टीची पाने एकत्र करून रात्रभर ठेवून द्या. सकाळी ती पाने वेगळी करा आणि त्यातून मोगऱ्याच्या पाकळ्या काढून टाका.

ग्रीन टीची पाने एका बंद डब्यात घट्ट झाकण लावून ठेवून द्या. चहा करताना गरम पाण्यात ती पाने आवश्यकतेनुसार टाका.

३ ते ५ मिनिटे ठेवून द्या. नंतर गाळून घ्या. चवीनुसार त्यात चमचाभर मध किंवा साखर टाका आणि प्या. तर असे आहेत मोगऱ्याच्या फुलाचे अगणित फायदे. दारात मोगरा लावा आणि याचा लाभ तुम्हीही घ्या.

हे मोगऱ्याचे विविध फायदे म्हणजे एक वेगळीच जादू आहे, हा मोगरा सौंदर्य तर वाढवतोच पण त्याशिवाय आपल्या आयुष्यातील बारीक सारिक गोष्टींसाठी किती उपयुक्त आहे ते यावरून आपल्याला समजते!

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version