Site icon InMarathi

हिटलर – सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या भेटीतील, टिळक आणि गौतम बुद्धांचं कनेक्शन!

subhashchandra bose meet hitler inmarathi

scroll.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं कुणी क्वचितच सापडेल ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव माहीत नसावं! भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात जितका गांधी, नेहरू इत्यादि मंडळींचा वाटा असला तरी त्यापेक्षा काकणभर जास्त योगदान नेताजींचं आहे!

असं तडफदार नेतृत्व पुन्हा होणं मुश्किलच, वैचारिक मतभेदांमुळे जर नेताजी कॉँग्रेस मधून बाहेर पडले नसते तर आज चित्र काही वेगळंच असतं! 

नेताजींनी आपल्या देशासाठी जो त्याग केला आहे तो शब्दांत मांडणं कठीण आहे!

अगदी परदेशी नोकरीला लाथ मारण्यापासून देशाबाहेर जाऊन इतर देशांशी हातमिळवणी करून एक स्वतंत्र आर्मी तयार करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रचंड प्रेरणा देणारा आहे!

 

 

नेताजींचा मृत्यू हा सुद्धा आजवर न उलगडलेलं एक रहस्यच आहे! तितकंच कुतूहल लोकांना त्यांनी घेतलेल्या हिटलरच्या भेटीबद्दल देखील आहे.

नेताजी बोस यांनी जेव्हा हिटलरला भेटायचे ठरवले, तेव्हा त्यांची पत्नी एमिली हिला ते फारसे आवडले नव्हते.

हिटलरसारख्या माणसाला भेटल्याने सुभाषचंद्रांवर टिका होईल असे तिला वाटत होते. आणि ते खरेही होते. एमिलीची शंका रास्तही होती. हिटलर हे नावच तसे होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

परंतु त्यावेळी नेताजी दुसऱ्याच काळजीत होते. नियमाप्रमाणे जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याला तुम्ही भेटायला जाता, तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू नेणे हे रीतीला धरून असते.

परंतु हिटलरसारख्या गूढ, गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असलेल्या माणसाठी नेमके काय न्यावे हे नेताजींना सुचत नव्हते. म्हणून मग त्यांनी आपल्या पत्नीचाच सल्ला घ्यायचे ठरवले.

तिने त्यांना एखादं दुर्मिळ पुस्तक किंवा एखादं पेन्टींग घेऊन जाण्याबद्दल सुचवलं. कारण हिटलर पूर्वी चांगला चित्रकार होता हे तिला ठाऊक होतं.

 

 

परंतु सुभाषबाबूंचं म्हणणं होतं की ती फार जुनी गोष्ट झाली आता. ‘बघू. विचार करतो काय न्यावं ते’ असं म्हणून त्यांनी शेवटी एक गिफ्ट नेण्याचं मनोमन नक्की केलं.

परराष्ट्रमंत्री रिबेन्ट्रॉप यांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर नेताजी बोस यांची हिटलरशी ही मुलाखत घडवून आणली होती.

नक्की झालेल्या तारखा दोनदा बदलल्यानंतर शेवटी २९ मे १९४२ ला ही मुलाखत घडून आली.

ही परस्परविरोधी विचारांच्या परंतु कॉमन हेतू असलेल्या दोन नेत्यांची बैठक होती. हीटलर तेव्हा प्रशियाजवळच्या रेस्टनबर्ग येथील काल्फास केझ नेझ या मिलिट्री बेस कॅम्पवर होता.

या मुलाखतीसाठी नेताजी बोस २८ मे ला बर्लिनवरून स्पेशल विमानाने प्रशिया येथे जायला निघाले. केपलर आणि ऍडम ट्रॉट हे दोघे त्यांच्याबरोबर होते.

हिटलरला भेटायला जायचे म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखे होते. परंतु नेताजी आपल्या ध्येयाप्रती ठाम आणि निश्चयी असल्याने त्यांना जराही भीती वाटत नव्हती.

 

विमानतळावर नेताजींना घेण्यासाठी रिबेन्ट्रॉप स्वतः आले होते. त्यांच्याबरोबर हिटलरच्या खास वर्तुळातले बरेच अधिकारीही होते. भारतातून आलेल्या या नेत्याला भेटायला ते सारेच उत्सुक होते.

सर्वात आधी परराष्ट्रमंत्री यांनी प्रोफेसर वेस्ट यांची नेताजींना ओळख करून दिली. मार्टीन बॉर्मन हे हिटलरचे स्पेशल दूत देखील आले होते.

“मिस्टर बोस, तुमच्याकडे टिळकांच्या गीता रहस्याची नवीन आवृत्ती आहे का?”

त्यांच्या या प्रश्नावर नेताजी थक्क झाले. त्यांना तसं पाहून ते म्हणाले,

“मी आजही म्युनिक विद्यापीठात शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करतो. आणि तुमच्या देशातील कालिदास, भवभूती यासारख्या थोर पुरुषांचे साहित्य माझ्या घरातल्या पुस्तकांमध्ये विराजमान आहे. तुमच्या लोकमान्य टिळकांचे साहित्यही माझ्या आवडीचे आहे.”

 

मग असा माणूस हिटलरसोबत कसा काय असा प्रश्न नेताजींनाही पडला. त्यावर हिमलर हा त्यांचा प्रिय मित्र असून त्याच्यामुळे त्यांना या नेत्यांसोबत काही क्षण घालवण्याची संधी मिळते असं कळलं.

हिटलरच्या वर्तुळात अशा बुद्धिमान लोकांचा समावेश आहे आहे हे पाहून नेताजींना बरं वाटलं.

हिटलरचे निकटवर्तीय, हिमलर आणि गोअरींग यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या रात्री रिबेन्ट्रॉप यांनी मेजवानीची व्यवस्था केली होती.

अर्थातच आपल्या भेटीस येणाऱ्या पाहुण्याची नीट खातिरदारी करण्याची सूचना हिटलरने केलेली होती.

त्या दिवशी हिटरच्या अभ्यासिकेत दुपारी चार वाजताची भेट नक्की झाली होती. या भेटीची व्यवस्थित तयारी केली गेली होती. परंतु या भेटीत मोजकेच लोक उपस्थित होते.

 

 

परराष्ट्रमंत्री रिबेन्ट्रॉप, ऍम्बेसेडर हॅवेल आणि हिटलरचे खाजगी दुभाषी श्मिट हे आधीपासूनच आपापल्या जागी स्थानापन्न होते.

समोरच्या भींतीवर दोन मोठे नकाशे होते – एक युरोप आणि आशियाचा, तर दुसरा तसाच परंतु त्यात जर्मनीच्या युद्धाच्या आघाड्या दर्शवणारा होता.

जेव्हा नेताजीनी खोलीत प्रवेश केला तेव्हा हिटलरने त्यांचे ‘आझाद हिंदचा नेता’ या शब्दांत भरभरून स्वागत केले. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या जागी स्थानापन्न झाला.

त्यानंतर नेताजी उठले आणि त्यांनी हिटलरसाठी आणलेली भेटवस्तू त्याच्या हातात दिली. हिटलरने अतीव आश्चर्याने आणि उत्सुकतेने ती उघडून पाहिली.

 

 

आत तांब्याच्या रंगाचा एक पुतळा होता. हिटलर त्या मूर्तीकडे बघत राहिला. इतर सर्व लोक देखील आश्चर्यचकीत झाले. ती पद्मासनातली बुद्धाची मूर्ती होती.

ही भेट अनपेक्षित होती. हिटलर कितीतरी वेळ त्या मूर्तीकडे पाहात राहिला. त्याला त्या मूर्तीची ओळख पटली नाही. शेवटी त्याने नेताजींना त्या मुर्तीबाबत विचारलं.

तेव्हा नेताजींनी सांगितले की ही मूर्ती बौद्ध धर्माचे संस्थापक, भगवान बुद्ध यांची असून त्यांनी जगाला अहिंसा आणि करुणा शिकवली होती.

तरीही हिटलरला गौतम बुद्धाबद्दल काही माहिती नव्हती. त्यामुळे त्याने नेताजींना विचारले की,

 

 

शांती, करुणा आणि अहिंसा शिकवणारा हा गृहस्थ गांधीसारखाच आहे. मग गांधींच्या आधीचा आहे की नंतरचा?

तेव्हा नेताजींनी त्यांना सांगितले, की महोदय, तो आपणा सर्वांपेक्षा खूप मोठा आहे. ती भेट गंभीर होती. म्हणून सगळ्यांनी या संवादावर आपापलं हसू दाबून ठेवलं होतं.

पण नंतर त्याने आपल्या अज्ञानाबद्दल खेद प्रदर्शित केला. त्यानंतर बैठकीत शांतता पसरली. कोणीच बोलत नव्हतं. कुणी सुरूवात करावी असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

मग हिटलरच जर्मन भाषेत बोलू लागला. ट्रॉट यांनी दुभाषीची भूमिका पार पाडत त्याच्या बोलण्याचा अनुवाद केला. श्मिट घाईघाईने नोट्स घेऊ लागला.

हिटलरचा चेहरा एका विचित्र आनंदाने चमकत असल्यासारखा दिसत होता. त्याचे तीक्ष्ण डोळे चुंबकीय आकर्षणाने समोरच्याचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेत होते.

त्याने हसत हसत नेताजींना आधी त्यांची ख्यालीखुशाली विचारली,

 

“बर्लिनमधला तुमचा मुक्काम कसा होता?आणि फ्री इंटिया सेंटर, भारतीय सेना यांचे कार्य समाधानकारकपणे चालू आहे ना?” हे विचारलं.

त्यानंतर दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात जर्मनीने मदत करावी अशी नेताजींनी इच्छा व्यक्त केली.

परंतु हिटलर त्यासाठी फारसा राजी नव्हता. उलट तो म्हणाला, की अजून दोनशे वर्षे तरी भारत स्वतंत्र होऊ शकेल असं वाटत नाही.

यावर नेताजींनी त्याचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमचा आशावाद हरवलेला नाही असं ते म्हणाले.

जर्मनीपासून भारत हा फार दूरवरचा देश आहे. आम्ही इथून तिथपर्यंत सैन्य पाठवू शकत नाही असेही हिटलरने सांगितले.

मला रशियावर कबजा मिळवू द्या. ते झाले की मी तिथून तुमची मदत करू शकेन असंही तो म्हणाला. त्यानंतर बरीच चर्चा होऊन ती बैठक संपली.

 

असे भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे आपले नेताजी हे थेट हिटलर ला जाऊन भेटले.

आणि तिथंही त्यांनी हिटलर सारख्या माणसाला शांती आणि अहिंसेचे प्रतिक गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन भारत आणि भारतीय हे सदैव सगळ्यांच्यापुढे का आहेत, याचं स्पष्टीकरणच दिलं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

हा लेख आणि यातले संदर्भ विश्वास पाटील यांची सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित ‘महानायक’ या कादंबरितून घेतले आहेत

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version