आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
रात्री उशिरापर्यंत जागरण झालं…नीट झोप लागली नाही…शांत झोप लागली नाही अशा तक्रारी कितीतरी जण कितीतरी वेळा सांगत असतात.
परिणामी दिवसभर अस्वस्थता, चिडचिड, पित्त वाढणं, डोकेदुखी अशा नाना प्रकारच्या तक्रारी सुरु होतात. काम नीट होत नाही. दुपारी झोप लागली तर पुन्हा रात्री जागरण हे चक्रच तयार होते.
त्यांचे परिणाम निस्तेज त्वचा, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणं असे दिसून येतात.
याचं कारण कुठेतरी तुमच्या आहारात दडलं आहे, झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता??? हे खूप महत्त्वाचं आहे. पोळी भाजी? भाजी -भाकरी -भात?? की पिझ्झा???
आॅनलाईन आॅर्डर देऊन पिझ्झा मागवला नी खाल्ला?? हे शेवटचं उत्तर जर हो असेल तर थांबा!!!! कोणकोणते पदार्थ आहेत जे निद्रानाशाचं कारण ठरतात ते आज आपण पाहूया.
१. पिझ्झा खाणे-
रात्री जेवण म्हणून पिझ्झा खाणं ही अतिशय भयंकर गोष्ट आहे. कारण, पिझ्झावर जे चीजचं टाॅपिंग केलेलं असतं ते तुम्हाला रात्री झोपेतून जागं करु शकतं. एखादं भयानक स्वप्न पडलं की जसे तुम्ही घाबरून, खडबडून जागे होता तसंच.
नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे की, पिझ्झा टाॅपिंग्जमध्ये वापरले जाणारे टोमॅटो सॉस हे शरीरातील आम्लपित्त वाढवण्यास कारणीभूत असतात, पण पोटदुखीचे ही कारण ठरतात.
तसेच पिझ्झा हा काही जेवायचा पदार्थ नाही. रात्री जेवताना तो खाल्ला तर अनावश्यक कॅलरीज शरीरात येतात आणि पुढच्या तक्रारी सुरू होतात.
२. काॅफी पिणे-
काॅफी पिणं हे निद्रानाशाचं जालिम कारण आहे. काॅफीमध्ये असलेलं कॅफीन हे झोपेवर चांगलाच परिणाम करतं.
संध्याकाळी हवं तर काॅफी प्यावी पण झोपण्यापूर्वी काॅफी प्याली तर झोपेचा बट्ट्याबोळ झाला म्हणूनच समजा. म्हणून काॅफी झोपायच्या वेळी पिऊ नये.
३. तृणधान्ये-
झोपण्यापूर्वी कसलीही तृणधान्ये म्हणजे मका वगैरे खाऊ नयेत. कारण त्यात असलेल्या साखरेचं प्रमाण जास्त असतं. आणि साखर झोपेचं खोबरं करते.
४. अतिमसालेदार पदार्थ-
अतिमसालेदार पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेत.
कारण त्यांचा झणझणीतपणा आपल्या जीभेवर ज्या चव ओळखणाऱ्या पेशी असतात त्यांना जास्त उत्तेजित करतो. त्यांचा संबंध थेट आपल्या पोटाशी, पचनसंस्थेशी असतो.
त्यामुळे पोटात किंवा छातीत जळजळ होणे सुरू होते. स्वाभाविकच झोप गायब होते.
याच कारणासाठी घरच्या जेवणात दही- दूध किंवा ताक यांचा समावेश पूर्वापार असतो. झोप लागावी यासाठी अतिमसालेदार पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेतच.
५. सोडा-
सोडा हे उत्तेजक द्रव्य आहे. त्यात असलेले साखरेचे प्रमाण फारच जास्त असते. त्यामुळे झोप येणं दुरापास्तच होतं. म्हणून झोपण्यापूर्वी सोडा पिणं सोडून द्या.
नाही तर तुमच्या झोपेची विकेट उडाली समजा.
६. दारु-
आश्चर्य वाटलं ना? कारण दारु पिऊन लोक तर्र होतात. अतिदारुमुळे रस्त्यावर पडलेले महाभाग आपण पाहीले आहेत. तीच दारु टाळा??? हो!!!
जरी दारु पिऊन गुंगी आली तरीही त्यामध्ये असलेलं अल्कोहोल शरीरातील नैसर्गिक झोपेवर परिणाम करतं.
म्हणजे, ती नशा उतरली की तुम्ही मध्यरात्री किंवा पहाटे जागे होता. आठ तास झोप आवश्यक असते ती होतच नाही. म्हणून झोपताना दारु पिणं टाळा.
७. सरबते-
आॅरेंज ज्यूस, लिंबू सरबत अशी पेयं झोपताना पिऊ नका. कारण आंबट चवीची फळं ही फार पित्तकारक असतातच शिवाय जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते.
झोपेतून उठावे लागले की झोप उडाली म्हणूनच समजा. कारण वाढत्या वयात आधीच झोप कमी होत असते आणि एकदा का झोपमोड झाली की मग परत लवकर झोप लागत नाही.
म्हणून सरबतांचं सेवनही झोपताना करु नये.
८. बर्गर-
आजच्या पिढीला प्रचंड आवडणारा पदार्थ म्हणजे बर्गर. ब्रेडमध्ये भरलेली स्टफींग्ज…लेट्यूससारखी पानं, ब्रेडवर दिसणारे चमकदार तीळ पाहून इच्छा होईल बर्गर खायची. पण झोपताना मात्र बर्गरसारखे पदार्थ खाऊ नयेत.
कारण बर्गर पचायला अतिशय जड आहे. त्याचं पचन करण्यासाठी आतड्यांवर अतिरिक्त प्रमाणात ताण येतो. कधीकधी पोटात कसंतरीच होतं असं आपण म्हणतो ते ‘कसंतरीच होणं’ म्हणजे पचायला होणारा त्रास असतो.
नुकत्याच झालेल्या एका पाहणीत आढळून आले आहे की, सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ शरीरातील कोलेस्टेरॉल वाढवण्यास कारणीभूत आहेत. बर्गर त्याच प्रकारचा पदार्थ आहे. निद्रानाशाचा मित्रच म्हणा हवंतर!!!
पण जर का तुम्हाला शांत आणि सलग झोप हवी असेल तर बर्गरसारखे पदार्थ टाळावेत.
९. चाॅकोलेटस्-
झोपण्यापूर्वी चाॅकोलेटस् खाऊ नयेत. कारण जसं काॅफीमध्ये कॅफीन असतं तसंच ते चाॅकोलेटस् मध्येपण असतं आणि कॅफीन झोपेसाठी घातकच आहे.
आहारतज्ज्ञ सांगतात की, झोपताना चाॅकलेट टाळा. झोपेचे जे जे वैरी असलेले पदार्थ आहेत त्यात चाॅकलेटसचा पण समावेश आहे.
१०. टर्की किंवा मांसाहार –
यामध्येही निद्रानाशाचा पूर्ण बंदोबस्त असतो. मांसाहारी पदार्थ हे पचायला जड असतात.
शिवाय माणसाला झोप लागावी म्हणून जे डोपामाईन हे द्रव्य शरीरात असतं त्यावरही त्यांचा काही अंशी परिणाम होतो त्यामुळं मांसाहारी पदार्थ झोपण्यापूर्वी टाळावेत.
११. काॅफी आईस्क्रीम-
आपण जेव्हा बाहेर जेवायला जातो तेव्हा डेझर्ट म्हणून काॅफी आईस्क्रीम घेतो. त्या आईस्क्रीममध्ये काॅफीच्या बिया स्वादासाठी घातलेल्या असतात.
त्यात जो कॅफीनचा अंश असतो तो निद्रानाशाचा मित्रच असतो. त्यामुळे झोपेवर परिणाम होतोच. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर हे टाळा.
१२. पाणी-
झोपताना पाणी पिऊ नका. दिवसभरात भरपूर पाणी प्या. दिवसभर कमी पाणी प्यायलात तर रात्री तहान लागून जाग येते. आणि झोपताना पाणी पिऊन झोपलं की मध्येच लघवीला उठावं लागतं.
त्यापेक्षा जेवण झाल्यावर पाणी प्या. कारण जेवण झालं की लगेचच झोपायला जात नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा पाणी प्यायला उठायची गरजच नाही पडणार.
१३. प्रोटीन्स शेक-
व्यायामानंतर पिण्यासाठी आहारतज्ज्ञ प्रोटीन्स शेक सांगतात. तो अशासाठी असतो की, व्यायामानंतर शरीरातील स्नायूंवर जो ताण येतो, तो थकवा भरुन निघावा यासाठी प्रोटीन्स पावडर किंवा प्रोटीन्स शेक सुचवतात.
झोपण्यापूर्वी जर प्रोटीन्स शेक घेतला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. ना ती व्यायामाच्या पूर्वीची अवस्था असते ना व्यायामानंतरची थकलेली अवस्था.
त्यामुळे प्रोटीन्स शेक मध्ये असलेले काॅफीन शरीरात विनाकारण साठून राहते. आणि निद्रानाश होतो.
थोडक्यात, मसालेदार, तेलकट पदार्थ, दारु, सोडा, हे पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेतच. ज्यामुळे झोप पुरेशी होते व कार्यक्षमता टिकून राहते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.