Site icon InMarathi

‘या’ कारणामुळे राम करू शकले नाही, तो इंद्रजिताचा वध, केवळ लक्ष्मणच करू शकला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

रामायण, महाभारत टीव्हीवर जसं सुरू झालं तसं लोकांना त्या कथांमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला आणि परत एकदा सगळेजण रामायण, महाभारताची उजळणी करायला लागले.

आजही फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात रामायण आणि महाभारताचा अभ्यास केला जातो.

हिंदू धर्मातील इतर गोष्टींप्रमाणे यातील कथाही आता चौथ्या युगातही तितक्याच आपुलकीने ऐकल्या जातात, गायल्या जातात. अशीच एक कथा म्हणजे रामायणातील रावणाचा मुलगा इंद्रजीतच्या वधाची. रामबंधू लक्ष्मणाने त्याचा वध केला त्याची.

 

 

आपल्याला माहीतच आहे की राम-रावण युद्धात रामाने कुंभकर्ण आणि रावणासारख्या पराक्रमी योद्ध्यांना मारले. परंतु रावणाइतक्याच पराक्रमी असणाऱ्या त्याच्या मुलाला मात्र लक्ष्मणाने मारले आणि तेही एका विशिष्ट कारणामुळे.

अगदी प्रभुराम देखील इंद्रजीताला मारू शकले नसते. इंद्रजीत आपल्या वडिलांप्रमाणेच पराक्रमी होता, शूर होता. इंद्रजीत हे नाव देखील त्याने स्वर्गाधीपती इंद्रावर मिळवलेल्या विजयामुळे त्याला मिळालेलं आहे.

इंद्रजीत अजिंक्य होता, अभेद्य होता आणि असं जर झालं असतं तर युद्धाचा परिणाम काहीतरी वेगळाच लागला असता. पण असं होणार नव्हतं. ते कार्य फक्त लक्ष्मणाच्या हातूनच घडणार होतं, आणि घडलं देखील.

नेमकं कारण काय होतं की इंद्रजीत याचा वध हा लक्ष्मणाच्या हातूनच होणार होता?

चौदा वर्षांचा वनवासानंतर आणि युद्धानंतर राम-लक्ष्मण-सीता अयोध्येला गेले. तिकडे त्यांना भेटायला अगस्ति ऋषि आले होते, त्यांनी युद्धात काय काय झालं हे रामाला विचारलं.

रामाने त्यांना रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध मी केला तर इंद्रजीतचा वध मात्र लक्ष्मणाने केला असं सांगितलं.

त्यावेळेस अगस्ती ऋषी म्हणाले, “कुंभकर्ण आणि रावण पराक्रमी होतेच पण इंद्रजीत अजिंक्य होता आणि त्याचा वध फक्त लक्ष्मणाकडून शक्य होता.”

मग रामाने विचारलं, की, “असं का?” त्यावेळेस अगस्तीऋषी म्हणाले,

“इंद्रजीतने स्वर्गावर आक्रमण केलं आणि इंद्राचा पराभव करून इंद्राला बांधून लंकेला नेलं. परंतु यामध्ये शेवटी ब्रह्मदेव आले आणि त्याने इंद्राला सोडवलं आणि इंद्रजीताला वरदान दिलं.”

 

हे ही वाचा  –

===

रामाने विचारले, “कोणतं वरदान, गुरुदेव?” त्यावर अगस्ती ऋषी म्हणाले, “जो माणूस १४ वर्ष झोपणार नाही. काही खाणार नाही आणि कुठल्याही स्त्रीचं तोंड पाहणार नाही तोच माणूस इंद्रजीतला मारू शकेल.”

म्हणूनच ,”हे रामा, इंद्रजीत अजिंक्य होता त्याला मारणे अशक्य होतं परंतु लक्ष्मणाने ते केलं.”

त्यावर राम म्हणाले, “मी तर वनात असताना लक्ष्मणाला, आमच्या कंदमुळे आणि फळे यामधील माझा आणि सीतेचा वाटा काढून त्याला एक वाटा देत होतो. मग त्याने काही खाल्ले नाही असं कसं होईल?”

त्यावर रामभक्त असलेल्या लक्ष्मणाने सांगितले ,”दादा तुम्ही मला फळांमधील वाटा देत होतात आणि म्हणायचात की लक्ष्मणा हा बाजूला ठेव. तुम्ही मला खा असं कधीही म्हणाला नाहीत म्हणून मी ते कधीही खाल्लं नाही. तुमची आज्ञा नसताना मी कसा खाईन!!”

“रात्री देखील मी कधी झोपलो नाही कारण तुमचं आणि सीतामाईंचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी होती. म्हणून मी १४ वर्ष झोपलो नाही.”

“तसेच मी कुठल्याही स्त्रीचं तोंड पाहिलं नाही. सीतामाईशी बोलताना देखील माझी नजर त्यांच्या पाया कडेच असायची. म्हणूनच सुग्रीवने आणलेल्या सीतामाईच्या दागिन्यातील मला फक्त त्यांच्या पायातील पैंजण ओळखता आले.”

हे ऐकून प्रभुराम देखील हैराण झाले. आणि भावाच्या या प्रेमाने भारावून देखील गेले. रामायणात हनुमान जितका रामभक्त आहे तितकाच लक्ष्मण देखील रामभक्त आहे.

 

 

अगदी लहानपणापासून लक्ष्मणाने आपल्या दादाची साथ कधी सोडली नाही.

वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात असा काही उल्लेख मिळत नाही, म्हणून यावर अनेक लोक शंका घेतात की कोणताही मनुष्य १४ वर्ष न झोपता, न खाता राहू शकेल का? एखाद्या लोककथेतूनच हा भाग आला असावा, असंही म्हटलं जातं.

पण हे जरी असलं तरी लक्ष्मणाचं आपल्या भावावरचे प्रेम कधीही लपलेलं नव्हतं. रामासाठी लक्ष्मणाने केलेला त्यागही तितकाच मोठा आहे. तो लोकांच्या नजरेत भरत नसेल, परंतु त्याचे योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे.

भावाला आदर्श मानून त्याच्यामागे उभे राहणं, त्याच्याच आदर्शावर चालणं हे वाटतं तितकं सोपं नाही. लक्ष्मण स्वभावाने रागीट होता, तरीही रामाची एकही आज्ञा त्याने कधीही मोडली नाही.

 

 

अगदी सीतेला एकटीला वनात सोडायची आज्ञा रामाने दिली, तीही त्याने मनावर दगड ठेवून पूर्ण केली.

लक्ष्मण रामाबरोबर जेव्हा वनवासाला आला तेव्हा त्याचंही लग्न झालं होतं परंतु त्याने उर्मिलेला आपल्याबरोबर वनवासात आणलं नाही.

शिवाय त्या वेळेस अयोध्येमध्ये भरत आणि शत्रुघ्न नव्हते त्यामुळे आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी देखील त्याने उर्मिलेला सांगितलं आणि तिला तिथेच ठेवलं.

असंही सांगितलं जातं की, त्याने आपली १४ वर्षाची झोप ही उर्मिलेला दिली आणि मगच तो वनवासाला निघाला. 

लक्ष्मण देखील रामा इतकाच शूर होता, पराक्रमी होता. कारण लहानपणापासूनच तो रामाबरोबर वाढला, त्याच्याबरोबरच शिकला. इतक्या पराक्रमी भावाचा भाऊ पराक्रमीच असेल ना!!

 

हे ही वाचा –

 

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version