UnseenMumbai : सागरी प्रवेशद्वाराला जन्म देणाऱ्या, अजूनही मुंबईतच असलेल्या वास्तूची कहाणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
गेट-वे-ऑफ इंडिया हे स्थळ बहुतेक लोकांना ऐकून ठाऊक असते. मुंबई बघायला येणारा प्रत्येक जण या ठिकाणाला भेट देतोच.
या वास्तुला भेट दिल्याशिवाय मुंबईची भेट पूर्ण होत नाही. मुंबईच्या गौरवाचे हे स्थान आहे. आणि या शहराच्या इतिहासात गेटवे ऑफ इंडियाचे स्वतःचे महत्त्व आहे.
परंतु गेट वे ऑफ इंडियाच्या एका लहान प्रतिकृतीबद्दल फारसं कुणाला ठाऊक नसेल. तुम्हालाही हे वाचून आश्चर्य वाटलं ना?

तुम्ही जर मुंबई येथील गावदेवीतील एका अरुंद अशा, भेंडी गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या गल्लीत गेलात तर तुम्हाला तेथे गेट वे ऑफ इंडियाची ही प्रतिकृती पाहायला मिळेल.
अगदी अचूक पत्ता हवा असेल तुम्हाला या गल्लीला भेट देऊन गेट वे ऑफ इंडियाची ही प्रतिकृती बघायला जाण्यासाठी तर हा घ्या –
यशवंत सिद्धी रावबहादुर देसाई सहकारी गृहनिर्माण संस्था लि. सीएस क्र-१७०४, २/१७०५, भेंडी गल्ली, हरिश्चंद्र गोरेगावकर मार्ग, गावदेवी, मुंबई -४००००७
ही इमारत म्हणजे एकेकाळी गेट वे ऑफ इंडियाचे सुपरिटेंडंट मॅनेजर रावबहादुर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई यांचे वडिलोपार्जित घर होते.
याच इमारतीच्या अंगणात पार्किंग लॉटमध्ये सहा फूट उंचीची ही गेटवे ऑफ इंडीयाची प्रतिकृती आहे आणि ती व्यवस्थित देखरेखीखाली आहे.
गेटवे ऑफ इंडियाची ही प्रतिकृती नुसतीच प्रतिकात्मक आणि पोकळ नसून स्टॅंड स्टोननी तयार केल्याने वजनी आणि मजबूतही आहे.
मुंबई महानगरीची ओळख म्हणून सर्वश्रुत असलेल्या- ‘गेटवे ऑफ इंडिया’ ही अजरामर वास्तू उभारणीत ज्यांचा मोठा सहभाग होता त्या रावबहादूर यशवंतराव हरिश्चन्द्र देसाई यांनी ही गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपल्या घराच्या प्रांगणात उभारली आहे.

मात्र रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई यांचे नाव आज कुणालाही फारसे ठाऊक नाही.
३१ मार्च १९११ ते ४ डिसेंबर १९२४ या कालखंडात अनेक स्थित्यंतरातून ‘गेट वे ऑफ इंडिया’ची जी उभारणी झाली त्याला तसा इतिहास आहे.
इंग्रजी आमदानीत ब्रिटिश शहेनशहा पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी राणी मेरी यांच्या सागरीमार्गे नियोजित भारतभेटीप्रीत्यर्थ अफाट समुद्रात भराव घालून ही वास्तू एक देखणी कलाकृतीची स्वागत कमान स्वरूप उभारली गेली.
हेच ते मुंबईचे सागरी प्रवेशद्वार; पण याच भव्य वास्तूची महाकाय मुंबईतील गावदेवी मोहल्ल्यात चित्ताकर्षक प्रतिकृती आहे हे फारच थोडय़ा लोकांना ज्ञात आहे.
मुंबईतील ग्रँट रोड – गावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात आता अनेकमजली इमारती उभ्या असल्या तरी ही प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे.
कोणतीही वास्तू निर्माण करण्याआधी ती नियोजित वास्तू कशी असेल याची रूपरेखा समजण्यासाठी संकल्पचित्रांबरोबर त्याची लहानशी प्रतिकृती (Mode) बनवण्याची पद्धती बांधकाम क्षेत्रात प्रचलित आहे.
ही प्रतिकृती तयार करण्यापाठीमागे कदाचित हाच उद्देश असावा असेही मानले जाते.
मूळ गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामात वापरलेला खरोडी नावाने ओळखला जाणारा स्टँड स्टोन दगड वापरला गेला आहे. या दगडाचे वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही हवामानात हा दगड आपले अस्तित्व टिकवून अधिकाधिक मजबूत होत जातो.
मुंबईतील ग्रँट रोड – गावदेवी परिसरात जी भेंडी गल्ली आहे, तेथील पूर्वीच्या देसाई वाडय़ाच्या आवारात ही प्रतिकृती आहे.
तुळशी वृंदावनसदृश या शिल्पाच्या निर्मितीला आज तीन पिढय़ांचा काळ लोटल्यावरही ती गेटवे ऑफ इंडियाचीच प्रतिकृती आहे याची लगेच कल्पना येते.
पाया, मध्य आणि घुमट अशा तीन भागांतून या प्रतिकृतीचे बांधकाम झालेले आहे.
सुमारे पाच फूट उंचीच्या प्रतिकृतीची निर्मिती करताना कमानयुक्त कलापूर्ण प्रवेशद्वारे, त्यावरील तितकेच आकर्षक नक्षीकाम आणि घुमट मूळ गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाशी साधर्म्य साधणारे आहे.

असामान्य कलाकृती निर्माण करणारी निसर्गदत्त देणगी लाभलेल्या रावबहादूर यशवंतराव देसाईंची पार्श्वभूमी तथा नवनिर्मिती करणारा जीवनप्रवास देखील रंजक आहे.
यशवंतराव देसाई यांचा जन्म ११ डिसेंबर १८७६ला झाला. ग्रँट रोड – भेंडी गल्लीतील एका नोकरदार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दुर्दैवाने यशवंतराव दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
पण व्यवहारचातुर्य असलेल्या आई आणि काकांच्या मदतीने एल्फिस्टन मिडल स्कूलमधून प्रारंभीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांचे पालक आणि मार्गदर्शक असलेले काका शाळिग्राम जगन्नाथ यांनी त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यात (PWD) दरमहा दहा रुपये पगारावर नोकरीला लावले.
याच वेळी अर्थार्जनाबरोबर त्यांचे शिक्षणही चालू होते. इ.स. १९०२ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आर्किटेक्चर एलिमेंट्री परीक्षेत गुणवत्ता प्रमाणपत्र त्यांनी प्राप्त केल्याने सार्वजनिक बांधकाम खात्यात यशवंतरावांना ‘ओव्हर सियर’ म्हणून पदोन्नती प्राप्त झाली.
कोणत्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाला नशिबाबरोबर योग्य मार्गदर्शनाची संधी देणारा कुणी तरी योग्य माणूस यावा लागतो. यशवंतरावांकडे ही संधी चालून आली.
त्यांच्या अंगच्या वास्तुरचनाकाराचे कौशल्य जाणून त्या काळचे मुंबईचे वास्तुविशारद अभियंता आणि सल्लागार जॉन बेग या दूरदृष्टीच्या ब्रिटिश अंमलदारांनी मुंबई परिसरातील काही महत्त्वाच्या कामांची जबाबदारी यशवंतरावांवर सोपवली.
यशवंतरावांनी या संधीचे सोनेच करून टाकले. म्हणूनच अनेक बांधकामांत सहभागी होण्याची संधी त्यांना चालून आली.
गेटवे ऑफ इंडियाच्या नियोजित बांधकामाचा आराखडा ब्रिटिश वास्तुरचनाकार जॉर्ज विट्टेट यांनी तयार केला हे जरी सत्य असले तरी त्यांच्या कल्पनेतील जगप्रसिद्ध अशी ही वास्तू तयार करताना यशवंतरावांनी त्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
ही सागरी मार्ग प्रवेशद्वाराची भव्य वास्तू उभारताना आधी समुद्रात भराव टाकून पायाभरणी केली. अहमदाबाद वास्तुशैलीचा प्रभाव असलेली ही वारसा वास्तू तयार होण्यासाठी एक तपाचा काळ गेला.

गेटवे ऑफ इंडियासमोरील ताजमहाल हॉटेलनजीकच्या रस्त्याला रावबहादूर यशवंत हरिश्चंद्र देसाई यांचे नाव देऊन स्मृती जतन केली आहे.
गॉथिक वास्तुशैलीच्या प्रेमाने भारावलेल्या ब्रिटिश सत्ताधीशांनी काही वास्तू बांधकामात जसा स्थानिक बांधकाम शैलीचा मुत्सद्दीपणे समावेश केला, तसाच स्थानिक वास्तुरचनाकारांच्या कल्पकतेसह त्यांच्या कौशल्याचीही कदर करून योग्य ती दखल घेतली आहे.
कलेची जाण ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार रावबहादूर, जस्टिस ऑफ पीस असल्या किताबांनी यशवंतरावांचा यथोचित गौरव केला गेला.
तर इ.स. १९२३ मध्ये रॉयल सॅनेटरी इन्स्टिटय़ूट ऑफ लंडन या संस्थेचे सभासदत्व त्यांना बहाल केले. १९२४ साली इंडियन सव्र्हिसेस अँड इंजिनीअरिंगचे पदाधिकारी म्हणून निवड केली गेली.
सुमारे नऊ दशकांपेक्षा जास्त काळ ही देखणी प्रतिकृती रावबहादूर यशवंतराव देसाई यांची तिसरी पिढी आजही अभिमानाने सांभाळतेय.
एका नोकरदार मराठमोळ्या माणसाने गेटवे ऑफ इंडियासारखी जगविख्यात वास्तू उभारताना आपल्या अंगभूत कल्पकतेने जी कलाकृती साकारली त्याची दखल समाजमनात, तसेच शासनदरबारीही हवी तशी घेतली जात नाही.
ऑस्ट्रीच या संस्थेसाठी ‘द गिरगांव क्रॉनिकल्स’ या नावाने हेरिटेज वॉकचे आयोजन करणारे सिद्धार्थ फोंडेकर म्हणतात की “लोकांना या जागेची माहिती नाही परंतु मी या जागेचे महत्त्व जाणतो. या प्रतिकृतीला योग्य प्रकारे संरक्षित केलेले आहे.”
यशवंतराव हे मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, रॉयल इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, जनरल पोस्ट ऑफिस, सर कावसजी जहांगीर पब्लिक हॉल आणि इतरही बऱ्याच आकर्षक इमारतींचे पर्यवेक्षक होते.
गेटवे ऑफ इंडियाची स्थापना ब्रिटनचे आणि तेव्हाच्या भारताचे किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या डिसेंबर १९११च्या भारतभेटीत स्वागतासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी केली गेली होती.
त्याचे बांधकाम ३१ मार्च १९११ रोजी मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी असलेल्या क्रूड जेट्टीलगत करण्यात आले. या स्मारकाची पायाभरणी तेव्हाचे मुंबईचे राज्यपाल सर जॉर्ज सिडनहॅम क्लार्क यांच्या हस्ते झाली होती.
या प्रस्तावित इमारतीचे प्रथम एका पुठ्ठ्यावर केलेले मॉडेल राजघराण्यातील अभ्यागतांसमोर सादर केले गेले. आणि त्यानंतर स्कॉटीश आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांचे अंतिम डिझाईन ३१ मार्च १९१४ ला मंजूर केले गेले.
गेटवे ऑफ इंडियाचे औपचारिक उद्घाटन भारताचे व्हाईसरॉय रफस इसाक्स यांच्या हस्ते ४ डिसेंबर १९२४ रोजी झाले.

या वास्तुच्या रचनेत स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनी रोमन शैलीतल्या विजयाची कमान आणि गुजरातच्या १६ व्या शतकातील स्थापत्यशास्त्राचे घटक एकत्रित करून केली होती.
शिवाय यात हिंदू आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचे संयोजन आहे. कमान मुस्लिम शैलीची आहे तर सजावट हिंदू शैलीची आहे. गेटवे पिवळा बेसाल्ट खडक आणि प्रबलित काँक्रीटपासून बनवला गेला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.