आपल्यातील ‘त्या’ मुलांना कमी लेखू नका. त्यांच्यातही आहे काही खास…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बरेचदा, वाचता न येणे, वाचलेले किंवा ऐकलेले सांगता येणे पण लिहिता न येणे, स्पेलिंग्स लक्षात न राहणे, ह्या सगळ्यांच्या मागे लर्निंग डिसॅबिलिटी हे कारण असू शकतं. ही लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय? ह्या बाबत माहिती ह्या लेखात पाहूया.
लर्निंग डिसॅबिलिटी हा तुलनेने नवा विषय. पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या, असं बरेचदा ऐकण्यात येतं. पूर्वीही ह्या गोष्टी होत्या, पण त्याबद्दल आपल्याला माहिती नव्हती. ह्याबद्दल काही गैरसमज आहेत.
१) मतिमंदत्व आणि Dyslexia सारख्याच गोष्टी आहेत.
२) आम्ही दोघं अभ्यासात हुशार, म्हणून मुलाला dyslexia असू शकत नाही.
३) Dyslexia म्हणजे अभ्यासाचा कंटाळा. आळशीपणा.
ह्या गोष्टी म्हणजे learning disability नाही किंवा, परीक्षेत कमी मार्क्स मिळणं म्हणजेही learning disability नाही. तर, शाळेत शिकण्यासाठी लागणाऱ्या क्षमतांची कमतरता म्हणजे learning disability. ह्या क्षमता कोणत्या?
फरक ओळखता येणे, वर्गीकरण करता येणे, माहितीचे विश्लेषण करता येते, माहिती योग्य शब्दांत मांडता येणं ह्या गोष्टी शिकण्यासाठीची क्षमता कमी असणं म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी असणे. म्हणजे, शाळेत शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी इतर मुलांप्रमाणे समजून घेता न येणे. समजलेल्या गोष्टी शब्दांत मांडता न येणे.
लर्निंग डिसॅबिलिटी असणारी मुलं कमी हुशार असतात का? आळशी असतात का? ही कधीच शिकू शकणार नाहीत का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत.
लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे बुद्धी कमी असणे नव्हे, ह्या मुलांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती खूप चांगली असते फक्त अक्षरे आणि अंक इथेच ते अडतात.
ह्या मुलांचा बुद्ध्यांक साधारण असू शकतो. काही बाबतीत ही मुलं असामन्य बुद्धिमत्तेची असू शकतात. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन ह्याचं उत्तम उदाहरण आहेत. असे म्हणतात की- आईन्स्टाईनला मतीमंद समजून शाळेतून काढलं होतं. आज जग त्यांना जिनीअस म्हणून ओळखते.
हुशार असूनही त्यांना लिहिता-वाचताना अडचणी का येतात? संशोधकांच्या मते,
ह्या मुलांच्या मेंदूची रचना जराशी वेगळी असते. वाचन मेंदूच्या एकाच भागाकडून केली जाणारी गोष्ट नाही. त्यासाठी डोळ्यांनी पाहणे, त्याला आवाजाची जोड देणे, त्यांतून अर्थ लावणे अशा निरनिराळ्या गोष्टी एकाच वेळी करणे अपेक्षित असते.
–
मेंदूच्या वेगळ्या रचनेमुळे ह्या मुलांना ते जड जाते. वाचताना आलेल्या माहितीवर व्यवस्थित प्रक्रिया होत नाहीत. म्हणूनच आपण काय वाचतो आहोत हे मुलांना समजतच नाही. मग वाचन ही त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक गोष्ट ठरते.
–
म्हणूनच मग मुले सारख्या दिसणाऱ्या अक्षरांच्या बाबतीत गोंधळतात. गणिताच्या चिन्हांच्या बाबतीत त्यांचा गोंधळ उडतो. थोडक्यात, अक्षरे आणि अंक शत्रू असल्यासारखे वागायला लागतात.
लर्निंग डिसॅबिलिटीचे तीन प्रकार आढळून येतात. dyslexia, dysgraphia आणि dyscalculia.
Dyslexia हा प्रकार तारे जमींपर मधील ईशानमुळे आपल्या सर्वांना माहिती आहेच. Dyslexia म्हणजे वाचताना लागणाऱ्या क्षमतांचा अभाव.
थोडक्यात, दोन अक्षरांमधील फरक लक्षात येणे, वर्गीकरण करणे, शब्द आणि ध्वनी ह्यांचा संबंध लावणे, शब्दांचे अर्थ लक्षात घेणे, व्याकरणाचे नियम समजावून घेणे, पाढे, आठवड्याचे दिवस सलग क्रमवारीने सांगता येणे इ. गोष्टींमध्ये समस्या जाणवतात.
ह्या समस्या जरी वाचनाशी निगडीत असल्या तरी त्यांचा परिणाम मुलांच्या लेखनावरही होतो. गणितातील शाब्दिक उदाहरणे समजावून घेतानाही होतो. अभ्यासातील सगळ्याच गोष्टींमध्ये मुलं मागे पडू लागतात.
Dysgraphia हा प्रकार लेखनाशी संबंधित आहे. विचार योग्य शब्दांत मांडता न येणे, गोष्ट किंवा निबंध ह्यांचे नियोजन न करता येणे, पेन-पेन्सील नीट पकडता न येणे, लिहिताना हाताची बोटे दुखणे, इ. समस्या ह्या मुलांना जाणवतात.
ह्या बरोबरच इतर बारीक कामे, चित्र काढणे, दोरा ओवणे, बटण लावणे, बुटाची लेस बांधणे ह्या गोष्टींमध्येही समस्या जाणवतात.
Dyscalculia हा प्रकार गणिताशी संबंधित आहे. गणितातील चिन्हे न समजणे. १२ आणि २१ किंवा १३ आणि ३१ अशा अंकांच्या बाबतीत गोंधळ उडणे ह्या गोष्टी dyscalculia ह्या प्रकारांत आढळून येतात.
लर्निंग डिसॅबिलिटी बरेचदा एकत्रितपणे आढळतात तर काही वेळेस फक्त एखाद्याच क्षेत्रामध्ये समस्या जाणवते. मुले शाळेत जायला लागली की, ह्या समस्या लक्षात येऊ लागतात.
३-५ वर्षांच्या मुलांच्या बाबतीत शाळेतून, ‘लिहित नाही’, अशा तक्रारी यायला सुरुवात होते, नवीन शब्द शिकणे, वाचायला शिकणे ह्या गोष्टींमध्ये मुले मागे पडू लागतात.
शर्टची बटणे लावणे, बुटाची लेस बांधणे ह्या गोष्टी मुलांना जमत नाहीत. मुलं जरा मोठी झाली की, अक्षरांची उलटापालट होणे, अंदाजाने शब्द सांगणे, चुकीचे उच्चार, चुकीचे स्पेलिंग्स, ह्यागोष्टीना सुरुवात होते. ह्या समस्यांमुळे मुले एकटी पडतात.
स्वत:ला कमी लेखू लागतात. अशी मुले अभ्यास, शाळा टाळू लागतात.जी गोष्ट जमत नाही, तिकडे लक्ष देणे आपोआपच कमी होते. म्हणूनच अभ्यास करताना लवकर लक्ष विचलित होते. अनेक वर्तनविषयक समस्या जाणवतात.
ह्या मुलांची जमेची बाजू म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती! मुलांना शिकविताना जर त्यांना मोकळीक दिली आणि विषय अनेक प्रकारांनी समजावून सांगण्यावर भर दिला, तर मुलं आवडीने शिकायला लागतात.
त्यांना वाचन शिकविताना त्यांच्या इतर जाणिवांचा उपयोग करून घेता येऊ शकतो, (जसं स्पर्शाची जाणीव)!
मुलांना शिक्षकांनी आणि पालकांनी वेळीच ओळखायला हवं. त्यांच्यातल्या गुणांना वाव द्यावा. त्यांना समजावून घ्यावं. ही मुले जराशी वेगळी आहेत, वेंधळी आहेत म्हणून त्यांना कमी समजू नका.
यश मिळविण्याची क्षमता त्यांच्यात असते, ती ओळखा. त्यांना त्यांचा वेगळेपणा जपत-जपत शिकविण्याची गरज असते. ह्या मुलांना पाहून नेहमी कवितेच्या ओळी आठवतात,
एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख,
होते कुरूप-वेडे पिलू तयांत एक.
एकेदिनी परंतु, पिलास त्या कळाले,
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले,
पाण्यांत पाहताना चोरूनिया क्षणैक,
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक..
ही मुले बदकांच्या सोबत वावरणाऱ्या राजहंसासारखी असतात. त्यांचे प्रतिबिंब पहायला आपणच मदत करायला हवी.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.