आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
किशोरवयीन मुलं आणि आई-बाबा ह्यांच्यात होणारे वाद हा नेहमी चर्चिला जाणारा आणि आई-बाबांसमोर निरनिराळे प्रश्न उभे करणारा विषय. ‘मी काहीही सांगितलं तरी त्याला चालत नाही, आई म्हणजे शत्रू असल्यासारखा वागतो. काहीच ऐकत नाही.’ अशा आईच्या तक्रारी वाढू लागतात.
इकडे मुलं म्हणत असतात, ‘सगळ्या गोष्टी कशासाठी तिला सांगायच्या? माझ्या मित्रांसमोर सुद्धा बबड्या अशी हाक मारते. माझी बॅग चेक करते. मोबाईल पाहते. मला काही प्रायव्हसी नको का? कालपर्यंत झोपतानासुद्धा कुशीत शिरणारं बाळ अचानक प्रायव्हसी मागू लागतं, हा पालक म्हणून आपल्यासाठी एक धक्का असतो.
मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही,
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई.
-संदीप खरे
किशोरवयीन मुलांशी होणाऱ्या वादाचं मूळ म्हणजे हा विचार! आई किंवा बाबा म्हणून आपण आपल्या मुलांच्या बरोबरीनेच जन्माला येतो. त्यांच्या गरजा पूर्ण करत-करत शिकत जातो. शहाणे होत जातो. आपलं बालपण नव्याने जगत जातो. मुलांचं बालपण संपलं की मग मात्र सगळं अवघड होत जातं. कारण मुलं मोठी होतात तसं आपण मोठे होत नाही. आपण मुलांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना लहानच समजत असतो. इथेच सगळं बिनसतं. मुलं तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असतात. ती लवकरच adult होणार असतात. आता त्यांच्याशी वागताना आपलं वागणं बदलायला हवं. हे कित्येकदा लक्षातच येत नाही. तसंच, कित्येकदा आपण त्यांना मोठं समजतो पण ते अगदीच बालिश वागतात. adult होणार असले तरी झालेले नसतात. त्यांच्याशी नेमकं कसं वागावं हा प्रश्न पाडण्याचं हेच कारण. त्यांचा मित्र होताना काही गोष्टी पाळायला हव्यात.
ह्या वयांत मुलांची मतं आकाराला येत असतात. आई म्हणेल किंवा बाबा म्हणतील तसं वागण्यापेक्षा त्यांना स्वतः च्या मताप्रमाणे वागायचं असतं. म्हणूनच जरा बंडखोरी अंगात आलेली असते. त्यांच्या आवडीनिवडीवर टीका केलेली त्यांना पटत नाही. आपण कुणीतरी आहोत आणि आपल्याला कुणीतरी आदर द्यायला हवा ही भावना प्रबळ असते. ह्या वयात मुलांवर आवाज चढवताना, त्यांच्यावर चिडताना काळजी घ्यायला हवी. चुकांची उजळणी टाळायला हवी. मुलांच्या चुकांसाठी त्यांना माफ करणं, स्विकारणं ह्या गोष्टी घडायला हव्यात.
त्यांना स्पेस देणं ही त्यांची गरज असते. म्हणून त्यांची डायरी, मित्रांशी फोनवर होणारे बोलणे, मेसेजेस त्यांना न विचारता चेक करू नये. आपल्याला काही आक्षेपार्ह आढळले तर विश्वासात घेऊन विचारावे. प्रत्येक ठिकाणी बरोबर जाणे. सतत फोन करणे टाळावे. अति काळजी टाळायला हवी.
मुलांना त्यांचं ऐकून घेणारं कुणीतरी हवं असतं. आपण ऐकतो ते प्रतिक्रिया देण्यासाठीच. मुलांचं बोलणं ऐकताना त्यांना सल्ला देणे किंवा उपदेश देणे टाळा. त्याऐवजी मत विचारा. त्यांचं बोलणं पूर्ण, लक्षपूर्वक, इन्व्हॉल्व्ह होऊन ऐका. बरेचदा त्यांना जे वाटतं ते शब्दांतून न मांडता त्यांच्या वागण्यातून मांडलं जातं. बोलताना आपलं त्यांच्याकडे लक्ष असेल तर हे शब्दांव्यतिरिक्त बोलणं आपल्यापर्यंत पोहोचू शकतं.
ह्या वयांत मुलं स्वतंत्र होत असली तरीही त्यांना आपली गरज असते. त्यांनी कितीही नाकारलं तरी त्यांचा आदर्श म्हणून ते आपल्याकडे पाहत असतात. त्यांना त्यांची ओळख करून देण्यासाठी आपली गरज असते. ही ओळख जेवढी सकारात्मक पद्धतीने करून दिली जाते, तेवढे भरकटण्याचे चान्सेस कमी होतात.
किशोरावस्था हा वाढीतला एक महत्त्वाचा टप्पा. पिल्लांच्या पंखांत बळ येण्याचा काळ. आपल्या पिल्लांनी उंच भरारी मारावी ह्यासाठी ह्याकाळात प्रयत्न व्हायला हवेत. म्हणूनच पिल्लांपासून थोडं दूर पण हाकेच्या अंतरावर थांबण्याची गरज असते. योग्य ठिकाणी मदत आणि बाकी त्यांची धडपड ह्याचा समतोल साधला जायला हवा.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi