Site icon InMarathi

आयुष्याचं तत्व शिकवणाऱ्या ‘साप शिडी’ खेळाचा जनक आहे एक ‘हिंदू’ शिक्षक!

snake and ladders featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या लहानपणी आपण दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघायचो. विशेष करून मे महिन्याची कारण मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमून खूप धम्माल करायचो.

सकाळी कितीही वाजता उठलं तरी कोणीच ओरडायचं नाही. मग दूध पिवून नाश्ता करून खेळाला सुरुवात व्हायची. भरपूर दंगा मस्ती करत खेळ सुरू व्हायचे.

मग कोणी तरी मोठं ओरडायला यायचं सगळं आवरून घ्या. मग सगळं आवरेस्तोवर जेवणाची वेळ व्हायची. मग रमत गमत जेवणं झाल्यावर झोप? छे!

झोप कसली, ती फक्त शाळा, अभ्यास असताना यायची दुपारी! सुट्टीत दुपारच्या झोपेला पण सुट्टी!

एप्रिल, मे महिना असल्याने बाहेर तर रणरणतं ऊन असतं त्यामुळे मैदानी खेळाला सुट्टी दिली जायची, बाहेर अज्जिबात जायचं नाही अशी सक्त ताकीद मिळायची मोठ्यांकडून.

मग सुरू व्हायचे बैठे खेळ! सागरगोटे, व्यापार, सारीपाट, पत्ते, कॅरम, बुद्धीबळ ह्यांसारख्या खेळांची सुरुवात व्हायची आणि दंगा मस्ती, आरडा-ओरडा,

 

Desi toys

 

मग आवाज जरा जास्तच व्हायला लागला की कोणी तरी ओरडायचं, मग काय आवाज पार बंद व्हायचा, परत जरा वेळाने सुरू व्हायचा दंगा! खूप मजा यायची तेव्हा!

सगळ्यात जास्त मजा यायची ते साप-शिडी आणि ल्युडो खेळायला त्यातही साप-शिडी खेळ सगळ्यांचा आवडता खेळ आहे. (अजूनही आवडतो…….हो ना?)

शिडी वरून वर जायचं, सापने गिळलं की खाली यायचं. खूप वेळ लागायचा खेळ संपायला.

दोन किंवा जास्त खेळाडूंमध्ये हा खेळ खेळला जातो ज्यात १०० चौकोन असतात जे फासा टाकून जो आकडा येईल त्यानुसार पटावरच्या सोंगट्या हलवायच्या.

शिडी आली की वर चढायचं आणि शिडीचा डाव घ्यायचा परत. तसंच फाशावर सहाचे दान पडले तरीही सहाचा डाव परत घ्यायचा! सापाने गिळलं की एकदम खाली!

शंभर पर्यंत जाईपर्यंत खूप वेळ आणि ‘पेशंस’ लागायचे. पण, तुम्हाला माहितेय? ह्या खेळाची सुरूवात कशी झाली? कोणी शोध लावला साप शिडी ह्या खेळाचा?

 

YouTube

 

चला तर मग आज आपण साप शिडीचा इतिहास जाणून घेऊया जो खूपच मनोरंजक आहे.

प्राचीन भारतात हा खेळ खेळला जाई. काही जाणकारांच्या मते हा खेळ इ.स.पू. दुसऱ्या शतकात खेळला जाई आणि ह्याचे नाव मोक्ष पात किंवा मोक्ष पतमु ह्या नावाने ओळखला जाई.

हिंदू अध्यात्मिक शिक्षकाने या खेळाचा शोध लावला ज्याचे नाव स्वामी ज्ञानदेव असावे असे शोधकर्त्यांचे मत आहे. ह्या खेळाला ‘लीला’ असेही नाव दिले गेले होते.

जे हिंदूंच्या रोजच्या आयुष्यातल्या धर्माचे प्रतिबिंब आहे.

आपल्याला आयुष्यात कसे वागायचे, कसे वागू नये, आपल्या धर्माची शिकवण मुलांना कशी द्यायची? ह्या विचारातून हा खेळ जन्माला आला.

कारण लहान मुले तीन गोष्टीतून पटकन शिकतात – १) गोष्टी किंवा कथा २) अनुकरण आणि ३) खेळ.

त्यामुळे हीच गोष्ट लक्षात घेऊन ह्या हिंदू शिक्षकानी, गुरूनी खेळाच्या माध्यमातून मुलांना हिंदू धर्माची, आयुष्यातल्या मूल्यांची शिकवण देण्यासाठी ह्या खेळाचा शोध लावला.

खरंच, किती सहजपणे आयुष्याचं तत्त्व शिकवायची युक्ती शोधली आहे ना?

 

the vintage news

 

आयुष्यात चढ (शिडी) – उतार (साप) तर येतच राहतात पण आपले लक्ष्य गाठण्यासाठी धीर सोडायचा नाही, प्रयत्न करत रहायचे.

कोणत्याही परिस्थिती हार मानायची नाही,धीराने घेतलं तर आपल्याला आपलं साध्य निश्चितच मिळवता येतं, गाठता येतं. ही सकारात्मक गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवणं महत्त्वाचं होतं.

शिवाय वाईट कृत्याचे वाईट फळ आणि चांगल्या कृत्याचे चांगले फळ हे मुलांच्या मनावर बिंबवणे महत्त्वाचे होते आणि खेळाच्या माध्यमातून मुलं ह्या गोष्टी लवकर आणि सहजपणे शिकतात.

वाईट कृत्याचे दुष्परिणाम आणि चांगल्या कर्माची चांगली फळे मिळातात ह्याची जाणीव मुलांना करून देणे हा त्यांच्या शिक्षणाचा एक भाग होता.

शिडी दयाळूपणाच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करते; त्याच प्रमाणे विश्वास, नम्रता, चिकाटी, हार न मानणे ह्यामुळे मिळणार्या ऊर्ध्वगतीचे म्हणजेच मोक्षाचे प्रतिनिधित्व ह्या पटावरील शिडी करते.

तर साप हे दुर्दैव, क्रोध, ह्यामुळे होणार्या नाशाचे, अवनतीचे प्रतिनिधित्व करतात.

 

executive secretary

 

खेळाचे नैतिक मूल्य, ह्याचे परिणाम, ह्याची शिकवण म्हणजे चांगल्या कर्मांद्वारे, सत्कृत्यानी मोक्ष मिळतो तर दुष्कृत्यामुळे नाश, पुनर्जन्माच्या चक्रात अडकणे ह्या गोष्टी घडतात.

तसेच काही काही वेळा आपल्या आयुष्यात आपल्याला यशाच्या संधी दोन वेळा मिळू शकतात हे शिडीच्या आणि सहाच्या दानानंतर पुन्हा खेळायला मिळणे यावरून कळते.

महत्त्वाचे म्हणजे तेव्हा जरी हा लहान मुलांना, विद्यार्थ्यांना धर्माची, आयुष्याची शिकवण देण्यासाठी हा खेळ तयार केला गेला असला तरी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा खेळ खेळू शकते.

म्हणजेच प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला

आपल्या धर्माची शिकवण मिळण्यासाठी हा खेळ उपयुक्त आहे.

ज्यामधे एक उद्दिष्ट आहे, एक ध्येय, लक्ष्य आहे जे अपल्या आयुष्यातही हवे आणि ते गाठण्यासाठी काहीही झालं तरी, कितीही चढ उतार आले तरी आपण आपलं ध्येय गाठायचंच असा निश्चय करायचा.

त्यामुळे आपण कोणत्याही संकटात डगमगून न जाता, धीर न सोडता आपण आपले लक्ष्य सहजपणे गाठू शकतो.

 

the forgotten toy shop

 

आशा आणि निराशेचा साप शिडी हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञानाची देखील शिकवण देतो.

सापावरून खाली येणे किंवा सापाने गिळणे म्हणजे आपण पुनर्जन्माच्या फेऱ्यात तर अडकतोच,

पण खाली येतो म्हणजे निम्न स्तरात आपणा जन्म घेतो!

त्यामुळे आपले आचरण नेहेमी शुद्ध, पवित्र असावे, मोक्ष प्राप्तीसाठी योग्य ते आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत, धर्माचे आचरण करावे म्हणजेच चांगल्या तत्त्वांना अनुसरूनच वागावे आणि वाईट तत्त्वांचा, वाईट गोष्टींचा त्याग करावा.

तसेच धीर सोडू नये, चांगल्या वागणूकीने, सत्कर्माने आपण मोक्ष मिळवू शकतो. ही शिकवण खरंच खूप मोठी आहे आणि हे शिकवण्याची पद्धत देखील सोपी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version