Site icon InMarathi

अनेक वर्षांपासून सीरीयात सुरू असलेले “गृहयुद्ध” भारतासाठी ठरू शकते चिंतेची बाब?

syria war inmarathi

हरीभूमी.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक :  स्वप्निल श्रोत्री

===

नोवल कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे महासचिव ॲंटोनिओ गुट्रेस यांनी सीरीयातील यादवी थांबवण्याची विनंती तेथील सर्व सहभागी संघटनांना केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली.

जगात ज्याप्रमाणे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपले मतभेद विसरून मानवजातीवर आलेल्या ह्या संकटाचे निवारण करणे आवश्‍यक आहे.

त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांची विनंती ही निश्चितच आदरास पात्र आहे. परंतु, नुसत्या एका विनंतीवरून जर युद्ध थांबणार असेल, तर हे युद्ध कसे म्हणायचे?

गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या सीरियातील गृहयुद्धाने आंतरराष्ट्रीय वादाचे स्वरूप घेतले असून त्याच्या मूळाशी अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाद आहे.

 

dw.com

 

पश्चिम आशियातील राष्ट्रांवर स्वतःची हुकूमत बनवण्यासाठी आणि अरब जगतावर स्वतःचे प्रभुत्व निर्माण करून मुस्लिम राष्ट्रांचे प्रतिनिधी बनण्यासाठी चाललेल्या ह्या खटाटोपात आतापर्यंत लाखो निरापराध नागरिकांचे बळी गेले आहेत.

कोरोनाच्या महामारीत सुद्धा हे युद्ध थांबण्यास तयार नाही.

एका बाजूला अमेरिका, सौदी, टर्की ह्यांचा एक गट तर दुसऱ्या बाजूला रशिया, इराण, इराक ह्यांचा एक गट असून यांपैकी कोणीही युद्धात प्रत्यक्ष न उतरता दोन्ही गटांच्या ‘प्राॅक्झी’ ना ( आपल्या हितसंबंधांसाठी लढणारे गट. उदा : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी गट हे पाकिस्तानचे प्राॅक्झी आहेत ) सर्वतोपरी मदत करीत आहेत.

अमेरिकेच्या गटाला सीरीयातील विद्यमान असद् सरकार उखडून टाकायचे असून रशियाच्या गटाला ते वाचवायचे आहे. परिणामी, सीरीयातील यादवी मूळ मुद्द्यांपासून भटकून आता अमेरिका आणि रशिया ह्यांच्यातील ‘इगो’ चा विषय बनली आहे.

 

गृहयुद्धाचा इतिहास

सन २०११ मध्ये सीरीयात पहिल्यांदा विद्यमान अध्यक्ष बशर – अल – असद् ह्यांच्या राजकीय कारकिर्दीला स्थानिक नागरिकांचा विरोध होवू लागला.

 

the indian express

 

पुढे जसा हा विरोध वाढत गेला तसे असद् विरोधी राष्ट्रांनी विरोधकांना फूस लावून सीरीयातील अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न केला.

आपल्या एकछत्री सत्तेला होणारा वाढता विरोध पाहता असद् यांनी विरोधकांवर रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचे आरोप अमेरिकेने सीरीयातील सरकारवर केला आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय वादाची ठिणगी पडली.

अमेरिकेने आंदोलकांच्या बाजूने वादात उडी घेत सीरीयावर हल्ला करण्याची धमकी दिली. परिणामी, सरकारच्या बाजूने रशिया वादात सहभागी झाली.

सन २०१३ मध्ये हा वाद विकोपाला जाऊन जेव्हा अमेरिका आणि रशिया ह्यांच्यात युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा संयुक्त राष्ट्राने मध्यस्ती करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि सीरीयातील रासायनिक अस्त्रांचा विषय ओ. पी. सी. डब्ल्यू अर्थात रासायनिक अस्त्र विरोधी संस्थेकडे दिला.

ओ. पी. सी. डब्यू ने तातडीने हालचाली करून सीरियातील रासायनिक अस्त्रे नष्ट झाल्याची पुष्टी दिली. त्यामुळे ओ. पी. सी. डब्यू ला सन २०१३ च्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वादाची ठिणगी शांत होण्याची चिन्हे दिसू लागताच सन २०१६ मध्ये अमेरिकेने असद् सरकारवर रासायनिक हल्यांचे आरोप केले आणि पुन्हा एकदा आगीची ठिणगी पडली.

 

http://blogs.reuters.com/

 

अमेरिका आणि रशिया पुन्हा एकदा एकमेकांना धमकी देऊ लागले. परंतु, संयुक्त राष्ट्राने उभय राष्ट्रांत प्रत्यक्ष युद्ध कधी होवून दिले नाही. सन २०१८ मध्ये अमेरिका व नाटोच्या राष्ट्रांनी सीरीयात इसिस वरील कारवाईच्या नावाखाली हवाई हल्ले सुरू केले.

त्यात सीरीयातील हवाई दलाचे अड्डे व रासायनिक प्रयोग शाळा उध्वस्त झाल्या. सीरीयातून इसिस आता बऱ्याच अंशी संपली आहे. इसिसचा म्होरक्या अबु – बक्र – अल् – बगदादी सुद्धा मारला गेला आहे.

सध्या सिरीयाच्या हवाई हद्दीवर रशियाचे पूर्ण नियंत्रण असून अमेरिका व नाटोचे सीरीयातील हवाई हल्ले सध्या पूर्ण बंद आहेत. अमेरिका आता कोणत्याही कारवाईत प्रत्यक्ष सहभागी होत नसली तरी विरोधी गटांना आजही सर्वतोपरी मदत करीत आहे.

परिणामी, सीरीयातील यादवी आजही थांबण्याची चिन्हे नाहीत.

शिया- सुन्नी वादाची किनार

 

vox.com

 

सीरीयातील गृहयुद्धाचे मूळ कारण शिया – सुन्नी मुस्लिम वादात आहे. सीरीयातील एकूण लोकसंख्येचा विचार करता ९५% लोकसंख्या मुस्लिम आहे.

त्यातील १५% हे शिया मुस्लिम तर ८० % नागरिक हे सुन्नी मुस्लिम आहेत. सीरियाचे विद्यमान अध्यक्ष बशर -अल – असद् हे अल्पसंख्यांक असलेल्या शिया गटात मोडतात.

त्यामुळे अल्पसंख्यांक व्यक्तीने देशाचे अध्यक्ष व्हावे ही बाब सीरीयातील अनेक नागरिकांचे पचनी पडलेली नाही. त्यामुळे असद् ह्यांच्या सत्तेला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे.

 

भारतासाठी चिंतेची बाब

 

newsweek.com

 

सीरीयातील गृहयुद्धाशी भारताचा जरी थेट संबंध नसला तरी यांमुळे पश्चिम आशियात अस्थिरता निर्माण होते. भारताच्या प्रमुख उर्जेची गरज ही पश्चिम आशियातील राष्ट्रांकडून पूर्ण होत असल्यामुळे येथील अस्थिरतेचा थेट फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसतो.

शिवाय पश्‍चिम आशियातील अनेक राष्ट्रांमध्ये भारताचे मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू असल्याने त्यांच्यावर सुद्धा सीरीयातील गृहयुद्धाचा प्रतिकूल परिणाम होतो.

थोडक्यात, सीरीयातील यादवी ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

शेवटी. दोन्ही बाजूच्या गटांना एक गोष्ट समजणे गरजेचे आहे की, सीरीयातील गृहयुद्धाने कोणाचाही फायदा होणार नसून केवळ नुकसानच होणार आहे.

गेल्या ९ वर्षात या युद्धाने ५ लाखापेक्षा जास्त बळी घेतले असून अजूनही युद्धाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे हा विषय जास्त न ताणता दोन्ही गटांनी एकत्र येऊन तो मिटविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version