' आपण सगळेच ओळखत असलेला `हा’ हुशार माणूस आहे टॅटू पेनचा जनक, वाचून धक्काच बसेल – InMarathi

आपण सगळेच ओळखत असलेला `हा’ हुशार माणूस आहे टॅटू पेनचा जनक, वाचून धक्काच बसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मागील काही वर्षांपासून शरीराच्या निरनिराळ्या भागांवर टॅटू काढून घेणे ही तरुण वर्गाची पॅशन बनलेली आहे.

आता तर प्रौढ स्त्री-पुरुष देखील या टॅटूच्या प्रेमात पडलेले आपल्याला दिसते. अंगावर एखादं तरी लहानसं का होईना टॅटू काढून घ्यावं असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटू लागतं.

या टॅटूला आपण मराठीत गोंदण म्हणतो. 

या टॅटूचे कलाकारही भाव खाऊन असतात. त्यांना समाजात कलाकार म्हणून चांगलेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ज्याप्रमाणे ब्यूटी पार्लर्स असतात त्याप्रमाणे छोट्या मोठ्या प्रत्येक शहरांत आता टॅटू पार्लर्सही दिसू लागलीत.

आणि लोक तिथे जाऊन आपली मनपसंत डिझाईन्स निवडून शरीराच्या निरनिराळ्या भागांवर ती गोंदून घेऊ लागलेत.

 

tattoo artist inmarathi
italian tattoo artist

 

टॅटू शरीरावर कशाप्रकारे गोंदले जातात?

शरीरावर हे टॅटू एका विशिष्ट पेनच्या साहाय्याने गोंदले जातात. हा पेन इलेक्ट्रीकल असतो, आणि तो आपल्या त्वचेवर छोटी छोटी छिद्रे करत पुढे सरकतो.

आणि त्या पेनात भरलेली शाई त्वचेच्या प्रत्येक छिद्रात भरली जाऊन टॅटूचे डिझाईन तयार होते.

या इलेक्ट्रीकल पेनचा किंवा मशीनचा शोध कसा लागला?

प्रत्येक शाळकरी मुलाला माहीत आहे की अमेरिकेच्या इतिहासात थॉमस एडिसनचं महत्त्व काय आहे ते. त्यांनी अनेक शोध लावले होते.

लाईट बल्ब्स, फोनोग्राफ, टेलिफोन. हे त्यांनी लावलेले ठळक शोध तर सर्वांनाच ठाऊक आहेत. पण हे केवळ ठळक शोधच आहेत.

याच बरोबर अनेक छोट्या मोठ्या शोधांचे जनकत्व देखील त्यांच्याचकडे जाते. हे मात्र फार थोड्या लोकांना ठाऊक असेल. त्यांनी जनरल इलेक्ट्रीकची स्थापना देखील केली.

 

thomas edison inmarathi
history.com

 

प्रथम औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा तयार केली आणि जवळपास १०९३ शोधांची पेटंट्स अमेरिकेला मिळवून दिली. संशोधनाचा हा आकडा नक्कीच कौतुकास्पद आणि आश्चर्यजनक आहे.

यापैकीच एक टॅटू मशिनचा शोध देखील आहे आणि त्याचे जनकत्व देखील थॉमस एडिसनकडेच जाते हे तुम्हाला ठाऊक आहे का?

अर्थात टॅटू कसा बनवायचा याचा शोध लावणं हे त्यांचं स्वप्न किंवा कार्य नव्हतं. दुसरा एक शोध लावताना अनायासेच या टॅटू मशीनचाही शोध लागलेला आहे.

१८७६ मध्ये एडिसन यांनी एक इलेक्ट्रीकल पेन बनवल आणि त्याचे पेटंट मिळवले. त्याआधी कोणत्याही कागदपत्रांची नक्कल काढायची तर ती हाताने लिहूनच काढावी लागत असे.

त्यामुळे एकापेक्षा जास्त कॉपी काढणे हे त्रासाचे काम होते. त्यांनी या नवीन पेनसाठी इलेक्ट्रीकल छोटी मोटार वापरली.

त्यामुळे वापरकर्त्याच्या हालचालींप्रमाणे पेन वरखाली होईल आणि कागदपत्रांची एक स्टेन्सिल तयार होईल अशी त्यात सोय होती.

या इलेक्ट्रिकल पेनचे डिझाईन तुम्ही पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल, की ते अगदी आताच्या टॅटू मशीनसारखेच दिसते.

 

tatto edison inmarathi
huffpost

 

मात्र या इलेक्ट्रिकल पेनला बाजारात फारशी मागणी मिळाली नाही. ते पेन तसेच पडून राहिले.

जर सॅम्युएल ओ’रीलीसारखे हुशार टॅटू कलाकार नसते, तर आज हे इलेक्ट्रीकल पेन इतिहासजमा झाले असते. त्यांचा काहीही उपयोग राहिला नसता.

मात्र सॅम्युएलच्या डोक्यात आले, की या पेनचा उपयोग टॅटू काढण्यासाठी केला तर?

या पेनाचा उपयोग टॅटू मशीन म्हणून कसा आणि कधी झाला?

८ डिसेंबर १८९१ साली ओ’रेलीने या पेनचे पेटंट आपल्या नावावर मिळवले. मात्र त्या पेटंटच्या कागदात स्पष्ट लिहिलेले आहे,

 

samuel o inmarathi
dosis de tinta

की हा इलेक्ट्रीकल पेन म्हणजे थॉमस एडिसनच्या अनेक संशोधनांपैकी एका संशोधनाचा भाग आहे.

या पेनमध्ये शाई साठवण्याची जागा होती आणि तिथून जी सुई निघते ती या शाईला घेऊन त्वचेला छिद्र करत पुढे चालत होती. अशा रितीने टॅटू मशीनचा जन्म झाला.

या मशिनचे आणखी एक वैशिष्ट्य असे होते, की त्या मशीनला एकावेळी पाच सुया लावता येऊ शकत होत्या.

याचा अर्थच असा होता, की कलाकाराला गरजेप्रमाणे अजून विस्ताराने पण कमी वेळात काम करता यावे. अर्थात हा बदल त्या मूळ पेनमध्ये सॅम्युएल ओ’रेलीने केला होता.

त्यामुळे हे टॅटू मशीन सेकंदाला दोन ते तीन छिद्रांऐवजी सेकंदाला ५० छिद्रे करू शकत होते.

 

tattoo old inmarathi
buzzworthy tattoo history

 

टॅटू क्रांती :

त्यानंतर या टॅटू मशीनने जगभरात टॅटू उद्योगात किती क्रांती घडवून आणली आहे ते आपणा सगळ्यांना ठाऊक आहे.

आज हा टॅटू काढून घेण्याचा छंद जगभरातील तरूणांना लागलेला आहे, आणि हा व्यवसाय चांगलाच फोफावलेला आहे.

सॅम्युएल ओ’रेलीचे हे मशीन आणि त्याने काढलेले टॅटू बघायला देशभरातून लोक त्याच्याकडे येत. या मशीनच्याच सहाय्याने पुढे अनेक कलाकारांनी अमाप पैसा कमवून त्यावर आपली घरे बांधली.

लवकरच या टॅटू मशीनला उद्योगक्षेत्रातून मोठी मागणी येऊ लागली. परंतु या मशीनचे पेटंट घेऊनही सॅम्युऐल ओ’रीली काही म्हणावा तसा श्रीमंत झाला नाही.

तो आयुष्यभर न्यूयॉर्कच्या दुकांनातून लोकांना टॅटूच काढून देत राहिला. अगदी सन १९०८ मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत!

मागच्या १२० वर्षांत या मशीनच्या डिझाईनमध्ये किरकोळ बदल वगळता फारसे बदल झालेले नाहीत.

याचा अर्थ एडिसन आणि ओ’रेलीने बनवलेले ते इलेक्ट्रीकल पेन किंवा आता टॅटू मशीन म्हणू या, ते परिपूर्ण होते. आजही ते तसेच्या तसेच वापरले जाते.

 

tattoo machine inmarathi
tattooland.com

 

म्हणजेच या शतकातील एका उत्कृष्ट शोधाचे ते प्रतिक आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

कलाकार आपल्या सोयीनुसार आपल्या मशीन्समध्ये बदल घडवून आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि त्याप्रमाणे नवनवीन बदल होत जुने मॉडेल कालबाह्य होत जाते.

मात्र हे मशीन त्याला काहीसे अपवाद आहे.

त्यामुळे आता जेव्हा कधी तुम्ही आपल्या शरीरावर टॅटू काढून घ्याल आणि त्याचा आनंद साजरा कराल, तेव्हा सॅम्युएल ओ’रेलीला विसरू नका,

कारण त्यानेच या मूळ शोधात कल्पक बदल करून ठेवल्यामुळे आज तुम्हाला टॅटूचा आनंद घेता येतोय. आणि हो, त्याचा मूळ जनक थॉमस एडिसनलाही विसरू नका.

त्याचेही आभार जरूर माना. कारण शेवटी या टॅटू मशीनचा खरा संशोधक तोच आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?