आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आजवर जेवढे क्रूर हुकुमशहा होऊन गेले त्यांच्यात एकच साम्य होते ते म्हणजे- या सर्वाना सत्तेची हाव होती आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याची आस होती. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकत होते आणी त्यांनी तसे केले देखील.
कित्येक निष्पाप लोकांचे जीव घेऊन आपला धाक निर्माण करता येतो हा त्यांचा मूळ समजच त्यांना हुकुमशहा सिद्ध करण्यास पुरेसा होता. लोकांना सोबत घेऊन देखील सत्ता चालवली जाऊ शकते ही गोष्ट त्यांच्या गावीच नव्हती मुळी!
या नाझी, फॅसिस्ट, कम्युनिस्ट आणि लष्करी हुकूमशहांनी जगाचा संपूर्ण इतिहास कलंकित केला आणि लोकांच्या नजरेत ते कायमचे व्हिलन बनून राहिले..! चला जाणून घेऊया इतिहासातील या सर्वात क्रूर राज्यकर्त्यांबाबत!
१. हायडेकी टोजो (१९४१-१९४५), लष्करी राजवट, (जपान)
टोजो जपानचा इंपेरियल जपानी सेनेचा जनरल व दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानचा पंतप्रधान होता. पर्लहार्बर हल्ल्यास जबाबदार असलेल्या टोजोमुळे जपान व अमेरिकेत युद्ध सुरू झाले होते.
युद्ध संपल्यानंतर टोजोला अटक करून जपानी युद्ध गुन्ह्यासाठी इंटरनॅशनल मिलिट्री ट्रायब्युनल फॉर द ईस्टने २३ डिसेंबर १९४८ रोजी फाशीची शिक्षा दिली. टोजोला चीन, फिलिपाइन्स व इंडोनेशियातील लाखो लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले जाते.
२. पॉल पॉट (१९७५-१९७९), कम्युनिस्ट राजवट, (कंबोडिया)
पॉल पॉट डेमोक्रेटिक कंपुचियाचा पंतप्रधान होता. एप्रिल १९७५ मध्ये कंबोडियाचा नेता बनल्यानंतर त्याने अग्रेरियन समाजवाद लागू केला. त्याने शहरातील रहिवाशांना सामूहिक शेतीत वेठबिगार म्हणून काम करण्यास भाग पाडले.
कुपोषण, बिगारी, वैद्यकीय सेवेचा अभाव व फाशी या कारणांमुळे २१ टक्के कंबोडियाची लोकसंख्या संपली. त्याच्या कार्यकाळात २० ते ४० लाख मृत्युमुखी पडल्याचे बोलले जाते.
३. किंग लियोपोल्ड दुसरा (१८६५-१९०५), हुकूमशाही राजवट, (बेल्जियम)
बेल्जियमचा राजा लियोपोल्ड दुसरा याने १७ डिसेंबर १८६५ रोजी सत्ता मिळवली. त्यास प्रामुख्याने कांगो फ्री स्टेटच्या वैयक्तिक प्रकल्पाचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्याने कांगोवर आपला दावा करण्यासाठी वेल्सचे र्जनालिस्ट व दक्षिण आफ्रिकेत एक्सप्लोरेशनसाठी प्रसिद्ध हेन्री मॉटोन स्टॅनलीचा वापर केला.
वैयक्तिक हितासाठी त्याने कांगोला निर्दयीपणे चिरडले. सुरुवातीला कांगोमधून हस्तिदंतांचा साठा करण्यात आला आणि नंतर रबराचे दर वाढल्यानंतर रबराच्या झाडांचा चीक गोळा करण्यासाठी लोकांना भाग पाडले.
४. जोसेफ स्टॅलिन (१९२९-१९५३), कम्युनिस्ट राजवट, (सोव्हिएत संघराज्य)
लेनिनचा वारसदार स्टॅलिन सामूहिक हत्येबाबत माओनंतर दुसर्या क्रमांकावर आहे. लेनिनच्या मृत्यूनंतर १९२४ मध्ये त्याने सत्ता हस्तगत केली आणि हळूहळू पक्षातील सर्व विरोधकांना ठार मारले.
एवढेच नव्हे तर १९३९ मध्ये त्याने आपल्याच हत्येचा कट रचल्याचा आरोप करत १३ रशियन नेत्यांना मृत्युदंड दिला.
स्टॅलिनने युक्रेनमध्ये लाखो सधन शेतकर्यांची हत्या केली किंवा त्यांच्याकडून बळजबरी जमीन हिसकावून घेतली. त्याने लाखो लोकांना गुलाम बनवून गुलागमध्ये पाठवले.
५. मेंगिस्तू हेली मरियम (१९७४-१९७८), लष्करी राजवट, (इथिओपिया)
मेंगिस्तू हेली मरियम इथिओपियन राजकारणी आहे. १९७४ ते १९७८ दरम्यान तो डर्ग नावाच्या कम्युनिस्ट लष्करी सरकारमध्ये महत्त्वाचा अधिकारी होता. त्याने पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी व डर्गविरोधात चालणार्या विरोधी गटांच्या हिंसक मोहिमेस (ज्यास इथिओपियन रेड टेररही म्हणतात) पायबंद घातला.
इथिओपियातील यादवी युद्ध संपल्यानंतर तो झिम्बाब्वेला पळून गेला. त्याच्या गैरहजेरीत इथिओपियन न्यायालयाने त्याला नरसंहाराचा दोषी ठरवले.
६. अॅडॉल्फ हिटलर (१९३३-१९४५), हुकूमशाही राजवट, (जर्मनी)
अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाने केलेला होलोकॉस्ट (नरसंहार) मानवतेच्या इतिहासाला लागलेला सर्वात मोठा डाग आहे. दुसर्या महायुद्धात करण्यात आलेल्या नरसंहारात ज्यू लोकांना लक्ष्य बनवण्यात आले होते.
हिटलरच्या आदेशावरून लष्कराने पोलंडवर आक्रमण केले. फ्रान्स व ब्रिटनने पोलंडला सुरक्षा देण्याचे वचन दिले होते.
त्यामुळे त्यांनी र्जमनीविरुद्ध युद्ध पुकारले. अशा प्रकारे दुसर्या महायुद्धास सुरुवात झाली. या युद्धात अमेरिका सामील झाल्यानंतर हिटलरचे सैन्य डगमगू लागले होते.
एप्रिल १९४५ मध्ये रशियाने हल्ला चढवल्यानंतर हिटलरने आत्मघात केला. कोट्यवधी लोकांचा बळी गेला आणि युरोप उद्ध्वस्त झाला.
७. माओ-त्से-तुंग (१९४९-१९७६), कम्युनिस्ट राजवट, (चीन)
चीनचे तथाकथित कर्णधार म्हटले जाणारे माओ-त्से-तुंग इतिहासातील सर्वात मोठे खुनी आहेत. त्यांना ‘माओ झेडाँग’ या नावानेही ओळखले जाते. देशात कम्युनिस्ट राजवट लागू झाल्यानंतर त्यांनी अनेक लोकांची हत्या घडवून आणली होती. त्यातील बहुतांश लोक चिनी होते.
साठच्या दशकात गेट्र लीप फॉरवर्ड या सांस्कृतिक क्रांतीतून पसरलेल्या उपासमारीमुळे व छळछावणीतील अत्याचारामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. आर्थिक अव्यवस्थापन व निरंतर राजकीय बंडामुळे चीनमधील लाखो लोक दारिद्रय़ात खितपत पडले.
त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी चीनने भांडवलशाही स्वीकारली.
८. इनवर पाशा (१९१५-१९२०), लष्करी राजवट, (तुर्की)
इनवर पाशा नावाने प्रसिद्ध असलेल्या ऑटोमन तुर्कीच्या या लष्करी शासकाचे नाव इस्माइल इनवर होते.
बाल्कन युद्ध व पहिल्या महायुद्धात तो प्रमुख नेता होता. त्याला युद्ध गुन्हे व अर्मेनिया नरसंहार, ग्रीक नरसंहार व अश्शुनियन नरसंहारासोबतच मोठय़ा प्रमाणात लोकांच्या हत्येस जबाबदार धरले जाते.
त्याच्या मृत्यूबाबत अनेक प्रकारचे दावे करण्यात येतात. त्याच्या एका सहकार्यानुसार, लढाईत एक गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता.
९. किम इल संग (१९४८-१९९४), कम्युनिस्ट राजवट, (उत्तर कोरिया)
कोरियन कम्युनिस्ट नेता किम इल संगने १९४८ ते १९९४ पर्यंत आजीवन शासन केले. १९४८ ते १९७२ पर्यंत पंतप्रधान व १९७२ ते १९९४ पर्यंत तो राष्ट्राध्यक्ष होता.
त्याच्या कार्यकाळात किमान १६ लाख नागरिक व राजकीय विरोधक जीव गमावून बसले.
दक्षिण कोरियावर हल्ला करण्याच्या निर्णयात सोव्हिएत संघराज्याचा हात नव्हता, हे अभिलेखीय सामग्रीवरून सिद्ध होते. दक्षिण कोरियावर हल्ला करण्यास किमनेच मदत केली होती.
१०. याकुबू गोवोन (१९६७-१९७०), लष्करी राजवट, (नायजेरिया)
याकुबू १९६७ ते १९७० दरम्यान नायजेरियाच्या लष्करी सरकारचा प्रमुख होता. त्याने एक लष्करी उठावानंतर तख्तपालट करून सत्ता हस्तगत केली होती.
याकुबूने आपल्या राजवटीत १९६६ ते१९७० दरम्यान बायफ्रा चळवळ (औपचारिकरीत्या पूर्व क्षेत्र नायजेरियातून वेगळे करण्याची मागणी) व नायजेरियेन यादवी युद्धाचे यशस्वीपणे मोडून काढले होते, त्यात जवळपास दीड लाख सैनिक व १० लाख नागरिक मारले गेले.
या क्रूर शासकांना अखेर त्यांच्या क्रूरपणाची शिक्षा मिळालीच. पण त्यांचे देश त्या आठवणींमधून अजूनही बाहेर पडू शकले नाहीत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.